आज मार्गशीर्ष शु॥ ६ म्हणजे #चंपाषष्ठी.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. या उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवतात. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात. षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती करतात.
खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा #येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, वांगी इ. पदार्थ या दिवसापासून खाणे विहित मानले जाते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.
आता खंडोबा विषयी थोडेसे, खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय. त्याला मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला, #वीरशैव पंथातील दैवत. कानडीत खंडोबाला #मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर #नेवासे गावचा. लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणाऱ्या पत्नीला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.
पुढे शिकारी ला गेल्यावर देव #खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला. तिथे त्याच प्रेम #बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण #म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले, खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो, ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत. पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.
खंडोबा किंवा #खंडेराय हे मुख्यत्वे #महाराष्ट्र, #कर्नाटक, #आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय #हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने #गोसावी, #मल्हारकोळी, #मातंग, #मराठा, #सोनकोळी, #वैती, #आगरी, #गवळी, #माळी, #कुणबी, #भंडारी, #वाडवळ, #खारवी, #भोई, #कराडी, #रामोशी (नाईक), #धनगर समाजाचे, तसेच कित्येक ब्राम्हण व प्रभु समाजातील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात #म्हाळसा, #बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो.
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसर्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी (मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी (येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
#मल्हार हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार "मल्लार" असा आहे.
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकतीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापार्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले. खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते असे ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख मोहरा अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.
खंडोबाची प्रतिके : खंडोबाची प्रतिके विविध आहेत. लिंग, तांदळा, मूर्ती, टांक ही प्रतिके आज रूढ आहेत.
#कुळाचार : हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे. कुळाचारात जागरण (गोंधळ) हा एक प्रकारच विधी आहे. देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
#तळी भरणे : तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
#तळीभंडार
---------------------
हरहर महादेव,
चिंतामणी मोरया,
आनंदीचा उदे उदे,
भैरोबाचा चांगभले,
बोल अहंकारा,
सदानंदाचा येळकोट!
येळकोट येळकोट जयमल्हार
अगडधूम नगारा,
सोन्याची जेजुरी,
देव आले जेजुरा,
निळा घोडा,
पायात तोडा,
कमरी करगोटा,
बेंबी हिरा,
मस्तकी तुरा,
अंगावर शाल,
सदाही लाल,
आरती करी,
म्हाळसा सुंदरी,
देव ओवाळी नानापरी,
खोब-याचा कुटका,
भंडाराचा भडका,
बोल अहंकारा,
बोला सदानंदाचा येळकोट!
येळकोट येळकोट जयमल्हार !!
अडकेल ते भडकेल,
भडकेल तो भंडार,
बोल बोल हजारी,
वाघ्या मुरुळी,
खंडोबा भगत,
प्रणाम प्रणाम!
बोल अहंकारा,
बोला सदानंदाचा येळकोट!
येळकोट येळकोट जय मल्हार!!
#उपासना : बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास अधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात. खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मातंग, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने त्याला अनेक नवस केले जातात.
मल्हारी #माहात्म्य : संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुधा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० ते १३९८ च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र म्हणतात. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आणि ९३० श्लोक आहेत. मल्हारी माहात्म्य या ग्रंथाशिवाय जयाद्री-माहात्म्य (संस्कृत, कवी ज्ञानदेव?), श्रीमार्तण्ड-विजय (कवी - गंगाधर कमलाकर) , श्री मल्हारी मार्तंड विजय (कवी माणिकप्रभु) हे खंडोबावरील इतर मराठी काव्यग्रंथ आहेत.
(संदर्भ -मल्हारी महात्म्य ग्रंथ )
जाणून घ्या आदिशक्ती आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा
https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/10/blog-post_24.html