Showing posts with label कसारा घाट. Show all posts
Showing posts with label कसारा घाट. Show all posts

Monday, 31 May 2021

कसारा घाटातील अहिल्याबाई होळकर विहीर उर्फ टोपाची विहीर

 कसारा घाटातील अहिल्याबाई होळकर विहीर उर्फ टोपाची विहीर

https://youtu.be/KrLWUk4-p5M

मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’ आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस उंच डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, इग्लूच्या आकाराचे दगडी बांधकाम दिसते. हे बांधकाम म्हणजे सुमारे  तीस ते पस्तीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरतात.

जुन्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्पर असलेले बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले. सुमारे २५० वर्षे जुनी असलेली ही विहीर अद्यापही सुस्थितीत व वापरात आहे. इतक्या उंचावर असूनही कडक उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीला भरपूर पाणी असते हा एक चमत्कारच मानावा लागेल. 

अहिल्याबाई होळकरांनी अखिल भारतवर्षात आसेतुहिमाचल असंख्य तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोया व धर्मशाळा बांधल्या. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली आहेत. 

अशा या प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, रणरागिणी, धर्मपरायण व तपस्विनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना  जयंती निमित्त निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!!!





Saturday, 17 October 2020

#शैलपुत्री उर्फ घाटनदेवी कसारा घाट,इगतपुरी

 #शैलपुत्री उर्फ #घाटनदेवी कसारा घाट,इगतपुरी


शैलपुत्री उर्फ घाटनदेवी, कसारा घाट, इगतपुरी


प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चंद्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्।। 

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च। सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्।। 

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नमानि ब्रह्मणैव महात्मना ।।

श्रीदुर्गा सप्तशतीमधील या सुप्रसिद्ध श्लोकात दुर्गेची नऊ रूपं वर्णन केली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदायी. यातली पहिली जी शैलपुत्री तिचं मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे.  भगवती शैलपुत्री ही दुर्गेच्या नऊ रूपांतील प्रथम रूप. पर्वतराज हिमालयाची ही कन्या शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध आहे. शैल म्हणजे पर्वत. पर्वतात माणिक, रत्ने व इतर मौल्यवान प्रकारचा साठा उपलब्ध आहे. हा मौल्यवान साठा सहज उपलब्ध असूनही भौतिक सुखाकडे आकर्षित न होता त्याचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी ही शैलपुत्री आहे. 


या देवीचे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी म्हणतात. शैलाधिराज तनया असलेली ही तेजस्वी देवी वज्रेश्वरीहून निघाली. रस्त्यात तिने या ठिकाणी विश्रांती घेतली. इथला सुंदर व नयनरम्य निसर्ग पाहून ती येथेच कायमची स्थिर झाली, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिरातील शैलपुत्री उर्फ घाटनदेवीची मूर्ती अतिशय प्रसन्न व देखणी आहे. देवीचे लोभस आणि तेजस्वी रूप भक्तांच्या आकर्षणाचे मुख्य कारण आहे. देवीची ही मूर्ती संगमरवरी असून, देवी सिंहावर बसलेली  व अष्टभुजा आहे. तिच्या प्रत्येक हातात आयुध आहे. उजवा हात अभय मुद्रेत असून  माता प्रसन्न मुद्रेने भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचा पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते. शेंदूरचर्चित असलेली घाटनदेवीची जुनी मूर्ती म्हणजे तांदळा नवीन मंदिरातही तसाच अचल स्वरूपात पूर्वीच्याच ठिकाणी जसाच्या तसा ठेवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते, त्यावेळी खुद्द त्यांनी घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून दर्शन घेतले असल्याची ऐतिहासिक नोंद आहे.  


उंटदरी नावाचे सृष्टिसौंदर्याने नटलेले निसर्गरम्य ऐतिहासिक स्थान घाटनदेवी मंदिराजवळच आहे. पूर्वी जव्हारकडून पुण्याकडे मावळ भागात जाणारा रस्ता याच उंटदरीवरून जात होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा नदीचा उगम याच उंटदरीत झाला आहे. कल्याणचा खजिना लुटून या दरीत उंट लोटले म्हणून या दरीला उंटदरी असे नाव पडल्याची आख्यायिका या परिसरात सांगितली जाते. 


या मंदिरात जागोजागी आपल्याला घंटा बांधलेल्या दिसतात. इतरत्र कोणत्याही मंदिरात पाहायला न मिळणारे वेगळेपण इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिरात पाहायला मिळते, ते म्हणजे या मंदिरात पितळेच्या लहान-मोठ्या अनेक घंटा जागोजागी बांधलेल्या दिसतात. भाविक स्त्री-पुरुष देवीला नवस करताना ‘माझी अमुक इच्छा सफल होऊ दे, म्हणजे मी देवीला पितळी घंटा वाहीन,’ असा नवस करतात आणि त्यांची इच्छापूर्ती झाल्यानंतर त्याचे प्रतिक म्हणून देवीला घंटा अर्पण करतात. 


















सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...