Showing posts with label दीपावली. Show all posts
Showing posts with label दीपावली. Show all posts

Saturday, 2 November 2024

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक... दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा


अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी उत्तर व मध्य भारतात नवीन विक्रम संवत सुरू होते.
    
अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरविण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिपले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा अहंकारी झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला, की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. आजच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असे मानले जाते. या दिवशी आपल्याकडे सर्व दुःख बाजूला ठेवून आपल्या राजाचे स्वागत केले जाते. नवीन कपडे, गोड पदार्थ, रोषणाई केली जाते. आजही ग्रामीण भागात माताभगिनी आपल्या घरातील पुरुषांना ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी प्रार्थना करतात. बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. 

मध्य व उत्तर भारतात सुरु होणा-या विक्रम संवतच्या नवीन वर्षाच्या अनुषंगाने पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारीलोक वर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो.

अशा या आपल्या न्यायी व प्रजाहितदक्ष राजाची आठवण करून देणाऱ्या बलिप्रतिपदेनिमीत्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
🪔🪔🪔

Wednesday, 11 November 2020

वसुबारस

#वसुबारस
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
काही ठिकाणी या दिवशी  कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.

यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा होय.

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया॥
परमपुज्य जी वंद्य या भारताला।
*नमस्कार त्या दिव्य गो देवतेला॥*

गायीचे मानवी जीवनातले स्थान अनन्यसाधारण आहे . अनादिकालापासून मनुष्यप्राणी शेती करून जगतो आहे . जगात जिथे जिथे म्हणून सुसंस्कृत लोकांनी वस्ती केली तिथे तिथे त्यांनी शिकारीवर गुजराण करणे बंद करुन शेतीवर पोट भरावयास सुरुवात केली . बाल्यावस्थेपासून मानवास गोमाताच दूध देई व शेतीची सर्व अवजड कामे करणाऱ्या बलवान बैलांची जननी देखील गोमाताच !अशा रितीने सर्व जगाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पोसणारी गोमाता जी भारतीयांना परम वंदनीय आहे तिला पुजण्याचा आज दिवस !वसुबारस

🌟शुभ दीपावली..🌟


सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...