Showing posts with label त्रिरश्मी लेणी. Show all posts
Showing posts with label त्रिरश्मी लेणी. Show all posts

Wednesday, 9 June 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ६) लेणी क्रमांक १७ ते १९

मागील लेखांमध्ये आपण लेणी क्र १ ते १६ अशी माहिती पाहिली. आज आपण १७ ते १९ ही अत्यंत महत्वाची लेणी जाणून घेऊयात.


लेणे क्रमांक १७, "यवन विहार" (कालावधी अंदाजे ख्रिस्ताब्द १२०) 


हे लेणे ग्रीक वंशीय म्हणजेच यवन असलेल्या धम्मदेवाचा पुत्र इंद्राग्नीदत्त या भाविकाने खोदवून घेतले आहे. तो आपल्या वडिलांचा उल्लेख दत्तमिती (हे म्हणजे प्राचीन ग्रीकमधले दिमेत्रीपोलिस किंवा दिमित्रीस शहर असावे)  या शहराचा रहिवासी असणारा 'यवन' असा करतो. त्यामुळे या लेण्याला 'यवन विहार' या नावाने ओळखले जाते. हे लेणे इ.स्. १२० मध्ये खोदले गेले आहे. इंद्राग्नीदत्त हा नहपानाचा समकालीन मानला जातो. 

या लेण्याचा व्हरांडा तुलनात्मकदृष्ट्या बराच छोटा आहे. दर्शनी भागातील चार स्तंभ अष्टकोणी, स्तंभाशीर्षासहित नहपान विहाराप्रमाणेच सुरेख व घाटदार आहेत. स्तंभशीर्षांवर हत्ती व स्वार कोरलेले आहेत. व्हरांड्याच्या एका बाजूला एका छोट्या कक्षाचे अर्धवट काम केलेले दिसते. व्हरांड्याच्या भिंतीवरच इंद्राग्नीदत्ताचा ब्राह्मी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखात इंद्राग्नीदत्ताने सदरचे लेणे व पाण्याचे टाके त्याच्या मातापित्याच्या स्मृतीप्रित्यर्थ खोदवून ते धम्मसंघाला अर्पण केले असल्याचा उल्लेख येतो. 

या लेण्याच्या अंतर्भागात फारसे शिल्पकाम केले आढळत नाही. आत दोन स्तंभ स्तंभशीर्षांसहित कोरलेले आहेत. आतमध्ये गाभारा खोदलेला आहे. गाभा-यासमोरचे दोन्ही स्तंभांचे काम अर्धवट राहिलेले दिसते. यांवरील स्तंभशीर्षांवर हत्ती व माहूत व काही स्वार कोरले आहेत. गाभा-याचेही काम अर्धवट सोडलेले दिसते. गाभा-यातील बैठकीवर मूर्ती कोरलेली नाही. मात्र ब-याच कालावधीनंतर या बैठकीवर अर्धवट शिवलिंग व शाळुंका कोरण्याचा प्रयत्न केला आहे. या गाभा-याच्या दर्शनी भिंतीवर एका बाजूला जवळपास ३.५ फूट उंचीची उभी बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे. अर्थात हे शिल्पकामही बरेच नंतर म्हणजे इ.स्.सहाव्या शतकात केलेले दिसते. या शिल्पावर महायान पंथियांच्या कामाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.  याशिवाय या विहारात १६ कक्ष खोदलेले आहेत. 


लेण्याचा दर्शनी भाग  



व्हरांड्याच्या भिंतीवर दरवाज्याच्या वर कोरलेला शिलालेख दिसत आहे.



स्तंभ शीर्ष  



 गाभारा व त्याच्या समोरील अर्धवट कोरलेले स्तंभ


गाभा-याच्या भिंतीवर कोरलेली उभी बुद्धप्रतिमा 


गाभा-यात अर्धवट कोरलेले शिवलिंग, जे ब-याच नंतरच्या काळात कोरले गेले. 

शिलालेख




लेणे क्रमांक १८: चैत्य 

लेणे क्रमांक १८ हे एक चैत्यगृह आहे. या लेणीसमूहातील हे एकमेव चैत्यगृह आहे. हे लेणे या लेणीसमूहातील इतर लेण्यांपेक्षा बरेच आधी खोद्ले गेले आहे. या लेण्यात असलेल्या शिलालेखांवरून नक्की कालगणना शक्य नसली तरी या शिलालेखात महा हकुसिरी (महाहकुश्री) च्या उल्लेखामुळे तसेच या चैत्यगृहाच्या आराखड्यानुसार व याच्या समकालीन कार्ले व बेडसे इ. इतर ठिकाणाच्या चैत्याच्या वैशिष्ट्यानुसार या लेण्याचा कालावधी थेट ख्रिस्तपूर्व दुस-या शतकापर्यंत जातो.  

या चैत्यगृहाचे प्रवेशद्वार अत्यंत  आकर्षक व नाजुक कलाकुसरीने अलंकृत आहे. प्रवेशव्दार चौकोनी आहे व त्याच्या भिंतींना लाकडी दरवाजे अडकविण्या करिता छिद्रे पाडलेली आहेत. या प्रवेशद्वारावर इतर ठिकाणांप्रमाणेच पिंपळपानाकृती कमान मात्र दुहेरी स्वरुपात कोरली आहे. त्यातल्या छोट्या कमानीमध्ये अत्यंत नाजुक असे वेलबुट्टीचे नक्षिकाम, बौद्ध धर्माचे प्रतिक असलेले रत्नत्रया चिन्ह व त्याच्या दोन्ही बाजुला हत्ती, घोडे व वृषभ इ. प्राणी नजाकतीने कोरलेले आहेत. या कमानीच्या आजुबाजूला दर्शनी भागात काष्ठवास्तुप्रमाणे तुळया कोरलेल्या आहेत तसेच या तुळ्यांच्या टोकाला मानवी चेहरेही दाखवले आहेत. अशा वास्तुरचनेला ‘डेन्टिल्स’ म्हणतात. अशा प्रकारचे डेंटिल्स प्राचीन ग्रीक अथवा रोमन वास्तुकलेमध्ये  आढळतात. म्हणज या चैत्यगृहाच्या वास्तुरचनेतही ग्रीक वास्तुकलेचा संगम झालेला दिसतो. 

वरच्या मोठ्या कमानीभोवती यक्ष, बुद्धाचे उपासक, अनेक छोट्या भित्तीकमानी, स्तूपांची रचना, भित्तीस्तंभ व वेलबुट्टीची नक्षी कोरलेले आहे.  

आतले सभागृहाचे छत गजपृष्ठाकार असुन यावर तुळया सारख्या दगडाच्या पट्ट्या कोरलेल्या व त्या शेजारी लहान छिद्रे आहेत. त्यात कदाचित लाकडाच्या पटटया अडकविल्या जात असाव्यात. सभागृहाला सतरा अष्टकोनाकृती खांब आहेत. या पैकी काही खांबांवर शिलालेख कोरलेले आहेत. मध्यभागी साधारणापणे ५.५ फूट व्यासाचा व ६.३ फूट उंचीचा दंडगोलाकृती स्तुप (दागोबा) आहे. त्यावर हर्मिका आहे. त्यावरचे लाकडी छत्र नाहीसे झालेले आहे, मात्र त्याच्या खाचा अद्याप शिल्लक आहेत. खांब व दागोबाच्या पाठीमागून प्रदक्षिणापथ आहे.  

चैत्यगृहात एकूण तीन शिलालेख आहेत. त्यापैकी एका शिलालेखात  हे चैत्य निर्माण करण्याबाबत उल्लेख आला आहे. तो असा महाहकुसिरीची नात, राजकीय अधिकारी अगियतनकाची पत्नी व कपननकाची माता, भट्टपालिका हिने हे चैत्यगृह तिरन्हू (त्रिरश्मी) पर्वतावर निर्माण केले आहे. 

या शिलालेखामुळेच या चैत्यगृहाच्या निर्माणाचा कालखंड ठरविता आला. भट्टपालिका सातवाहन कुळातील महाराणी नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. म्हणजेच हे चैत्यगृह क्षत्रप नहपान व गौतमीपुत्राच्या ही आधी खोदले गेले आहे, असे म्हणता येते.

प्रवेशद्वारावरील शिलालेखात प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे नाशिक परिसरातील जनतेतर्फे म्हणजेच लोकांनी वर्गणी गोळा करुन देणगी म्हणून अर्पण केले आहे. 

 

लेणे क्रमांक १८ चे दुरून होणारे दर्शन


प्रवेशद्वारावरील दुहेरी पिंपळपानाकृती कमान


कमानीत कोरलेले त्रिरत्न चिन्ह व सुरेख नक्षीकाम


आतील स्तुप व भोवती घटाकृती आधारावर कोरलेले खांब

चैत्याचा अंतर्भाग


स्तुपाचे जवळून दर्शन


खांबावरील उभा शिलालेख


कमानींचा बाजूचे सुरेख नक्षीकाम व शिल्पकाम

चैत्यगृहाचा आराखडा


लेणे क्र .१९  कृष्ण विहार (कालावधी इसवीसनपूर्व १०० ते ७०) 

लेणे क्र. १९.
दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेले जाळीदार गवाक्ष

हे लेणे लेणे क्र. २० च्या थेट खालच्या तळमजल्यावर खोदलेले आहे.  हे लेणे म्हणजे एक छोट्या चौरस आकाराचा विहार असून आतमध्ये सहा कक्ष खोद्लेले आहेत. या लेण्यातील सभागृह व सर्व कक्ष अगदी परिपूर्ण चौरस आकारात खोदलेले आहेत. सर्व कक्षांच्या  दरवाज्यांवर पिंपळपानाकृती कमान व काही ना काही नक्षी कोरलेली आहे. या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. दरवाजासमोर व्हरांड्यांत दोन चौकोनी स्तंभ आहेत. तर व्हरांड्याच्या दोन्ही बाजूंना दोन देवड्या खोदलेल्या आहेत. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजुच्या खिडकीवर एक शिलालेख कोरलेला आहे. हाच तो सातवाहन राजा पहिला कण्ह (कृष्ण)याचा लेख. या शिलालेखामुळेच हे लेणे 'कृष्ण विहार' म्हणून ओळखले जाते.  


लेणे क्रमांक १९ ही लेणे क्रमांक २० च्या खाली स्थित आहे .


विहारातील कक्ष व त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण कमानी
(अशा प्रकारे विहारातील कक्षांवर नक्षीकाम केवळ याच लेण्यात आढळते)



विहाराचा आराखडा

या शिलालेखात "सातवाहन घराण्यातील राजा कान्हाच्या कारकिर्दीत हे लेणे नासिक येथील श्रमण संघाच्या प्रभारी बनविली आहे" असा उल्लेख आहे.हा शिलालेख इ.स.पू. १००-७० मधील सातवाहनांचा ज्ञात असलेला सर्वात जुना शिलालेख आहे. त्यामुळे हे लेणे या लेणी समुहातील सर्वप्रथम कोरले गेलेले लेणे ठरते.  

क्रमशः

(संकलन - अशोक दारके)





Monday, 24 May 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ५) लेणी क्रमांक १० ते १५

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक 

लेणी क्रमांक १० ते १५


लेणे क्रमांक १० "नहपान विहार" :



हे लेणे हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा विहार आहे. स्तंभ, व्हरांडा, विहार व आतल्या खोल्या अशी या विहाराची रचना आहे. यात नहपानांचे एकूण सहा शिलालेख आहेत. 

हे लेणे क्र. १०  विदेशी क्षत्रप नहपान यांनी ख्रिस्ताब्द शके १२० मध्ये खोदवून घेतले. त्यामुळे हे लेणे 'नहपान विहार' म्हणून ही ओळखले जाते. 

इथे लेणी क्र.३ प्रमाणेच लेण्याची सुरूवात व्हरांड्यातील स्तंभांपासून होते. इथे सहा स्तंभ(दोन भित्तीस्तंभांसह - Pilasters) कोरलेले आहेत. हे स्तंभ या लेणीसमूहातील इतर लेण्यांपेक्षा अधिक कलात्मकरित्या कोरलेले आहेत. या स्तंभाचा आधार असलेले घट घाटदार असून स्तंभशीर्ष असलेले उलट्या घटांचा आकारही नजाकतदार कोरलेला आहे. या स्तंभांवर दर्शनी बाजुला वरच्या भागात हत्ती,बैल, सिंह इ. प्राणी कोरलेले आहेत. तर मागील बाजूस स्फिंक्ससदृश्य प्राणी (म्हणजे शिर मनुष्याचे व धड प्राण्याचे, बोकड, गरुडाचे डोके व चोच असलेला व चतुष्पाद  प्राण्याप्रमाणे शरीर असलेला प्राणी इ. प्राणी कोरलेले आहेत. हे प्राणी आपल्याला इजिप्त किंवा ग्रीक दंतकथांमध्ये आढळतात. याचाच अर्थ त्याकाळी पाश्चात्यांबरोबर व्यापारासोबतच संस्कृतीचेही आदानप्रदान होत होते हे या बाबींवरुन सिद्ध होते. 

व्हरांड्याच्या दोन्ही बाजूस दोन छोट्या खोल्या खोद्लेल्या आहेत. अशाप्रकारच्या खोल्या ध्यानकक्ष म्हणून वापरात येत असत असे जाणकारांचे म्हणणे आहे. या खोल्या दखमित्रा (दक्षमित्रा) या नहपान या क्षहरात क्षत्रपाची कन्या व दिनिकाचा पुत्र उशवदता याची पत्नी हिने खोदवून घेऊन नंतर धम्मसंघास दान केल्याचा उल्लेख बाजूच्या शिलालेखात मिळतो. 

नहपान विहाराचा अंतर्भाग :

विहारातील सभागृह ४३ फूट रुंद व ४५ फूट लांब असे प्रशस्त आहे. याला तीन दरवाजे आहेत. आत तीन बाजूंना एकूण अठरा कक्ष खोदलेले आहेत व समोरच्या भिंतीवर स्तुपाची रचना व आजुबाजूला दोन स्त्री साधकांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. या स्तुपाच्या जागी भैरवसदृश्य मुर्ती नंतरच्या काळात कोरलेली आहे. मात्र मुळ स्तुपाची हर्मिका व तीन छत्र्या शाबूत आहेत. 

नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णी यांचे समकालीन होता. त्यामुळे या लेण्याची निर्मिती लेणे क्र.३ च्या पुर्वीच्या काळात झाली आहे हे नक्की. व्हरांड्यातील दर्शनी भिंतीवर शिलालेख कोरलेले आहेत. या लेण्यात एकूण ६ शिलालेख कोरलेले आहेत. यापैकी ३ शिलालेख हे क्षत्रप नहपान राजाचा जावई व दिनिकाचा पुत्र उषवदत (ऋषभदत्त) याने धम्मसंघाला दिलेल्या दानाबाबत आहेत. यात उषवदत्त (ऋषभदत्त) याने कोणकोणत्या धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या आणि कोणती धार्मिक कृत्ये पार पाडली याचे विस्तृत विवरण दिलेले आहे. एका शिलालेखात क्षत्रपांच्या सातवाहनावरील विजयाप्रित्यर्थ उषवदत (ऋषभदत्त) याने भिक्कुंच्या अन्नवस्त्रांकरीता तसेच लेणे खोदण्यासाठी ३००० सुवर्णनाणी दान दिल्याचा उल्लेख आढळतो. इतर दोन छोट्या शिलालेखात ऋषभदत्त याची पत्नी दक्षमित्रा हिने संघाला दान म्हणून खोदलेल्या खोल्यांचा उल्लेख केलेला आहे. 

 या लेण्याच्या बाहेरच्या बाजूला आतील भैरवसदृष्य एक मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याच्या शिरामागे पाच फण्यांचा नाग असून तोंडातून बाहेर सुळे आलेले आहेत. उजवा हात कमरेवर ठेवलेला असून डाव्या हातात सोटा किंवा गदासदृष्य हत्यार घेतलेले आहे. ही रक्षकदेवता कदाचित हिंदू अथवा जैनधर्मियांनी नंतरच्या काळात कोरलेली असावी असा अंदाज आहे.

नहपान विहाराचे बाह्यदर्शन 


नहपान विहाराचा व्हरांडा 


विहाराचा अंतर्भाग


स्तूपाच्या जागी कोरलेली भैरवाकृती


चैत्य आणि छत्री


स्तंभ


शिलालेख

शिलालेख

शिलालेख


लेण्याच्या बाहेर कोरलेली रक्षक आकृती

विहाराचा आराखडा


लेणे क्रमांक .११, "जैन लेणी"


लेणे क्रमांक ११  हे  लेणे क्रमांक १० च्या जवळच परंतु थोड्याश्या उंचावर आहे. पाय-या चढून या लेण्या प्रवेश करता येतो. प्रवेशद्वाराजवळ असलेली अर्धवट व्हरांड्यतील दगडी बैठक भंगलेली आहे. या लेण्यातील भिंतींवर जैन धर्मीयांनी जैन तीर्थंकर  ऋषभदेव, वाघावर आरुढ असलेली यक्षी अंबिका व ऐरावतावर आसनस्थ इंद्र यांची शिल्पे कोरली. या लेणीसमूहात हे एकमेव जैन लेणे आहे. साधारणपणे इ. स. ११ व्या शतकात हे मुळचा बौद्ध विहार असलेले लेणे जैन लेण्यात रुपांतर केलेले दिसते. 

या लेण्यात एक शिलालेख आढळातो. या शिलालेखात लेखक शिवामित्र याचा पुत्र रामनक याने हे लेणे दान केल्याचा उल्लेख आहे. 

लेणे ११ (पाय-यांसह) ते १४


लेणे क्र.११ चे प्रवेशद्वार


जैन तीर्थंकर  ऋषभदेव


जैन तीर्थंकर  ऋषभदेव, यक्षी अंबिका व ऐरावतावर आसनस्थ इंद्र यांची शिल्पे 

लेणी क्र .१२-१३-१४

या लेणी म्हणजे भिक्कुंच्या निवासासाठी अथवा साधनेसाठी खोदलेले कक्ष आहेत. यात एक, दोन किंवा तीन कक्ष आहेत. १२व्या क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखावरुन रामनक या वेलीदत्ताच्या मुलाने भिक्कुसंघाला वस्त्र पुरविण्यासाठी १०० काशार्पण एवढ्या नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे. 

लेणे क्रमांक १३ मध्ये फक्त कक्ष आहेत. त्यात कोणताही शिलालेख नाही.

लेणे क्रमांक १४ मध्ये भगवान बुद्ध व बोधिसत्वांची शिल्पे आहेत. 


लेणी क्र. १२, १३, व १४(अत्यंत डावीकडे)


लेणी क्र. १२, १३ बाह्यभाग


लेणी क्र. १२, १३ बाह्यभाग

लेणे क्र.१४, बाहेरून होणारे दर्शन  


लेणे क्र.१४, प्रलंबपादासनात आसनस्थ बुद्ध  (धम्मचक्रप्रवर्तन मुद्रा)


लेणे क्र. १४, बोधिसत्व


लेणे क्र. १४, बोधिसत्व

लेणे क्रमांक १५ :

हे लेणे पूर्वी दोन मजली असावे. सध्याचा अस्तित्वात असलेला भाग म्हणजे पूर्वीच्या लेण्याचे गर्भगृह असावे असा अंदाज आहे. या लेण्याचा पुढचा भाग कोसळून नष्ट झाला आहे. या लेण्यातील शिल्पकलेवर महायान पंथियांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या लेण्यात असलेल्या बुद्धाच्या प्रतिमा सिंहासनावर प्रलंबपादासनात व कमलपुष्पावर पद्मासनात धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बसलेल्या आहेत. शेजारी पद्मपाणी व वज्रपाणी बोधिसत्व तसेच इतर सेवक ही दिसतात. हे शिल्पकाम साधारणपणे इ.स् ५व्या शतकात केलेले असावे. 

लेणे क्र.१५ चे समोरून होणारे दर्शन 


प्रलंबपादासनात बसलेल्या बुद्धाचे भग्न शिल्प 


प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेले बुद्ध व बाजूस बोधिसत्व 


कमलासनावर पद्मासनात आसनस्थ बुद्ध व कमळाच्या देठाला आधार देणारे गंधर्व 


लेण्याचा अंतर्भाग व आतून दिसणारे बाहेरचे दृष्य


पुढील लेखांकात आपण उर्वरीत लेणी पाहूयात.

(क्रमशः)
संकलन : अशोक दारके

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...