महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर जिल्ह्यांच्या परिसरात विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती स्थाने केवळ धार्मिक तीर्थक्षेत्रे नाहीत; ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीचे आठ स्तंभ आहेत, जिथे दगडातून देवत्व प्रकटले आणि शतकानुशतके भक्तांच्या श्रद्धेने त्याला आकार दिला.
अष्टविनायकाची संकल्पना :
"अष्ट" म्हणजे आठ आणि "विनायक" म्हणजे विघ्नहर्ता गणेश — या आठ मूर्ती स्वयंभू (स्वतः निर्माण झालेल्या) मानल्या जातात, म्हणजे त्या कुणा शिल्पकाराने घडवलेल्या नाहीत, तर निसर्गतः त्या रूपात प्रकट झाल्या अशी श्रद्धा आहे. प्रत्येक मूर्तीची सोंड वेगळ्या दिशेने वळलेली आहे, प्रत्येकाचे डोळे, हात आणि मुद्रा भिन्न आहेत — जणू एकाच परमतत्त्वाची आठ भिन्न रूपे. या आठ स्थानांना जोडणारी परंपरा किमान अठराव्या शतकापासून, पेशवाईच्या काळापासून प्रचलित आहे, जेव्हा भक्तांनी विशिष्ट क्रमाने ही यात्रा करण्याची रीत रूढ केली.
अष्टविनायकांची आठ स्थाने आणि त्यांची कथा :
मोरगाव — मयूरेश्वर :
पुणे जिल्ह्यातील कऱ्हा नदीच्या काठी वसलेले मोरगाव हे अष्टविनायकांचे "आदिस्थान" मानले जाते — यात्रेचा प्रारंभ आणि समारोपही येथूनच होतो. सिंधू नामक राक्षसाचा वध करण्यासाठी गणेशाने मोरावर (मयूरावर) आरूढ होऊन येथे अवतार घेतला, म्हणून नाव मयूरेश्वर. श्री मयूरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हणले जाते.
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे . गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस रिद्धि-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर विराजमान आहेत.
सिद्धटेक — सिद्धिविनायक :
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. सिद्धटेक गावात भीमा नदीच्या तीरावर, एका टेकाडावर उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक विराजमान आहे. पुराणकथेनुसार, विष्णूने मधुकैटभ राक्षसांचा पराभव करण्यासाठी येथे गणेशाची आराधना करून "सिद्धी" प्राप्त केली, म्हणून हे नाव. उजव्या सोंडेच्या मूर्तीचे व्रत कठीण मानले जाते, त्यामुळे भक्त येथे विशेष संकल्पाने येतात.
हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शिव, विष्णु, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात. यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे.
पाली — बल्लाळेश्वर :
रायगड जिल्ह्यातील पाली गावी बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. बल्लाळ नामक बालभक्ताच्या अपार गणेशभक्तीची आणि त्याच्या वडिलांनी दिलेल्या शिक्षेची करुण कथा येथे जोडलेली आहे. गणेशाने प्रसन्न होऊन बल्लाळाला दर्शन दिले आणि स्वतः याच नावाने येथे स्थिरावले, अशी आख्यायिका. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.
या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
महड — वरदविनायक :
रायगड जिल्ह्यातीलच महड येथे वरदविनायकाचे मंदिर कोकणच्या हरित निसर्गात वसलेले आहे. येथील मूर्ती स्वयंभू असून तिला "वर" (वरदान) देणारा गणेश म्हणून पूजले जाते. गृत्समद ऋषींना येथे वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद ऋषी हे गाणपत्य संप्रदायाचे आद्य प्रवर्तक समजले जातात. पुरातन काळात महाडचे नाव मणिपूर वा मणिभद्र होते.
या मंदिरातील नंदादीप शतकानुशतके अखंड तेवत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये रूढ आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा प्राचीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले. या मंदिरासंदर्भात एक दंतकथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
थेऊर — चिंतामणी :
पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर चिंतामणी गणेशाचे स्थान आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. "चिंता हरण करणारा" चिंतामणी.
श्रीमोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्रीमोरया यांचे नातू श्रीधरणीधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रुपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.
श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.
लेण्याद्री — गिरिजात्मज :
जुन्नरजवळील डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्यांच्या संकुलातच गिरिजात्मज गणेशाचे स्थान आहे. पार्वतीने (गिरिजा) पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली आणि गणेश येथे "गिरिजेचा आत्मज" म्हणून जन्मला, अशी कथा. सुमारे तीनशे पायऱ्या चढून जावे लागणारे हे एकमेव डोंगरातील गुहामंदिर आहे. श्री गिरिजात्मज लेण्याद्री गणपती हे अष्टविनायकातील एकमेव गणपतीचे मंदिर लेण्यांमध्ये कोरलेले आहे. लेण्याद्री बाबतची प्राचीन आख्यायिका अशी सांगितली जाते की, पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी लेण्याद्री येथील लेणी एका रात्रीत कोरली. येथे पुर्व ते पश्चिम एकुण २८ लेणी आहेत. श्री. गिरीजात्मज गणेशाचे मंदिर सातव्या लेण्यामध्ये आहे. या लेणीमध्ये पार्वती मातेने बारा वर्षे पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. या बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर श्री गणेशजी स्वयंभू प्रकट झाले.
गिरीजा म्हणजेच माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा, म्हणून या गणरायाचे नांव श्री गिरीजात्मज असे पडले असावे. या डोंगराला पुर्णतः लेणी असल्याने लेण्याद्री असे संबोधले जाते. असा हा लेण्याद्रीचा गिरीजात्मज. लेण्याद्रीचे श्री गणेश मंदिर हे दक्षिणाभिमुख आहे. . जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले.
ओझर — विघ्नहर :
कुकडी नदीच्या काठी ओझर येथे विघ्नासुर राक्षसाच्या नात्याची कथा जोडलेली आहे — गणेशाने त्याला पराभूत करून "विघ्नहर" हे नाव धारण केले आणि राक्षसानेच विनंती केली की भक्तांच्या मार्गातील विघ्ने आधी गणेशापुढेच यावी. या मंदिराचे सोन्याचे शिखर विशेष प्रसिद्ध आहे. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत. पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.
रांजणगाव — महागणपती :
पुणे-नगर मार्गावरील रांजणगाव येथे महागणपतीचे भव्य स्थान आहे. त्रिपुरासुराच्या वधाआधी शंकरांनीच येथे गणेशाची आराधना केली, अशी कथा सांगितली जाते. यात्रेतील हे शेवटचे थांबा-स्थान मानले जाते, जिथून पुन्हा मोरगावकडे परतीचा प्रवास सुरू होतो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्' या श्लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.महागणपती मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे असून, दगडी गाभाऱ्याचे काम पेशवाईमध्ये झाले. सवाई माधवराव पेशव्यांनी हे काम केले. मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवऱ्या असून, पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी त्या बांधल्या. मंदिरासमोरील लाकडी मंडपाचे काम इंदूरच्या सरदार किबे यांनी केले.
यात्रेची परंपरा आणि आत्मिक अनुभव
अष्टविनायक यात्रा साधारणतः तीन दिवसांत, विशिष्ट क्रमाने पूर्ण करण्याची प्रथा आहे — मोरगावपासून सुरू होऊन पुन्हा मोरगावातच समाप्त होणारी ही यात्रा एका वर्तुळाकार तीर्थभ्रमणासारखी आहे, जणू भक्त स्वतःच्या मनातील विघ्नांचे एक चक्र पूर्ण करून पुन्हा मूळ बिंदूवर परततो. वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही यात्रा सुखकर झाली असली, तरी पूर्वीच्या काळी बैलगाडी किंवा पायी केलेल्या या प्रवासात कोकणचे घाट, सह्याद्रीचे कडे आणि नदीकाठची हरितता अनुभवायला मिळत असे.
आजही श्रावण महिना, गणेश चतुर्थीचा काळ आणि माघी गणेश जयंती या काळात अष्टविनायक मंदिरांत भक्तांची अलोट गर्दी असते. प्रत्येक मंदिराचे स्थापत्य, त्याच्या भोवतीचा निसर्ग आणि त्याच्याशी जोडलेली आख्यायिका वेगळी असली, तरी या आठ स्थानांतून एक समान सूत्र वाहते — विघ्नांवर मात करून मांगल्याकडे जाण्याचा मार्ग. हीच अष्टविनायक यात्रेची खरी शिकवण आहे आणि हेच महाराष्ट्राच्या श्रद्धाशील मनाचे प्रतिबिंब आहे.
















.jpg)



.jpg)





