Saturday, 11 December 2021

हनुमंताची मूर्ती सोन्याची….कि शेणाची?

 हनुमंताची मूर्ती सोन्याची….कि शेणाची?


#नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत.

समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची. … त्यांतील एक जण म्हणाला की, ‘हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.’ तर दुसरा मुलगा म्हणाला की,’मूर्ती शेणाची आहे’. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.

अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले – ‘ तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे’. जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.





No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....