गोदाकाठावरील ऐतिहासिक कपूरथळा छत्री
गोदाकाठावर विसावलेल्यांमध्ये असंख्य ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. यात साधू, महंतांपासून ते लढवय्या सरदारपर्यंत तर विचारवंतापासून राजे, महाराजांचाही समावेश आहे. त्यांच्या आठवणींचे प्रतीक म्हणून येते अनेक समाधी पहायला मिळतात. काहींबद्दल आपल्याला माहिती असते तर काही अजूनही अज्ञातच आहेत. यात कपूरथळा डोमचा समावेश होतो. कपूरथळा कोण, ही समाधी कोणाची, त्यामागील इतिहास काय या प्रश्नांची उत्तर रमेश पडवळ यांच्या अल्बममधून….
गोदाकाठावरील बालाजी मंदिरासमोरील कपूरथळा छत्री (डोम) म्हणून परिचित असलेली समाधीची वास्तू परिचित आहे ती तिच्या सुंदरतेमुळे. मात्र, याबद्दल फारशी माहिती नसल्याने कपूरथळा समाधी इतकेचं याबद्दल सांगितले जाते. ही समाधी आहे कपूरथळा संस्थानचे राजे राजा रणधीर सिंह यांची. कपूरथळा म्हणजे सध्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. पूर्वी हे शीख साम्राज्यातील एक प्रांत होता. त्यांचा इतिहास रोचक असून, शेर-ए-पंजाब म्हणजेच शिखांचा पहिला राजा रणजितसिंहांची पत्नी जिंदाची समाधीही गोदाकाठावर उभारण्यात आली होती, या इतिहासाशी राजा रणधीर सिंहाच्या इतिहासाचाही एक अनोखा संबंध आहे.
शेर-ए-पंजाब म्हणजेच शिखांचा पहिला राजा रणजितसिंहच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी शिखांविरोधात आघाडी उघडली. यातून १८४५ ला पहिले अँग्लो-शीख युद्ध झाले. इंग्रजांनी लाहोर जिंकल्यामुळे शिखांना तह करणे भाग पडले. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १८४९ मध्ये शिखांनी रणजित सिंहांची पत्नी जिंदाच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा इंग्रजांविरोधात उठाव केला आणि दुसरे अँग्लो युद्ध छेडले गेले. यातून पंजाब प्रातांचे तुकडे पडले. जनरल लॉर्ड डलहौसीने शरण आलेल्या व मदत केलेल्या शीखांना वेगवेगळे प्रांत वाटून दिले व त्यांच्यावर ब्रिटिशांचे नियंत्रण निर्माण झाले. यात कपूरथळा संस्थानचाही समावेश होता.
अहलूवालिया मिसालचे शीख प्रमुख हे कपूरथळा संस्थानचे राजे म्हणून ओळखले जात. दुसऱ्या अँग्लो-शीख युद्धानंतर निहाल सिंह अहलूवालिया हे कपूरथळाचे राजे झाले. राजा निहाल सिंह यांनी १३ सप्टेंबर १८५२ रोजी अखेरचा श्वास घेतला.
राजा रणधीर सिंह कोण?
राजा निहाल सिंहांनंतर त्यांचा मोठा मुलगा राजा रणधीर सिंह यांनी अहलूवालिया मिसालचे शीख प्रमुख व कपूरथळाचे राजा म्हणून सूत्रे हाती घेतली. राजा रणधीर सिंह एक कुशल शासक होता. त्याच्या वडिलांचा सौम्य आणि उदार स्वभाव त्याच्याकडेही होता. ब्रिटिशांच्या सोबत राहण्याचे धोरण राजा रणधीर सिंहांनीही स्वीकारले, त्यामुळे त्यांना ब्रिटिशांमध्येही महत्त्वाचे स्थान मिळाले. राजा रणधीर सिंहांनीही ब्रिटिशांना वेळोवेळी सहकार्य केले. यामुळे १८६४ मध्ये लाहोर येथे भरलेल्या लॉर्ड लॉरेन्स यांच्या सार्वजनिक दरबारात राणी व्हिक्टोरियाकडून दिला जाणारा जी.सी.एस.आय. हा किताब राजा रणधीर यांना देण्यात आला. राजा रणधीर सिंह हा पर्शियाच्या नादिर शहाची तलवार व हातातील चांदीचा कडा नेहमी परिधान करीत असे, अशी नोंद इतिहासात मिळते.
राजा रणधीरचा मृत्यू अन् गोदाघाट
राजा रणधीर सिंह यांचा मृत्यू वयाच्या ३९ व्या वर्षी २ एप्रिल १८७० मध्ये लंडन येथील ईडन शहरात झाला. ते व्हिक्टोरिया राणीच्या भेटीसाठी समुद्रमार्गे जात असताना एडन येथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. यावेळी त्यांचा ज्येष्ठ पुत्र खडक सिंह उपस्थित होते. खडक सिंह यांनी त्यांच्यावर नाशिक येथे दहन पद्धतीने अंत्यसंस्कार केले. गोदाकाठावर कपूरथळा घाटावर समाधीचा डोम बांधण्यासाठी १२,६१० रूपये खर्च आला. डोमचा खालील भाग बेसाल्ट दगडाने तर वरील पांढऱ्या मार्बलचा वापर करण्यात आला आहे. संस्कृत, ऊर्दू व इंग्रजीत तीन शिलालेख असून, संस्थांनच्या चिन्हाचाही वापर यावर करण्यात आला आहे. या डोमची उंची ३० फूट (९.१४ मीटर) आहे. यावर सिंहाचे शिल्पही आकर्षक आहे. बालाजी मंदिराशेजारील आश्रम व मंदिराची इमारत १८७८ मध्ये बांधण्यात आली. आश्रमाच्या इमारतीसाठी १४,६९० खर्च करण्यात आला होता. या आश्रमात राम, लक्ष्मण, सीता, गंगा आणि गोदावरीच्या प्रतिमा असलेले एक मंदिर बांधण्यात आले होते. यावेळी खडक सिंह नासिकमध्ये आले होते. हॉल बांधण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करण्यात आला.
खडकसिंहांनी केली नाशिकरांची मदत
२९ सप्टेंबर १८७० च्या रिपोर्टमधील एका नोंदीनुसार, गोदावरीच्या पात्रात मोठ्या खड्ड्यात पाणीसाठा झाल्याने त्यातून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत होता. हा खड्डा भरून काढणे गरजेचे होते. यावेळी नाशिकमध्ये आलेल्या कपूरथळाचे राजे खडकसिंह यांच्याकडे नाशिकच्या नागरपित्याने ही कैफियत मांडली तेव्हा त्यांनी या कामासाठी तसेच नदीच्या बाजूने पक्का दगडी कोट बांधण्याचे काम क्रमाक्रमाने करून देण्यास आर्थिक मदत केली.
- रमेश पडवळ
No comments:
Post a Comment