Showing posts with label रामदास स्वामी. Show all posts
Showing posts with label रामदास स्वामी. Show all posts

Wednesday, 3 February 2021

दासबोध जयंती

 आज माघ शुद्ध नवमी म्हणजेच दासबोध जयंती...



समर्थ रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य व लेखनिक कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध या ग्रंथराजाची रचना केली. माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली.

हा ग्रंथ अत्यंत सोप्या मराठी भाषेतच असल्याने, मराठी बोली भाषा येणा-या कुणालाही तो सहज समजेल असा आहे. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केले आहे. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.

दासबोधाची वैशिष्ट्ये :
गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेश वंदन, सरस्वती वंदन, गुरू वंदन दासबोधात आढळत नाही. हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केल्याची प्रचिती प्रत्येक समासात येते. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या असंख्य विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे.

दासबोधातील दशकांची नावे :
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत.

स्तवनाचा दशक, मूर्खलक्षणांचा दशक, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्रांचा दशक, देवशोधन, चौदा ब्रह्मांचा दशक, मायोद्भवनाम ज्ञानदशक, गुणरूप दशक, जगज्जोतिनाम दशक, भीम दशक, विवेक वैराग्य दशक, नामरूप दशक, अखंड ध्याननाम दशक, आत्म दशक, सप्ततिन्वयाचा दशक, प्रकृती पुरुष दशक, बहुजिनसी दशक, शिकवण दशक आणि पूर्ण दशक. या दशकांच्या केवळ नावावरून समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते.

असा हा १७व्या शतकात रचलेला हा ग्रंथराज सर्वसामान्यांना मार्गदर्शनासाठी आजही तितकाच उपयुक्त ठरत आहे.





Friday, 27 November 2020

श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती, टाकळी नाशिक

श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित गोमय मारुती, टाकळी, नाशिक

समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या  मारुतींपैकी असलेला सर्वप्रथम टाकळीचा मारुती. बोहल्यावरून पलायन केल्यावर रामदास स्वामी नाशिकच्या काळाराम मंदिरात आले. तेथे त्यांनी रामाची उपासना सुरू केली. राममंदिरात ५ दिवस ५ रात्र राहिल्यानंतर त्यांना रामाने दृष्टांत दिला आणि सांगितले की, 'गोदावरी, नंदिनी, संगमावर तपश्चर्येला सुरुवात कर' त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी टाकळीला संगमावर तपश्चयेर्ला सुरुवात केली. तेथेच त्यांना 'श्रीराम जयराम जय जय राम' या मंत्राचे स्फुरण झाले. १६२० मध्ये ते टाकळीला आले. १६२० ते १६३२ पर्यंत त्यांनी १२ वर्षे  गायत्री मंत्र व राम मंत्राचे पुरश्चरण केले. या ठिकाणी त्यांनी १३ कोटी मंत्रांचे पुरश्चरण केले. गोदावरीच्या पाण्यात उभे राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप, दररोज १२०० सूर्यनमस्कार करून त्यांनी मानसिक आणि शारीरिक शक्तीचा विकास केला.

१६३२ मध्ये रामदास स्वामींनी टाकळी सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपला शिष्य उद्धवस्वामी याच्यासाठी या मंदिराची स्थापना केली. मठात असणाऱ्या कपिला गायीच्या शेणापासून या मंदिरातल्या मारुतीची स्थापना करण्यात आलेली आहे.  गुढीपाडवा आणि दिवाळीचा पाडवा या दिवशी दुधात शेंदुर कालवून या मूर्तीला लेप दिला जातो. या मंदिरात राम, लक्ष्मण व सीता यांच्याही मूर्ती आहेत. येथील गाभार्‍याबाहेर एक मोठा सभामंडप आहे. येथे काचेच्या मोठ्या पेटीत रामदास स्वामींची मोठी सुबक मूर्ती आहे. या ठिकाणी दासनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मोठा उत्सव असतो. 

नाशिक येथील टाकळी येथील समर्थांनी स्थापन केलेला मठ हा पहिला मठ आहे. त्यामुळे समर्थांच्या टाकळी येथील मठाला रामदासी संप्रदायात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे.






सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...