Monday, 20 December 2021

अहिल्याबाई_होळकर_ह्यांचा_फोटो_किंवा_पुतळा_हातात_शिवलिंग_आणि_डोक्यावर_पदर_घेतलेला_असाच_का_असतो?

अहिल्याबाई_होळकर_ह्यांचा_फोटो_किंवा_पुतळा_हातात_शिवलिंग_आणि_डोक्यावर_पदर_घेतलेला_असाच_का_असतो?


प्रत्येक शिल्पाची काहीतरी ओळख असतेच स्वतःची अशी वेगळी ! जसे स्वातंत्र्यवीर म्हटले की त्यांची ती " मार्गदर्शक तर्जनी ", झाशीची राणी म्हटले की " आपल्या पाठीवर मूल बांधलेली आणि उभी समशेर हातात असलेली स्त्री ! तसेच अहिल्याबाई होळकर म्हटले की " डोक्यावर पदर घेतलेली आणि हातात शिवलिंग " अश्या एका स्त्रीचे चित्र डोळ्यासमोर येते .
अहिल्याबाई ह्या शिवभक्त होत्या हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे पण त्यांचा पुतळा किंवा फोटो असाच का असतो हे आपल्याला माहीत आहे ? आज आपण तेच समजून घेऊ !
अहिल्याबाईंच्या राजवटीत त्यांचे कर्तृत्व बघून एक इंग्रज शिल्पकार इंग्रजांनी दूरदृष्टीने अहिल्याबाईंच्या दरबारात घुसवला .
तो बरेच दिवस अहिल्याबाईंच्या दरबारात राहिला , त्याने अहिल्याबाई ह्यांचे अगदी जवळून निरीक्षण केले आणि त्यानुसार अहिल्याबाईंचे दोन पुतळे त्याने बनवले .
एक दिवस अहिल्याबाई ह्यांच्या दरबारात येऊन त्याने अहिल्याबाई ह्याचेच दोन पुतळे अहिल्याबाईंना भेट दिले . त्या शिल्पकाराने अहिल्याबाईंचे सूक्ष्म निरीक्षण करून ते बनवले होते .
" मी एक विधवा स्त्री ! मी माझे सासरे गमावले आहेत , माझ्या सासवा सती गेल्या आहेत , माझा नवरा गेला आहे , माझा मुलगा गेला आहे , त्याबरोबर सून सती गेली आहे, माझी मुलगी तिच्या नवऱ्याबरोबर सती गेली आहे , एवढेच कशाला माझा दहा वर्षांचा नातू गेला आहे आणि त्याची लहान बायकोही सती गेली आहे, मी फार दुःखी आहे . भगवान शंकराला गादीवर बसवून त्याची सेविका म्हणून मी राज्य करतेय . त्यामुळे माझा पुतळा वगैरे नको ". म्हणून अहिल्याबाईंनी ते पुतळे नर्मदा नदीत टाकून देण्याची आज्ञा भानराव होळकर ह्या आपल्या विश्वासू माणसास दिली .
त्याने अहिल्याबाईंचा एक पुतळा नर्मदा नदीत विसर्जित केला पण दुसरा मात्र लपवून ठेवला .
अहिल्याबाई 1794 मध्ये मरण पावल्यावर महेश्वर येथेच नर्मदा नदीच्या काठावर त्यांचे दहन करण्यात आले . तिथून अगदी जवळ त्यांच्या महालाच्या जवळ एक छत्री उभारण्यात आली , छत्री म्हणजे स्मृतिस्थळ !
आज ती छत्री " अहिल्येश्वर महादेवाचे " म्हणून प्रसिद्ध आहे . त्या मंदिराच्या गाभाऱ्यात अहिल्याबाईंचा हा पुतळा आहे .
मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला जाता येत नाही आणि आपल्याला फोटोही काढता येत नाही . त्यामुळे त्याच्या फोटोचा फोटो इथे टाकला आहे.
माहेश्वर येथे जाल तेव्हा अवश्य हा पुतळा बघा .
अहिल्यामातेचे चित्र किंवा पुतळा म्हटले की त्यात मातेच्या हातात शंकराची पिंड दिसतेच . त्याचा हा इतिहास !
© डॉ सुबोध नाईक
( कुठेही शेयर करायचे असल्यास लेखकाच्या नावासहच शेअर करावा . )

अहिल्याबाई होळकरांची छत्री म्हणजे स्मृतिस्थळ असलेल्या " अहिल्येश्वर महादेव " मंदिराच्या गाभाऱ्यातील अहिल्याबाईंचा पुतळा.


काशी विश्वनाथ धाम मध्ये बसवण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांचा पुतळा.


No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....