Showing posts with label इगतपुरी. Show all posts
Showing posts with label इगतपुरी. Show all posts

Thursday, 22 October 2020

कामाक्षी_माता मंदिर, कावनई ता. इगतपुरी जि. नाशिक

#कामाक्षी_माता मंदिर #कावनई ता. इगतपुरी जि. नाशिक

#Kamakshi_Mata_temple, #Kavnai, district Nashik

It is one of shakteepeeth amongst four shaktipeeths of Kamakshi Mata viz. Kanchipuram, Gouhatti, Kavnai and Karanjgoan (Shegaon). 

It is said that Mother Goddess Parvati wanted to examine the desire of Prabhu ShriRam after Ravana kidnapped Mata Sita; but Prabhu ShriRam identified Mata Parvati and requested her to stay at this place to fulfill the prayers of devotees. Thus Mata Parvati stayed at this place as Kamakshi Maata.

कावनईच्या किल्ल्याच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच श्री कामाक्षी माता मंदिर आहे. या मंदिराचे पौराणिक माहात्म्य मानले जाते. 

सदरचे कामाक्षी देवी मंदिर हे पौराणिक महात्म्य लाभलेले भारतातील ४ शक्तीपीठापैकी तिसऱ्या क्रमांकाचे शक्तीपीठ मानले जाते. भारतात कामाक्षी मातेचे कांचीपुरम, गौहाती,कावनई आणि करंजगाव ( शेगाव ) ही ४ शक्तीपीठे मानलेली आहेत. या शक्तीपीठात दूरदूरवरून असंख्य भाविक नवसपूर्तीसाठी येत असतात. 

या शक्तीपीठामागे प्रचलित असलेली आख्यायिका अशी आहे की द्वापार युगात रामायणकाळात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात असताना सध्याच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे पक्षीराज जटायू जखमी अवस्थेत मिळून आला. जटायुच्या प्राणोत्क्रमणानंतर त्याचा उद्धार करून प्रभू श्रीराम हे दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्याच वेळेस कैलास पर्वतावर भगवान शंकराचा श्रीराम हा जप सुरु असताना माता पार्वती शंकरास म्हणाली जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे ध्यान तुम्ही का करता ? यावेळी शंकराने उत्तर दिले की, जो विचार तुझा आहे तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेवू शकतेस. त्या वेळेस या दंडकारण्यात माता पार्वती सीतेच्या रुपात येवून रामाला मोहित करू लागली. तेंव्हा श्रीरामाने माता पार्वती मातेला ओळखून दंडवत घातले. माता पार्वतीने प्रसन्न होऊन रामास पुढील मार्गदर्शन केले व कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा भक्तांसाठी कामाक्षी देवीच्या रूपात इथेच रहावे असा हट्ट श्रीरामाने माता पार्वतीकडे धरला. म्हणून माता पार्वती या ठिकाणी कामाक्षी मातेच्या रुपाने राहिली. रामाची काम इच्छा बघण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. 

मराठेशाहीमध्ये अत्यंत महत्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली म्हणून नानासाहेब पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोने आणि चांदीचे अलंकार अर्पण केले होते असा उल्लेख पेशवे बखरमध्ये आहे असे म्हणतात. मंदिराकडे आजही हे दागिने उपलब्ध  असून ते अलंकार देवीच्या मूर्ती वर दर नवरात्रोत्सवात आणि चैत्र पौर्णिमेला चढवले जातात.

अशी ही भक्तांची इच्छापूर्ती करणारी कामाक्षी माता सुविख्यात आहे.

Saturday, 17 October 2020

#शैलपुत्री उर्फ घाटनदेवी कसारा घाट,इगतपुरी

 #शैलपुत्री उर्फ #घाटनदेवी कसारा घाट,इगतपुरी


शैलपुत्री उर्फ घाटनदेवी, कसारा घाट, इगतपुरी


प्रथमं शैलपुत्रीच द्वितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चंद्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्।। 

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च। सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्।। 

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नमानि ब्रह्मणैव महात्मना ।।

श्रीदुर्गा सप्तशतीमधील या सुप्रसिद्ध श्लोकात दुर्गेची नऊ रूपं वर्णन केली आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्धिदायी. यातली पहिली जी शैलपुत्री तिचं मंदिर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे.  भगवती शैलपुत्री ही दुर्गेच्या नऊ रूपांतील प्रथम रूप. पर्वतराज हिमालयाची ही कन्या शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध आहे. शैल म्हणजे पर्वत. पर्वतात माणिक, रत्ने व इतर मौल्यवान प्रकारचा साठा उपलब्ध आहे. हा मौल्यवान साठा सहज उपलब्ध असूनही भौतिक सुखाकडे आकर्षित न होता त्याचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त करण्यास प्रवृत्त करणारी ही शैलपुत्री आहे. 


या देवीचे मंदिर कसारा-इगतपुरीच्या घाटमाथ्यावर आहे म्हणून तिला घाटनदेवी म्हणतात. शैलाधिराज तनया असलेली ही तेजस्वी देवी वज्रेश्वरीहून निघाली. रस्त्यात तिने या ठिकाणी विश्रांती घेतली. इथला सुंदर व नयनरम्य निसर्ग पाहून ती येथेच कायमची स्थिर झाली, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिरातील शैलपुत्री उर्फ घाटनदेवीची मूर्ती अतिशय प्रसन्न व देखणी आहे. देवीचे लोभस आणि तेजस्वी रूप भक्तांच्या आकर्षणाचे मुख्य कारण आहे. देवीची ही मूर्ती संगमरवरी असून, देवी सिंहावर बसलेली  व अष्टभुजा आहे. तिच्या प्रत्येक हातात आयुध आहे. उजवा हात अभय मुद्रेत असून  माता प्रसन्न मुद्रेने भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचा पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते. शेंदूरचर्चित असलेली घाटनदेवीची जुनी मूर्ती म्हणजे तांदळा नवीन मंदिरातही तसाच अचल स्वरूपात पूर्वीच्याच ठिकाणी जसाच्या तसा ठेवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते, त्यावेळी खुद्द त्यांनी घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून दर्शन घेतले असल्याची ऐतिहासिक नोंद आहे.  


उंटदरी नावाचे सृष्टिसौंदर्याने नटलेले निसर्गरम्य ऐतिहासिक स्थान घाटनदेवी मंदिराजवळच आहे. पूर्वी जव्हारकडून पुण्याकडे मावळ भागात जाणारा रस्ता याच उंटदरीवरून जात होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा नदीचा उगम याच उंटदरीत झाला आहे. कल्याणचा खजिना लुटून या दरीत उंट लोटले म्हणून या दरीला उंटदरी असे नाव पडल्याची आख्यायिका या परिसरात सांगितली जाते. 


या मंदिरात जागोजागी आपल्याला घंटा बांधलेल्या दिसतात. इतरत्र कोणत्याही मंदिरात पाहायला न मिळणारे वेगळेपण इगतपुरीच्या घाटनदेवी मंदिरात पाहायला मिळते, ते म्हणजे या मंदिरात पितळेच्या लहान-मोठ्या अनेक घंटा जागोजागी बांधलेल्या दिसतात. भाविक स्त्री-पुरुष देवीला नवस करताना ‘माझी अमुक इच्छा सफल होऊ दे, म्हणजे मी देवीला पितळी घंटा वाहीन,’ असा नवस करतात आणि त्यांची इच्छापूर्ती झाल्यानंतर त्याचे प्रतिक म्हणून देवीला घंटा अर्पण करतात. 


















सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...