आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते.
महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण देणा-या व प्रबळ शत्रूशी कसा लढा द्यावा याचा संपूर्ण विश्वात मानदंड प्रस्थापित करणारे #छत्रपती #शिवाजी #महाराज यांचा आज जन्मदिवस.
शिवजयंती म्हटले की आपल्याला शिवनेरी किल्ल्याची आठवण येते. शिवरायांचे बालपण शिवनेरीवर कसे गेले असेल याची कल्पनाचित्रे आपल्या मनात फेर धरु लागतात. पण शिवरायांचे बालपण केवळ शिवनेरीवरच नव्हे तर #नाशिक मध्येही व्यतित झाले आहे, हे सांगितले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा नाशिकशी असलेला संबंध फक्त लढाई आणि गडकिल्ल्यांपुरताच मर्यादित नव्हता, तर नाशिककरांशी त्यांचा थेट ऋणानुबंध जोडला गेला होता, हे नातं आहे छत्रपतींच्या बालशिवाजी रुपाशी! काझी गढीवरील पाटीलवाड्यात बालशिवाजींची पावले तब्बल पाच वर्षे दुडूदुडू दौडत होती. बालशिवाजी शिवनेरीवर जेवढे राहिले तेवढेच ते नाशिकमध्येही राहिले. त्यामुळेच वडील शहाजीराजे व आई राजमाता जिजाऊ यांच्यासह बालशिवरायांचा एकत्रित पुतळा असलेले स्मारक काझी गढीवर उभारावे, अशी पूर्वापार मागणी आहे. खुद्द इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांनीही अशा वैशिष्ट्यपूर्ण स्मारकाची इच्छा व्यक्त केल्याचे पुरावे उजेडात आले आहेत.
नाशिकमध्ये सन १६३० मध्ये बाल शिवाजींचे वास्तव्य होते. कवीन्द्र परमानंद या समकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निकटवर्ती पंडित कवीने महाराजांची जन्मतारीख फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही दिली आहे. म्हणजे बाल शिवाजी वडिलांबरोबर जुन्नरहून नाशिकला आले त्यावेळी ते एक वर्षाचे होते. मोगलांचे ठाणे जुन्या नाशिकच्या काझी गढीच्या टेकडीवर होते. आज या भागात जुम्मा मशिद, गाडगे महाराजांची धर्मशाळा, सादिक अलीचा दर्गा इत्यादी स्थळे आहेत. मोगलांचे ठाणेदार म्हणून शहाजीराजे आजच्या जुम्मा मशिदीच्या जवळ व गाडगे महाराजांच्या धर्मशाळेच्या अगदी वरच्या मजल्याला लागून असलेल्या सरकारी वाड्यातून कारभार पाहत होते. तेथील आताच्या पाटीलवाड्यात (कोठावळे वाडा) शहाजीराजे, राजमाता जिजाबाई आणि बालशिवाजींचे वास्तव्य होते. पुढे शहाजीराजे व मोगलांचे पटले नाही. एका वर्षातच त्यांनी बंडाचा झेडा फडकवला आणि सन १६३२ मध्ये ते निजामशाहीत दाखल झाले.
सन १६३२ ते १६३६ च्या ऑक्टोबरपर्यंत मोगल आणि शहाजीराजे यांची वारंवार धुमश्चक्री चालू होती. शेवटी शहाजी राजांना सन १६३६ च्या ऑक्टोबरमध्ये विजापूरला नोकरीत जावे लागले. या पाच-सहा वर्षांच्या काळात बालशिवाजी नाशिक ते शिवनेरी असे येत-जात राहिले, अशी नोंद इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांनी 'बहु असोत सुंदर' या पुस्तकात केली आहे.
- रमेश पडवळ
No comments:
Post a Comment