Wednesday, 29 December 2021

देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज पुण्यतिथी

आज मार्गशीर्ष वद्य एकादशी म्हणजे देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांची पुण्यतिथी 

देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज म्हणजे यशवंत महादेव भोसेकर यांच मुळ गाव पंढरपुर तालुक्यातील करमभोसे. लहानपणी यशवंत अभ्यासात हूशार. सुंदर हस्ताक्षर. त्यांच्या हूशारीवर पहिली नजर पडली ती त्यांच्या मामांची. यशवंत यांचे मामा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे नोकरीस होते. आपण त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेवू हे वचन देवून यशवंतचे मामा त्यांना कोपरगाव इथे घेवून आले. हूशार असलेल्या यशवंतने मामांचा विश्वास जोपासला. त्याने अभ्यास करुन वयाच्या १४ व्या वर्षीच सरकारी नोकरीत प्रवेश केला. 

सन १८२९ साली नाशिक जिल्ह्यात ते बदली कारकून म्हणून नोकरीस लागले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षा कामातील प्रामाणिकपणामुळे ते वरिष्ठाचे आवडते झाले. याच काळात बढती म्हणून ते शिरस्तेदार ते कलेक्टर यांचे दुय्यम चिटणीस म्हणून काम करु लागले. त्यांच्या कामाच्या शैलीमुळे त्यांना बढती मिळत गेली. 

सन १८५३ साली त्यांना मामलेदार म्हणून बढती मिळाली. या पदावर नियुक्त होताच ते लोकांच्या भल्यासाठी झटू लागले. चाळीसगाव इथून त्यांनी आपल्या मामलेदार पदाच्या नोकरीस सुरवात केली. येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मामलेदार म्हणून ते काम करु लागले. ब्रिटीश व्यवस्थेत इतर अधिकाऱ्यांप्रमाणे गळचेपी धोरण न राबवता ते लोकांच्या बाजूने उभा राहू लागले. 

सन १८६९ साली इंग्रजांनी नाशिक जिल्ह्यात बागलाण नावाचा नवा तालुका निर्माण केला. या तालुक्याचे महसुली केंद्र सटाणा ठेवण्यात आले. याच नव्या तालुक्याची मामलेदार म्हणून जबाबदारी यशवंत महाराज यांच्याकडे सोपवण्यात आली. अवघ्या काही दिवसातच एक परोपकारी मामलेदार म्हणून आपली ओळख त्यांनी बागलाण प्रांतात निर्माण केली. बागलाण प्रांतातले शेतकरी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेवून येवू लागले. इथेच त्यांच्याकडे अडचणीतून मार्ग काढणारे मामलेदार म्हणून ओळखले जावू लागले. 

सन १८७० साली बागलाण प्रांतात मोठ्ठा दुष्काळ पडला. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्याच काळात सटाणा-बागलाण प्रांतातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. दूष्काळावर मात करण्यासाठी लोकांना मदत मिळावी अशी याचना करण्यात आली, पण नाशिकच्या कलेक्टर यांनी  काही मदत पोहचवली नाही. 

लोकांचे हाल पाहून यशवंत महाराजांनी आपल्या अधिकारात असणारा सरकारी खजिना लोकांसाठी खुला केला. आपल्या अधिकारात असणारे सुमारे १ लाख २७ हजार रुपये त्यांनी लोकांच्यात वाटले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळात देव धावून आल्याची प्रचिती बागलाण प्रांतात झाली. लोक त्यांचा संत म्हणून उल्लेख करु लागले. पण हि बातमी कलेक्टरांना समजली. कलेक्टरांनी सरकारी तिजोरीची तपासणी केली, मात्र या तपासणीत कलेक्टरांना खजिन्यातील रक्कम तितकीच आढळली. एक पैशाचाही फरक मिळाला नाही. असे बागलाण प्रांतातले भक्त सांगतात.

या चमत्कारामुळे त्यांना दैवत्व बहाल करण्यात आले. पुढे चारच वर्षात ते मामलेदार पदावरुन निवृत्त झाले. लोकांच्या आग्रहावरुन ते याच ठिकाणी राहू लागले. त्यानंतर ११ डिसेंबर १८८७ रोजी त्यांचे निधन झाले.  नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले. तर सटाणा येथे आरमनदीच्या काठी त्यांचे स्मारक आणि मंदिर बांधण्यात आले. सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी इ.स.१९००मध्ये पहिला यात्रोत्सव सुरू झाला. तेव्हापासून दरवर्षी हा यात्रोत्सव होतो. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तगण या मंदिरास भेट देत असतात. संपूर्ण भारत देशात सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर हे फक्त यशवंतराव महाराज यांचेच आहे. या मंदिरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याची रोज पूजा केली जाते. मंदिरात धार्मिक पारायणे होतात. एक सरकारी अधिकारी आपल्या परोपकारी व समर्पित वृत्तीमुळे नागरिकांच्या मनात देव बनून राहतो आणि तब्बल दीडशे वर्षांनंतरही श्रद्धेने पूजला जातो ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. 

#देवमामलेदार #यशवंतरावमहाराज #सटाणा  #नाशिक #बागलाण 












No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....