Showing posts with label आषाढ. Show all posts
Showing posts with label आषाढ. Show all posts

Saturday, 7 August 2021

दीप अमावस्या

आज दीप अमावास्या. गटारी अमावस्या  नावाने कुप्रसिद्ध केलेला आजचा दिवस प्रत्यक्षात दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या (अवस) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दीपपूजन केले जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते, दिवा लावला जातो आणि दान धर्म केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. 

वास्तविक भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितरांचे स्मरण करून पिंडदान केले जाते. मात्र, आषाढ अमावास्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिले जाते. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्ज्वलित केला जातो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. दुसरीकडे, श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मांसाहार टाळला जातो.

दीपपूजनाची आख्यायिका पुराणात सांगितली आहे. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला. उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरील प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी आपल्यावर उगाच आळ घेतला म्हणून तिचा सूड घेण्याचे ठरवले. सर्वांनी मिळून एके रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या दालनात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू आणि दिराने निंदा केली. घरातून तिला घालवून दिले. तिचा रोजचा नेम असे की, रोज दिवे घासावेत, तेलवात करावी आणि स्वतः प्रज्वलित करावे. खडीसाखरेने त्यांच्या ज्योति साराव्या. दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. तिला घरातून घालवल्यानंतर तिचा हा नेम खंडीत झाला.

एक चमत्कार घडला. पुढे कालांतराने दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली तो मुक्कामाला उतरला. तिथे त्याच्या दृष्टीला एक चमत्कार घडला. आपले सर्व गावातील दिवे झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केले, कोणी कशी पूजा केली वगैरे गोष्टी सुरू होत्या. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला की, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाट-माट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.

इतके म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारले की, असे होण्याचे कारण काय? मग दिव्याने त्या दिवशी राजाच्या घरी घडलेला सर्व प्रकार अगदी सविस्तर आणि विस्तृतपणे सांगितला. म्हणून मला हे दिवस पाहायला लागत आहेत. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सूनेचा अपराध नाही, अशी त्याची खात्री झाली. घरी आला. त्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत चौकशी केली. तिला मेणा पाठवून माघारी आणले. झाल्या प्रकाराबाबत तिची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. तिला दिवा पावला. 

इतका सुरेख मतितार्थ असलेला हा दिवस आपण उगाचच बदनाम केला आहे.

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...