Showing posts with label जगदंबा. Show all posts
Showing posts with label जगदंबा. Show all posts

Thursday, 22 October 2020

वणी, ता. दिंडोरी ची जगदंबा


वणी ता. दिंडोरी येथील राजराजेश्वरी स्वरूपा भगवती जगदंबा माता अर्थातच आद्यपीठ श्रीसप्तशृंगी मातेची बहीण. गडावर दर्शन घेतल्यावर ह्या आदिशक्तीचे दर्शन घेऊन दर्शन पूर्ण होते असं इथलं महत्व सांगितलं जातं. भगवती जगदंबा मातेची मूर्ती ही स्वयंभू आहे.

टाहाकारीचे जगदंबा मंदिर

 टाहाकारीचे जगदंबा मंदिर


नाशिकपासून अवघ्या ५५ ते ६० किमी अंतरावरील टाहाकारी येथील जगदंबा मंदिर हे आवर्जुन पाहण्यासारखे आहे. अत्यंत रमणीय परिसरात स्थित असलेले हे नितांत सुंदर मंदिर म्हणजे शिल्प सौंदर्याचा खजिनाच आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. इसवी सनाच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी असा अंदाज अभ्यासक वर्तवतात.

सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.

रावणाचा छेदिला आंगोठा

तेथे झाला औंढापट्टा

त्रिंबकीच्या बिकटघाटा

अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!

या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका  या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे.प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.

टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे कळस बांधलेले आहेत. तसेच मंदिराच्या समोर सिमेंटचा सभामंडप बांधण्यात आलेला आहे. हे म्हणजे रेशमी पैठणी साडीच्या जरतारी पदराला मांजरपाटाच्या कापडाचे  मंदिराची शोभा घालवायचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. 

टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.


मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दिनीच्या रुपात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.

मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी मकरप्रणाली आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.

मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.

मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.

मंदिर परिसरात भक्तांसाठी बांधलेला नवीन हॉल आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे. या रम्य परिसराला आणि ऊन, वारा, पाऊस यांचा मारा सहन करत गेली अनेक शतके उभे असलेले हे मंदिराचे दगडी शिल्प अवश्य पाहण्यासारखे आहे. 

(माहिती आंतरजालावरुन)



















































Wednesday, 21 October 2020

कोटमगावची त्रिगुणात्मक स्वरूपातील जगदंबा

 कोटमगावची त्रिगुणात्मक स्वरूपातील जगदंबा


येवल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोटमगाव असून, मुख्य रस्त्यापासून जवळच उजव्या बाजूला नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत नारंदी नदी काठावर जगदंबामातेचे मंदिर वसलेले आहे. आई जगदंबेचे हे स्थान स्वयंभू आणि जागृत आहे. जगदंबा नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती या तीन देवींचे एकरूप येथे एकवटले आहे.

कोटमगावच्या देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, अतिशय प्रशस्त आहे. मंदिराला आतून पूर्णपणे टाइल्स बसविलेल्या आहेत. समोर तीन मोठे दरवाजे असून, देवीचा गाभारादेखील टाइल्सने आतून-बाहेरून सुशोभित करण्यात आलेला आहे. कोटमगावच्या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे देवीचा गाभारा उंचावर नसून जमिनीवर खोलगट जागेवर आहे.

ही त्रिगुणात्मक स्वरूपातील जगदंबा येथे कशी अवतीर्ण झाली याबाबत एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी :

महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालिंधर हा सती वृंदाच्या प्रभावाने त्रिलोकी विजयी झाला. त्याला अपयश माहीत नव्हते. सती वृंदाच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने देवलोकावर स्वारी केली. त्यामुळे सर्व देवांनी श्री विष्णूंचा धावा केला.


श्री विष्णूंनी जालिंधराच्या यशाचे सामर्थ्य सती वृंदेचे सतीत्व असल्याचे ओळखले व सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री भगवान विष्णूंनी जालिंधराचे रूप धारण केले व सतीचे शील हरण केले. शील हरण झाल्याबरोबर दैत्यराज जालिंधर पराभूत झाला व त्याचा मृत्यू झाला. जालिंधराचा मृत्यू झाल्याबरोबर सतीने श्री विष्णूंना ओळखले व तुम्ही शालिग्राम होऊन पडाल, असा शाप दिला. शापाने श्री विष्णू शालिग्राम होऊन कोटमगावी पडले.

श्री विष्णूंचा शोध करीत देवी श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या. तेथे श्री विष्णू नसल्याने दोघी परत श्री महाकालीकडे गेल्या, तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही शोधावयास निघाल्या आणि शोधता-शोधता तिघींना श्री विष्णू कोटमगावी शालिग्राम रूपात दिसले. त्यांनी सती वृंदेचा उद्धार करून श्री विष्णूंना शापमुक्त केले आणि तिघी या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज, तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रूपात वास करू लागल्या व मग या त्रिगुणात्मक गुप्तरूपात एका नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून अवतीर्ण झाल्या, असे हे जगदंबा मातेचे स्थान.

कोटमगावच्या देवीची मूर्ती अतिशय प्राचीन आहे. देवीचे तीन मुखवटे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे आहेत. पूर्वीची मूर्ती वालुकामय होती. त्यावर शेंदराचा लेप लावत असत. त्यातूनच आताच्या मूर्तीचा आकार निर्माण झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर देवीची मूर्ती पूर्णपणे शेंदाराचीच आहे. पूर्वी देवीला कोणताही आकार नव्हता. त्याला आकार देण्यासाठी कै. बनाजी पुतळे यांनी देवीला चांदीचे डोळे बसवून हल्लीचा आकार दिला. आठ पिढ्यांपासून पुतळे कुटुंबियांना देवीच्या पूजेचा मान आहे.

या देवीचे विशेष म्हणजे तिला सोन्या-चांदीच्या अलंकारांऐवजी फुलांच्या अलंकारांनी सजविण्याची प्रथा आहे. देवीच्या अलंकारांमध्ये चांदीचा मुकुट प्रमुख असून, तो नवरात्रातील सातव्या माळेला देवीला चढवितात. इतर दिवशी फूलमाळांची आरास करतात. कोटमगावच्या देवीच्या मंदिराजवळून पूर्वी नारंदी नावाची नदी वाहत होती. मंदिर टेकडीवर होते. आजही आसपासच्या इतर घरांच्या व वस्तीच्या तुलनेत कोटमगावच्या देवीचे मंदिर उंचावर आहे. त्यामानाने देवीचा गाभारा मात्र खोलगट भागात आहे. पूर्वी तर हा गाभारा अधिकच खोल होता.

सन १९५८ मध्ये कोटमगावच्या देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यापूर्वी याच जागेवर लाकडी बांधणीचे मंदिर होते. हल्ली बांधण्यात आलेले मंदिर सिमेंट काँक्रीटचे आहे. मंदिराच्या आसपास बारा धर्मशाळा आहेत. ज्या भाविकांच्या मनोकामना देवीमुळे पूर्ण झाल्या अशा देवीभक्तांनी या खोल्या कृतज्ञभावाने बांधून दिल्या आहेत. नवसपूर्ती करताना भाविक देवीला चांदीचे हात, पाय, तसेच येवल्याची सुप्रसिद्ध पैठणीदेखील वाहतात.

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/10/blog-post_21.html









 

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...