Showing posts with label भुईकोट. Show all posts
Showing posts with label भुईकोट. Show all posts

Tuesday, 24 November 2020

वारसा जपणारा मालेगावचा बलदंड भुईकोट किल्ला

वारसा जपणारा मालेगावचा बलदंड भुईकोट किल्ला


मालेगाव हे महाराष्ट्रामध्ये नेहमी चर्चेत असणारे प्रसिद्ध गाव आहे. मालेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. नाशिकच्या ईशान्य दिशेला मालेगाव असून मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ हा मालेगावातून जातो. नाशिक, धुळे, जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद येथून गाडीमार्गाने मालेगावला पोहोचता येते. या सर्व मार्गांवर एस.टी. बसेसची सोय आहे. दाट लोकवस्तीच्या या ऐतिहासिक शहरात गिरणा आणि मोसम नद्यांच्या संगमावर इतिहासाचा वारसा जपणारा बलदंड असा किल्ला उभा आहे. हा किल्ला मालेगावचा भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यात आता शाळा भरते, त्यामुळे हा किल्ला आजही बर्‍यापैकी तग धरुन आहे.

. . १७४० मध्ये हा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असल्याचे मत मराठ्यांचा इतिहास लिहणारे ग्रांट डफ यांनी नमूद केले आहे. एका उल्लेखानुसार १८२० मध्ये मालेगावाचा किल्ला साठ वर्षापूर्वी बांधला असा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार हा किल्ल १७६० मध्ये बांधला असावा, असे दिसते. नारोशंकर हे सरदार होते. ते बराच काळ उत्तर भारतात होते. उदोजी पवार यांच्याकडे शिलेदार म्हणून असणारे नारोशंकर पुढे इंदोरचे सुभेदार झाले. त्यांनी ओरछा जिंकून घेतले. झाशीमध्ये १४ वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी मोगल बादशहा आलमगीर गाझी होता. आलमगीर गाझी शिकारीच्या मोहीमेवर असताना नारोशंकर ही सोबत होते. बादशहाने शिकारीच्या दरम्यान सिंहावर बंदुकीतून गोळी झाडली. ती गोळी हुकली. चवताळलेल्या सिंहाने बादशहावर झेप घेतली. नारोशंकर यांनी झेप घेणार्‍या सिंहाला तलवारीने मारले. त्यामुळे बादशहा बचावला. बादशहाने नारोशंकर यांची प्रशंसा करून त्यांना 'राव बहादूर' हा किताब देवून मालेगाव परिसरातील निंबायती आणि सात-आठ खेड्याचा परिसर जहागीर म्हणून दिला. पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले. पेशव्याबरोबर झालेला बेबनाव मिटवण्यात नारोशंकर यांना यश आले. नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्याकडून मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी नारोशंकर यांना दिली होती. मात्र नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधून काढला.

छत्रपंती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे यांनी त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता आली. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला . जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १० जुन १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्‍य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सरदार नारोशंकर यांनी किल्ला बांधण्यासाठी उत्तर भारतामधून कारागीर आणले. नारोशंकर यांच्यावरही उत्तर भारतातील किल्ल्यांचा प्रभाव असावा असे मालेगावच्या किल्ल्याच्या बांधकामावरून दिसते. मूळ चौरस आकाराचा भक्कम किल्ला आहे. त्याच्या भोवती साधारण ४० ते ४५ फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. भुईकोट किल्ल्याला संरक्षणासाठी खंदकाची नितांत गरज असते. या तटबंदीच्या बाहेर चारही बाजुंनी रुंद आणि खोल असा खंदक खंदून त्यात मोसम नदीचे पाणी खेळवून किल्ला अभेद्य करण्यात आला होता. खंदकावर काढता घालता येण्यासारखा पुल होता. आज आपण किल्ल्यात प्रवेश करतो त्या बाजूचाच खंदक अस्तित्वात आहे. बाकीच्या सर्व बाजूंनी दाट वस्ती असल्याने त्या वस्तीने तो खंदक गिळंकृत केला आहे.

किल्ल्याला तिहेरी तटबंदी होती त्यातील बाहेरची तटबंदी वस्तीत लुप्त झाली आहे. त्यातील नदीच्या बाजूचा एकच बुरुज शाबूत आहे तो किल्ल्यावरुन दिसतो. सध्या किल्ल्यात कांकणी विद्यालय आहे. त्यांच्या सोईसाठी पश्चिमेची तटबंदी फ़ोडून दरवाजा बनवलेला आहे. या दरवाजातूनच आपला प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला विद्यालयाची नवीन बांधलेली इमारत आणि त्याच्या समोर ठेवलेल्या ३ तोफ़ा दिसतात. विद्यालयाच्या इमारतीकडे तोंड करुन उभे राहीले असता उजव्या बाजूला असलेल्या दोन तटाबंदीतील प्रशस्त जागेतून गडफ़ेरीला सुरुवात करावी. किल्ल्याची आतील तटबंदीत ९ बुरुज आहेत तटबंदीची उंची २० फ़ूट आहे. तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. बाहेरील म्हणजे दुसर्‍या तटबंदीत बुरुज नाहीत. या तटबंदीची उंची साधारणपणे १५ फ़ुट आहे. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. तटबंदीला फ़ांजी मात्र नाही आहे. तटबंदीच्या खालच्या भागात ३ फ़ूट उंच, २ फ़ुट रुंद आणि २ फ़ूट खोल अशा छोट्या चौकोनी खोल्या आहेत. त्यांचा उद्देश कळत नाही. दोन तटबंदींच्या मधून किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५ मिनिटे लागतात. या प्रदक्षिणेत आतील तटबंदीतील बुरुजांची भव्यता लक्षात येते. पुन्हा विद्यालयाच्या समोर आल्यावर विद्यालयाच्या इमारतीसाठी दोन बुरुजांमधील तटबंदी पाडलेली दिसते. यातील डाव्या बाजूचा बुरुज आणि विद्यालयाची इमारत यांच्या मधून जाणार्‍या वाटेने पुढे जावे. तेथे एक भव्य प्रवेशव्दार आपले स्वागत करते. प्रवेशव्दाराचा लाकडी दरवाजा अजून शाबूत आहे

या ठिकाणी उतराभिमुख दुहेरी दरवाजा आहे. हा दरवाजा बाहेरुन बंद असल्याने आपण किल्ल्याच्या आतून दरवाजात प्रवेश केलेला असतो. दरवाजातून बाहेर पडल्यावर प्रवेशव्दारची भव्यता आपल्याला कळते. २० फ़ुटी उंच प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्या कमानीच्या बाजूला दगडात कोरलेली कमळे आहेत. प्रवेशव्दारावर आणि बुरुजांच्यावर वीटांनी केलेले १० फ़ुटी बांधकाम आहे. यात प्रवेशव्दारावर तीन आणि बाजूच्या बुरुजांवर प्रत्येकी ३ कमादार खिडक्या कोरलेल्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला दोन मजली दालन होते. त्यातील वरच्या मजल्यावर रंगमहाल होता. आता तळ मजल्यावर शाळेचा वर्ग भरतो आणि दोन मजल्यांनधील स्लॅब नष्ट झाल्याने रंगमहालात जाता येत नाही. पण रंगमहालाच्या भिंतीत कोरलेले कमानदार कोनाडे पाहायला मिळतात. आतील दरवाजाच्या काटकोनात बाहेरचा दरवाजा आहे. हा भव्य दरवाजा पूर्ण दगडी बांधणीचा असून त्याच्या बाजूच्या दोन्ही बुरुजांवर सुंदर मनोरे आहेत. दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी समोर भिंत बांधलेली आहे. या दरवाजाच्या काटकोनात एक छोटा दरवाजा होता, पण आता तो बुजवून त्याठिकाणी शाळेची मुतारी बांधलेली आहे. दरवाजाच्या वर जाण्यासाठी तटबंदीत जीना आहे. जीन्याने तटबंदीवर जाऊन फ़ांजीवरुन किल्ल्याच्या आतल्या तटबंदीवरुन फ़िरता येते. दरवाजाच्या वरच्या बाजूस किल्ल्याच्या आत आणि बाहेर लक्ष ठेवण्यासाठी खोल्या आणि झरोके बनवलेले आहेत. दरवाजाच्या बाजूच्या बुरुजांवर असलेले मनोरे सुंदर आहेत. ८ दगडी खांबांवर या मनोर्‍यांचे छत तोललेले आहे. घुमटाकार छत वीटांनी बनवलेले असून त्याच्या छतावर आतल्या बाजूने चुन्यात फ़ुल कोरलेले आहे. दोन खांबांच्या मध्ये दगडी कमानी असून कमानीवर दोन बाजूला कमळ कोरलेले आहेत. मनोर्‍याला वाळ्याचे पडदे लावण्यासाठी बसवलेल्या कड्या आजही तेथे आहेत. मनोरे पाहून पुढे गेल्यावर ध्वजस्तंभ असलेला भव्य बुरुज आहे. फ़ांजी वरुन फ़िरतांना एके ठिकाणी तटबंदीत उतरण्यासाठी जीना आहे. तो तटबंदीतच दुसर्‍या बाजूने बाहेर पडतो. फ़ांजीवरुन फ़िरुन परत प्रवेशव्दाराशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी अवघा अर्धा तास लागतो. मात्र खास वाट वाकडी करुन बघावा असा हा किल्ला आहे एवढे निश्चित.

(संदर्भ ः छायाचित्रे व मजकूर इंटरनेटवरुन घेतलेला आहे).




Friday, 9 October 2020

 वारसासंपन्न पळशी


आपले पृष्ठ नाशिकशी संबंधित असल तरी नाशिकपासून अवघ्या दिडशे किमी अंतरावरील पळशी ता. पारनेर या गावाची दखल घेतल्यावाचून राहवत नाही. महाराष्ट्रात खूप कमी गावे आहेत जी इतिहास तसेच गावातील वास्तुस्थापत्यासाठी ओळखली जातात. अशा गावात इतिहासाचा संपन्न वारसादेखील वास्तूंमधून पाहावयास मिळतो. त्यामुळेच या अशा गावात भटकंतीची सारी रूपे याचि देही याचि डोळा पाहायला मिळतात. या अशा मोजक्या गावांपैकीच एक गाव म्हणजे पळशी. आडवाटेवर असणारे, पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असणारे आणि अस्सल ग्रामीण ढंगाचे हे गाव पाहणे म्हणजे सुरेख पर्वणीच ठरावे. पळशीचा गढीवजा भुईकोट किल्ला, होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा, ‘राही-रखुमाई’ नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर, हे सारे काही पळशी गावात पर्यटकांच्या स्वागतास उभे आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा -बेल्हे- टाकळी ढोकेश्वर – खडकवाडी मार्गे पळशी गाव गाठता येते.

पळशी गाव हे भुईकोटातच वसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग ठरावा, इतके हे गाव टुमदार आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. महादेवाचे मंदिराचं वास्तुस्थापत्य आवर्जून पाहण्यासारखंच. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नसावा हे खरोखरीच अद्भुत वाटते. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे. 

महादेव मंदिराच्या जवळच पळशीकरांचा देखणा वाडा आहे. हा वाडा बहुकोटाच्या दक्षिणेस बांधलेला आहे. याच बाजूला किल्ल्याचे दक्षिणद्वार आहे. लाकडात बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे. हा वाडा पूर्वी चार मजले होता असे इथले ग्रामस्थ सांगतात, पण सध्या येथे तीनच मजले दिसतात. वाडय़ाचे प्रवेशद्वार देखणे आहे. त्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवडय़ाही दिसतात. या देवडय़ा पार करून डाव्या बाजूने आत गेलो की वाडय़ाचा मुख्य चौक लागतो. 





आणि आपण आता वाडय़ाच्या मध्यभागी असतो. चहुबाजूंनी वाडय़ाचा रंगमंच जणू काही फेर धरून आपल्याभोवती गोलाकार नाचतो की काय असेच क्षणभर वाटून जाते. ही कुशल कारागिरी आहे मात्र लाजवाबच. ती काष्ठशिल्पे पाहून आपण अक्षरश: स्तंभितच होऊन जातो. 




इतकं नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. यातली आवर्जून उल्लेख करावी लागतील अशी शिल्पे म्हणजे अननसाच्या पानासारखी खांबावर असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी तर हॅट्स ऑफच! वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वरच्या मजल्यावर जाता येते. वर गेल्यावर जाणवते की वाडा आता जीर्ण झालाय. ठिकठिकाणच्या भिंती ढासळल्यात. एवढय़ा सुंदर वास्तूची ही अवस्था पाहून वाईटही वाटते. वाडय़ाच्या खालच्या मजल्यावरचे देवघरही पाहण्यासारखे आहे. जुन्या पद्धतीचे देवघर, त्याची मांडणी, छत आणि लाकडी सजावट पाहातच राहावीशी वाटते.

पळशीतच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या  विठ्ठल राही रखुमाई मंदिर म्हणजे अत्त्युच्च आकर्षण. हे मंदिर मात्र भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. वाडय़ाच्या जवळूनच दक्षिण दरवाजातून या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. छोटय़ाशा ओढय़ाजवळील एका बंधाऱ्याजवळ हे मंदिर बांधलंय. त्यामुळे येथे बारमाही पाणी असते. दुरूनच पाण्याशेजारचं हे मंदिर आपल्याला आकर्षित करते. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही दिसते. तसेच या तटबंदीवर आणि नगारखान्यावर जाण्यासाठी दगडी जिनेही आहेत. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. मंदिर विलक्षण प्रेक्षणीय आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही येथे चितारल्या आहेत. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे.  








या विठ्ठल मंदिरात, विठ्ठल, रुक्मीणी व राही या तिघांच्या एकत्रित मुर्त्या आहेत. असे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पळशीलाच आहे. हे आगळे वेगळे वैशिष्टय होय. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या आहेत. पण या दोन्हीही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्ती स्थापनेनंतरच्या कालावधीतील असाव्यात. विठ्ठलाच्या मुर्तीच्या प्रभावळीवर मच्छ व कच्छादी दशावतार कोरलेले आहे. डोक्यावर शिवलिंग कोरलेले असून पायाजवळ सवत्स धेनु, गोपाळ आहेत. मुर्तीच्या सिंहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नर, आदिंच्या कोरीव मुर्ती आहेत. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे. कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्पे कोरलेली दिसतात.


मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे गेल्यावर गरुडध्वज दिसतो तो पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापूर्ण नक्षीकाम आपले मन थक्क होऊन जाते. मंदिराच्या महाव्दारावर गणपती, सरस्वती ही दैवते, महाव्दाराच्या चोहोबाजूस, जय, विजय, सुरया व नक्षीकाम आहे. नगार खाण्याचे रंगकाम व नक्षीकाम विशेष आहे. सभा मंडपाच्या तीन बाजूंनी नऊ पायऱ्या नव विद्या भक्तीची प्रतिक. सभा मंडपात अठरा स्तंभ जे नउ फुट उंचीचे या स्तभांवरील कोरीव काम अप्रतिम देखणे मनात भरणार. हे अठरा खांब अठरा पुराणाचे प्रतिनिधीक स्वरुप. सभा मंडपाच्या मध्यमागी दगडी कासव आहे. 













सभा मंडपाचे वरच्या भागाच्या काशाची घंटा आपली नजर वेधते. सभा मंडपाच्या आतील बाजूस श्रीकृष्ण व गौळणीच्या रासविहाराच्या दगडीमुर्ती आहेत. श्रीकृष्ण हिंदूस्थानी कलाकारांच्या हस्त कौशल्याची उत्कृष्ट शैली आहे. वास्तु शास्त्राचा उत्कृष्ट नमुना येथे पाहावयास मिळतो. सभा मंडपातील हरणांच्या वानराच्या कोरीव मुर्ती रेखाटतानां उत्तर हिंदूस्थानी कलाकरांनी जीव ओतून काम केल्याचे दिसते. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोनही बाजुंना रिध्दी – सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती आहेत. दरवाजावर ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर दोन किर्तीमुखे आहेत. 

मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस व कोरीव कलाकसुरीची कोरीव कामे आहेत. त्यावरुन नजर दूर जात नाही. मंदिरात असणाऱ्या ओहारीतील नक्षीकाम अप्रतिम असून भूमितिय श्रेणीत केलेले काम असून प्रत्येक ओहोरीत वेगळ शिल्प, मंदिरा भोवती असणारी भक्कम तटबंदी मंदिराच्या प्रवेशव्दारा वरील असणारे दुसऱ्या मजल्यावरील कोरीव नक्षी कुठेही पहावयास मिळत नाही.

मंदिराच्या आवारात उत्तरेला असणाऱ्या हौदात १९७२ सालीही पाणी आटले नव्हते. मंदिराच्या आवारातूनच पुर्व व उत्तर कोपऱ्यातून एक दहा पाय-या खाली उतरत गेले की आपण पुष्करणीत प्रवेश करतो. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. मंदिर उत्तरमुखी असुन समोरच एक तटबंदी भिंत असुन यामध्ये एक दरवाजा आपणास सटवाई मंदिराच्या आवारात घेऊन जातो. संपूर्ण मंदिराला जवळपास १५ /२० फुट उंचीची तटबंदी बांधलेली असून ती मंदिराची सुरक्षा रक्षक अनेक वर्षे उन वारा पाऊस झेलून सुध्दा सुव्यवस्थित आहे. मंदिर ओढ्याच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून. हा ओढा मंदिराच्या उत्तरेकडुन वाहताना दिसतो. मंदिराच्या पश्चिमेस ओढ्याच्या उत्तर किना-यावर ऐतिहासिक रामेश्वर महादेव मंदिर, गणेश मंदिर व घाट पहावयास मिळतो. रामेश्वर महादेव मंदिरातील नंदीचे शिल्प हि पाहण्यासारखे आहे.

पळशीचा कोट, विठ्ठलमंदीर व त्यासमोरील गरुडध्वज पाहिल्यावर त्यावरील कलापुर्ण नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. मंदीराची शिखरे, त्यावरील काम, त्याची प्रमाणबद्धता या गोष्टी पळशीकरांच्या रसिकतेची व पांडुरंगनिष्ठेची प्रचिती आणून देतात. एकंदरीतच हे मंदिर पळशी भेटीतील सर्वोच्च बिंदू ठरावे.

खूप कमी गावांना असे वैभव वारशातून मिळाले आहे. पळशी हे देखणे गाव त्यामुळे भाग्यशाली आहे. हे गाव पाहताना आपण एका वेगळ्याच दुनियेत वावरतोय असे जाणवत राहते.

(मजकूर सौजन्य गौरवशाली इतिहास, छायाचित्र सौजन्य : दुर्गवेध ब्लॉग व इंटरनेट)




































































सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...