Showing posts with label दिवाळी. Show all posts
Showing posts with label दिवाळी. Show all posts

Monday, 1 November 2021

धनत्रयोदशी

🪔#धनत्रयोदशी🪔

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. 
(लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.)..

शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन.! ‘धान्य’ हा शब्द धन या शब्दातूनच उत्पन्न झाला असावा अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरू नये. ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असतं. या नवीन धान्याची शेतकरी पूजा करतात तो दिवस म्हणजे म्हणजे "#धनत्रयोदशी". धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. 

व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकर्‍यांच्या दॄष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा #नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास #झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडूची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत #आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात.

#Diwali #HappyDiwali #Diwali2021 #marathi #Deepotsav #दीपोत्सव #HinduFestivals #दिपावली #संस्कृती #फटाके #शुभदीपावली

Sunday, 15 November 2020

बलिप्रतिपदा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक... पाडवा

अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
    
अश्विनातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा व‌ख्यिात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरविण्यासाठी भगवान विष्णूंची निवड करण्यात आली. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिपले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.

वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणिन पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा श‌ल्लिक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला, की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.

बळीचे राज्य येवो...

पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

व्यापाऱ्यांसाठी नववर्ष

पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारीलोक वर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

दिवाळसण

पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो..!🪔

Friday, 13 November 2020

डोळ्यांचं पारणं फेडणारा दीपोत्सव गिनीज बुकात

 ५ लाख ८४ हजार ५७२ दिव्यांनी उजळली अयोध्या, डोळ्यांचं पारणं फेडणारा दीपोत्सव गिनीज बुकात


दिवाळीनिमित्त अयोध्येत दीपोत्सव तर साजरा करण्यात आलाच शिवाय रामायणावर आधारित लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सवाचा पहिला दिवा लावून या उत्सवाला सुरुवात केली. शरयू नदीच्या काठावर ५ लाख ८४ हजार ५७४ दिवे लावण्यात आले. तेलाच्या पणत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर लावून दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

काही महिन्यांपूर्वीच राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या दिवाळीला विशेष महत्व आहे. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येत ५ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले. 

अयोध्येत ५ लाख ८४ हजार ५७४ दिव्यांनी प्रभू रामचंद्रांची अयोध्या उजळून निघाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पणत्या लावण्याचा या विक्रमाची नोंद थेट गिनीजबुकात झाली आहे. 
















नरक चतुर्दशी

दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सबंध भारत देशातच नव्हे तर जगात जेथे जेथे भारतीय माणूस आहे, तेथे तेथे दिवाळीचा सण साजरा होत असतो. दीपावली या नावावरूनच हा दिव्यांचा उत्सव आहे हे कळून येतं. दिवाळी म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे जाण्याचा सण.

दिवाळी शरद ॠतूमध्ये येते. आपल्या पूर्वजांनी ॠतू आणि सण यांची अगदी योग्य सांगड घातली आहे. शरद ॠतू म्हणजे साधारण आक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे दिवस असतात. धान्य तयार होऊन घरे नव्या धान्याने संपन्न बनलेली असतात. त्यामुळे सर्वाच्याच आनंदाला अगदी उधाण आलेलं असतं.

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीपासून नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि यमद्वितिया म्हणजे भाऊबीज अशी पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो. या प्रत्येक दिवसाच्या संबंधी कथा वेगवेगळय़ा आहेत.

आज आपण चंद्रोदय व्यापिनी आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक  चतुर्दशी का साजरी करतो, त्या दिवशी दीपोत्सवही का साजरा करतो ते पाहू.

नरक चतुर्दशीसंबंधी एक कथा भागवत पुराणात सांगितलेली आहे. नरकासुराची माता भूदेवी. या भूमीदेवीचा मुलगा म्हणून याला भौमासुर असेही म्हणतात. या भौमासुराला आईकडून वैष्णवास्त्र  मिळाले होते. म्हणून हा खूप बलाढय़ व गर्विष्ठ झाला होता, गर्वाने त्याने प्रजाजनांनाच नव्हे, तर देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. या उन्मत्त भौमासुराने वरुणाचे छत्र, इंद्राचे अमर पर्वतावरील मणिसंज्ञक स्थान आणि इंद्रमाता अदिती हिची कुंडले पळविली होती. याचबरोबर या नरकासुराने वेगवेगळय़ा राजांच्या सोळा हजार तरुण कन्या पळवून नेऊन आपल्या बंदिवासात ठेवल्या. नरकासुराच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते. त्यामुळे इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि नरकासुराकडून या सर्वाची मुक्तता करण्याविषयी श्रीकृष्णाला सांगितले.

श्रीकृष्णाला हे कळताच श्रीकृष्ण गरुडावर बसून सत्यभामे बरोबर नरकासुराच्या प्राग्ज्योतिष नगरात गेला. प्राग्ज्योतिष नगरीत बळकट किल्ले, शस्त्रास्त्रांचे कोट पाण्याने, अग्नीने आणि वायूने भरलेले खंदक असा कडेकोट बंदोबस्त होता, या शिवाय अगोदर मूर राक्षसाच्या भयंकर बळकट बंदोबस्ताचा पाश सभोवार होता.

श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या साहाय्याने पर्वताचे पीठ केले. बाणांच्या साहाय्याने शस्त्रास्त्रांचे कोट मोडून टाकले. सुदर्शन चक्राच्या सहाय्याने अग्नी, पाणी, विषारी वायू यांचे खंदक भेदून टाकले. आणि प्रथम तलवारीने मूर राक्षसाला ठार मारले. त्याचा पांचजन्य शंख वाजविला. त्यानंतर त्याने नरकासुराच्या नगरीत प्रवेश केला. प्रथम श्रीकृष्णाने नरकासुराच्या सैनिकांना छिन्नविच्छिन्न केले. गरुडानेसुद्धा आपल्या पंखाने, चोचीने सैनिकांना व्याकूळ करून त्यांना जखमी केले. नरकासुर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध सुरू झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुरावर प्रहार केला आणि त्याचे मस्तक उडविले. नरकासुर मृत झालेला पाहिल्यावर त्याची आई पृथ्वीमाता भूमिदेवी पुढे आली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. आणि रत्नांनी चमकणारी दोन कुंडले, वैजयन्तीमाला वरुणाचे छत्र, महारत्न या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्या. याच वेळी भूमीमातेने कृष्णाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली, की नरकासुराचा ‘भगदत्त’ नावाचा मुलगा आहे. त्याला तू संभाळ. श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले. त्यानंतर नरकासुराच्या वाडय़ात शिरून सोळा हजार राजकन्यांना बंदिवासातून सोडवून द्वारकेला पाठविले. त्याचबरोबर नरकासुराची विपुल संपत्ती, रथ-घोडे, सैन्य, धनधान्य, सोनेनाणी सर्व काही द्वारकेला पाठविले. आणि सत्यभामेसह इंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने इंद्राच्या आईची कुंडले परत दिली. युद्ध जिंकल्याबद्दल इंद्राने श्रीकृष्णाचा आणि सत्यभामेचा सत्कारही केला.

श्रीकृष्णाने नरकासुराला ज्या दिवशी मारले तो दिवस आश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता. नरकासुराने आपली शेवटची इच्छा श्रीकृष्णाजवळ सांगितली आणि प्रार्थना केली. या दिवशी जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होणार नाही. आणि या दिवशी लोकांना दिवे लावून विजयोत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाने त्याच्या दोनही मागण्या मान्य केल्या. नरकसुराच्या छळापासून लोक मुक्त झाले. म्हणून आनंदोत्सवानिमित्त या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो.

श्रीकृष्णाने नरकासुराच्या वाडय़ातील सर्व संपत्ती द्वारकेला नेलीच, शिवाय सर्व अन्यायग्रस्त स्त्रियांना द्वारकेला आणले. त्यांच्या त्यांच्या घरी मुलींना परत नेण्याविषयी आईवडिलांना विनंती केली. पण कोणीही (पीडित मुलींच्या आईवडिलांनी) मुलींना घरी नेले नाही. श्रीकृष्णाचा मोठेपणा हा की त्याने सर्व अन्यायग्रस्त स्त्रियांना आधार दिला. धन्य त्या श्रीकृष्णाची अन्याय, अत्याचार, दु:ख, वेदनांनी पीडित अशा सोळा हजार स्त्रियांचा तो रक्षणकर्ता बनला. त्याची आठवण म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात.

लोकांनी दु:ख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळविली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.

आत्ताच्या काळातही अज्ञान, रोग, दारिद्रय़, भ्रष्टाचार यांच्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्वानीच भगवान श्रीकृष्णासारखा दुष्टप्रवृत्तीचा नाश करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल.

या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ म्हणजेच  अभ्यंगस्नान असते. अभ्यंगस्नानाविषयी प्रत्येकाच्याच खास आठवणी असतात. पहाटे लवकर उठून सुगंधी उटण्याने आंघोळ करणे असो वा मित्रमंडळी आणि परिवारासोबत एकत्र बसून फराळाचा आस्वाद घ्यायचा असो या प्रत्येक गोष्टी दिवाळ सणाची रंगत वाढवतात. यातीलच एक खास बात म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभयंगस्नान करून घराबाहेर चिरोटे पायाने चिरडून  फोडणं. हिंदू पुराणांनुसार चिरोटे फोडणे यामागे एक समर्पक अर्थ दडला आहे. आपण आज सुद्धा जे चिरोटे फळ फोडतो ते एक जंगली फळ आहे आणि म्ह्णूनच ते नरकासुराचे प्रतीक म्ह्णून डाव्या पायाच्या अंगठ्याने ठेचले जाते. 

चिरोटे फोडण्याची परंपरा मुख्यत्वे कोकण प्रांतात पाळली जाते. या फळाला वेगवेगळी नावे आहेत काही ठिकाणी कारीट आणि चिराटे ही दोन नावे प्रचलित आहेत दिवाळीत चिरोटे फोडताना एक परंपरा म्हणून चिरोटे कडे न पाहता त्यामागची भावना समजून घ्यायला हवी आणि आपल्यातले दुर्गणही बाजूला सारायला हवेत. 






दिवाळी फराळ - किती आपला, किती परका?

*🎊💥 💥🎊*

*‼ दिवाळी फराळ : किती आपला, किती परका ?  ‼*


        दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो.
प्रांतागणिक त्यातले पदार्थ बदलत जातात पण फराळाशिवाय दिवाळी नाही. महाराष्ट्रीय फराळाचा विचार करता लाडू, चकली, शेव , करंजी , शंकरपाळी , अनारसे या पदार्थांमुळे दिवाळीची रंगत खऱ्या अर्थाने द्विगुणित होते.
पण या मराठी फराळाच्या ताटातले कितीतरी पदार्थ मुळात आपले नाहीत. ते आपल्याकडे आले कुठून आणि इथे इतके रुळले कसे हे पहाणं रंजक ठरेल.

*❗फराळाचं प्रयोजन काय?*
दिवाळी फराळ ही एक परंपरा मानली तर साहजिकच मनात या परंपरेच्या प्रयोजनाचा प्रश्न निर्माण होतो. दिवाळी आणि फराळ भारताच्या शेतीप्रधानतेला जोडलेले आहेत. शेतीच्या दिवसात कष्ट करून थकलेल्या शेतक-याचा निवांत होण्याचा हा काळ.

या काळात गोडधोड खाऊन तो स्वतःच्या शरीराचं गोडकौतुक पुरवू शकतो. या तेलकट तुपकट पदार्थांच्या माध्यमातून येणाऱ्या थंडीसाठी तो शरीरात स्निग्धता साठवून घेत असतो. या प्रयोजनाने दिवाळीचं निमित्त साधून फराळाची परंपरा निर्माण झाली.
*❗'भोजनकुतूहल' ते आल्बेरुनी*
परंपरेचा इतिहासही दीर्घ आहे. अगदी उपनिषद काळापासून वेगवेगळ्या रूपात हा फराळ सिद्ध होतो. ११ व्या शतकातील "भोजनकुतूहल" ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख येतो. याच काळात भारतभेटीवर आलेला जगप्रवासी आल्बेरुनी दिवाळी उत्सवाचं वर्णन करतो. त्यातही अनेक पदार्थांचा उल्लेख येतो. कुठलाही पदार्थ अमुक प्रांतात निर्माण झाला असं प्रत्येकवेळी ठामपणे सांगता येत नसलं तरी काही पदार्थांची मूळ नावं आणि नंतर त्याचं अन्य प्रांतांनी केलेलं अनुकरण ह्यातून काही अंदाज मांडता येतात. आपले मराठी लाडू हे लड्डूच्या अपभ्रंशातून आलेलं नाव आहे. त्यामुळे फराळाच्या थाळीत रवा आणि बेसन अशा वैविध्याने मिरवणारा लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे शिरला असावा.
प्राचीन काळी या लाडवाना मोदक म्हटलेलं आहे. मोद अर्थात आनंद देणारा तो मोदक. पण मराठी मोदक हा पूर्णतः भिन्न पदार्थ असल्याने आज ज्याला लाडू या नावाने आपण संबोधतो त्याचे मूळ हिंदी लड्डूत आढळते आणि नावाच्या या अपभ्रंशामुळे लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे आला या म्हणण्याला बराच वाव मिळतो.
प्राचीन काळी साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मध व गूळ यांच्यासह तीळ खाण्यास देत.
या मिश्रणाचे प्रमाण निश्चित व्हावे याकरता ते विशिष्ट मात्रेत गोलाकारात वळलेले असत. त्यामुळे ज्याला आपण लाडू म्हणतो तो आकार पदार्थ म्हणून निश्चित होण्यापूर्वी औषधास सोयीस्कर म्हणून वळला जाई.
*🌀 चकली (मुरुक्कू, चक्रिका)🌀,*
चकुली, चकरी, मुरुक्कू या नावाने ओळखली जाणारी ही चकली दक्षिण भारतातून आपल्याकडे आली.
उपनिषद काळात चक्रिका अशा पदार्थाचा उल्लेख झालेला दिसतो. तमिळ भाषेत मुरुक्कू म्हणजे वेटोळी. जगभरात जिथे जिथे तामिळ मंडळी पसरली तिथे तिथे चकली आहे.
श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया या देशातही तिचं आढळणं तिचं तामिळ कनेक्शन दाखवतं चकलीच्या गोलाकाराने या तामिळ मुरुक्कुचं रूपांतर चकरीत झालं आणि त्याचा मराठी अपभ्रंश चकली असा झाला.
*शष्कुलीची करंजी होताना...*
फराळात मानाचं स्थान जिला प्राप्त झालेलं दिसतं ती करंजी. शुभशकुनाशी तिचं नातं जोडलं गेलं आहे. ही करंजी प्राचीन काळापासून शष्कुली या नावाने परिचित होती.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या करंजीचं मूळ उत्तरप्रदेशात दिसून येतं. उत्तरप्रदेश- राजस्थान - गुजरात - महाराष्ट्र असा प्रवास करत ती मराठी घरात आली असावी. प्रत्येक प्रांतात तिचं नाव बदललेलं दिसतं हे आणखी एक विशेष.
उत्तरप्रदेशात ती गुजिया असते. छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पुरुकीया किंवा पेडकीया आणि गुजराथमध्ये घुघरा. जशी मराठी घरात होळीला पुरणाची पोळी तशी उत्तर भारतात होळीच्या सणाला गुजिया हवीच.
*❗अनारशाचं बिहारी कनेक्शन*
मराठी फराळाच्या थाळीत सध्या अपवादाने आढळणारा पण सुगरणीच्या पाककौशल्याची परीक्षा पाहणारा पदार्थ म्हणजे अनारसा. या पदार्थाच्या मराठीपणाबद्दलदेखील शंका घ्यायला पुरेसा वाव आहे.
याचं कारण म्हणजे अनारसे दोनच राज्यात विशेषत्वाने खाल्ले जातात एक महाराष्ट्र आणि दुसरं बिहार. या दोन्ही राज्यांमधलं भौगोलिक अंतर या पदार्थाच्या संदर्भात बुचकळ्यात टाकणारं आहे.
महाराष्ट्रात अनारसे हे केवळ दिवाळीच्या दिवसात फराळाच्या ताटापुरतं अस्तित्व दाखवत असले तरी बिहारमध्ये तिथल्या अस्सल बिहारी पदार्थात अनारशांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे अनारशांचे कुळ शोधताना ते बिहारकडे अधिक झुकलेलं दिसतं.
*❗फराळी कडबोळं*
कडबोळे हा पदार्थ अलिकडे फारसा फराळाच्या थाळीत आढळत नसला तरी त्याचं नाव आपल्याला एक विशेषण म्हणून पुरतं. या पदार्थाची माहिती शोधताना तो मराठी पदार्थ आहे असं सांगितलं जातं. मात्र कडबोळे हे नाव कन्नड कडबूच्या खूप जवळ जाणारे आहे.
कडबू या कनार्टकी पदार्थाची पाककृती पूर्णतः भिन्न दिसत असली तरीही कडबूचा डिक्शनरी अर्थ होतो गोंधळ, अडचणीची स्थिती आणि मराठीत आपण हे काय कडबोळं करून ठेवलंय? असा वाक्यप्रयोग त्याच अर्थाने करतो. त्यामुळे कडबोळ्यांचं दायित्व महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकाकडे अधिक असावं.
*▪परकीय आक्रमणं आणि स्वाऱ्या*
या सगळ्या पदार्थांच्या अस्सल मराठीपणाची खात्री नसली तरी वर्षानुवर्षे ते आपल्या फराळाच्या ताटाची शोभा वाढवत आहेत.
परकीय आक्रमणाने यातल्या काही पदार्थांचा आपल्या संस्कृतीत समावेश झालेला दिसतो तर काही वेळा इथले राज्यकर्ते स्वारीच्या निमित्ताने परराज्यात गेल्यावर तिथून येताना आवडलेल्या पदार्थाना आपल्या सोबत घेऊन आलेले दिसतात.
आज या पदार्थाना मराठीच मानावं इतके ते आपल्या फराळाच्या डब्यात आणि आपल्या मनातही रुळले आहेत. फराळ हा केवळ दिवाळीच्या आनंदाचा उपचार नाही. तो खाद्यसंस्कृतीचा ठेवा आहे.

Thursday, 12 November 2020

मोती साबणाचा जन्म

#मोती_साबणाचा_जन्म.! 

तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन, म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मिरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही.! 

अंघोळीची अशी तऱ्हा होती, तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, सनलाईट सोप नावाचा.! त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स.!  हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही.! लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.! 

या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.! 

आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता,.टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेलतर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत, १० रुपयांना १०० वड्या.! 

नावही ठरलं..५०१..बार.! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची. ती झाली ब्रिटिश.! टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.! लिव्हर ची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची.! आणि त्या साबणाच नाव होतं ५००.! ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले... मग आपल्या साबणाचे नाव ५०१.! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.! 

बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला.! त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली.! त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता.! टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती.! टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.! टाटा या स्पर्धेत तरले.! या कंपनीने पुढे अंघोळीसाठी हमाम... तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो... त्या मोती साबणाची निर्मिती केली.! ✍🏻

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...