'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ' असलेला #कर्दमाश्रम, करंजी ता. दिंडोरी, जि. #नाशिक
#दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र #करंजी म्हणजे कर्दमऋषींच्या तपश्चर्येने व प्रभू #दत्तात्रेयांच्या बाललीलांनी पुनीत झालेला परिसर. #नाशिक - #वणी रस्त्यावर दिंडोरीपासून सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला ओझरखेड हे गाव लागते. रस्त्यावरील पुल ओलांडताना उजवीकडे श्री क्षेत्र करंजीकडे जाणारा दिशादर्शक फलक आपले स्वागत करतो अन् एक कच्चा रस्ता आपल्याला कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जातो. महामार्गापासून साधारण एक किलोमीटर आत गेल्यावर घनदाट झाडीत श्री क्षेत्र करंजी वसले आहे.
#कर्दम ऋषी व देवहूती या दांपत्याची कन्या महासती #अनुसया हिचा विवाह सप्तर्षींपैकी एक असलेले महान ऋषी #अत्रि यांच्याशी झाला होता. त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या उदरी पुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. म्हणजेच कर्दम ऋषी हे प्रभू दत्तात्रेयांचे आजोबा. सृष्टीची रचना करत असताना ब्रह्मदेवाच्या छायेतून कर्दम ऋषींचा जन्म झाला. त्यांनाच ब्रह्माने सृष्टीचा विस्तार करण्याचा आदेश दिला. कर्दम ऋषींनी आपल्या भार्येसाठी आकाशात उडणाऱ्या विमानाची निर्मिती केली होती, असेही म्हटले जाते. कर्दम ऋषींचा विवाह लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाला. त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. देवहुतीने आपल्याला विष्णूसारखा पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याने स्वतः:भगवान विष्णूंनी तिच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे या पुत्राला म्हणजेच #कपिल ऋषींना विष्णुच्या २४ अवतारांपैकी एक अवतार मानले जाते. हे कपिल मुनी 'सांख्य तत्वज्ञानाचे' प्रवर्तक मानले जातात. कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या ऋषींशी लावले.
श्री क्षेत्र करंजी हे नाव दण्डकारण्यातील या ज्या परिसरात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते, त्या भागात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी हे नाव पडले व आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर परिचित आहे. यालाच 'निर्जल मठ' असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन 'सिद्धानां कपिलो मुनीः' असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव इथे पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे असे म्हणतात. मंदिरात असलेल्या देवघरात एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे. या कर्दमाश्रम परिसरात स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे.
कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. या आश्रमातच काशीची गंगा अवतरल्याचे म्हटले जाते. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी कर्दमाश्रमात येतात म्हणून या क्षेत्राला प्रतिगाणगापूरही म्हटले जाते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/MCXEbPPByTY
https://youtu.be/MCXEbPPByTY
No comments:
Post a Comment