Friday, 3 December 2021

आद्य पूर्णपीठ असलेले नस्तनपूरचे श्री शनिधाम

आजच्या शनि अमावास्येनिमित्त दर्शन घेऊयात श्री शनिमहाराजांच्या साडेतीन पीठांपैकी  आद्य पूर्णपीठ असलेले नस्तनपूरच्या शनिधामचे...  

देशभरातील शनिमहाराजच्या साडेतीन पीठांपैकी श्री क्षेत्र नस्तनपूर ता. नांदगांव जि. नाशिक हे स्वयंभू पूर्ण पीठ म्हणून अखिल भारतात ओळखले जाते व अख्यायिका प्रमाणे प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या साडेतीन पीठामध्ये नस्तनपूरला पूर्णपीठ म्हणून मान्यता आहे. हे भारतातील शनि महाराजांचे पहिले पूर्ण शक्ती पीठ होय. दुसरे शक्ती पीठ उज्जैन तर तिसरे राक्षस भुवन येथे आहे. अर्धे पीठ काशी येथे आहे

श्री शनिधाम, नस्तनपूरचा इतिहास हा प्राचीन आहे. राम वनवासात असताना दण्डकारण्यात होते. सूर्य स्नान करताना त्यांच्या हाती शनिदेवाची मूर्ती आली. ही मूर्ती स्थापन करावी, असे अगस्ती मुनींनी सांगितले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी या वालुकामय मूर्तीची स्थापना केली. या स्वयंभू मूर्तीबाबत व स्थानाबाबत काशीखंड, महाभारत, रामायण व लिलावती या ग्रंथात उल्लेख झालेला आहे. या ठिकाणाबाबत वयोवृद्धाकडून व ग्रामस्थाकडून असे ऐकावयास मिळते कि, श्रीराम या ठिकाणी दोन वेळा येऊन गेले असून रावणाने सीताचे हरण केल्या नंतर सीतेचा शोध घेत घेत राम मनमाड जवळील अनकाई किल्ल्यावर अगस्ती ऋषीच्या दर्शनासाठी गेले अगस्ती ऋषींना त्यांनी आपले दुःख कथन केले असता अगस्ती ऋषींनी रामास सांगितले की “रावण व राम या दोघांची रास एकच आहे. आपणास जर रावणावर विजय मिळवायचा असेल तर आपण साडेतीन शनिची स्थापना करावी’’ रामाने शनिची स्थापना करण्याचे ठरविले व रामचंद्र अगस्ती ऋषीचा निरोप घेऊन सीतेचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले. सितामाईचा शोध घेत-घेत रामचंद्र ‘नशरथपूर म्हणजेच आत्ताचे नस्तनपूर’ या ठिकाणी आले

संध्याकाळ झाल्याने व खूप घनदाट वृक्षाच्या छायेमुळे पुढे जाणे शक्य नव्हते म्हणून या ठिकाणीच रामाने मुक्काम करण्याचे ठरविले, राम-लक्ष्मण त्रिकाळ संध्या करीत असत. सायंसंध्येची वेळ झाल्याने प्रभू रामचंद्र संध्या करू लागले. सूर्यास अर्घ्य देत असताना रामचंद्राच्या हातात सूर्याने नस्तनपूर क्षेत्री स्थापन झालेली शनिदेवाची ही मूर्ती दिली. प्रभू रामचंद्रांनी ह्या शनिदेवाच्या मूर्तीचे पूजन करून सूर्य मुख, अमृतकल्प अशी ही शनि मूर्ती शनिवारच्या दिवशी या ठिकाणी येथे स्थापन केली. सदर मूर्ती वालुकामय मूर्ती आहे. सकाळी पूजाअर्चा करून प्रभू रामचंद्रांनी सितामाईच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले.

श्री रामचंद्रांनी स्थापन केलेल्या जागीच ही मूर्ती अद्याप आहे. उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्वेकडे तोंड असलेली भारतातील एकमेव मूर्ती आहे. मूर्तीची उंची ३५ इंच तर रुंदी २८ इंच आहे. मूर्ती चतुर्भुज असून हातात भाला, कट्यार, शस्त्र व चौथा हात आशीर्वाद देतांनाचा आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्य किरणाचा मुकुट आहे. शनि महाराज कोकीळ या पक्षावर मांडी घालून बसलेले आहे.

या मंदिरात शनि महाराजांचे दर्शन घेण्यास महिलांना प्रवेश आहे. महिलांच्या हातून आरती देखील केली जाते. देव दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे २४ तास उघडे असतात. कोणताही भेदभाव केला जात नाही.  भाविक दाल-बाटी, रोटगे, ठेचा-भात असे जेवण बनवितात.

शनिधाम, नस्तनपूर येथे भक्त निवास, अभिषेक हॉल आहे. अॅम्पी थिएटर, प्रसादालय, बाल उद्यान यासारखे प्रकल्प आहेत. शनि अमावस्या, सोमवती अमावस्येला भाविकांची गर्दी होत असते.

कसे जाल :  मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गावर हे शनिधाम आहे. मनमाडपासून ४२ कि.मी., नांदगावपासून १५ कि.मी., चाळीसगावपासून २९ कि.मी., मालेगावपासून ५२ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी महिलांना प्रवेश तर आहेच. त्यांना आरतीचाही मान दिला जातो हे महत्त्वाचे आहे.


जाणून घ्या आदिशक्ती आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/10/blog-post_24.html











No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....