आज #गोदावरी #जन्मोत्सव...
गौतमी गंगा अर्थात गोदावरी नदीबद्दल पौराणिक व धार्मिक माहिती ः
गोदावरी नदी हि भारतातील प्रमुख नद्यांपैकी
एक आहे. गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. पुण्यसलीला
गोदावरी भारतीय संस्कृतीचा पौराणिक व ऐतिहासिक असा समृद्ध ठेवा आहे. हिच्या तटांवर अनेक ऋषी मुनींनी निवास
केला व सनातन हिंदू धर्माची संस्कृती विकसित केली. गोदावरीचा इतिहास म्हणजे उत्तर भारतीय
व दक्षिण भारतीय संस्कृतीच्या संगमाचा इतिहास आहे.
१. गोदावरी’ शब्दाची व्युत्पत्ती व अर्थ 'शब्दकल्पद्रुम' या ग्रंथात पुढीलप्रमाणे वर्णन केला आहे.
‘गां स्वर्गं ददाति
स्नानेन इति गोदा ।
तासु वरी श्रेष्ठा गोदावरी ।’ (शब्दकल्पद्रुम)
अर्थ : जिच्यात स्नान केल्याने स्वर्गप्राप्ति
होते, तिला ‘गोदा’ म्हणतात. म्हणजेच स्वर्गात स्थान मिळवून देणाऱ्या नद्यांमध्ये
जी श्रेष्ठ आहे, ती गोदावरी आहे.
गौतमस्य गवे जीवनं ददाति इति गोदा ।
अर्थ : गौतम ऋषींच्या गायीला जी जीवनदान
देते, ती ‘गोदा’ (गोदावरी) आहे.
गोदावरी भूलोकात (पृथ्वीवर ) अवतरित
होण्याची एक पौराणिक आख्यायिका ब्रह्मपुराणात दिली आहे.
सत्ययुगात एकदा सलग बारावर्षे दुष्काळ
पडला. अजिबात पाऊस पडला नाही. तेव्हा गौतम ऋषींनी पावसासाठी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी
तप केले. श्रीगणेशाच्या वरदानाने गौतम ऋषींच्या आश्रमाच्या परिसरात भरपूर पाऊस पडू
लागला. दुष्काळ समाप्त झाला व सर्व लोकांना पुरेसे अन्नधान्य ऊपलब्ध झाले. त्यामुळे सर्व लोकांमध्ये गौतम ऋषींची प्रतिष्ठा
वाढली. मात्र गौतम ऋषींच्या वाढत्या प्रतिष्ठेने अनेकांचा जळफळाट वाढला. या द्वेषातून
काही ब्राह्मणांनी आश्रमाच्या शेतात एक मायावी गाय सोडली. उभे पीक खात असलेली गाय शेतातून
हाकलण्यासाठी गौतम ऋषींनी गवताची काडी फेकून मारली. त्या यत्किश्चित गवताच्या काडीने
ती मायावी गाय त्वरित मरण पावली. त्याबरोबर कारस्थानी मत्सरी ब्राह्मणांनी गौतम ऋषींवर
गोहत्येचा आरोप ठेऊन प्रायश्चित्त घेण्याची मागणी केली. या गोहत्येच्या पापक्षालनार्थ
गंगा अवतरित करण्यासाठी गौतम ऋषींनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी घोर तप केले.
गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न
होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली. गौतम ऋषींनी गोदावरीत
स्नान करून गोहत्येचे पाप धुतले.
त्यामुळे या गंगेला 'गौतमी गंगा' व
'गोदावरी' (गायीला जीवन देणारी) हे नामभिधान प्राप्त झाले.
भगवान शंकराच्या जटेत गंगेच्या दोन जलधारा असतात. एक जलधारा आहे 'गौतमी गंगा' तर दुसरी आहे 'भागीरथी गंगा'.
२. गोदावरी च्या उगमस्थानाबाबत आणि प्रकट काळाबाबत खालील श्लोकात माहिती मिळते.
कृते लक्षद्वयातीते मान्धातरि शके सति
।
कूर्मे चैवावतारे च सिंहस्थे च बृहस्पतौ
॥
माघशुक्लदशम्यां च मध्याह्ने सौम्यवासरे
।
गङ्गा समागता भूमौ गौतम सति ॥
महापापादियुक्तानां जनानां पावनाय च
।
औदुम्बरतरोर्मूले ययौ तदा ॥
अर्थ : कृत युगाचे दोन लक्ष वर्ष पूर्ण
झाल्यानंतर, अखिल विश्वाचे सम्राट मांधाता यांच्या शासनकाळात, भगवान श्रीविष्णूंच्या
कूर्मावताराप्रसंगी, सिंह राशीत गुरुचे भ्रमण असताना, माघ महिन्यातील शुक्ल दशमीला
मध्यान समयी, बुधवारी, गौतम ऋषीनिवासाजवळ असलेल्या औदुंबर वृक्षाच्या मुळातून गंगा
प्रगट झाली.
३. गोदावरीला इतरही अनेक नावांनी ओळखले
जाते.
३ अ. गंगा अथवा दक्षिण गंगा :
गोदावरी भगवान शंकरांच्या जटेतूनच ब्रह्मगिरी
पर्वतावर प्रकट झाली, त्यामुळे तिलाही गंगाच म्हणतात. तिचे स्थान दक्षिण भारतात येत
असल्यामुळे तिला ‘दक्षिण गंगा’ ही म्हणतात.
३ आ. गौतमी :
महर्षि गौतम ऋषींच्या तपसामर्थ्यामुळे ती पृथ्वीवर प्रकट झाली, त्यामुळे तिला ‘गौतमी’ पण म्हणतात.
३ इ. इतर नावे
भगवान शंकरांनी तिचे वर्णन करताना गौतम
ऋषींना माहेश्वरी, वैष्णवी, नंदा, सुनंदा, कामदायिनी, ब्रह्मतेजससमानिता इ. नावे सांगितली.
मात्र ‘गोदावरी’हेच नाव विशेष प्रचलित
झाले.
३ ई.
कण्वऋषींनी ब्रह्मपुराणात गोदावरीची
स्तुती करताना तिला ‘ब्राह्मी’आणि ‘त्र्यंबका’या नावांनी संबोधित केले आहे.
४. ‘पुरुषार्थचिंतामणि’ग्रंथात गोदावरी नदीचा उल्लेख आदि नदी असा येतो.
आद्या सा गौतमी गङ्गा द्वितीया जाह्नवी
स्मृता ।’
अर्थात, ‘गोदावरी आदि गंगा (नदी) आहे;
जाह्नवी (गंगा) तिच्यानंतर पृथ्वीवर आली.
गोदावरी ला गंगेची आद्य बहीण मानतात.
भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याच्या अगोदर गोदावरीचा उगम झाला होता. त्यामुळे तिला
वृद्धगंगा या नावानेही ओळखले जाते.
५. बंगालच्या उपसागरात विलीन होण्यापूर्वी
गोदावरी नदीचे सात प्रवाहात विभाजन होते. या सात प्रवाहांना – वसिष्ठा, वैश्वामित्री,
वामदेवी, गौतमी, भारद्वाजी, आत्रेयी और जामदग्नी या सप्तर्षींच्या नावाने ओळखले जाते.
६. गोदावरीला आरोग्यदायिनी मानतात.
राजनिघंटु या आयुर्वेदावरील ग्रंथात
तिच्या पाण्याचे वर्णन असे केले आहे.
पित्तार्तिरक्तार्तिसमीरहारि पथ्यं
परं दीपनपापहारि ।
कुष्ठादिदुष्टामयदोषहारि गोदावरीवारि तृषानिवारि ॥ (राजनिघंटु, वर्ग १४, श्लोक ३२)
७. गोदावरी नदी ही सात पवित्र नद्यांपैकी
एक मानली जाते.
भारतात ८४ गंगातत्त्वाच्या निदर्शक
असलेल्या ८४ नद्या आहेत. यांपैकी गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधु, शरयू आणि
नर्मदा, यांना ‘सप्तगंगा’म्हटले जाते.
त्यामुळे रोज स्नान करताना खालील श्लोक
म्हणण्याचा प्रघात आहे.
गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती
।
नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥ (नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक ३३)
८. पापविनाशिनी :
गोदावरी भीमरथी कृष्णवेण्यादिकास्तथा
।
सह्मपादोद्भवा नद्य: स्मृता: पापभयापहा:
॥ ( विष्णुपुराण, देवतांची उपासना : शक्ति खंड ८)
अर्थ : सह्याद्रीतून उद्भव होणाऱ्या गोदावरी, भीमरथी, कृष्णवेणी
इ. पाप आणि भय दूर करणाऱ्या नद्या आहेत.
९. पुण्यदायिनी :
दक्षिणवाहिनी गोदावरीला पुण्यदायिनी
मानले जाते.
कालिन्दी पश्चिमा पुण्या गङ्गा चोत्तरवाहिनी
।
विशेषा दुर्लभा ज्ञेया गोदा दक्षिणवाहिनी ॥
अर्थ : पश्चिमेची यमुना, उत्तरेला असणारी गंगा आणि और दक्षिणेची गोदावरी विशेष दुर्लभ व पुण्यदायिनी आहे.
१०. मोक्षदायिनी :
कुरुक्षेत्री दान, नर्मदा तटी तप व
गंगेच्या किनारी मृत्यू येणे हे अत्यंत पुण्यदायी आहे; परंतु याव्यतिरिक्त गोदातटी
केवळ निवास केल्यानेही मोक्ष प्राप्त होतो.
या गतिर्योगयुक्तानां मुनीनाम् ऊर्ध्वरेतसाम्
।
सा गतिः सर्वजन्तूनां गौतमीतीरवासिनाम् ॥ (गुरुचरित्र, अध्याय १३, श्लोक ६८)
अर्थ : मृत्यु पश्चात ऊर्ध्वरेता (ब्रह्मचारी) मुनिंना जी सद्गती
प्राप्त होते, तीच सद्गती गोदातटी वास करणाऱ्या सर्व जीवांना प्राप्त होते; अर्थात
गोदावरी तटी वास करणाऱ्या सर्व जीवांना मृत्यु पश्चात मोक्ष प्राप्त होतो.
११. तीर्थश्राद्ध :
कूर्मपुराणात गोदावरी तीरी श्राद्ध करणे विशेष महत्वपूर्ण असल्याचा उल्लेख केला गेला आहे.
मूलमध्यावसानेषु गोदा लभ्या कलौ युगे
।
मुण्डनं तत्र कुर्यात् वै तीर्थश्राद्धं
विशेषतः ॥
अर्थ : कलियुगात गोदावरीच्या उगमस्थानी
म्हणजे त्र्यंबकेश्वर, मध्यस्थान म्हणजे नांदेड येथे व अंतिम स्थान म्हणजे राजमहेंद्री
येथे मुंडन व तीर्थश्राद्ध करावे.
१२. कुंभमेळा ः
अमृत – मंथनच्या वेळेस अमृताचे थेंब
गोदावरी नदीत नाशिकच्या रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी पडले. त्यामुळे
दर १२ वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा या ठिकाणी भरतो. देशभरातील साधू, संत-महंत व भाविक
स्नानासाठी येतात. म्हणून गोदावरीला गंगे इतकेच महत्त्व आहे.
गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर, नासिक, नेवासे, पैठण, भद्राचलम्, राजमहेंद्री व कोटिपल्ली ही प्रमुख तीर्थक्षेत्रे असून नासिक व राजमहेंद्री येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थात स्नानसोहळा असतो. अनेक प्रसिद्ध देवस्थाने, संतांची निवासस्थाने यांमुळे महाराष्ट्रातील गोदातटाकीचा, विशेषतः मराठवाड्याचा, प्रदेश संतभूमी म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यातील पैठण हे धार्मिक महत्त्वाचे स्थान असून नांदेड येथे शीख समुदायाचा एक प्रमुख गुरुद्वारा असून शिखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंग यांचे नांदेड येथे निधन झाले होते.
आंध्रप्रदेशात कंदाकुर्ती येथे मंजिरा नदी, हरिद्रा नदी
या उपनद्यांचा गोदावरीशी त्रिवेणी संगम होतो.
शिवालय व स्कंद आश्रम नावाची प्राचीन देवालये आहेत. बासर येथे देवी सरस्वतीचे
मंदिर असून, धर्मापुरी (करीमनगर जिल्हा) हेसुद्धा प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पट्टिसीमा
ह्या नयनरम्य स्थळी गोदावरी नदीच्या मधोमध देवकूट डोंगरावर वीरभद्र मंदिर आहे. भद्राद्री कोठागुडम जिल्ह्यात आल्यावर गोदातीरावर
भद्राचलम येथे धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रसिद्ध असे श्री सीता रामचंद्रस्वामी
मंदिर आहे. त्यामुळेच भद्राचलमला दक्षिण अयोध्या म्हणून सुद्धा ओळखले जाते. राजमहेंद्री हे गाव राजमुंद्री या नावानेदेखील ओळखले
जात असे. राजा महेंद्रवर्मन् हा इतिहासातला पहिला ज्ञात तेलुगू राजा येथे होऊन गेला.
गोदावरी नदीबाबत भौगोलिक माहिती ः
गोदावरी हि भारताची दुस-या क्रमांकाची
नदी आहे. तिच्या एकूण लांबी नुसार (१४६५) जगात तिचा ९२ वा क्रमांक आहे. गोदावरी नदीचे
खोरे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समृद्ध खोरे म्हणून ओळखले जाते. पश्चिम
घाटातील सह्याद्री पर्वतरांगेतील ब्रह्मगिरी पर्वतावर हिचा उगम होवून
ती दख्खनचे पठार, आंध्रमध्ये पूर्वघाट
असा प्रवास करते. गोदावरी नदीच्या प्रवाहाची सर्वसाधारणपणे दिशा पूर्व – आग्नेयेस अशी
आहे. दख्खनच्या पठारावरून वाहणारी नदी महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून वाहूत
जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरीची एकून लांबी सुमारे १४६५ कि.मी
असून क्षेत्र १५३७७९ चौ .कि. मी आहे.
No comments:
Post a Comment