भागवत संप्रदायाचे आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वर माऊलींचे सकल तीर्थ. विश्वकल्याणाच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो, आद्यगुरू, आदिनाथ असणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराज यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी रोजी नाशिकमधील त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे साजरा केला जातो. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई या भावंडांमधे निवृत्तिनाथ थोरले होते. निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांचे गुरू होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तिनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. मात्र, आळंदीवासीयांनी त्यांना स्वीकारले नाही. देहांत प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित नाही, असा गावचा हुकूम झाल्यानंतर विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांनी जलसमाधी घेतली. आई-वडिलांविना सर्व भावंड पोरकी झाली. सर्वांत थोरले म्हणून निवृत्तिनाथांनी सर्व भावंडांचा सांभाळ केला. त्यांना योग्य दिशा दाखवली. मार्गदर्शन केले आणि त्यांचे गुरूही झाले.
पूर्वायुष्य आणि गहिनीनाथांचे शिष्यत्व :
माघ वद्य प्रतिपदेला सन ११९५ रोजी निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म झाला, असे सांगितले जाते. एके दिवस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. अरण्यातून बाहेर पडल्यानंतर निवृत्तिनाथ कुठे दिसेनात. पुष्कळ शोध करूनही निवृत्तिनाथ सापडले नाहीत. सात दिवसांनंतर निवृत्तिनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. गेले सात दिवस कुठे होता, अशी विचारणा केल्यावर, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर, असे सांगितले, असे निवृत्तिनाथांनी सांगितले. अशा प्रकारे निवृत्तिनाथ गहिनीनाथांचे शिष्य बनले.
संत ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक :
नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे, असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर, असे अभंग त्यांनी रचले आहेत. निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून अधिक आहे. आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले, असे निवृत्तिनाथांबद्दल म्हटले जाते.
ज्ञानेश्वरीचे प्रेरणास्रोत :
निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे शके १२१२ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे येथे भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. हा अलौकिक ग्रंथ त्यांनी अत्यंत नम्रपणे संतसद्गुरू निवृत्तिनाथांच्या चरणी अर्पण केला. यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून 'अमृतानुभव' हा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. निवृत्तिनाथांबद्दल असलेला आदर ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो. अनेक तीर्थयात्रांमध्ये निवृत्तिनाथांसोबत ज्ञानेश्वर होते.
'सटीक भगवद्गीता' आणि 'समाधि बोध' :
निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका, असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. मात्र, आताच्याघडीला ते उपलब्ध नाहीत. धुळे येथील श्रीसमर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते आहेत, ती निवृत्तिनाथ महाराजांची आहेत, असे सांगितले जाते. निवृत्तिनाथ समजून घ्यायचे तर अनेक संतांच्या हृदयस्थ भावनांना मन–स्पर्श करायचा तो भक्तीच्या ओथंबलेपणातून. तिन्ही भावांचे शब्दपूजन सूर्याची उपमा देऊन केली जाते. सूर्य म्हणजे प्रकाशाची सहस्त्रावधी किरणे, तसेच सद्गुरू निवृत्तिनाथांचे ज्ञानस्वरूप. विश्व-आत्म-स्वरूप म्हणजे निवृत्तिनाथांचे व्यक्तिमत्त्वदर्शन. निवृत्ती हे तत्त्व आहे. गुरुतत्त्व स्वरूप असतात. संतांची भाव-एकवाक्यता अनुभूतिपूर्ण आहे.
त्रंबकेश्वरी समाधी :
निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या चारही भावंडानी आपल्या अभंग रचनेच्याद्वारा पंढपुरची वारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले. निवृत्तिनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. नामदेव महाराजांच्या नंतरच्या काळातले सेना महाराज निवृत्तिनाथांचे वर्णन करतात. संत चोखोबा महाराज त्यांच्या अभंग गाथेतील संतांची आरती या प्रकरणात निवृत्तिनाथांचा उल्लेख निरंतर ब्रह्म आणि आनंदाचा पूर असा करतात. एकनाथ असो की नामदेव, सेना महाराज असो की चोखोबा, जनाबाई असो की कान्होपात्रा, तुकाराम महाराज असो की निळोबाराय, सोपान असो की मुक्ताई, या सर्व संतांनी निवृत्तिनाथांचे गुणगायन केले आहे. संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सरते शेवटी जेष्ठ वद्य द्वादशी रोजी निवृत्तिनाथ महाराजांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली.
संत निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीला ७२५ वर्षे झाली आहेत. हा समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात झाला. मग आता यात्रा आता कशी असा प्रश्न काही भाविकांना पडतो या प्रश्नाचे स्पष्टीकरण असे की, त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवनसमाधी घेतली थोडक्यात पावसाळा असे असताना यात्रा उत्सव पौष वद्य एकादशीला थोडक्यात या तिथीला भरवणे हा निर्णय तत्कालिन संतांनी घेतला.
श्री हरी पांडुरंगाची पंढरपूर यात्रा आषाढात असते . अशा वेळेस सर्व ठिकाणच्या ,सर्व संतांच्या दिंड्या पंढरपूर वाटचाल करीत असतात. ही पायी वाटचाल एक महिन्यापर्यंत अगोदर सुरू असते. व परतीत 15 दिवस सुरू असते. कार्तिकात माऊलींची आळंदी यात्रा असते. तर पावसाळ्यात त्रंबकेश्वरला मोठा पाऊस असतो. अशी काही कारणे लक्षात घेऊन तत्कालीन संतांनी सातशे वर्षा पूर्वी समाधी सोहळ्या नंतर म्हणजे संत निवृत्ती नाथ यात्रा पौष वारी पौष वद्य एकादशीला तिथीला यात्रा भरवावी
असे ठेवले, असा निर्णय घेतला व तेंव्हा पासून अशा प्रकारे पौष महिन्यातील षटतिला एकादशीच्या दिवशी दरवर्षी यात्रा भरत आहे .