Thursday, 13 January 2022

मकर संक्रांतीची माहिती

“तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला”


पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं प्रत्ययनं स कालः।

संक्रांतिवाच्योsयमतिप्रशस्तः स्नाने च दाने च स्वेर्विशेषात्।।


संक्रांत म्हणजे काय... याचा अर्थ समजून घेऊन आपण सण म्हणून साजरा करणे उचित ठरेल. कोणताही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्यावेळी प्रवेश करील, त्या प्रवेशकाळाला ‘संक्रांति’ असे म्हणतात. हा संक्रांतिकाल अत्यंत सूक्ष्म असतो. म्हणून त्यावेळी धार्मिक विधीसाठी पुण्यकाल असे सांगितलेले आहे. ते संक्रांतीच्या पुण्यकालात स्नान, दान इत्यादी करणे पुण्यकारक आहे, असे शास्त्रकार सांगतात. 

मकर संक्रांत म्हणजे काय...मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. धनु राशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या प्रक्रियेला मकर संक्रांती असं म्हटलेलं आहे.  दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं.  वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते. 


आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे.

मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का खायच्या असतात?  तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो. 

मकर संक्रांत भारतीय महिलांचाही आवडीचा सण आहे. एकतर नववर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे. त्यात मकर संक्रातीला महिला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांना साजरा करण्यासाठी हा सण म्हणजे पर्वणीच असते. पण यावेळी नक्की काळा रंग का परिधान करायचा याची माहिती सर्वांनाच नसते. त्याचं शास्त्रीय कारण आहे. सणासुदीला काळा रंग खरंतर वर्ज्य आहे. मात्र मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय मकर संक्रातीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. त्यामुळे हलव्याचे दागिनेदेखील यावेळी घालण्यात येतात. 

एका आख्यायिकेनुसार, महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार,भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्या वेळी तिसऱ्या दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळेच संक्रात येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करीत नाहीत. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचे माहात्म्य सांगितल्याची कथाआढळते. 

महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीने किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो. 

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।

तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।

देवीपुराणातील या श्लोकानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मकर संक्रांतीच्या शुभ काळात स्नान, दान, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे.  या दिवशी लोक नदीत अंगाला तीळ लावून स्नान करतात. यानंतर, सूर्याला जल अर्पण केल्यानंतर, त्याची पूजा केली जाते आणि  चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना केली जाते. या नंतर वेगवेगळ्या वस्तूंचे दान केले जाते. आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उडविले जातात. गुजरात मध्ये तर पतंगोत्सव साजरा करतात. नाशिक जिल्ह्यातील येवल्याचाही  पतंगोत्सव प्रसिद्ध आहे. 

मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात – Makar Sankranti (महाराष्ट्र). . . पोंगल – Pongal (तामिलनाडु) . . . उत्तरायण (गुजरात व राजस्थान) . . . लोहढी – Lohri (पंजाब) . . . माघमेला – Magh Mela (ओडिसा) . . . भोगाली बिहु – Bihu (आसाम) . . . संक्रांती – Sankranti (कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार) अशी विविध नावं या सणाला आहेत.




No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....