नाशिक जिल्ह्यात फक्त मालेगावचाच एक तो काय भुईकोट आहे असे अनेकांना वाटते. पण लासलगावचा भूईकोट व त्याच सोबत नांदगाव तालुक्यातील खोज किल्ला हे देखील भुईकोट आहेत. त्यातील लासलगावच्या भुईकोटा विषयी तरी काही लोकांना माहिती असते पण नांदगाव तालुक्यातील खोज किल्ल्यविषयी स्थानिक व काही अभ्यासू दुर्ग भटक्यांनशिवाय इतर कुणास माहीत नाही.
नाशिकपासून जवळजवळ १३० किमी व नांदगाव पासून १६ किमी वर आहे ते नस्तनपुर. या नस्तनपुराची अजून वेगळी ओळख म्हणजे येथे प्रभू श्रीराम यांनी वसवलेल शनिपीठ आहे; आणि याच शनिपिठाच्या पुढे आहे खोज किल्ला. किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे किल्ल्याला खंदकासोबतच दुहेरी तटबंदीचा साज आहे तसेच किल्ल्यात असलेला एक बुरुज काहीसा सुस्थितीत आहे. या बुरुजाचा आकार अतिशय मोठा असून याच्या आत जाण्याचं जिन्याची रचना केलेली दिसते. तसेच २ मजली सज्जे या बुरुजात केलेले दिसून येतात व आधी हा बुरुज दुसऱ्या एका बुरुजाला सज्ज्यायुक्त जिन्याने जोडलेला होता अशी योजना क्वचितच कोठे पहावयास मिळते
सद्यस्थितीत दुसरा बुरुज पूर्ण ढासळला आहे. या बुरुजासोबतच अजून ८ बुरुज होते पण त्यांचे आता फक्त अवशेष तेवढे दिसतात. त्याचसोबत अश्व शाळा, हमामखाना, दगडी बारव, तटबंदी यांचे अवशेष दिसून येतात खोजा नावाच्या राजाची आख्यायिका इतिहास विचारला तर स्थानिक सांगतात, पण एकूणच गडावरील दुर्गस्थापत्य पाहता हा किल्ला निजामशाहीत निर्माण केला गेला असावा. पण शोकांतिका अशी की आपल्याला या किल्याच्या इतिहासाचा अंदाजच तेवढा लावता येतो.
गॅझेटियर मध्येदेखील नोंद नसलेल्या या किल्ल्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे नाहीतर काही दिवसात याचे नाव फक्त तेवढे शिल्लक उरेल...
प्रा.प्रशांत पाटील
#travellerprashant #khojafort #nastanpur #nashik #gadkille #fortsofindia #maharashtra_forts
No comments:
Post a Comment