Tuesday, 11 May 2021

आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन

 आज आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन आहे. 

दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो. रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जगातील प्रत्येक परिचारिकेचा सन्मान करण्याचा हा दिवस. १९७१ मध्ये आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या लेडी फ्लोरेंस नायटिंगेल यांच्या जन्मदिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. तेव्हापासून १२ मे हा दिवस हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स यांचा जन्म १२ मे १८२० ला इटलीमध्ये झाला. धनाढ्य कुटुंबात वाढूनही फ्लोरेंस नायटिंगेल यांनी आपले जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित केले. आधुनिक शुश्रुषा पद्धती विकसित केल्या. रात्ररात्र त्या हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत. त्यामुळे त्यांना 'लॅम्प लेडी' असेही म्हटले जात असे.

नर्सिंग क्षेत्राकडे त्या काळात तितकेसे प्रतिष्ठेने पाहिले जात नव्हते. मात्र त्यांनी सर्व सामाजिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत १८५१ मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे १८५३ मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं. 

१३ ऑगस्ट, १९१९ रोजी फ्लोरेंस नाईटिंगेल यांचं निधन झालं. नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदानामुळे त्यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो. नर्सिंग क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने गौरवण्यात येते.

नर्सिंग चे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय व प्रशंसनीय आहे. परिचरिकांमुळे रुग्णांची वेळोवेळी निगा राखली जाते.  स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारीका दिनाच्या (International Nurses Day) हार्दिक शुभेच्छा.




Sunday, 9 May 2021

मातृदिन अर्थात मदर्स डे

*दिनविशेष*

मदर्स डे अर्थात जागतिक मातृदिन 

आईचा सन्मान करण्यासाठी 'मातृदिन'  साजरा केला जातो. हा दिवस जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो. सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा मदर्स डे साजरा केला जातो. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो तर पाश्चात्य देशात व भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.

"स्वामी तिन्ही जगाचा
आई वीना भिकारी "
या उक्तितच आईचा महिमा किती अगाध आहे हे समजते.

मातृ दिनाचा इतिहास :
मे महिन्याचा दुसरा रविवार हा पाश्चिमात्य देशात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. 

मातृ दिनाचा इतिहास खूप प्राचीन आहे. १६ व्या शतकापासून इंग्लडमध्ये एक मोठा समुदाय प्रभू येशूची आई मदर मेरीचा सन्मान करत असे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती वूड्रो विल्सन यांनी १९१४ मध्ये मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून अमेरिकेत मातृ दिन साजरा केला जात आहे. अमेरिकेत साजरा करणारा मदर्स डे हल्ली सर्वत्र साजरा केला जात आहे. 

मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाचा हा दिवस. मात्र,आईवरचे प्रेम व्यक्त करणासाठी एक दिवस पुरेसा आहे का? 

भारतीय संस्कृतीत आई ही संकल्पनाच अशी आहे की, तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकताच ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे की, ती आपण मोजमाप करता येत नाही. भारतीय संस्कृतीत आईला ईश्वराचे रूप मानले आहे. कोणतेही कार्य करण्याच्या आधी सर्वप्रथम आईचा आशीर्वाद घेतला जातो. 

आई ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे.तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षिता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. ममता, माया आणि खरा आपलेपणाचा चिरंतन ओलावा, अनेक समस्यांवरचा एकच उपाय आई होय. रडणारे बाळ आईकडे दिले की लगेच शांत होते.  बाळाला हाताला धरून चालायला शिकवणारी आईच जन्म घेणार्‍या प्रत्येकाची पहिली गुरू असते. 

तीच मुलांना लहानाचे मोठे करून त्यांच्यावर संस्कार करते. मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत अललेलं एक नातं म्हणजे आई.

एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्‍यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही.

मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत असलेलं एक नातं म्हणजे आई.

आई सकाळी उठल्यापासून आपल्या पिलांसाठी राबत असते. एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्‍यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्‍या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही;

आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं.

माझ्या मनाचा आरसा आहे माझी आई. आईला कधी माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज मला भासलीच नाही.

आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिच्या उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही, हे माहीत असूनही आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात मातृ दिन साजरा केला जातो.


Thursday, 6 May 2021

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानचे लाईव्ह दर्शन मोबाईल ॲप

या मोबाईल ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग चे लाईव्ह दर्शन घेता येईल तसेच ऑनलाईन देणगी ही देता येऊ शकते. सदर ॲप गूगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. तरी या सुविधेचा सर्व भक्तांनी सदर ॲप डाऊनलोड करून अवश्य लाभ घ्यावा. 

या ॲपमध्ये देवस्थानची संपूर्ण पौराणिक, ऐतिहासिक माहिती देण्यात आलेली आहे. तसेच देवस्थानतर्फे वर्षभरात होणारे विविध उत्सव व सोहळे यांचे वेळापत्रकही दिलेले आहे.

सदर ॲप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करूनही डाऊनलोड करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.shritrimbakeshwardevsthan.app






सप्तश्रृंगनिवासिनी सप्तश्रृंगी माता

विश्वव्यापक विश्वजननी विश्वाची माता 
या विश्वावरी संकट पडिले धाव घे आता ।

जय अंबे जगदंबे, सकलांची माता 
सप्तश्रृंगनिवासिनी आळवितो आता ||

आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठाचे अर्थात श्री सप्तशृंग निवासिनी देवी - श्री सप्तशृंगी मातेचे आज गुरुवार, दिनांक- ०६/०५/२०२१ रोजीचे दैनंदिन मुखदर्शन...!

मास्क वापरा...
सुरक्षित रहा...
आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या.

Wednesday, 5 May 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ३) : गौतमीपुत्र विहार

लेणे क्रमांक ३ "गौतमीपुत्र विहार" (लेणे खोद्ण्याचा काल अंदाजे इसवी सन १५० )
हे लेणे भारतात आढळणा-या सर्व लेण्यांमधील अत्यंत एक महत्वाचे आहे. त्रिरश्मी लेणी संकुलातील हे सर्वाधिक मोठे लेणे आहे. या लेण्याची निर्मिती दुसर्‍या शतकात (अंदाजे इसवी सन १५०च्या आसपास)सातवाहन कुळातील महान सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीची आई राणी गौतमी बलश्री हिने, त्याच्या मृत्युनंतर केली व धम्मसंघाला हे लेणे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण केले. या लेण्यात अनेक महत्त्वपूर्ण शिलालेख आहेत. हे लेणे गौतमीपुत्र सातकर्णीची आई राणी गौतमी बलश्री हिने खोदवले असल्यामुळे हे 'देवीलेणे' किंवा ‘राणीचे लेणे’ म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील लेण्यांचा कालक्रम मांडण्यासाठी हे लेणे फार महत्वाचे व उपयुक्त ठरले आहे. चार महत्त्वपूर्ण शिलालेख या लेण्यात आहेत. व्हरांड्यातली संपूर्ण दर्शनी भिंत व्यापून टाकलेल्या या लेखात महाराष्ट्राचा आद्य राजवंश सातवाहनांच्या कुळाची, त्यातील सत्ताधीशांची बरीच माहिती मिळते. अनेकांचा राज्यारोहनाचा काळ मिळतो. सत्तेचा एकूण कालावधी, त्यांनी नहपान या शक राजाचा केलेला पराभव असा बराच मोठा तपशील कळतो. या विहाराचा शिल्पांनी सालंकृत असलेला मुख्य दरवाजा सांचीच्या प्रवेशद्वारावरील तोरणाची आठवण करून देतो. या दरवाज्याचे भित्तीस्तंभ सहा चौकोनांमध्ये विभागले आहेत. या प्रत्येक चौकोनात एका स्त्री-पुरुषाच्या युगुलाची कथा शिल्पपटाद्वारे कथन केली आहे. हे जोडपे म्हणजे जणू गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे. दरवाज्याच्या तोरणावर बोधी वृक्ष, दगोबा आणि धम्मचक्र ही तीन प्रतीके व त्यांची उपासना करणारे भिक्कु व नागरिक दाखवली आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजुंना दोन द्वारपाल उभे आहेत व ते चव-या ढाळत आहेत. त्यांच्या वेषभुषेवरुन तत्कालीन समाजात वापरल्या जाणा-या वस्त्रप्रावरणांची व शिरोभूषणांची आपणास कल्पना येते.
लेणी क्रमांक 3, प्रवेशद्वार

सांची च्या स्तुपाच्या प्रवेशद्वारावरील तोरणाची आठवण करुन देणारे तोरण

प्रवेशद्वाराच्या चौकटीवरील शिल्पपट


 हे लेणे म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी निर्माण केलेला विहार आहे. या विहारातील सभागृह ४१ फूट रुंद आणि ४६ फूट लांब आयताकृती आहे. आत, भिक्कुंच्या निवासासाठी १८ कक्ष निर्माण केलेले आहेत. या सभागृहाच्या मधोमध समोरच्या भिंतीवर उठावदार स्तूप कोरलेला आहे. या स्तूपाच्या दोन्ही बाजूस स्त्री प्रतिमा आहेत. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वरच्या बाजूस हाती पुष्पमाला घेतलेले गंधर्व अवकाशी विहार करत आहेत. स्तुपाच्या बाजुला धम्मचक्र व सिंह तर स्तुपाच्या हर्मिकेवर पाच छत्र कोरलेले आहेत.
विहाराचा अंतर्भाग, स्तुप व बाजुचे कक्ष 


लेणे क्रमांक ३ च्या व्हारांड्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ 
गौतमीपुत्र विहाराच्या व्हरांड्यात सहा भारदस्त अष्टकोनी स्तंभ आहेत. हे सालंकृत स्तंभ खोदीव दगडी चौथ-यांवर उभे आहेत. या स्तंभाची स्तंभशीर्षे हर्मिकेच्या प्रतिकृतीवर स्थित आहेत. हर्मिका आमलकाच्या चारी कोप-यावरील चार छोट्या यक्षांनी तोलून धरलेली आहे व हे यक्ष या स्तंभावरील उलट्या घटाच्या आकाराच्या फुगीर भागावर उभे आहेत. या स्तंभशीर्षांवर पुढच्या बाजूने हत्तीवर बसलेला राजपरिवार व मागील बाजूस हत्ती, बैल, सिंह, स्फिंक्स, गरुडाचे मुख असलेला प्राणी ( ज्याला ग्रीक पुराणांमध्ये 'ग्रिफिन' नावाने ओळखले जाते) इ. प्राणी कोरलेले आहेत.
लेणी अभ्यासक नहपान विहार (लेणे क्र १०) (डावीकडे) आणि गौतमीपुत्र विहार (लेणे क्र. ३)(उजवीकडे)च्या स्तंभशीर्ष ची नेहमी तुलना करतात. लेणे क्र. ३ चे स्तंभशीर्ष हे लेणे क्र १० च्या तुलनेत आकाराने छोटे व कमी अलंकृत दिसतात.तसेच या स्तंभावरील घंटेचा आकारऐवजी उलट्या घटाचा आकार केलेला आहे. लेणे क्र. ३ हे नहपान विहारानंतर खोदलेले असल्याने त्यातील स्तंभांच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तसेच हे स्तंभ अर्धवटरित्या खोदीव चौथ-यांवर टेकवेलेले आहेत.
या लेण्याच्या शीर्षपट्टीवर अतिशय अलंकारीक रचना केलेली आहे. वरच्या बाजूला भौमितिक आकाराची नक्षी व त्याखालच्या ओळीत हत्ती, घोडा, बैल विविध प्राणी एका रेषेत शिल्पांकीत केले आहेत. या लेण्याच्या दर्शनी भागात सर्व स्तंभांच्या खालच्या बाजूला चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे जू कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहून नेत आहेत.


या लेण्यातील शिलालेख 
गौतमीपुत्र सातकर्णीचा नातू राजा वशिष्ठिपुत्र पुळुमावी याच्या कारकीर्दीत या लेण्याचे काम पूर्ण झाले व त्याचे धम्मसंघाला लोकार्पण करण्यात आले. श्री पुळुमावीने (इ.स. दुसरे शतक)आपल्या कारकिर्दीच्या १९व्या वर्षात खोदलेल्या दीर्घ शिलालेखात (शिलालेख क्र. २), महान सम्राट गौतमीपुत्राची मातोश्री महाराणी गौतमी बलश्री हिने हे लेणे निर्माण केले व संघाला अर्पण केल्याचे स्पष्ट केले आहे. श्री पुळुमावीच्या कारकिर्दीच्या २२व्या वर्षीही अजुन एक दिर्घ शिलालेख (शिलालेख क्रमांक ३) खोदवून घेतला आहे. त्याच्या कारकिर्दीच्या १८व्या वर्षी या लेण्याच्या प्रवेशद्वारावर दोन शिलालेख (क्रमांक ४ व ५)शिलालेख कोरलेले आहेत.
या व्हरांड्याच्या भिंतीवर गौतमीपुत्रची आई गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत. हे शिलालेख महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांपैकी एक आहेत. सर्वात महत्वाचा शिलालेख गौतमीपुत्रच्या आईने म्हणजे गौतमी बलश्री ने आपला नातू वशिष्ठिपुत्र पुळुमावीच्या कारकिर्दीत या लेण्यात खोदवून घेतला. या प्रदिर्घ शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा, त्याचे विविध युद्धातील विजय, शत्रुंचा संहार करून मातृभुमीची त्यांच्या तावडीतून सुटका व या विजयाप्रित्यर्थ हे लेणे खोदवून संघाला भेट म्हणून अर्पण केल्याचे वर्णन केले आहे.
गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हा या बहुतांश भागावर नहपान क्षत्रपांची सत्ता होती. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडून नाशिक जवळ झालेल्या युद्धात त्यांना पराभूत केले व त्यांचा समूळ उच्छेद केला. या युद्धात नहपानाच्या संपूर्ण क्षहरात वंशाचे निर्दालन केले त्यामुळे गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन या शिलालेखात 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे केले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. आपली ही मातृभुमी नहपानाच्या ताब्यातून जिंकून घेऊन त्याने सातवाहन वंशाची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा सन्मानपूर्वक गौरव केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हवांचा नाश केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला आहे. हा शिलालेख 'नाशिक प्रशस्ती' या नावानेही ओळखला जातो. या लेण्याच्या व्हरांड्याच्या मागील भिंतीवर हा शिलालेख स्थित आहे. याच शिलालेखात गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्रीने आपल्या पुत्राच्या रुपाचेही वर्णन केले आहे. गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने बलशाली आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीमान आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.
इसवी सन १८९७ मध्ये अनामिक ब्रिटीश छायाचित्रकाराने काढलेले लेणे क्र.३ चे छायाचित्र 


(छायाचित्रे विकीपिडीया व मिसळपाव या वेबसाईटस च्या सौजन्याने)

 #nashikcaves #pandavleni #nasikcaves #trirashmicaves #rockcutcaves #heritage #satvahan #history

Monday, 3 May 2021

Nashik info

आता नाशिक जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असलेले बेड्स, ॲाक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर, तसेच प्लाझ्मा उपलब्ध असणा-या संस्था, ऑक्सिजन पुरवठादार, हेल्पलाईन व संबंधित माहिती एका क्लिक वर... खाली दिलेल्या ॲपवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. धन्यवाद 🙏🏻

हे ॲप १४ वर्षे वयाच्या आदित्य अशोक दारके या नाशिकमधील न्यु इरा हायस्कूल च्या  इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांने तयार केले आहे.
 
कृपया इतर गृपवर शेअर करा.

#MahaCovid

https://play.google.com/store/apps/details?id=com.adityadarke.nashikinfo

Saturday, 1 May 2021

महाराष्ट्राची राज्य प्रतिके

महाराष्ट्र दिनानिमित्त आज आपण महाराष्ट्राची राज्य प्रतिके जाणून घेऊयात.

ही राज्य प्रतिके पाहिल्यानंतर आपला महाराष्ट्र किती नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे हे आपणास लक्षात येते.

राज्य फुल - ताम्हण
राज्य वृक्ष - आंबा
राज्य प्राणी - शेकरू
राज्य पक्षी - हरियाल
राज्य फुलपाखरू - राणी पाकुळी.

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...