त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अमृतकुंडाची साफसफाई सध्या सुरू असून, कुंडातील पाणी काढण्यात आले आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग अनेक वर्षांनंतर प्रथमच दर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे.
या कुंडाच्या तळाशी एके खड्ड्यात भगवान महादेवांची पिंड असून त्यावर कायमस्वरूपी पाणी साचलेले असते. ब्रह्मगिरी पर्वतावरील पंचलिंग डोंगरातून येणारे पाणी या कुंडात येते आणि हे पाणी आजवर कधीही पूर्णपणे आटले नसल्याचे सांगितले जाते. याच अमृतकुंडातील पाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पूजेसाठी वापरले जाते. समुद्रमंथनावेळी अमृताचे थेंब येथे पडल्याची आख्यायिका प्रचलित असून, त्यावरूनच या कुंडाला 'अमृतकुंड' हे नाव पडल्याचे मानतात.
या दुर्मिळ दर्शनामुळे भाविकांमध्ये आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, अनेक जण याला अत्यंत शुभ मानत आहेत.