Wednesday, 5 May 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक ३) : गौतमीपुत्र विहार

लेणे क्रमांक ३ "गौतमीपुत्र विहार" (लेणे खोद्ण्याचा काल अंदाजे इसवी सन १५० )
हे लेणे भारतात आढळणा-या सर्व लेण्यांमधील अत्यंत एक महत्वाचे आहे. त्रिरश्मी लेणी संकुलातील हे सर्वाधिक मोठे लेणे आहे. या लेण्याची निर्मिती दुसर्‍या शतकात (अंदाजे इसवी सन १५०च्या आसपास)सातवाहन कुळातील महान सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीची आई राणी गौतमी बलश्री हिने, त्याच्या मृत्युनंतर केली व धम्मसंघाला हे लेणे त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्पण केले. या लेण्यात अनेक महत्त्वपूर्ण शिलालेख आहेत. हे लेणे गौतमीपुत्र सातकर्णीची आई राणी गौतमी बलश्री हिने खोदवले असल्यामुळे हे 'देवीलेणे' किंवा ‘राणीचे लेणे’ म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील लेण्यांचा कालक्रम मांडण्यासाठी हे लेणे फार महत्वाचे व उपयुक्त ठरले आहे. चार महत्त्वपूर्ण शिलालेख या लेण्यात आहेत. व्हरांड्यातली संपूर्ण दर्शनी भिंत व्यापून टाकलेल्या या लेखात महाराष्ट्राचा आद्य राजवंश सातवाहनांच्या कुळाची, त्यातील सत्ताधीशांची बरीच माहिती मिळते. अनेकांचा राज्यारोहनाचा काळ मिळतो. सत्तेचा एकूण कालावधी, त्यांनी नहपान या शक राजाचा केलेला पराभव असा बराच मोठा तपशील कळतो. या विहाराचा शिल्पांनी सालंकृत असलेला मुख्य दरवाजा सांचीच्या प्रवेशद्वारावरील तोरणाची आठवण करून देतो. या दरवाज्याचे भित्तीस्तंभ सहा चौकोनांमध्ये विभागले आहेत. या प्रत्येक चौकोनात एका स्त्री-पुरुषाच्या युगुलाची कथा शिल्पपटाद्वारे कथन केली आहे. हे जोडपे म्हणजे जणू गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे. दरवाज्याच्या तोरणावर बोधी वृक्ष, दगोबा आणि धम्मचक्र ही तीन प्रतीके व त्यांची उपासना करणारे भिक्कु व नागरिक दाखवली आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजुंना दोन द्वारपाल उभे आहेत व ते चव-या ढाळत आहेत. त्यांच्या वेषभुषेवरुन तत्कालीन समाजात वापरल्या जाणा-या वस्त्रप्रावरणांची व शिरोभूषणांची आपणास कल्पना येते.
लेणी क्रमांक 3, प्रवेशद्वार

सांची च्या स्तुपाच्या प्रवेशद्वारावरील तोरणाची आठवण करुन देणारे तोरण

प्रवेशद्वाराच्या चौकटीवरील शिल्पपट


 हे लेणे म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी निर्माण केलेला विहार आहे. या विहारातील सभागृह ४१ फूट रुंद आणि ४६ फूट लांब आयताकृती आहे. आत, भिक्कुंच्या निवासासाठी १८ कक्ष निर्माण केलेले आहेत. या सभागृहाच्या मधोमध समोरच्या भिंतीवर उठावदार स्तूप कोरलेला आहे. या स्तूपाच्या दोन्ही बाजूस स्त्री प्रतिमा आहेत. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वरच्या बाजूस हाती पुष्पमाला घेतलेले गंधर्व अवकाशी विहार करत आहेत. स्तुपाच्या बाजुला धम्मचक्र व सिंह तर स्तुपाच्या हर्मिकेवर पाच छत्र कोरलेले आहेत.
विहाराचा अंतर्भाग, स्तुप व बाजुचे कक्ष 


लेणे क्रमांक ३ च्या व्हारांड्यातील वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ 
गौतमीपुत्र विहाराच्या व्हरांड्यात सहा भारदस्त अष्टकोनी स्तंभ आहेत. हे सालंकृत स्तंभ खोदीव दगडी चौथ-यांवर उभे आहेत. या स्तंभाची स्तंभशीर्षे हर्मिकेच्या प्रतिकृतीवर स्थित आहेत. हर्मिका आमलकाच्या चारी कोप-यावरील चार छोट्या यक्षांनी तोलून धरलेली आहे व हे यक्ष या स्तंभावरील उलट्या घटाच्या आकाराच्या फुगीर भागावर उभे आहेत. या स्तंभशीर्षांवर पुढच्या बाजूने हत्तीवर बसलेला राजपरिवार व मागील बाजूस हत्ती, बैल, सिंह, स्फिंक्स, गरुडाचे मुख असलेला प्राणी ( ज्याला ग्रीक पुराणांमध्ये 'ग्रिफिन' नावाने ओळखले जाते) इ. प्राणी कोरलेले आहेत.
लेणी अभ्यासक नहपान विहार (लेणे क्र १०) (डावीकडे) आणि गौतमीपुत्र विहार (लेणे क्र. ३)(उजवीकडे)च्या स्तंभशीर्ष ची नेहमी तुलना करतात. लेणे क्र. ३ चे स्तंभशीर्ष हे लेणे क्र १० च्या तुलनेत आकाराने छोटे व कमी अलंकृत दिसतात.तसेच या स्तंभावरील घंटेचा आकारऐवजी उलट्या घटाचा आकार केलेला आहे. लेणे क्र. ३ हे नहपान विहारानंतर खोदलेले असल्याने त्यातील स्तंभांच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तसेच हे स्तंभ अर्धवटरित्या खोदीव चौथ-यांवर टेकवेलेले आहेत.
या लेण्याच्या शीर्षपट्टीवर अतिशय अलंकारीक रचना केलेली आहे. वरच्या बाजूला भौमितिक आकाराची नक्षी व त्याखालच्या ओळीत हत्ती, घोडा, बैल विविध प्राणी एका रेषेत शिल्पांकीत केले आहेत. या लेण्याच्या दर्शनी भागात सर्व स्तंभांच्या खालच्या बाजूला चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे जू कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहून नेत आहेत.


या लेण्यातील शिलालेख 
गौतमीपुत्र सातकर्णीचा नातू राजा वशिष्ठिपुत्र पुळुमावी याच्या कारकीर्दीत या लेण्याचे काम पूर्ण झाले व त्याचे धम्मसंघाला लोकार्पण करण्यात आले. श्री पुळुमावीने (इ.स. दुसरे शतक)आपल्या कारकिर्दीच्या १९व्या वर्षात खोदलेल्या दीर्घ शिलालेखात (शिलालेख क्र. २), महान सम्राट गौतमीपुत्राची मातोश्री महाराणी गौतमी बलश्री हिने हे लेणे निर्माण केले व संघाला अर्पण केल्याचे स्पष्ट केले आहे. श्री पुळुमावीच्या कारकिर्दीच्या २२व्या वर्षीही अजुन एक दिर्घ शिलालेख (शिलालेख क्रमांक ३) खोदवून घेतला आहे. त्याच्या कारकिर्दीच्या १८व्या वर्षी या लेण्याच्या प्रवेशद्वारावर दोन शिलालेख (क्रमांक ४ व ५)शिलालेख कोरलेले आहेत.
या व्हरांड्याच्या भिंतीवर गौतमीपुत्रची आई गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत. हे शिलालेख महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांपैकी एक आहेत. सर्वात महत्वाचा शिलालेख गौतमीपुत्रच्या आईने म्हणजे गौतमी बलश्री ने आपला नातू वशिष्ठिपुत्र पुळुमावीच्या कारकिर्दीत या लेण्यात खोदवून घेतला. या प्रदिर्घ शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा, त्याचे विविध युद्धातील विजय, शत्रुंचा संहार करून मातृभुमीची त्यांच्या तावडीतून सुटका व या विजयाप्रित्यर्थ हे लेणे खोदवून संघाला भेट म्हणून अर्पण केल्याचे वर्णन केले आहे.
गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेव्हा या बहुतांश भागावर नहपान क्षत्रपांची सत्ता होती. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार मोहीम उघडून नाशिक जवळ झालेल्या युद्धात त्यांना पराभूत केले व त्यांचा समूळ उच्छेद केला. या युद्धात नहपानाच्या संपूर्ण क्षहरात वंशाचे निर्दालन केले त्यामुळे गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन या शिलालेखात 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे केले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. आपली ही मातृभुमी नहपानाच्या ताब्यातून जिंकून घेऊन त्याने सातवाहन वंशाची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा सन्मानपूर्वक गौरव केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हवांचा नाश केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला आहे. हा शिलालेख 'नाशिक प्रशस्ती' या नावानेही ओळखला जातो. या लेण्याच्या व्हरांड्याच्या मागील भिंतीवर हा शिलालेख स्थित आहे. याच शिलालेखात गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्रीने आपल्या पुत्राच्या रुपाचेही वर्णन केले आहे. गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने बलशाली आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीमान आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.
इसवी सन १८९७ मध्ये अनामिक ब्रिटीश छायाचित्रकाराने काढलेले लेणे क्र.३ चे छायाचित्र 


(छायाचित्रे विकीपिडीया व मिसळपाव या वेबसाईटस च्या सौजन्याने)

 #nashikcaves #pandavleni #nasikcaves #trirashmicaves #rockcutcaves #heritage #satvahan #history

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....