Sunday, 21 March 2021

जागतिक कविता दिवस : हाल सातवाहनाची 'गाथा सप्तशती'

 आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस !


सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

जगातील काव्यात्मक अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देण्यासाठी, काव्याचे वाचन, लेखन व प्रकाशनासाठी २१ मार्च हा दिवस जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो. 

जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस. २१ मार्च हा दिवस युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे जगभर काव्य दिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस. १९९९ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या युनेस्कोच्या तिसाव्या अधिवेशनात हा दिवस घोषित करण्यात आला. 

कविता सुचते कशी हा बहुतेकांना पडणारा प्रश्न. सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठे ह्यांनी कविता स्फुरते कशी हेही कवितेतूनच मांडले आहे. कविता तिच्या नाजूक नखरेलपणामुळे आणि भावतरलतेमुळे स्त्रीलिंगी मानली जाते. स्त्रियांच्या नकारात अनेकदा होकार दडलेला असतो असं मानलं जातं. त्या आपल्या कवितेत त्या म्हणतात -

कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी

नजरेपुढती ठुमकत येती रूपवती कामिनी

त्यांच्या नादे करू पाहते पदन्यास मी कशी

मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी


आज जागतिक काव्य दिनानिमित्ताने महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ जो ‘गाथा सत्तसई’ म्हणजेच ‘गाथा सप्तशती’ याचे स्मरण करुयात व या अभिजात काव्यसंग्रहाबद्दल जाणून घेऊयात.

‘गाथा सप्तशती’ म्हणजेच ‘गाथा सत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ!

माहाराष्ट्री प्राकृतमधील शृंगाररसप्रधान गीतांचे सातवाहन राजा हाल (इ. स. पहिले वा दुसरे शतक) याने केलेले एक संकलन. गाथा सप्तशती  हे याचे संस्कृत रूप. गाहा कोस  हे त्याचे मूळ नाव. हाल हा सातवाहन साम्राज्याचा सम्राट होता. मत्स्य पुराणानुसार हा सातवाहनांचा १७वा राजा होता[१]. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. 

राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्लेख गाहा सत्तसईमध्ये त्याने केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर  ह्या थोर जर्मन पंडिताने इ. स. १८८१ मध्ये करून दिली. त्यानेच ह्या गाहा सत्तसईची पहिली संपादित प्रत तयार केली. अनेक विद्वानांच्या मते गाहा सत्तसई  हा प्रथम गाथा कोश असावा आणि पुढे नवव्या शतकापर्यंत त्या कोशामध्ये भर पडत जाऊन सध्या अस्तित्वात असणारा गाहा सत्तसई हा ग्रंथ तयार झाला असावा.


‘गाणे’ ह्या अर्थी असणाऱ्या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील आर्या ह्या वृत्तासारखेच आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला गाथा सप्तशती  हे नाव देण्यात आले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्तशती  म्हणजे  सातशे  श्लोक. म्हणून ह्याला सप्तशती  असेही  म्हणतात.

तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेता येतो. महाराष्ट्र संस्कृती, मराठी भाषेची जडणघडण, तिचा उगम व विकास, भाषेची प्राचीनता आणि मौलिकता या गोष्टी त्या काव्यग्रंथामधून सिद्ध होतात. 

‘गाथासप्तशती’चे स्वरूपही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘हाल सातवाहन’ या राजाने त्याच्या राज्यातील कवींना आवाहन करून त्यांच्याकडून काव्य मागवून ते संकलित केले. त्याला अनेक कवींनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यातील दर्जेदार काव्य निवडून, त्यातील सातशे गाथा त्या संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘हाल सातवाहन’ स्वतः कवी होता. त्याची ती कृती महाराष्ट्री भाषेच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी करणारी ठरली. त्याने द्विपदी स्वरूपातील ‘गेय’ अशा सातशे गाथा संपादित करून तत्कालीन महाराष्ट्राचे समाजजीवन, कृषिजीवन, ग्रामीण जीवन आणि मानवी मनातील भावभावनांचा आविष्कार असणारे आद्यकाव्य संकलित केले असे म्हणता येते. त्याने मुद्रणकला अस्तित्वात नसताना केलेले हस्तलिखित स्वरूपातील ते प्रकाशन हा प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ ठरतो! तसाच, तो पहिलाच संपादित ग्रंथ असल्याने ‘हाल’ राजास महाराष्ट्रातील पहिला संपादक असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. ते काव्य गोदावरीच्या तीरावर घडले. त्यामुळे ‘गोदावरी’ नदीला संस्कृतिवाहिनीचेही महात्म्य लाभते. 


‘गाथासप्तशती’ या काव्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण आले असले तरी ते वर्णन ग्राम्यता टाळून केले गेले. अभिजातता आणि सौंदर्य यांचे सुरम्य साहचर्य त्या काव्यात  दिसते. त्यातील ‘शृंगार’ आणि ‘कामजीवन’ यांचे चित्रणही सूचकतेने, संयतपणे, कलात्मक वृत्तीने अभिव्यक्त झाले. त्यात अश्लीलता, बीभत्सता आढळत नाही. निसर्गातील विविध प्रतिमा-प्रतीकांचा वापर आणि विशेष म्हणजे तो शृंगार दैनंदिन व्यवहारातील अनेक घटना- प्रसंगाच्या माध्यमातून आविष्कृत झाला. त्यातील प्रणयप्रसंग उत्कट आणि कल्पनारम्य आहेत. गाथेत स्त्रियांचे चित्रण नवयौवना, नवविवाहिता, गृहिणी, प्रौढा, कुमारिका अशा विविध वयोगटांतील आले आहे. मानवी मनातील प्रेमभावना आहे. त्यातील अलवारता, तरलता, उत्कटता, विरह या संवेदना हृदयस्पर्शी व मनोहारी आहेत. हे रसरशीत सौंदर्य कोणाही आस्वादकाला प्रभावित करेल असेच आहे. 

यातील काव्यात विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासून ते गोदावरीच्या उत्तरेपर्यंतचा भौगोलिक परिसर चित्रित झाला आहे. गाथेला मराठवाडा, विदर्भ, गोदावरीचे दोन्ही तीर या परिसरातील परंपरा, भाषा, रीतिरिवाज, ग्रामीण संस्कृती असा, मराठी मातीचा अस्सल गंध आहे. त्यातील कितीतरी शब्द गोदावरीच्या तीरावर बोलीभाषेत प्रचलित आहेत. तेथे ‘महुमास’ हा शब्द चैत्रमासासाठी उपयोजला गेला तोच शब्द ‘मधुमास’ म्हणून वर्तमान काव्यातून झंकारत आहे. शेती व्यवसाय, ग्रामीण भागातील संथ आणि शांत जीवन, गावगाड्यातील ग्रामणी (गावाचा प्रमुख), त्याचे वर्चस्व, तत्कालीन ग्रामव्यवस्था तेथे दिसते. राजकीय संघर्ष अथवा अराजक याबाबतचे चित्रण त्यात आले नाही. समृद्ध ग्रामजीवन त्यात चित्रित झाले. साळी, तूर, कापूस, ऊस, ताग, हळद इत्यादी पिकांचे तर बोर, आंबे, जांभूळ, काकडी या फळांचे उल्लेख तेथे येतात. झाडे, पशू, पक्षी; तसेच गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा, गिरणा इत्यादी नद्यांचे उल्लेख येतात. 

सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील बारीक सारीक घटनांचे चित्रण ह्या गाथांमध्ये आढळते. त्यामुळे वाचकाला तत्कालीन समाजाची उत्तम ओळख होते. म्हणूनच ऐतिहासिकदृष्ट्याही  हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. गोदावरीचे अनेक उल्लेख गाथांमध्ये आढळतात. वड, पळस, बेल, आंबा, जांभूळ इ. वृक्षांचे; तर कमळ, मालती, माधवी, केतकी वेलींचे उल्लेख गाथांमध्ये दिसतात. रानावनात फिरणाऱ्या, शेती करणाऱ्या लोकांनी ह्या गाथा रचल्या असल्यामुळे झाडे, वेली, फळे, फुले यांचे उल्लेख स्वाभाविकपणे आले आहेत.

तत्कालीन देव-देवता, पौराणिक कल्पना, सामाजिक चालीरीतीं यांचे वर्णन गाथांमध्ये आढळते. गाहा सत्तसईच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी शंकराला नमन केले आहे. पती-पत्नीच्या सुखी संसारासंदर्भातील वर्णनामध्ये अग्नीचे उल्लेख बऱ्याचदा येतात (रंधणकम्मणिउणिए ! मा जूरसु, रत्तपाडलसुअंधं ।मुहमारुअं पिअंतो धूमाइ सिही, णपज्जलइ ।। गाथा क्र. १४). याशिवाय कृष्णाच्या रासलीला, समुद्र-मंथन, सतीची प्रथा यांबद्दलची वर्णनेही आढळतात.  शुभाशुभ शकुनांवर लोकांचा विश्वास होता. मंगलकलश ठेवणे, डावा डोळा लवणे इ. गोष्टी लोक मानत असत. तत्कालीन समाज अल्पसंतुष्ट, आनंदी, समाधानी, साधाभोळा होता. त्यामुळे या गाथा म्हणजे ह्या ग्रामीण जीवनाची जणू भावगीतेच होता.

प्राकृत भाषेचे सौंदर्य-माधुर्य, उत्तम निसर्गचित्रण, लोकव्यवहार, नीतीनियम तसेच प्रणयाचे सात्विक पण बहुरंगी स्वरूप मांडण्याच्या उद्देशाने हाल राजाने या गाथांची निवड केली असावी. अनेक गाथा शृंगारप्रधान असल्या तरी हा केवळ शृंगारिक गाथांचा संग्रह नाही. वास्तव जीवनानुभव मानवी भाव-भावनांचे विविध कंगोरे दाखविणाऱ्या अशा या गाथा आहेत. नैसर्गिक सहजता व प्रासादिक रचनांमुळे या गाथा आपले चित्त वेधून घेतात. एकूणच, गाथा माणूस आणि त्याच्या सभोवतालचे पर्यावरण कवेत घेत सिद्ध झाली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्र यांची दोन सहस्त्रकांतील वाटचाल कशी झाली? त्या दृष्टीने ‘गाथासप्तशती’ हा काव्यकोश म्हणजे महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित आहे.







No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....