गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक
Shreepad ShreeVallabh Temple, Galne road, Tingari, Malegaon, Nashik.
A must visit place
ज्यांना पिठापुरला जाणे शक्य नसेल, पण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची दर्शनाची इच्छा असेल त्यांनी टिंगरी, मालेगाव येथील गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान इथे जरूर जावे. हे स्थान अतिशय जागृत असल्याचा भक्तांचा अनुभव आहे.
हे मंदिर आपल्या नेहमीच्या कल्पनेपेक्षा अतिशय वेगळे परंतु आकर्षक आहे. तीन मजल्यांचे हे मंदिर म्हणजे अनोखे वास्तुशिल्प आहे. मंदिरामध्ये चरणस्थळी संत / दत्तावतार परंपरा यांच्या कमालीच्या जिवंत मूर्ती आहेत. वर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि राजराजेश्र्वरी देवीची मूर्ती आहे. सगळ्यात वर दत्त मूर्ती असून मंदिराचे शिखर व कळस शिवलिंगाकार आहे.
पहिल्या मजल्यावरील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची कुमार रूपातील तेजपुंज अशी मूर्ती आहे. हि मूर्ती इतकी जिवंत दिसते, जणू स्वामीच स्वतः उभे आहेत. येथेच पंचधातूची श्रीपादांची मूर्ती आणि पादुका आहेत. पाठिमागे देवी राजराजेश्वरी ची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्गावर श्री बापनार्युलू आणि श्री अप्पळराज नरसिंह शर्मा यांच्या मनमोहक मूर्ती आहेत.
दुस-या मजल्यावर श्री गुरुदत्तात्रेय विराजमान आहेत. हते श्वान, धेनु संगे स्मितहास्य करीत त्रिमूर्ती रुपात आहेत.
ओंकारात नटलेले शिवलिंग मंदिराच्या कळसस्थानी आहे.
हे मंदिर उभारणारे श्री स्वामी त्रिशक्ती महाराज मुळचे आंध्र प्रदेशातले. एका महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तास कुक्कुटेश्वर स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कुमार रुपात दर्शन देवून पुढील कार्याची सूचना दिली व महाराष्ट्रामध्ये वास्तव्य व जनकार्याची आज्ञा दिली. दृष्टांताप्रमाणे स्वामीजी २००९ मध्ये या ठिकाणी आले व श्रीपाद श्रीवल्लभ यांचे मंदिर उभारण्याचे कार्य सुरू केले.
या मंदिराचे बांधकाम व मंदिराच्या मूर्तीचे काम गुरुपौर्णिमेला सुरू करण्यात आले. सदर मूर्तीची निर्मिती जयपूर येथे करण्यात आली . सदर मूर्तीस घडवण्यासाठी आवश्यक व सुयोग्य असा दगड अनेक ठिकाणी शोधूनही मिळेना. अखेर श्रीपादांच्या जन्मदिवशी गणेश चतुर्थीला हा दगड मिळाला जो जणू काय केवळ श्रीपादांचे मूर्तीसाठी ५ वर्षांपासून पडून होता आणि सध्याची अत्यंत नयनमनोहर श्रीपादांची मूर्ती तयार झाली. सदर मंदिरात महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्रावण नक्षत्र, परिवर्तन एकादशी, २४ ऑगस्ट २०१५ रोजी झाली.
गाभाऱ्यात सगळ्यांना अभिषेक/ पालखी सेवा करता येते. जाताना सोबत स्वच्छ धोतर/सोवळे न्यावे. मात्र सध्या कोरोनामुळे मंदिर प्रवेश बंदी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment