Monday, 13 March 2023

फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी

आज फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी 





अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविणारे महान संत म्हणजे संत एकनाथ महाराज! एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्ती मार्गाची शिकवण दिली. पारंपरिक मराठी पंचांग दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली म्हणूनच या दिवशी नाथ षष्ठी साजरी केली जाते.


                श्री संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी " चतुःश्लोकी भागवत " या त्यांच्या पहिल्या ग्रंथाचे लेखन त्यांनी नाशिक मध्ये गोदातीरी, म्हणजेच कपिला संगम की जेथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली व जनार्दन स्वामींचे नाशिक मधील तपश्चर्येचे ठिकाण आहे अशा तपोवन येथे केले. त्यानंतर तीर्थ यात्रेत नाथ महाराज व त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांच्या सोबत असलेले श्री चंद्रभट ( चांदबोधला ) नामक ब्राम्हण याच पवित्र स्थानी नेहमी येऊन भागवताचे पारायण व चिंतन करत असत. पुढे जाऊन भागवताचे अभ्यासक येथे येऊन भागवत अभ्यासत.

     

        म्हणून भागवताचे लेखन झालेल्या या सिद्ध परिसरात एकनाथ महाराजांच्या वंशजांनी गरुडावर विराजमान अशा भगवान श्री विष्णुंचे मंदिर निर्माण करुन येथे श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका स्थापीत केल्या, असे नाशिक मधील जुनी जाणकार व इतिहास अभ्यासक मंडळी सांगतात.  पूर्वी नाशिक शहर हे जुने नाशिक एवढेच सीमित होते. आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाण्याची सुरवात जेव्हा पासून झाली - तेंव्हा पासून, जातांना पालखीचा दुसरा मुक्काम नाशिक मध्ये ज्या मंदिरात होत असतो, ते मंदिर म्हणजे नाशिक मधील वारकरी संप्रदायाचे त्या काळातील प्रमुख स्थान असावे. त्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर येथून नाशिक मधील सर्व भजनी मंडळ फाल्गुन कृ.६ ( नाथ षष्ठी ) या दिवशी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीने येथे येत व भजन , कीर्तन करत.


                शंभराहून अधिक वर्षां पूर्वीची ही परंपरा म्हणून जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिर, भजनी मंडळ या पवित्र स्थानी येऊन हि परंपरा अखंडपने चालू ठेवत आहे. तसेच नाशिक मधील पवार कुटुंबीय आणि अनेक भाविक भक्तगण गोपाल काल्याचा प्रसाद येथे आणून वाटत.


               फाल्गून वद्य षष्ठीच्या या दिवशी पाच मोठ्या घटना घडलेल्या असल्याने त्यांस " पंचपर्वश्रेणी पर्व " असं म्हणतात. एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.


पंचपर्व -

१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म दिवस.

२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह याच दिवशी.

३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह याच दिवशी.

४) श्री जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी याच दिवशी.

५) शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीचा हाच दिवस.


शांतिब्रह्म संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी नाथषष्ठी निमित्त भक्तिपूर्ण नमन....!!!







Sunday, 5 March 2023

होलिका दहन

 फाल्गुन मासी येते होळी

खायला मिळते पुरणाची पोळी

रात्री देतात जोरात आरोळी

राख लावतो आपुल्या कपाळी


https://tinyurl.com/4rzbp26b


वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा होळी हा  हिंदू धर्मियांचा एक महत्वाचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या हा सणाला दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी केली जाते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर चिखल, माती अथवा  रंग उडवून धुळवड खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. पुढे पाच दिवसांनी रंगपंचमी असते. होळीचा सण हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे हे दर्शवतो. या सणाला भारतामध्ये फार महत्त्व आहे. देशातील प्रत्येक भागात होळीचा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.


होलिका दहन

फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा आहे. काही राज्यांमध्ये याला छोटी होळी असे म्हटले जाते. प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने त्याच्या बहिणीची मदत घेतली. पण या प्रयत्नांमध्ये होलिकेचा अंत झाला. होलिका दहनासाठी लाकूड, गवत आणि शेणाची पोळी यांची एक मोठी मोळी उभी केली जाते, त्याभोवती सजावट करुन तिची पूजा केली जाते. त्यानंतर तिला अग्नी दिला जातो. सोबतच होलिका दहनासाठी तयार केलेले पदार्थ अग्नीत समर्पित केले जातात.


लठमार

मथुरेतील ब्रज प्रदेशामध्ये होळी आठवडभर असते. येथील लठमार होळीची परंपरा फार प्रसिद्ध आहे. बरसाना या गावामध्ये हा खेळ होळीच्या दिवशी खेळला जात असे. हे राधेचे गाव होते असे म्हटले जाते. लठमार होळीमध्ये स्त्रिया हातात काठ्या घेऊन पुरुषांना मारण्याचा प्रयत्न करत असतात. येणारा प्रहार रोखण्यासाठी पुरुषांना ढाल दिलेली असते. ही होळी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मथुरेला जमतात.


दोल जत्रा

पश्चिम बंगाल, ओडिसा अशा काही राज्यांमध्ये होळीच्या दिवशी दोल जत्रा/ डोल जात्रा असते. या निमित्ताने कृष्णाची आराधना केली जाते. कृष्ण-राधा यांच्या मूर्ती झोपाळ्यावर प्रस्थापित केल्या जातात. पूजा सुरु असताना झोपाळा झुलवला जातो. त्यानंतर भक्तगण मिळून रंग खेळतात.


आणखी वाचा – विश्लेषण : होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता


होळी-योशांग

मणिपूर राज्यात होळी आणि योशांग हे उत्सव एकत्रितपणे साजरा केले जातात. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामूहिक गायन-नृत्य करत नागरिक हा सण साजरा करतात.


भस्म होळी

वाराणसीमध्ये भस्म होळी खेळण्याची मोठी प्रथा आहे. नागा साधू, अघोरी आणि अन्य साधू मंडळी ही अनोखी होळी खेळतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमा झालेल्या राखेने होळी खेळण्याची अघोरी संप्रदायमध्ये परंपरा आहे. ही होळी प्रामुख्याने स्मशानभूमीमध्ये साजरी केली जाते.


फुलों वाली होळी

वृंदावनमध्ये होळीच्या आदल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी राधा-कृष्णाच्या मूर्तींवर फुलांचा वर्षाव केला जातो आणि त्यांची पूजा-अर्चना केली जाते. यंदाच्या वर्षी ३ मार्च रोजी वृंदावनातील बांकेबिहारी मंदिरामध्ये फुलों वाली होळी खेळली गेली.


एवढेच काय तर महाराष्ट्रामधील कोकण, विदर्भ अशा प्रत्येक विभागामध्ये सुद्धा होळीचा उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याचे पाहायला मिळते.





Wednesday, 15 February 2023

दासनवमी....

 आज दासनवमी....


सद्गुरु समर्थ रामदासांनी पंधरा दिवस आधी पूर्व सूचना देऊन इ.स.१६८२ च्या माघ वद्य नवमीला दुपारी साडे बारा वाजता सज्जनगडावर देह ठेवला. तेंव्हापासून माघ वद्य नवमी ' दासनवमी ' म्हणून ओळखली जाते.


समर्थांनी तर देह ठेवण्याआधी आपल्या शिष्यांना दिलेल्या अखेरच्या संदेशात स्पष्ट सांगून ठेवले आहे कीं ते या जगांत त्यांच्या ग्रंथ रूपाने निरंतर वास करून आहेत. 

माघ वद्य नवमीला समर्थांनी तीन वेळेला मोठ्यांदा रामनामाची गर्जना केल्यानंतर त्यांची प्राणज्योत त्यांच्या शरीरातून बाहेर पडली व समोरच्या राममूर्तीत प्रविष्ट झाली. दुपारी साडे बारा वाजता त्यांनी अशा प्रकारे देह ठेवला.

रामदास स्वामी समाधिस्त झाल्याची ही बातमी संभाजीराजांना समजली. समर्थांच्या उत्तरकार्यासाठी त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना सज्जनगडी जाण्याची आज्ञा केली. नंतर दीड महिन्याने संभाजीराजे रामचंद्रपंतांसह सज्जनगडावर गेले. समर्थांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधीसुद्धा मोठे देवालय बांधण्याची आज्ञा केली. दीड महिन्यात मोठे देवालय करविले. खाली समाधी आणि वरती तंजावरहून आणलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान याच्या मूर्ती असे हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मठाच्या खर्चास द्रव्य पुरविण्याची रामचंद्रपंत अमात्य व खंडोबल्लाळ यांना आज्ञा दिली. साधुसंतांचा योग्य तो मान राखण्याचे शिवाजी महाराजांचेच धोरण संभाजीराजांनी अंगिकारले.

समर्थ समाधी रुपाने सज्जनगडावर आजही आहेत व भाविकांना याचे प्रत्यंतर अनेक प्रकारांनी येत असते. तेथील समाधी मंदिरावर पुढील श्लोक आहे.

सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदारश्रृंगापरि ।
नामे सज्जन जो नृपे वसविला श्रीउर्वशीचे तिरी ।
साकेताधीपती कपि भगवती हे देव ज्याचे शिरी ।
तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या टाकळी (नाशिक) येथील  गोमय हनुमान मंदिरात जतन केलेल्या समर्थांच्या चरण पादुका (खडावा)


Thursday, 9 February 2023

गणेश गुहा, हरीशचंद्रगड.

गणेश गुहा, हरीशचंद्रगड.


तारामती शिखर हे गडावरील व पुणे जिल्हातील सर्वात उंच शिखर आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. मूर्ती संपूर्ण दगडात कोरलेली आहे. श्री गणेशाचे रूप पाहून मन प्रसन्न होते. हजारो वर्षांपासून नैसर्गिक आणि मानावी आघात सहन करूनही मूर्ती अजूनही चांगल्या स्थितीत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याच किल्ल्यावर इतकी मोठी गणेश मूर्ती नाहिये. ते भाग्य हरीशचंद्रगडाला लाभले आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत.



Tuesday, 24 January 2023

श्रीगणेशजयंती अर्थात माघी गणेश जयंती

आज #श्रीगणेशजयंती_अर्थातच _माघी_गणेश_जयंती




गणपतीची एकूण २४ रूपे व तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. 


पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! वैशाख शुद्ध पौर्णिमेस पुष्टीपती गणेशाचा प्रकटदिन, भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती आणि कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस.  


चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर या माघ शुद्ध चतुर्थीला तीळ चतुर्थी, कुंद चतुर्थी, विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी वा तिलकुंद चतुर्थी या नावांनीही ओळखले जाते. 


माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.  


भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. 


गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे मानतात. 


पहिला अवतार घेतला तो दिवस होता वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. मुदगल पुराणानुसार या अवतारात गणेशाने विराटरूप धारण करून दुर्मती नामक असुराचे पारिपत्य केले. भगवान श्रीकृष्णानेही रुक्मीणी स्वयंवराची वेळेस पुष्टीपती गणेशाचे आवाहन व पूजन केल्याचा उल्लेख आहे. 


दुसरा अवतार घेतला तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा गजानन शिव-पार्वतीचा पुत्र मनाला जातो.  वाहन मूषक असते. या दिवशी गजाननाच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.  या दिवसाला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात. 


तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने कश्यपाच्या पोटी 'विनायक' नावाने अवतार घेतला  व त्याने नरांतक राक्षसाला ठार मारले. हा दशभुजा असून सिंहारूढ असतो. ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.  या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. बरेच जण एकभुक्त (एक वेळ उपाशी राहून) या दिवशी जागरण करतात.  

अशा या गणेश जयंती उर्फ विनायक चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!

https://tinyurl.com/ye7eysxb




Wednesday, 18 January 2023

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर

 आज पौष वद्य एकादशी (षटतिला एकादशी) - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर 


                                                        https://tinyurl.com/pcxkzbbd




ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी आपले धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला.  निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी भगवदगीतेचा भावार्थ सर्वसामान्यांना समजण्यासाठी प्राकृत भाषेत लिहिण्याचा आदेश दिला. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिलिहिली.  त्यांनी जुन्या रुढी, परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला त्यांनी नवीन मार्ग दाखविला.  यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. त्यामुळे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना  वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक  मानले जाते तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. 


वाचे म्हणता गंगा गंगा ।

 सकळ पापे जाती भंगा ।।

दृष्टी पडता ब्रम्हगीरी ।

 त्यासी नाही यमपुरी ।।

कुशावर्ता करिता स्नान ।

 त्यासी कैलासी रहानं ।।

नामा म्हणे प्रदक्षिणा ।

 त्याच्या पुण्या नाही गणना ।।


धन्य धन्य निवृत्तीदेवा | 

 काय महिमा वर्णावा ||

शिवे अवतार धरून | 

 केले त्रैलोक्य पावन ||

समाधी त्र्यंबक शिखरी |

 मागे शोभे ब्रह्मगिरी ||

निवृत्ती नाथाचे चरणी |

 शरण एका जनार्दनी ||


अशा शब्दात संत नामदेव महाराज  व संत एकनाथ महाराज यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या विषयी असलेला आदर वर्णन केला आहे. 


संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो. मात्र ही  यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते. पंढरपूरची यात्रा आषाढ महिन्यात असते. त्यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात. कार्तिक महिन्यात आळंदीची यात्रा असते. ही सर्व कारण लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथांची यात्रा पौंष महिन्यात घेण्याचा निर्णय संतानी घेतला.

Saturday, 14 January 2023

मकर संक्रांत

हवामानाला अनुकूल अशा घटकांचा आहारात समावेश करण्याचा हेतू जोडून महाराष्ट्रात संक्रांत सण साजरा केला जातो. भरात आलेलं हरभरा पीक, भरू लागलेली ज्वारीची कणसं, बोर, आवळे या फळांची रेलचेल... असा चैतन्य गोठलेल्या पृथ्वीला नवसर्जनाचं आश्वासन देणारा हा काळ! तिळातलं तेल नि गुळातली गोडी या माध्यमातून स्नेह-माधुर्याच्या स्पर्शानं मानवी आयुष्यातील रुची वाढवणारा...! शेतकामांच्या समारोपाचा उत्सव! 

वाण म्हणजे वायन! एखादे व्रत केल्यानंतर त्याच्या सांगतेसाठी भेटीदाखल देतात ते वाण! पाच सुगडे घेऊन ती रंगवायची. प्रत्येक सुगडात एक बदाम, एक खारीक, सुपारी, हळकुंड, हळद, कुंकू, उसाचे करवे, गव्हाच्या लोंब्या, हरभर्‍याचे घाटे, बोरे, शेंगा, गाजर, पावटा, बिबट्या, कापूस, मुळा, तिळाचे लाडू हे सर्व भरायचे आणि एकेका घरी हे सुगडे वाण वाटायचे. पाच घरातल्या स्त्रियांनीसुद्धा या स्त्रीचे आदरातिथ्य करून नारळाने ओटी भरावी, अशी प्रथा होती. ‘सौभाग्य’ या शब्दाचा मूळ अर्थ आहे सौंदर्य, भाग्य, अधिकार.

वाण देताना आठ सौभाग्यचिन्ह म्हणून हळद, कुंकू, आरसा, फणी, मंगळसूत्र, बांगड्या, फळ, धान्य यांचा समावेश करतात. दुर्गा भागवत यांनी संक्रांतीच्या वेळी केल्या जाणार्‍या काही जुन्या व्रतांची जी माहिती दिली आहे ती वाचताना गंमत वाटते नि नव्या माहितीनं आपण आश्चर्यचकित होतो. ती माहिती अशी-
 
रसरंग व्रत : दोन वाट्या घेऊन एकात कुंकू आणि दुसर्‍यात गूळ घालायचा. पाच घरी जाऊन रस घ्या आणि रंग द्या, असे म्हणायचे.

खेळते रांगते व्रत : सहा नारळ घेऊन पाच घरी जायचे. उंबर्‍याबाहेर उभे राहायचे. घरमालकिणीला हळदकुंकू लावून एक नारळ उंबर्‍यावर ठेवायचा. एक घरात सोडायचा आणि म्हणायचे, खेळते घ्या, रांगते द्या.

आवडनिवड व्रत : दोन रंगांचे खण घेऊन सवाष्णीसमोर ठेवायचे आणि तिच्या आवडीप्रमाणे खणांची निवड करायला सांगून तो खण तिला भेट द्यायचा.

गांधारीचा वसा : हे जरा वेगळे व्रत प्रामुख्याने उस्मानाबाद भागात केले जायचे. ते असे- पाच पानांचे सात विडे, प्रत्येक विड्यावर हळकुंड, खोबरे, सुपारी, खारीक, बदाम आणि एखादे फळ ठेवायचे. प्रत्येक विडा खणांनी झाकायचा. आलेल्या सवाष्णींना प्रश्न विचारायचा, हळदीकुंकू कोणाचे लेता? विडे कोणाचे घेता? आणि मग यजमानांचे नाव उखाण्यात गुंफून पदराच्या आत लपवत ते द्यायचे. काही ठिकाणी विड्यांऐवजी सुगडे ठेवतात.

   मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...