आज पौष वद्य एकादशी (षटतिला एकादशी) - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर
https://tinyurl.com/pcxkzbbd
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी आपले धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी भगवदगीतेचा भावार्थ सर्वसामान्यांना समजण्यासाठी प्राकृत भाषेत लिहिण्याचा आदेश दिला. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिलिहिली. त्यांनी जुन्या रुढी, परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला त्यांनी नवीन मार्ग दाखविला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. त्यामुळे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जाते तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते.
वाचे म्हणता गंगा गंगा ।
सकळ पापे जाती भंगा ।।
दृष्टी पडता ब्रम्हगीरी ।
त्यासी नाही यमपुरी ।।
कुशावर्ता करिता स्नान ।
त्यासी कैलासी रहानं ।।
नामा म्हणे प्रदक्षिणा ।
त्याच्या पुण्या नाही गणना ।।
धन्य धन्य निवृत्तीदेवा |
काय महिमा वर्णावा ||
शिवे अवतार धरून |
केले त्रैलोक्य पावन ||
समाधी त्र्यंबक शिखरी |
मागे शोभे ब्रह्मगिरी ||
निवृत्ती नाथाचे चरणी |
शरण एका जनार्दनी ||
अशा शब्दात संत नामदेव महाराज व संत एकनाथ महाराज यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या विषयी असलेला आदर वर्णन केला आहे.
संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो. मात्र ही यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते. पंढरपूरची यात्रा आषाढ महिन्यात असते. त्यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात. कार्तिक महिन्यात आळंदीची यात्रा असते. ही सर्व कारण लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथांची यात्रा पौंष महिन्यात घेण्याचा निर्णय संतानी घेतला.
No comments:
Post a Comment