Saturday, 14 January 2023

मकर संक्रांत

हवामानाला अनुकूल अशा घटकांचा आहारात समावेश करण्याचा हेतू जोडून महाराष्ट्रात संक्रांत सण साजरा केला जातो. भरात आलेलं हरभरा पीक, भरू लागलेली ज्वारीची कणसं, बोर, आवळे या फळांची रेलचेल... असा चैतन्य गोठलेल्या पृथ्वीला नवसर्जनाचं आश्वासन देणारा हा काळ! तिळातलं तेल नि गुळातली गोडी या माध्यमातून स्नेह-माधुर्याच्या स्पर्शानं मानवी आयुष्यातील रुची वाढवणारा...! शेतकामांच्या समारोपाचा उत्सव! 

वाण म्हणजे वायन! एखादे व्रत केल्यानंतर त्याच्या सांगतेसाठी भेटीदाखल देतात ते वाण! पाच सुगडे घेऊन ती रंगवायची. प्रत्येक सुगडात एक बदाम, एक खारीक, सुपारी, हळकुंड, हळद, कुंकू, उसाचे करवे, गव्हाच्या लोंब्या, हरभर्‍याचे घाटे, बोरे, शेंगा, गाजर, पावटा, बिबट्या, कापूस, मुळा, तिळाचे लाडू हे सर्व भरायचे आणि एकेका घरी हे सुगडे वाण वाटायचे. पाच घरातल्या स्त्रियांनीसुद्धा या स्त्रीचे आदरातिथ्य करून नारळाने ओटी भरावी, अशी प्रथा होती. ‘सौभाग्य’ या शब्दाचा मूळ अर्थ आहे सौंदर्य, भाग्य, अधिकार.

वाण देताना आठ सौभाग्यचिन्ह म्हणून हळद, कुंकू, आरसा, फणी, मंगळसूत्र, बांगड्या, फळ, धान्य यांचा समावेश करतात. दुर्गा भागवत यांनी संक्रांतीच्या वेळी केल्या जाणार्‍या काही जुन्या व्रतांची जी माहिती दिली आहे ती वाचताना गंमत वाटते नि नव्या माहितीनं आपण आश्चर्यचकित होतो. ती माहिती अशी-
 
रसरंग व्रत : दोन वाट्या घेऊन एकात कुंकू आणि दुसर्‍यात गूळ घालायचा. पाच घरी जाऊन रस घ्या आणि रंग द्या, असे म्हणायचे.

खेळते रांगते व्रत : सहा नारळ घेऊन पाच घरी जायचे. उंबर्‍याबाहेर उभे राहायचे. घरमालकिणीला हळदकुंकू लावून एक नारळ उंबर्‍यावर ठेवायचा. एक घरात सोडायचा आणि म्हणायचे, खेळते घ्या, रांगते द्या.

आवडनिवड व्रत : दोन रंगांचे खण घेऊन सवाष्णीसमोर ठेवायचे आणि तिच्या आवडीप्रमाणे खणांची निवड करायला सांगून तो खण तिला भेट द्यायचा.

गांधारीचा वसा : हे जरा वेगळे व्रत प्रामुख्याने उस्मानाबाद भागात केले जायचे. ते असे- पाच पानांचे सात विडे, प्रत्येक विड्यावर हळकुंड, खोबरे, सुपारी, खारीक, बदाम आणि एखादे फळ ठेवायचे. प्रत्येक विडा खणांनी झाकायचा. आलेल्या सवाष्णींना प्रश्न विचारायचा, हळदीकुंकू कोणाचे लेता? विडे कोणाचे घेता? आणि मग यजमानांचे नाव उखाण्यात गुंफून पदराच्या आत लपवत ते द्यायचे. काही ठिकाणी विड्यांऐवजी सुगडे ठेवतात.

   मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....