आज फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी
अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविणारे महान संत म्हणजे संत एकनाथ महाराज! एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्ती मार्गाची शिकवण दिली. पारंपरिक मराठी पंचांग दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली म्हणूनच या दिवशी नाथ षष्ठी साजरी केली जाते.
श्री संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी " चतुःश्लोकी भागवत " या त्यांच्या पहिल्या ग्रंथाचे लेखन त्यांनी नाशिक मध्ये गोदातीरी, म्हणजेच कपिला संगम की जेथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली व जनार्दन स्वामींचे नाशिक मधील तपश्चर्येचे ठिकाण आहे अशा तपोवन येथे केले. त्यानंतर तीर्थ यात्रेत नाथ महाराज व त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांच्या सोबत असलेले श्री चंद्रभट ( चांदबोधला ) नामक ब्राम्हण याच पवित्र स्थानी नेहमी येऊन भागवताचे पारायण व चिंतन करत असत. पुढे जाऊन भागवताचे अभ्यासक येथे येऊन भागवत अभ्यासत.
म्हणून भागवताचे लेखन झालेल्या या सिद्ध परिसरात एकनाथ महाराजांच्या वंशजांनी गरुडावर विराजमान अशा भगवान श्री विष्णुंचे मंदिर निर्माण करुन येथे श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका स्थापीत केल्या, असे नाशिक मधील जुनी जाणकार व इतिहास अभ्यासक मंडळी सांगतात. पूर्वी नाशिक शहर हे जुने नाशिक एवढेच सीमित होते. आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाण्याची सुरवात जेव्हा पासून झाली - तेंव्हा पासून, जातांना पालखीचा दुसरा मुक्काम नाशिक मध्ये ज्या मंदिरात होत असतो, ते मंदिर म्हणजे नाशिक मधील वारकरी संप्रदायाचे त्या काळातील प्रमुख स्थान असावे. त्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर येथून नाशिक मधील सर्व भजनी मंडळ फाल्गुन कृ.६ ( नाथ षष्ठी ) या दिवशी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीने येथे येत व भजन , कीर्तन करत.
शंभराहून अधिक वर्षां पूर्वीची ही परंपरा म्हणून जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिर, भजनी मंडळ या पवित्र स्थानी येऊन हि परंपरा अखंडपने चालू ठेवत आहे. तसेच नाशिक मधील पवार कुटुंबीय आणि अनेक भाविक भक्तगण गोपाल काल्याचा प्रसाद येथे आणून वाटत.
फाल्गून वद्य षष्ठीच्या या दिवशी पाच मोठ्या घटना घडलेल्या असल्याने त्यांस " पंचपर्वश्रेणी पर्व " असं म्हणतात. एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.
पंचपर्व -
१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म दिवस.
२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह याच दिवशी.
३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह याच दिवशी.
४) श्री जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी याच दिवशी.
५) शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीचा हाच दिवस.
शांतिब्रह्म संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी नाथषष्ठी निमित्त भक्तिपूर्ण नमन....!!!
No comments:
Post a Comment