Tuesday, 24 January 2023

श्रीगणेशजयंती अर्थात माघी गणेश जयंती

आज #श्रीगणेशजयंती_अर्थातच _माघी_गणेश_जयंती




गणपतीची एकूण २४ रूपे व तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. 


पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! वैशाख शुद्ध पौर्णिमेस पुष्टीपती गणेशाचा प्रकटदिन, भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती आणि कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस.  


चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर या माघ शुद्ध चतुर्थीला तीळ चतुर्थी, कुंद चतुर्थी, विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी वा तिलकुंद चतुर्थी या नावांनीही ओळखले जाते. 


माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.  


भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. 


गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे मानतात. 


पहिला अवतार घेतला तो दिवस होता वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. मुदगल पुराणानुसार या अवतारात गणेशाने विराटरूप धारण करून दुर्मती नामक असुराचे पारिपत्य केले. भगवान श्रीकृष्णानेही रुक्मीणी स्वयंवराची वेळेस पुष्टीपती गणेशाचे आवाहन व पूजन केल्याचा उल्लेख आहे. 


दुसरा अवतार घेतला तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा गजानन शिव-पार्वतीचा पुत्र मनाला जातो.  वाहन मूषक असते. या दिवशी गजाननाच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.  या दिवसाला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात. 


तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने कश्यपाच्या पोटी 'विनायक' नावाने अवतार घेतला  व त्याने नरांतक राक्षसाला ठार मारले. हा दशभुजा असून सिंहारूढ असतो. ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.  या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. बरेच जण एकभुक्त (एक वेळ उपाशी राहून) या दिवशी जागरण करतात.  

अशा या गणेश जयंती उर्फ विनायक चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!

https://tinyurl.com/ye7eysxb




No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....