Tuesday, 24 January 2023

श्रीगणेशजयंती अर्थात माघी गणेश जयंती

आज #श्रीगणेशजयंती_अर्थातच _माघी_गणेश_जयंती




गणपतीची एकूण २४ रूपे व तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. 


पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! वैशाख शुद्ध पौर्णिमेस पुष्टीपती गणेशाचा प्रकटदिन, भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती आणि कश्यप मुनी या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस.  


चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर या माघ शुद्ध चतुर्थीला तीळ चतुर्थी, कुंद चतुर्थी, विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी वा तिलकुंद चतुर्थी या नावांनीही ओळखले जाते. 


माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, तर भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.  


भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. 


गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे मानतात. 


पहिला अवतार घेतला तो दिवस होता वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते. मुदगल पुराणानुसार या अवतारात गणेशाने विराटरूप धारण करून दुर्मती नामक असुराचे पारिपत्य केले. भगवान श्रीकृष्णानेही रुक्मीणी स्वयंवराची वेळेस पुष्टीपती गणेशाचे आवाहन व पूजन केल्याचा उल्लेख आहे. 


दुसरा अवतार घेतला तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा गजानन शिव-पार्वतीचा पुत्र मनाला जातो.  वाहन मूषक असते. या दिवशी गजाननाच्या मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.  या दिवसाला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात. 


तर तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने कश्यपाच्या पोटी 'विनायक' नावाने अवतार घेतला  व त्याने नरांतक राक्षसाला ठार मारले. हा दशभुजा असून सिंहारूढ असतो. ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते.  या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. बरेच जण एकभुक्त (एक वेळ उपाशी राहून) या दिवशी जागरण करतात.  

अशा या गणेश जयंती उर्फ विनायक चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!

https://tinyurl.com/ye7eysxb




Wednesday, 18 January 2023

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर

 आज पौष वद्य एकादशी (षटतिला एकादशी) - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर 


                                                        https://tinyurl.com/pcxkzbbd




ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी आपले धाकटे बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला.  निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी भगवदगीतेचा भावार्थ सर्वसामान्यांना समजण्यासाठी प्राकृत भाषेत लिहिण्याचा आदेश दिला. त्यानुसार ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिलिहिली.  त्यांनी जुन्या रुढी, परंपरा यांनी ग्रासलेल्या समाजाला त्यांनी नवीन मार्ग दाखविला.  यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. त्यामुळे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांना  वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक  मानले जाते तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. 


वाचे म्हणता गंगा गंगा ।

 सकळ पापे जाती भंगा ।।

दृष्टी पडता ब्रम्हगीरी ।

 त्यासी नाही यमपुरी ।।

कुशावर्ता करिता स्नान ।

 त्यासी कैलासी रहानं ।।

नामा म्हणे प्रदक्षिणा ।

 त्याच्या पुण्या नाही गणना ।।


धन्य धन्य निवृत्तीदेवा | 

 काय महिमा वर्णावा ||

शिवे अवतार धरून | 

 केले त्रैलोक्य पावन ||

समाधी त्र्यंबक शिखरी |

 मागे शोभे ब्रह्मगिरी ||

निवृत्ती नाथाचे चरणी |

 शरण एका जनार्दनी ||


अशा शब्दात संत नामदेव महाराज  व संत एकनाथ महाराज यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या विषयी असलेला आदर वर्णन केला आहे. 


संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य १२ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. त्यामुळे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात होतो. मात्र ही  यात्रा पौष कृष्ण एकादशीला भरते. पंढरपूरची यात्रा आषाढ महिन्यात असते. त्यावेळी सर्व दिंड्या साधारण महिनाभर पायी वाटचाल करून पंढरपूरला जातात. कार्तिक महिन्यात आळंदीची यात्रा असते. ही सर्व कारण लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथांची यात्रा पौंष महिन्यात घेण्याचा निर्णय संतानी घेतला.

Saturday, 14 January 2023

मकर संक्रांत

हवामानाला अनुकूल अशा घटकांचा आहारात समावेश करण्याचा हेतू जोडून महाराष्ट्रात संक्रांत सण साजरा केला जातो. भरात आलेलं हरभरा पीक, भरू लागलेली ज्वारीची कणसं, बोर, आवळे या फळांची रेलचेल... असा चैतन्य गोठलेल्या पृथ्वीला नवसर्जनाचं आश्वासन देणारा हा काळ! तिळातलं तेल नि गुळातली गोडी या माध्यमातून स्नेह-माधुर्याच्या स्पर्शानं मानवी आयुष्यातील रुची वाढवणारा...! शेतकामांच्या समारोपाचा उत्सव! 

वाण म्हणजे वायन! एखादे व्रत केल्यानंतर त्याच्या सांगतेसाठी भेटीदाखल देतात ते वाण! पाच सुगडे घेऊन ती रंगवायची. प्रत्येक सुगडात एक बदाम, एक खारीक, सुपारी, हळकुंड, हळद, कुंकू, उसाचे करवे, गव्हाच्या लोंब्या, हरभर्‍याचे घाटे, बोरे, शेंगा, गाजर, पावटा, बिबट्या, कापूस, मुळा, तिळाचे लाडू हे सर्व भरायचे आणि एकेका घरी हे सुगडे वाण वाटायचे. पाच घरातल्या स्त्रियांनीसुद्धा या स्त्रीचे आदरातिथ्य करून नारळाने ओटी भरावी, अशी प्रथा होती. ‘सौभाग्य’ या शब्दाचा मूळ अर्थ आहे सौंदर्य, भाग्य, अधिकार.

वाण देताना आठ सौभाग्यचिन्ह म्हणून हळद, कुंकू, आरसा, फणी, मंगळसूत्र, बांगड्या, फळ, धान्य यांचा समावेश करतात. दुर्गा भागवत यांनी संक्रांतीच्या वेळी केल्या जाणार्‍या काही जुन्या व्रतांची जी माहिती दिली आहे ती वाचताना गंमत वाटते नि नव्या माहितीनं आपण आश्चर्यचकित होतो. ती माहिती अशी-
 
रसरंग व्रत : दोन वाट्या घेऊन एकात कुंकू आणि दुसर्‍यात गूळ घालायचा. पाच घरी जाऊन रस घ्या आणि रंग द्या, असे म्हणायचे.

खेळते रांगते व्रत : सहा नारळ घेऊन पाच घरी जायचे. उंबर्‍याबाहेर उभे राहायचे. घरमालकिणीला हळदकुंकू लावून एक नारळ उंबर्‍यावर ठेवायचा. एक घरात सोडायचा आणि म्हणायचे, खेळते घ्या, रांगते द्या.

आवडनिवड व्रत : दोन रंगांचे खण घेऊन सवाष्णीसमोर ठेवायचे आणि तिच्या आवडीप्रमाणे खणांची निवड करायला सांगून तो खण तिला भेट द्यायचा.

गांधारीचा वसा : हे जरा वेगळे व्रत प्रामुख्याने उस्मानाबाद भागात केले जायचे. ते असे- पाच पानांचे सात विडे, प्रत्येक विड्यावर हळकुंड, खोबरे, सुपारी, खारीक, बदाम आणि एखादे फळ ठेवायचे. प्रत्येक विडा खणांनी झाकायचा. आलेल्या सवाष्णींना प्रश्न विचारायचा, हळदीकुंकू कोणाचे लेता? विडे कोणाचे घेता? आणि मग यजमानांचे नाव उखाण्यात गुंफून पदराच्या आत लपवत ते द्यायचे. काही ठिकाणी विड्यांऐवजी सुगडे ठेवतात.

   मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Tuesday, 20 December 2022

२१ डिसेंबर, हुतात्मा अनंत कान्हेरे शौर्य दिवस !

 आज २१ डिसेंबर. आज जॅक्सन वधाला ११३ वर्ष पूर्ण झाली. 


https://tinyurl.com/yc2vsxcr


नागरिकांवर होणाऱ्या जुलुमाच्या व अत्याचाराच्या निषेधार्थ अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी ब्रिटिश कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन याची विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान पिस्तुलाने गोळी झाडून हत्या केली. 


वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दाखवलेल्या सशस्त्र पराक्रमास त्रिवार वंदन.


ज्या पिस्तुलातून अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडल्या ते पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील पिस्तुलांपैकी एक होते. अनंत कान्हेरे यांना कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे व इतर समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. 


जॅक्सनची हत्या केल्यानंतर अनंत कान्हेरे आपल्या जागेवर शांतपणे उभे राहिले. त्यांना अटक करण्यात आली.  अनंत कान्हेरे, कर्वे, देशपांडे, जोशी व गंगाराम मारवाडी यांच्यावर खटला भरण्यात आला. या खटल्याची व्याप्ती वाढवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही त्यात आरोपी करण्यात आले. हा खटला नाशिक कट खटला म्हणूनही ओळखला जातो. त्यात कान्हेरे, कर्वे व देशपांडे यांना २० मार्च १९१० रोजी फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली. आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. या तिघांचेही मृतदेह नातलगांना न सोपवता त्यांच्यावर परस्पर अंतिम संस्कार करण्यात आले. ब्रिटिश सरकारने अस्थी ठाण्याच्या खाडीत आणि रक्षा मुंबईला समुद्रात विसर्जित केली.  तर या व इतर खटल्यांच्या आधारे २४ डिसेंबर १९१० ला स्वा. सावरकरांना ५० वर्षे जन्मठेपेची अर्थात काळ्यापाण्याची व त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. 


अश्या वीर हुतात्म्यांना व त्यांच्या सशस्त्र पराक्रमाला त्रिवार वंदन !!!


वंदे मातरम्









Thursday, 15 December 2022

भेटवस्तूऐवजी रोख रकमेच्या पाकीटामध्ये आपण तो अतिरिक्त एक रुपया का जोडतो

वाढदिवस किंवा लग्न यासारख्या शुभप्रसंगी, कधीकधी आपण भेटवस्तूऐवजी " रोख रकमेचे पाकीट" देणे पसंत करतो. पण आपण पाकीटात ठेवलेली रक्कम कधीच  रु. १०, १००, ५०० किंवा १००० अशी नसते; पण नेहमीच  रु. ११, १०१, ५०१ किंवा १००१  अशा प्रकारे दिली जाते.  मग रोख रकमेच्या पाकीटामध्ये आपण तो अतिरिक्त एक रुपया का जोडतो याचा कधी विचार केला आहे का ?


असे करण्यामागे चार कारणे असू शकतात :


१)आपण दिलेली रोख रक्कम ही शुभेच्छांचे प्रतीक असते. त्यामुळे त्या रकमेतील  "शून्य" म्हणजे समाप्ती, तर "एक" म्हणजे नवीन सुरुवात. तो अतिरिक्त एक रुपया हे सुनिश्चित करतो की प्राप्तकर्ता शून्यावर येऊ नये तर एक या अंकाप्रमाणेच सतत वाढत जावो. 


२) गणितीय दृष्ट्या १०,  १००, ५०० आणि १००० या संख्यांना पूणर्पणे भाग जातो; परंतु ११, १०१, ५०१ आणि १००१ या संख्या अविभाज्य आहेत. शगुन हा आशीर्वाद आहे आणि आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद अविभाज्य राहावेत, अशी त्यामागची इच्छा असते. 


३) जोडलेला एक रुपया हा सातत्याचे प्रतीक आहे, मूळ रकमेच्या पुढे. तो देणारा आणि घेणारा यांच्यातील बंध मजबूत करतो. याचा सरळ अर्थ की "आपले चांगले संबंध कायम राहतील."


४) पूर्वीच्या काळी आशीर्वाद अथवा शुभेच्छा देताना सोने, चांदी इ. धातू दिले जात असत. तसेच नाणे धातूचे बनलेले असते, जे पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानले जाते. आणि ते लक्ष्मीचा अंश मानले जाते. मोठी रक्कम ही गुंतवणूक असली तरी, एक रुपयाचे नाणे हे त्या गुंतवणुकीच्या पुढील वृद्धीचे "बीज" असते. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ही गुंतवणूक रोख किंवा कर्मामध्ये वाढण्यासाठी आहे.





Wednesday, 7 December 2022

श्रीदत्त जयंती

 मार्गशीर्ष शुक्लपक्ष पौर्णिमा, श्रीदत्त जयंती उत्सव





त्रिमूर्ती हा अवतार, दत्तरूपी साकार, त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर 

होता साक्षात्कार घडतो चमत्कार, गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार

दत्त म्हणजे साकार होणे, प्रगट होणे, अवतिर्ण होणे.

परमेश्वर आपल्या शरिराच्या रुपाने साकार झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व ईश्वर रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त.


तीन शिरे :- शरीर + मन + चैतन्य (परमेश्वर).

सहा हात :- शरीराचे दोन हात - डावा व उजवा

मनाचे दोन हात - बहिर्मन व अंतर्मन

चैतन्याचे दोन हात - जाणिव व नेणीव.

गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती.

श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे.

हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात राम अशी जगण्याची जीवन शैली.

काखेत झोळी म्हणजे सतत इतरांकडून ज्ञान मिळवत रहा.


किंबहुना आपण (दत्त) जन्माला येतो तो ज्ञान मिळविण्यासाठी.

जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव.

सदगुरुने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त.

म्हणून ख-या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्तजयंती.


दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना हा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमय जावो ही सदिच्छा! 🙏🏻💐🚩


#Datta #DattaJayanti #Dattatreya #दत्त #दत्तात्रय #दत्तजयंती




Saturday, 12 November 2022

श्री साक्षीविनायक गणेश, नाशिक

 संकष्टी चतुर्थी निमित्त नाशिक मधील श्री साक्षी विनायक गणेश या पुरातन गणेश स्थानाची माहिती घेऊयात. 

नाशिकच्या सोमवार पेठेतील शौचे वाड्यात श्री साक्षी विनायक गणेश स्थित आहे.  हा भग्न अवस्थेतील वाङा जुन्या नाशिकच्या सुप्रसिद्ध गुलाल वाडी व्यायाम शाळे जवळ आहे. याच वाडयात ३ ते ४ फुट  उंचीची गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. हा गणपती श्री साक्षी विनायक गणेश या नावाने ओळखला जातो.  हातात जपमाळ असलेली ही अनोखी गणेशमूर्ती दुर्मिळ आहे. श्री गणेशाच्या चारी हातात अंकुश, परशु, मोदकपात्र व जपमाळ आहे. सोबत मूषकराजही लाडू खात आहे.  

अश्या या ऐतिहासिक वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही वास्तव्य केल्याचे जुने लोक सांगत असत. या वाड्यात असलेल्या परंतु आता मातीने बुजलेल्या आडात अनेक शस्त्रे  सापडत असे. सुप्रसिद्ध रवीन्द्रनाथ विद्यालयाची स्थापना ह्याच वाड्यात झाली. अनेक वर्ष शाळेचे वर्ग इथेच भरत असे. रवीन्द्रनाथ विद्यालयाचे संस्थापक कै.पुरुषोत्तम शिवशंकर शौचे ह्यांना आदर्श शिक्षक राष्ट्रपति पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.





अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...