Monday, 19 April 2021

हुतात्मा अनंत कान्हेरे स्मृती दिन

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक सशस्त्र क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा आज स्मृतीदिन. 

अनंत कान्हेरे हे खुदिराम बोस यांच्यानंतर सर्वात तरुण क्रांतीकारक. 

देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन ऐन तारुण्यात फाशीला धीरोदात्तपणे सामोरे गेलेले हुतात्मा अनंत कान्हेरे हे अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेचे सदस्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे आणि कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या त्यांच्या सहका-यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध करण्याचे ठरवले. विजयानंद नाट्यगृहात जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याला ठार मारले. 

पुढे जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना १९ एप्रिल १९०९ या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.

हुतात्मा अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन !!!

#वंदेमातरम् #हौतात्म्यदिन #अभिनवभारत

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक २)

 पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक २)


पांडव लेण्यांमध्ये आढळून येणा-या शिलालेखांवरून नाशिकवर त्याकाळी तीन राजघराण्यांनी राज्य केल्याचे दिसते. क्षहरात किंवा पश्चिम क्षत्रप, सातवाहन आणि अभिर. या भागावर वर्चस्व मिळविण्यासाठी सातवाहन आणि क्षत्रप यांच्यात नेहमीच संघर्ष चालू होता. तथापि,या तीनही राजघराण्यांनी बौद्ध धर्माच्या उपासनेला व श्रमणसंघाला सहाय्य केल्याचे दिसते.  या राजघराण्यांच्या व्यतिरिक्त तत्कालीन जमीनदार, स्थानिक व्यापारी व नागरिक यांनीही या लेण्यांच्या विकासासाठी मोठमोठ्या रकमा दान दिल्याचे शिलालेखात आढळून येते. उल्लेखनीय बाब म्हणजे या शिलालेखांमध्ये राजघराण्यातल्या किंवा व्यापा-यांच्या कुटुंबातील महिलांनीही अनेक लेण्या खोदविण्यासाठी दान दिल्याचे उल्लेख आहेत. यावरुन तत्कालीन समाजात स्त्रीचा सामाजिक दर्जा आतापेक्षा निश्चितपणे उच्च होता असे म्हणता येते. 

तत्कालीन नाशिक हे आतापेक्षा व्यापारीदृष्ट्या कमी महत्वाचे गाव असल्याचे दिसते तर सध्याचे गोवर्धन हे गाव मुख्य बाजारपेठेचे ठिकाण होते असे येथील शिलालेखातून लक्षात येते.

या लेण्यांच्या ठिकाणी प्राचीन काळात वापरली जात असणारी जल व्यवस्थापन तंत्राची ही चुणूक दिसून येते. या ठिकाणी खडकांमध्ये अनेक टाकी खोदलेली दिसतात. ज्यामध्ये पावसाचे पाणी साठवून ते पिण्यासाठी, दैनंदिन कामासाठी व विविध कारणांसाठी वापरात आणलेले दिसते. 


लेणी आणि त्यांचे शिलालेख

या सर्व लेण्यांपैकी लेणी क्र.३,११,१२,१३,१४,१५,१९ व २० या लेण्यांमधील असलेले शिलालेख वाचता येतात. पांडवलेणीतील शिलालेखांमधून महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती समजते. इ. स. पूर्वी १०० वर्षापासून इ. स. १०० वर्षापर्यंतच्या पश्चिम हिंदुस्थानकडील पुष्कळ देशांची नावे, पर्वत, नद्या, शहरे, गावे व खेडी अशा इतिहासातील बऱ्याचशा भागांचा खुलासा इथल्या शिलालेखांतून होतो. या शिलालेखांमधून भट्टपालिका,गौतमी बलश्री,गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी,यज्ञश्री सातकर्णी, कान्ह अथवा कृष्ण, हकुसिरी अथवा हकुश्री, क्षहरात व नहपान, उषवदत्त आणि त्याची पत्नी दक्षमित्रा, माधुरीपुत्र शिवदत तर यवन (इंडो-ग्रीक) धम्मदेव यांची नावे व वर्णन आढळते. भिक्‍खूंना राहण्यासाठी आणि औषधोपचारांसाठीची तरतूद, दानांचे उल्लेख, युद्ध, तसेच आर्थिक व्यवहाराचे व व्याजाच्या पद्धतीचा उल्लेखही लेणीतील शिलालेखांमध्ये आढळतो.

या लेणी पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहेत तर हा डोंगर व परिसर वनखात्याच्या ताब्यात आहे. या डोंगरावर व सभोवताली वनखात्याने वनसंवर्धन करून एक छोटेसे अरण्य निर्माण केले आहे. या अरण्यात कोल्हे, लांडगे, ससे, इ. प्राणी व मोर, भारद्वाज इ. विविध पक्षी आहेत. येथे वर जाण्यासाठी सुरेख अशी दगडी पाय-या बांधल्या आहेत. वर चढण्यास सुमारे २५ ते ३० मिनिटे वेळ लागतो. पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृष्य दिसते.  या डोंगराच्या पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आहे. 


पुरातत्त्व खात्याने लावलेला फलक



लेण्यांकडे जाणा-या पाय-या

आता आपण लेणीनिहाय या लेण्यांची माहिती जाणून घेऊयात.

लेणे क्रमांक १

गुहा क्रमांक १: हे लेणे लेणे खोदण्याच्या कालखंडातील सर्वात उत्तरार्धातील लेणे असावे. हे लेणे अर्धवट सोडलेले दिसून येते. या लेण्यामध्ये दर्शनी भागात वरच्या कोरीव पट्टीशिवाय काही कोरीव काम केलेले नाही. मात्र या लेण्यावरुन लेण्यांचे खोदकाम कशाप्रकारे केले जात असेल याची पुरेपूर कल्पना करता येते. हे लेणे म्हणजे विहार व समोर चार स्तंभ अशी योजना असावी असे दिसते. कदाचित राज्यकर्त्यांच्या धामधुमीच्या काळात हे खोदकाम सुरु केले असावे व राज्यकर्ते व धनिकांकडून मदतीचा ओघ आटल्यामुळेही लेणीनिर्माण थांबवणे भाग पडले असावे किंवा येथील खडकात दोष आढळल्यामुळेही या लेण्याचे खोदकाम अर्धवट सोडले असावे असा अंदाज आपण बांधू शकतो.



लेणे क्र.१, बाहेरून दिसणारे लेणे



लेणे क्र.१, बाहेरून दिसणारे लेणे



लेणे क्र.१ चा अंतर्भाग



लेणे क्र.१ चा अंतर्भाग


लेणे क्रमांक २

लेणे क्रमांक २ हे एक छोटेसे लेणे आहे.  या लेण्याची समोरची दरवाजाची भिंत कदाचित पाडून टाकली गेली आहे किंवा काळाच्या ओघात नष्ट झाली आहे.या लेण्यात दोन  छोटे कक्ष दिसतात.  या लेण्यात एक अर्धवट शिल्लक राहिलेला शिलालेख आहे. त्यात सद्यस्थितीत फक्त वासिष्ठीपुत्र पुळुमावीच्या  कार्यकाळाच्या ६ व्या वर्षाचा उल्लेख वाचता येतो. 

आतल्या कक्षातील भिंतीवर प्रलंबपादासनात व धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील भगवान बुद्धांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. बुद्धाच्या शेजारी बोधिसत्व व चव-या ढाळणा-या सेवकांची व पुष्पमाला घेतलेल्या यक्षांची शिल्पे अंकित केलेली आहेत. या लेणीत बुद्धाची काही शिल्पे अर्धवट दिसतात ती एकतर अपूर्ण राहिलेली असावीत किंवा खंडीत केली असावीत. या अपूर्ण शिल्पांवर महायान पंथाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शिलालेखातील उल्लेखानुसार मुळ लेणे  हे इ.स् दुस-या शतकात खोदलेले असून महायान पंथियांनी सहाव्या शतकात बुद्ध प्रतिमांची भर घातली आहे हे दिसून येते.


या लेणीच्या बाहेर पाण्यासाठी उघडे टाके खोदलेले आहे. 


लेणे क्र.२, बाहेरून दिसणारे लेणे


लेणे क्र.२ चा अंतर्भाग


आतील बुध्द प्रतिमा



- क्रमशः


(संकलन : अशोक दारके)





Sunday, 18 April 2021

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या कोविड संदर्भातील ऑनलाईन लिंक्स

 सध्या कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भावाने महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती ओढवली आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे तर रेमडेस्वीर इंजेक्शनचीही टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा गोंधळाच्या परिस्थितीत या सर्वांसाठी कुठे संपर्क साधायचा ते सर्वसामान्य माणसाला कळेनासे झाले आहे. 

विविध जिल्हा प्रशासनांनी सुरळीतपणे कामकाजासाठी वेबसाइटस तयार केल्या आहेत. महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या सर्व जिल्ह्यांच्या या संदर्भातल्या सर्व लिंक्स सर्व लोकांच्या सोईसाठी एकत्रितरित्या खाली दिल्या आहेत. आपल्या नातेवाईक किंवा मित्रपरिवाराला याचा उपयोग होऊ शकतो. तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक शेअर करा.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या कोविड संदर्भातील ऑनलाईन लिंक्स


Pune पुणे

https://covidpune.com/


Nagpur नागपूर

http://nsscdcl.org/covidbeds/AvailableHospitals.jsp


Thane ठाणे

https://covidthane.org/availabiltyOfHospitalBeds.html


Nashik नाशिक

http://covidcbrs.nmc.gov.in/home/hospitalSummary


Navi Mumbai नवी मुंबई

https://nmmchealthfacilities.com/


Panvel पनवेल

https://www.covidbedpanvel.in/


Ahmednagar अहमदनगर

http://ahmednagarcovid19.com/report/


Aurangabad औरंगाबाद

https://aurangabad.gov.in/public-utility-category/hospitals/


Amarawati अमरावती

https://amravati.gov.in/public-utility-category/hospitals/


Jalna जालना

https://jalna.gov.in/private-hospital-bed-availibility/



Beed बीड

https://beed.gov.in/en/list-of-hospitals/


Nanded नांदेड

https://nwcmc.gov.in/hospitallist.php


Parbhani परभणी

https://parbhani.gov.in/covid19dashboard/


Solapur सोलापूर 

http://117.247.89.137:85/

https://solapur.gov.in/en/corona/


Satara सातारा

https://covid19satara.in/District_data/muncipal_list


Sangli सांगली

http://smkc.gov.in/covid19


Osmanabad उस्मानाबाद

https://osmanabad.gov.in/covid19-bed/


Sindhudurg सिंधुदुर्ग

https://sindhudurg.nic.in/en/covid-19-coronavirus-2/


Latur लातूर

https://covid19bedinfo.cslatur.in/

http://bedinfo.mclatur.org/


Chandrapur चंद्रपूर

https://chanda.nic.in/en/covid-19-updates/


Gondia गोंदीया

https://gondia.gov.in/en/covid-19-information/


Wardha वर्धा

https://buldhana.nic.in/en/public-utility-category/hospitals/


Nandurbar नंदूरबार

https://nandurbar.gov.in/covid-19-updates/


Maharashtra महाराष्ट्रातील कोविड हॉस्पिटलबाबत एकत्रित माहिती

https://arogya.maharashtra.gov.in/pdf/covidupload42.pdf



महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटल्स व बेड उपलब्धता

Mahatma Fule Jeevandayee Arogya Yojana, Maharastra


https://www.jeevandayee.gov.in/MJPJAY/FrontServlet?requestType=PublicViewsRH&actionVal=ViewBedCapacity&page=Network%20Hospitals&%3E%3E%3CB%3EView%20Bed%20Occupancy%3C/B%3E&mainMenu=Hospitals&subMenu=View%20Bed%20Occupancy


Saturday, 17 April 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक

 पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी,  नाशिक

 नाशिक लेणी किंवा पांडव लेणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या लेण्या नाशिकपासून  दक्षिणेला ८ ते ९ किमी अंतरावरील असलेल्या त्रिरश्मी डोंगरांत स्थित आहेत. त्यामुळे या त्रिरश्मी लेणी या नावानेही ख्यातकिर्त आहेत. या लेण्या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. या लेणी म्हणजे इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स. तिसरे शतक या काळात कोरण्यात आलेल्या २४ लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांमध्ये मिळालेल्या शिलालेखांवरून या लेणी खोदण्याचा कालावधी इ.स्.पूर्व १ ले शतक असा निश्चित करता येतो. याच लेण्यातील शिलालेखात प्रथम ‘लेण’ हा शब्द वापरण्यात आला व त्यापासूनच अशा प्रकारच्या शैल्यगृहासाठी पुढे ‘लेणी’ हा शब्द वापरण्यात येऊ लागला.

या लेणी पांडव लेणी नावाने ओळखल्या जात असल्या तरी यांचा पांडवांशी काहीही संबंध नाही. इथल्या लेणे क्रमांक २३ मधल्या बुद्ध व बोधीसत्वांच्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच अशा प्रकारचे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले असावे. या लेण्यांना पांडव लेणी अथवा पांडू लेणी हे नाव पडण्यामागे अजून एक उपपत्ती सांगितली जाते. पंडु म्हणजे पाली भाषेत "पिवळा रंग". या लेण्यांमध्ये "चिवर किंवा पिवळे वस्त्र" परिधान करणारे बौद्ध भिक्षू निवास करत. त्यामुळे तत्कालीन सर्वसामान्य लोक या लेण्यांना पंडू लेणी म्हणून ओळखत असत. कालौघात पंड्रू शब्दाचा उच्चार बदलून पांडू लेणी झाला व कालांतराने लोकांनी त्याला पांडव  लेणी असे संबोधण्यास सुरवात केली.

या २४ लेण्या त्रिरश्मी डोंगराच्या उत्तरेकडील बाजूस लांब पट्ट्यात खोदल्या आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे या क्रमवारीने लेण्या कोरल्या गेल्या. यातील बहुतेक सर्व लेणी हिनयान बौद्ध पंथीयांनी कोरलेल्या दिसतात. यातील बहुतांशी लेण्यांचा अंतर्भाग साधासुधा असला तरी दर्शनी बाह्य भाग मात्र अत्यंत सुरेख अशा नक्षीकामाने व शिल्पांनी अलंकृत केलेला दिसतो. या लेणी यात कोरलेल्या शिल्पांमुळे व नक्षीकामांमुळे भारतीय लेणी वास्तुकलेचे अनोखे व अत्युत्तम उदाहरण आहेत. या लेण्यांचे  खरे वैशिष्ट्य आहे ते या लेण्यांमध्ये कोरलेले शिलालेख. या समूहातील लेण्यांमध्ये तब्बल २७ ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. या लेण्यात खोदण्यात आलेल्या शिलालेखांमुळे प्राचीन इतिहासाचा हा एक अत्यंत महत्वाचा ठेवाही ठरला आहे. क्षहरात उर्फ क्षत्रप आणि सातवाहन राजवंशाच्या कारकिर्द या शिलालेखांमुळे प्रकाशात आल्या आहेत.

 इ.स.पू.१ ल्या शतकात खोदण्यात आलेले सध्याचे १८व्या क्रमांकाचे चैत्य असलेले वगळता इतर बहुतेक लेण्या म्हणजे विहार आहेत. या लेण्यांचे 'त्रिरश्मी' हे नाव याच लेण्यांमध्ये अस्लेल्या शिलालेखातील "तिरन्हू" शब्दापासून आले आहे. या शब्दाचा अर्थ "सूर्यप्रकाशाचे किरण" असा होतो. या लेण्या निर्माण करण्यासाठी तत्कालीन राजे सातवाहन, नहपान, अभिर तसेच  तत्कालीन स्थानिक व्यापारी यांनी बौद्ध भिक्कुंना सढळपणे देणग्या दिल्याचे दिसते. 

यातील काही लेण्या आकाराने मोठ्या असून त्यामध्ये भिक्कु किंवा साधकांना ध्यानसाधनेसाठी अनेक कक्ष खोदलेले आहेत व प्रवचनासाठी त्याला लागूनच सभागृह तयार केलेले दिसते. चैत्य असलेले लेणे (लेणे क्र. १८) हे कार्ला लेण्याइतकेच प्राचीन असावे. त्याचा दर्शनी भाग अतिशय सुरेख व अलंकारीक नक्षीकामाने शिल्पांकित केलेले आहे. या लेण्यांमध्ये बुद्धाच्या विविध मुद्रांमधील प्रतिमा उत्किर्ण केलेल्या आहेत तसेच पद्मपाणी व वज्रपाणी बोधिसत्व,यक्ष, यक्षी, हत्ती, बैल, सिंह, घोडा इ. प्राणी व तत्कालीन समाजजीवन दर्शविणारे  नागरिक व राजघराण्यातील प्रतिमा शिल्परुपाने कोरलेल्या आहेत. या लेण्यांमध्ये कोरलेल्या स्तंभावरच्या अनेक शिल्पांमध्ये इंडो-ग्रीक वास्तुकलेचा संगम पाहावयास मिळतो. या लेण्यात कोरलेल्या  समृद्ध शिल्पे व विविध प्रतिमा पहाता भारतीय व ग्रीक वास्तुकलेच्या संगमाचे या लेणी म्हणजे एक अपूर्व उदाहरण आहेत.

(क्रमशः)













Thursday, 15 April 2021

खाकी वर्दीतला 'ऑक्सिजन'

प्रेरणादायी : 'खाकी वर्दीतील नझीम शेख' रहिवाशांसाठी ठरताहेत 'ऑक्सिजन'!

सध्याच्या कोरोना विषाणूच्या वाढत्या  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी लूट, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक नकारात्मक बातम्या कानावर येत आहेत. अशा संपूर्ण नकारात्मक वातावरणात एक अत्यंत प्रेरणादायी व माणुसकीचे ह्रृदंगम दर्शन घडविणारी बातमी समोर आली आहे.

नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस शिपाई  'नजीम शेख' यांनी आजूबाजूच्या रहिवाश्यांसाठी चक्क कर्ज काढून थेट ऑक्सिजन मशीनच खरेदी केले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोरोना रूग्ण दगावल्याच्या बातम्या वाचून त्यांचे मन अस्वस्थ झाले. प्रशासनाला किंवा हॉस्पिटलला दोष देण्यापेक्षा आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.  

या अस्वस्थतेतूनच त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी कर्ज काढून स्वखर्चाने विद्युतशक्तीवर चालणारे व स्वच्छ पाण्यातून ऑक्सिजन तयार करणारे मशीनच विकत घेतले. यामुळे परिसरातील एखाद्या बधिताला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास ते मशीन त्यास वापरासाठी विनामूल्य दिले जाणार आहे. यामुळे बधितांना घरीच उपचार घेता येणार असून, हॉस्पिटलला भरमसाठ बिल भरण्याची वेळही येणार नाही आणि प्राणही वाचण्यास मदत होणार आहे.

ते नाशिकच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये रासबिहारी लिंक रोड वरील सरस्वती नगर येथील सागर स्पंदन सोसायटीत राहतात.  आई वडिलांनी मोलमजुरी करीत नझीमचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर नझीम नाशिक शहर पोलीस दलात भरती झाले.  सध्या शेख हे सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शेख यांना आजही हा छंद शांत बसू देत नाही. सतत काहीना काही सामाजिक कार्यात व्यग्र राहणाऱ्या नझीम यांनी राहत्या परिसरातील नागरिकांना एकत्र आणत सरस्वती नगर मित्र मंडळाची स्थापना केली आहे. या ठिकाणी अनेक सामजिक कार्यक्रम घेतले जातात

नझीम शेख यांनी हे मशीन सरस्वती मित्र मंडळास भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच खाकी वर्दीतील नझीम शेख परिसरातील रहिवाशांसाठी 'ऑक्सिजन' ठरले आहेत. या कार्याने नझीम यांनी केवळ आपले व आईवडिलांचेच नाही तर नाशिकचेही नाव 'रोशन' केले आहे.

Wednesday, 14 April 2021

स्वामी समर्थ प्रकट दिन

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..'  हे वाक्‍य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. 

आंध्र प्रदेशातील श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून महाराष्ट्रात  स्वामी समर्थ प्रगट झाले. दरम्यान, स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरात आले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १८७८ होता.  त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वामिसुत महाराजांनी सुरु केला आहे. तेव्हापासून दरवर्षी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा केला जातो. 

स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट येथेच 'वटवृक्ष  समाधी मठ स्थानी' आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. मात्र, आजही लोकांमध्ये स्वामी समर्थांबद्दल अपार श्रद्धा आहे.

पौराणिक आख्यायिकेनुसार, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रयाचे हे तिसरा पूर्णावतार आहेत. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.

नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले,

(संकलित माहिती)

Tuesday, 13 April 2021

गुढीपाडवा

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, शके १९४३, प्लवनाम संवत्सर...

आजपासून प्रारंभ होणाऱ्या संवत्सराचे नाव आहे ‘प्लव’ या शब्दाचा अर्थ पोहणे, तरंगणे, उड्या मारणे, बडबडणे आहे. बेडूक हाही या शब्दाचा अर्थ आहे. पण वेदांमध्ये या शब्दाचा अर्थ वेगळा सांगितलेला आहे. तो म्हणजे श्रेष्ठ, अत्युत्तम. अजून काही अर्थही आहेत, पैकी प्रवाह, नदीच्या प्रवाहातील वाढ होणे. अशा अनेक अर्थांमध्ये या शब्दाचा वापर केलेला दिसतो आहे. मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीला, माकड, वानर यांनासुद्धा प्लव असे काही ठिकाणी संबोधिलेले आहे. 

॥ नाशयेच्च शनैः पश्चात् प्लवं सलिलपूरवत्, सर्वं ज्ञानप्लवेवैव वृजिनं संतरिष्यसि ॥

सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता वरच्या श्लोकातील अर्थाप्रमाणे, हळु हळु नाश पावणार... म्हणजे सध्याच्या रोगाने हळु हळु समाजाचा नाश होणार, नंतर जसा नदीचा प्रवाह वाढतो तशीच प्रगती होत जाणार. एकदा नदीत प्रचंड पूर यायला लागला, की त्यातूनही काही प्रमाणात नाश होतोच. तसेच नदीच्या प्रवाहासारखे जीवन सुधारेल पण तेही नाशाकडे जाऊ शकतं. कालक्रमेण ती प्रगती ज्ञानानेच होईल आणि या जगात ज्ञानी माणसंच राहतील. संपत्तीचा माज असलेलला व्यक्ती नाश पावणार. फक्त ज्ञानी माणूस जीवंत राहणार.

बेडूक आधी पाण्यात मनसोक्त फिरतो, नंतर चिखलात फिरतो, शेवटी तो जमिनीवर येतो. तसेच मानवजातीचा जीवनक्रम होणार आहे. आधी पाण्यात असलेल्या बेडकासारखे संपूर्ण मानवजाती मनसोक्त पैसा, पद, संपत्ती इत्यादींसोबत फिरत असे. नंतर कोरोना किंवा तत्सम आजाराने किंवा सामाजिक परिस्थितीने चिखलामध्ये असलेल्या बेडकासारखी परिस्थिती भोगायला लागली. ती परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन. आत्ता हीच मंडळी बेडकासारखी जमिनीवर येणार. पाहा..... शेवटी प्रत्येकाला जमिनीवर येणे गरजेचे आहे. म्हणूनच पूर्वी म्हणत असतं की, आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा.  मंडळी बेडूक का जमिनीवर आहे याचा विचार करा. सुरक्षित, वाहून जाण्याची शक्यता नाही, चिखलात बुडण्याची शक्यता नाही. म्हणून बेडूक जसं जमिनीवर येतं, तसं सध्याच्या गंभीर बनलेल्या सामाजिक परिस्थितीतून काही ना काही बोध घेऊन प्रत्येकाने जमिनीवर पाय रोवायला शिका.

वामन शिवराम आपटे यांच्या शब्दकोशामध्ये प्लव या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तसेच कृष्ण यजुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. प्लवं नाति विश्वेगमनात्.... असा एक उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा प्लव या शब्दाचा उल्लेख आहे. शिवाय अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये प्लव  या शब्दाला योग्य ठिकाणी वापर केलेला आहे. 

त्यामुळे येणारा संवत्सर कसा असेल ही एक चिंता प्रत्येकाला जगभरात आहे. पण जमिनीवर पाय ठेवून जो वागेल, जगेल तोच टिकेल, नाही तर बेडकासारखी परिस्थिती होईल, असं म्हणण्यास हरकत नाही.
प्रत्येकाने आपल्या राहणीमानाची जाणीव ठेवावी, वाड-वडिलांची काळजी घ्यावी, संपत्ती सत्  मार्गाने कमवावी, वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये, विचार चांगले ठेवावेत. कितीही मोठी कठिण परिस्थिती उद्भवली तरी  जीवन संपविण्याचा विचार करू नये, त्यातून मार्ग काढायला समाजाची मदत घ्यावी. राजकारण सोडा आणि सत्-असत्  विवेकबुद्धीने जीवन जगा. हे नक्की आहे, सामाजिक परिस्थिती ही क्रूरतेने भरलेली असू शकते. खून, मारामाऱ्या, बलात्कार, राजकारण, अर्थकारण अशा गोष्टी होऊ शकतात, कारण मानसिक अस्थिरता..... पण या गोष्टी सर्वांना विनाशाकडे नेणाऱ्या असतील, हे गांभीर्याने सांगाव्या असे वाटते.

प्लव  संवत्सर सर्वांना आरोग्यदायी, श्रेयदायी, आनंददायी, यशोदायी जावो या शुभेच्छा....

डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे.


सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...