Saturday, 17 April 2021

पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक

 पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी,  नाशिक

 नाशिक लेणी किंवा पांडव लेणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या लेण्या नाशिकपासून  दक्षिणेला ८ ते ९ किमी अंतरावरील असलेल्या त्रिरश्मी डोंगरांत स्थित आहेत. त्यामुळे या त्रिरश्मी लेणी या नावानेही ख्यातकिर्त आहेत. या लेण्या महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेण्यांपैकी एक आहेत. या लेणी म्हणजे इ.स.पू. पहिल्या शतकापासून ते इ.स. तिसरे शतक या काळात कोरण्यात आलेल्या २४ लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांमध्ये मिळालेल्या शिलालेखांवरून या लेणी खोदण्याचा कालावधी इ.स्.पूर्व १ ले शतक असा निश्चित करता येतो. याच लेण्यातील शिलालेखात प्रथम ‘लेण’ हा शब्द वापरण्यात आला व त्यापासूनच अशा प्रकारच्या शैल्यगृहासाठी पुढे ‘लेणी’ हा शब्द वापरण्यात येऊ लागला.

या लेणी पांडव लेणी नावाने ओळखल्या जात असल्या तरी यांचा पांडवांशी काहीही संबंध नाही. इथल्या लेणे क्रमांक २३ मधल्या बुद्ध व बोधीसत्वांच्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच अशा प्रकारचे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले असावे. या लेण्यांना पांडव लेणी अथवा पांडू लेणी हे नाव पडण्यामागे अजून एक उपपत्ती सांगितली जाते. पंडु म्हणजे पाली भाषेत "पिवळा रंग". या लेण्यांमध्ये "चिवर किंवा पिवळे वस्त्र" परिधान करणारे बौद्ध भिक्षू निवास करत. त्यामुळे तत्कालीन सर्वसामान्य लोक या लेण्यांना पंडू लेणी म्हणून ओळखत असत. कालौघात पंड्रू शब्दाचा उच्चार बदलून पांडू लेणी झाला व कालांतराने लोकांनी त्याला पांडव  लेणी असे संबोधण्यास सुरवात केली.

या २४ लेण्या त्रिरश्मी डोंगराच्या उत्तरेकडील बाजूस लांब पट्ट्यात खोदल्या आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे या क्रमवारीने लेण्या कोरल्या गेल्या. यातील बहुतेक सर्व लेणी हिनयान बौद्ध पंथीयांनी कोरलेल्या दिसतात. यातील बहुतांशी लेण्यांचा अंतर्भाग साधासुधा असला तरी दर्शनी बाह्य भाग मात्र अत्यंत सुरेख अशा नक्षीकामाने व शिल्पांनी अलंकृत केलेला दिसतो. या लेणी यात कोरलेल्या शिल्पांमुळे व नक्षीकामांमुळे भारतीय लेणी वास्तुकलेचे अनोखे व अत्युत्तम उदाहरण आहेत. या लेण्यांचे  खरे वैशिष्ट्य आहे ते या लेण्यांमध्ये कोरलेले शिलालेख. या समूहातील लेण्यांमध्ये तब्बल २७ ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. या लेण्यात खोदण्यात आलेल्या शिलालेखांमुळे प्राचीन इतिहासाचा हा एक अत्यंत महत्वाचा ठेवाही ठरला आहे. क्षहरात उर्फ क्षत्रप आणि सातवाहन राजवंशाच्या कारकिर्द या शिलालेखांमुळे प्रकाशात आल्या आहेत.

 इ.स.पू.१ ल्या शतकात खोदण्यात आलेले सध्याचे १८व्या क्रमांकाचे चैत्य असलेले वगळता इतर बहुतेक लेण्या म्हणजे विहार आहेत. या लेण्यांचे 'त्रिरश्मी' हे नाव याच लेण्यांमध्ये अस्लेल्या शिलालेखातील "तिरन्हू" शब्दापासून आले आहे. या शब्दाचा अर्थ "सूर्यप्रकाशाचे किरण" असा होतो. या लेण्या निर्माण करण्यासाठी तत्कालीन राजे सातवाहन, नहपान, अभिर तसेच  तत्कालीन स्थानिक व्यापारी यांनी बौद्ध भिक्कुंना सढळपणे देणग्या दिल्याचे दिसते. 

यातील काही लेण्या आकाराने मोठ्या असून त्यामध्ये भिक्कु किंवा साधकांना ध्यानसाधनेसाठी अनेक कक्ष खोदलेले आहेत व प्रवचनासाठी त्याला लागूनच सभागृह तयार केलेले दिसते. चैत्य असलेले लेणे (लेणे क्र. १८) हे कार्ला लेण्याइतकेच प्राचीन असावे. त्याचा दर्शनी भाग अतिशय सुरेख व अलंकारीक नक्षीकामाने शिल्पांकित केलेले आहे. या लेण्यांमध्ये बुद्धाच्या विविध मुद्रांमधील प्रतिमा उत्किर्ण केलेल्या आहेत तसेच पद्मपाणी व वज्रपाणी बोधिसत्व,यक्ष, यक्षी, हत्ती, बैल, सिंह, घोडा इ. प्राणी व तत्कालीन समाजजीवन दर्शविणारे  नागरिक व राजघराण्यातील प्रतिमा शिल्परुपाने कोरलेल्या आहेत. या लेण्यांमध्ये कोरलेल्या स्तंभावरच्या अनेक शिल्पांमध्ये इंडो-ग्रीक वास्तुकलेचा संगम पाहावयास मिळतो. या लेण्यात कोरलेल्या  समृद्ध शिल्पे व विविध प्रतिमा पहाता भारतीय व ग्रीक वास्तुकलेच्या संगमाचे या लेणी म्हणजे एक अपूर्व उदाहरण आहेत.

(क्रमशः)













No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....