Tuesday, 13 April 2021

गुढीपाडवा

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा, शके १९४३, प्लवनाम संवत्सर...

आजपासून प्रारंभ होणाऱ्या संवत्सराचे नाव आहे ‘प्लव’ या शब्दाचा अर्थ पोहणे, तरंगणे, उड्या मारणे, बडबडणे आहे. बेडूक हाही या शब्दाचा अर्थ आहे. पण वेदांमध्ये या शब्दाचा अर्थ वेगळा सांगितलेला आहे. तो म्हणजे श्रेष्ठ, अत्युत्तम. अजून काही अर्थही आहेत, पैकी प्रवाह, नदीच्या प्रवाहातील वाढ होणे. अशा अनेक अर्थांमध्ये या शब्दाचा वापर केलेला दिसतो आहे. मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीला, माकड, वानर यांनासुद्धा प्लव असे काही ठिकाणी संबोधिलेले आहे. 

॥ नाशयेच्च शनैः पश्चात् प्लवं सलिलपूरवत्, सर्वं ज्ञानप्लवेवैव वृजिनं संतरिष्यसि ॥

सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता वरच्या श्लोकातील अर्थाप्रमाणे, हळु हळु नाश पावणार... म्हणजे सध्याच्या रोगाने हळु हळु समाजाचा नाश होणार, नंतर जसा नदीचा प्रवाह वाढतो तशीच प्रगती होत जाणार. एकदा नदीत प्रचंड पूर यायला लागला, की त्यातूनही काही प्रमाणात नाश होतोच. तसेच नदीच्या प्रवाहासारखे जीवन सुधारेल पण तेही नाशाकडे जाऊ शकतं. कालक्रमेण ती प्रगती ज्ञानानेच होईल आणि या जगात ज्ञानी माणसंच राहतील. संपत्तीचा माज असलेलला व्यक्ती नाश पावणार. फक्त ज्ञानी माणूस जीवंत राहणार.

बेडूक आधी पाण्यात मनसोक्त फिरतो, नंतर चिखलात फिरतो, शेवटी तो जमिनीवर येतो. तसेच मानवजातीचा जीवनक्रम होणार आहे. आधी पाण्यात असलेल्या बेडकासारखे संपूर्ण मानवजाती मनसोक्त पैसा, पद, संपत्ती इत्यादींसोबत फिरत असे. नंतर कोरोना किंवा तत्सम आजाराने किंवा सामाजिक परिस्थितीने चिखलामध्ये असलेल्या बेडकासारखी परिस्थिती भोगायला लागली. ती परिस्थिती म्हणजे लॉकडाऊन. आत्ता हीच मंडळी बेडकासारखी जमिनीवर येणार. पाहा..... शेवटी प्रत्येकाला जमिनीवर येणे गरजेचे आहे. म्हणूनच पूर्वी म्हणत असतं की, आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा.  मंडळी बेडूक का जमिनीवर आहे याचा विचार करा. सुरक्षित, वाहून जाण्याची शक्यता नाही, चिखलात बुडण्याची शक्यता नाही. म्हणून बेडूक जसं जमिनीवर येतं, तसं सध्याच्या गंभीर बनलेल्या सामाजिक परिस्थितीतून काही ना काही बोध घेऊन प्रत्येकाने जमिनीवर पाय रोवायला शिका.

वामन शिवराम आपटे यांच्या शब्दकोशामध्ये प्लव या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तसेच कृष्ण यजुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. प्लवं नाति विश्वेगमनात्.... असा एक उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा प्लव या शब्दाचा उल्लेख आहे. शिवाय अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये प्लव  या शब्दाला योग्य ठिकाणी वापर केलेला आहे. 

त्यामुळे येणारा संवत्सर कसा असेल ही एक चिंता प्रत्येकाला जगभरात आहे. पण जमिनीवर पाय ठेवून जो वागेल, जगेल तोच टिकेल, नाही तर बेडकासारखी परिस्थिती होईल, असं म्हणण्यास हरकत नाही.
प्रत्येकाने आपल्या राहणीमानाची जाणीव ठेवावी, वाड-वडिलांची काळजी घ्यावी, संपत्ती सत्  मार्गाने कमवावी, वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये, विचार चांगले ठेवावेत. कितीही मोठी कठिण परिस्थिती उद्भवली तरी  जीवन संपविण्याचा विचार करू नये, त्यातून मार्ग काढायला समाजाची मदत घ्यावी. राजकारण सोडा आणि सत्-असत्  विवेकबुद्धीने जीवन जगा. हे नक्की आहे, सामाजिक परिस्थिती ही क्रूरतेने भरलेली असू शकते. खून, मारामाऱ्या, बलात्कार, राजकारण, अर्थकारण अशा गोष्टी होऊ शकतात, कारण मानसिक अस्थिरता..... पण या गोष्टी सर्वांना विनाशाकडे नेणाऱ्या असतील, हे गांभीर्याने सांगाव्या असे वाटते.

प्लव  संवत्सर सर्वांना आरोग्यदायी, श्रेयदायी, आनंददायी, यशोदायी जावो या शुभेच्छा....

डॉ. वासुदेव शंकर डोंगरे, पुणे.


No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....