पांडव लेणी किंवा त्रिरश्मी लेणी, नाशिक (लेखांक २)
पांडव लेण्यांमध्ये आढळून येणा-या शिलालेखांवरून नाशिकवर त्याकाळी तीन राजघराण्यांनी राज्य केल्याचे दिसते. क्षहरात किंवा पश्चिम क्षत्रप, सातवाहन आणि अभिर. या भागावर वर्चस्व मिळविण्यासाठी सातवाहन आणि क्षत्रप यांच्यात नेहमीच संघर्ष चालू होता. तथापि,या तीनही राजघराण्यांनी बौद्ध धर्माच्या उपासनेला व श्रमणसंघाला सहाय्य केल्याचे दिसते. या राजघराण्यांच्या व्यतिरिक्त तत्कालीन जमीनदार, स्थानिक व्यापारी व नागरिक यांनीही या लेण्यांच्या विकासासाठी मोठमोठ्या रकमा दान दिल्याचे शिलालेखात आढळून येते. उल्लेखनीय बाब म्हणजे या शिलालेखांमध्ये राजघराण्यातल्या किंवा व्यापा-यांच्या कुटुंबातील महिलांनीही अनेक लेण्या खोदविण्यासाठी दान दिल्याचे उल्लेख आहेत. यावरुन तत्कालीन समाजात स्त्रीचा सामाजिक दर्जा आतापेक्षा निश्चितपणे उच्च होता असे म्हणता येते.
तत्कालीन नाशिक हे आतापेक्षा व्यापारीदृष्ट्या कमी महत्वाचे गाव असल्याचे दिसते तर सध्याचे गोवर्धन हे गाव मुख्य बाजारपेठेचे ठिकाण होते असे येथील शिलालेखातून लक्षात येते.
या लेण्यांच्या ठिकाणी प्राचीन काळात वापरली जात असणारी जल व्यवस्थापन तंत्राची ही चुणूक दिसून येते. या ठिकाणी खडकांमध्ये अनेक टाकी खोदलेली दिसतात. ज्यामध्ये पावसाचे पाणी साठवून ते पिण्यासाठी, दैनंदिन कामासाठी व विविध कारणांसाठी वापरात आणलेले दिसते.
लेणी आणि त्यांचे शिलालेख
या सर्व लेण्यांपैकी लेणी क्र.३,११,१२,१३,१४,१५,१९ व २० या लेण्यांमधील असलेले शिलालेख वाचता येतात. पांडवलेणीतील शिलालेखांमधून महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती समजते. इ. स. पूर्वी १०० वर्षापासून इ. स. १०० वर्षापर्यंतच्या पश्चिम हिंदुस्थानकडील पुष्कळ देशांची नावे, पर्वत, नद्या, शहरे, गावे व खेडी अशा इतिहासातील बऱ्याचशा भागांचा खुलासा इथल्या शिलालेखांतून होतो. या शिलालेखांमधून भट्टपालिका,गौतमी बलश्री,गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी,यज्ञश्री सातकर्णी, कान्ह अथवा कृष्ण, हकुसिरी अथवा हकुश्री, क्षहरात व नहपान, उषवदत्त आणि त्याची पत्नी दक्षमित्रा, माधुरीपुत्र शिवदत तर यवन (इंडो-ग्रीक) धम्मदेव यांची नावे व वर्णन आढळते. भिक्खूंना राहण्यासाठी आणि औषधोपचारांसाठीची तरतूद, दानांचे उल्लेख, युद्ध, तसेच आर्थिक व्यवहाराचे व व्याजाच्या पद्धतीचा उल्लेखही लेणीतील शिलालेखांमध्ये आढळतो.
या लेणी पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहेत तर हा डोंगर व परिसर वनखात्याच्या ताब्यात आहे. या डोंगरावर व सभोवताली वनखात्याने वनसंवर्धन करून एक छोटेसे अरण्य निर्माण केले आहे. या अरण्यात कोल्हे, लांडगे, ससे, इ. प्राणी व मोर, भारद्वाज इ. विविध पक्षी आहेत. येथे वर जाण्यासाठी सुरेख अशी दगडी पाय-या बांधल्या आहेत. वर चढण्यास सुमारे २५ ते ३० मिनिटे वेळ लागतो. पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृष्य दिसते. या डोंगराच्या पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आहे.
आता आपण लेणीनिहाय या लेण्यांची माहिती जाणून घेऊयात.
लेणे क्रमांक १
गुहा क्रमांक १: हे लेणे लेणे खोदण्याच्या कालखंडातील सर्वात उत्तरार्धातील लेणे असावे. हे लेणे अर्धवट सोडलेले दिसून येते. या लेण्यामध्ये दर्शनी भागात वरच्या कोरीव पट्टीशिवाय काही कोरीव काम केलेले नाही. मात्र या लेण्यावरुन लेण्यांचे खोदकाम कशाप्रकारे केले जात असेल याची पुरेपूर कल्पना करता येते. हे लेणे म्हणजे विहार व समोर चार स्तंभ अशी योजना असावी असे दिसते. कदाचित राज्यकर्त्यांच्या धामधुमीच्या काळात हे खोदकाम सुरु केले असावे व राज्यकर्ते व धनिकांकडून मदतीचा ओघ आटल्यामुळेही लेणीनिर्माण थांबवणे भाग पडले असावे किंवा येथील खडकात दोष आढळल्यामुळेही या लेण्याचे खोदकाम अर्धवट सोडले असावे असा अंदाज आपण बांधू शकतो.
लेणे क्रमांक २
लेणे क्रमांक २ हे एक छोटेसे लेणे आहे. या लेण्याची समोरची दरवाजाची भिंत कदाचित पाडून टाकली गेली आहे किंवा काळाच्या ओघात नष्ट झाली आहे.या लेण्यात दोन छोटे कक्ष दिसतात. या लेण्यात एक अर्धवट शिल्लक राहिलेला शिलालेख आहे. त्यात सद्यस्थितीत फक्त वासिष्ठीपुत्र पुळुमावीच्या कार्यकाळाच्या ६ व्या वर्षाचा उल्लेख वाचता येतो.
आतल्या कक्षातील भिंतीवर प्रलंबपादासनात व धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील भगवान बुद्धांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. बुद्धाच्या शेजारी बोधिसत्व व चव-या ढाळणा-या सेवकांची व पुष्पमाला घेतलेल्या यक्षांची शिल्पे अंकित केलेली आहेत. या लेणीत बुद्धाची काही शिल्पे अर्धवट दिसतात ती एकतर अपूर्ण राहिलेली असावीत किंवा खंडीत केली असावीत. या अपूर्ण शिल्पांवर महायान पंथाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शिलालेखातील उल्लेखानुसार मुळ लेणे हे इ.स् दुस-या शतकात खोदलेले असून महायान पंथियांनी सहाव्या शतकात बुद्ध प्रतिमांची भर घातली आहे हे दिसून येते.
या लेणीच्या बाहेर पाण्यासाठी उघडे टाके खोदलेले आहे.
- क्रमशः
(संकलन : अशोक दारके)
No comments:
Post a Comment