प्रेरणादायी : 'खाकी वर्दीतील नझीम शेख' रहिवाशांसाठी ठरताहेत 'ऑक्सिजन'!
सध्याच्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी लूट, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक नकारात्मक बातम्या कानावर येत आहेत. अशा संपूर्ण नकारात्मक वातावरणात एक अत्यंत प्रेरणादायी व माणुसकीचे ह्रृदंगम दर्शन घडविणारी बातमी समोर आली आहे.
नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस शिपाई 'नजीम शेख' यांनी आजूबाजूच्या रहिवाश्यांसाठी चक्क कर्ज काढून थेट ऑक्सिजन मशीनच खरेदी केले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोरोना रूग्ण दगावल्याच्या बातम्या वाचून त्यांचे मन अस्वस्थ झाले. प्रशासनाला किंवा हॉस्पिटलला दोष देण्यापेक्षा आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.
या अस्वस्थतेतूनच त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी कर्ज काढून स्वखर्चाने विद्युतशक्तीवर चालणारे व स्वच्छ पाण्यातून ऑक्सिजन तयार करणारे मशीनच विकत घेतले. यामुळे परिसरातील एखाद्या बधिताला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास ते मशीन त्यास वापरासाठी विनामूल्य दिले जाणार आहे. यामुळे बधितांना घरीच उपचार घेता येणार असून, हॉस्पिटलला भरमसाठ बिल भरण्याची वेळही येणार नाही आणि प्राणही वाचण्यास मदत होणार आहे.
ते नाशिकच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये रासबिहारी लिंक रोड वरील सरस्वती नगर येथील सागर स्पंदन सोसायटीत राहतात. आई वडिलांनी मोलमजुरी करीत नझीमचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर नझीम नाशिक शहर पोलीस दलात भरती झाले. सध्या शेख हे सरकारवाडा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शेख यांना आजही हा छंद शांत बसू देत नाही. सतत काहीना काही सामाजिक कार्यात व्यग्र राहणाऱ्या नझीम यांनी राहत्या परिसरातील नागरिकांना एकत्र आणत सरस्वती नगर मित्र मंडळाची स्थापना केली आहे. या ठिकाणी अनेक सामजिक कार्यक्रम घेतले जातात
नझीम शेख यांनी हे मशीन सरस्वती मित्र मंडळास भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच खाकी वर्दीतील नझीम शेख परिसरातील रहिवाशांसाठी 'ऑक्सिजन' ठरले आहेत. या कार्याने नझीम यांनी केवळ आपले व आईवडिलांचेच नाही तर नाशिकचेही नाव 'रोशन' केले आहे.
No comments:
Post a Comment