एक अनोखी परंपरा - मुल्हेरचा रासोत्सव.....
श्रीकृष्णच्या जीवनात रासलीलेचे स्थान अढळ आहे. गोपिका व श्रीकृष्ण यांच्या एकमेकांवरच्या निस्सीम प्रेमाचे ते प्रतीक मानले जाते. गोकुळातील गोपींचे कृष्णकन्हैयावर अपार प्रेम होते. कृष्णाचे सुद्धा सर्व गोपींवर समान प्रेम होते. सर्व गोपी श्रीकृष्णमय झाल्या होत्या. त्या गोपींना आपले पतीसुद्धा श्रीकृष्णरुप दिसत असत. श्रीकृष्णाने सर्व गोपींना वचन दिले होते. त्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेस रात्रीच्या शांत समयी मुरलीधरने मुरली वाजविण्यास सुरूवात केली. मुरलीचा मंत्रमुग्ध करणारा ध्वनी ऐकताच त्या सावध झाल्या. त्यांना कृष्णाच्या भेटीची ओढ लागली. त्यांनी व्यवस्थित शृंगार केला व श्रीकृष्णाकडे आल्या.
श्रीकृष्णास मुरली वाजवताना पाहून सर्व गोपींना आनंद झाला. श्रीकृष्णाने गोपींच्या संख्येएवढी रूपे धारण केली. त्यामुळे प्रत्येक गोपीला श्रीकृष्णाचा सहवास लाभला. एकमेकांचा हात धरून श्रीकृष्णासह गोल रिंगण करून गाणी म्हणत त्या आनंदाने नृत्य करू लागल्या. सर्व गोपिकांच्या जीवनातला तो सुवर्णक्षण होता. श्रीकृष्णाबरोबरची रासक्रीडा पाहून सर्व देवदेवतांना आपणसुद्धा गोपींचे रूप घ्यावे असे वाटू लागले. रासलीलेतील गोपींचे तालमय नृत्य पाहून रंभा, मेनका, तिलोत्तमा इ. अप्सरासुद्धा आश्चर्यचकित झाल्या. गंधर्व, यक्ष,किन्नर यांना गोपींचा हेवा वाटू लागला.
असाच अनोखा रासक्रीडा उत्सव नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे दरवर्षी साजरा होतो. नाशिकच्या बागलाण प्रांतातील मुल्हेर येथील रासोत्सव महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी एक आहे. मराठी प्रांत असूनही येथे उत्तरेतील मथुरा आणि वृंदावनात प्रचलीत असणाऱ्या ब्रज भाषेतील गोपीगीत गाऊन उत्सव साजरा केला जातो. स्थानिक श्रद्धेनुसार महाभारतातील राजा मयुरध्वज याने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने रासोत्सव सुरु केला. पुढे इ.स.१५० च्या सुमारास बागलाण प्रांतावर आभिरांचे आधिपत्य होते. ते स्वतःला कृष्णाच्या कुळातील समजत असत. त्यांनी ही परंपरा सुरु केली असावी परंतु त्याचे तेव्हाचे स्वरूप कसे असावे याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. साधारणपणे हजार वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो अशी स्थानिक मान्यता आहे. प्रचलीत उत्सव इ.स.१६०० दरम्यान श्री.उद्धवमहाराजांचे गुरु श्री.काशिनाथमहाराज यांच्यापासून साजरा केला जातो.
स्थानिक आख्यायिकेनुसार हा उत्सव महाभारत कालीन मुल्हेर राजा मयूरध्वज याने (इ.स.पूर्व ३००० सुमारे )सुरु केला. राजा मयूरध्वजाचे राज्य नर्मदेच्या दक्षिण भागात होते या राजधानी रत्नपुर (मुल्हेरचे पूर्वीचे नाव ) पांडवांच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी नर्मदा हि त्यांच्या दिग्विजयाची सीमा निश्चित करण्यात आली.अर्जुन श्रीकृष्णासह नर्मदातीरी अश्व त्यांचा १६ वर्षाचा मुलगा ताम्रध्वज सांभाळत होता. अर्जुनाने नर्मदेच्या दक्षिण तिरावरील राज्यावर विजय मिळवण्याची इच्छा श्री कृष्णा जवळ प्रगट केली. पण देवाने सांगितले की, आपली हिच सीमा आहे. तसेच मयूरध्वज राजा महापराक्रमी आहे.त्याच्यापुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे तरी ही अर्जुनाने कृष्णाला आग्रह धरला की तुम्ही असतांना काहीही अशक्य नाही.मयूरध्वज हि कृष्ण भक्त होता. त्याच्यावर कृपा व्हावी व अर्जुनाचाही हट्ट पुरवावा. अशा इच्छेने ते सैन्यासह नर्मदेच्या तीरावर आले. त्यांचा सामना ताम्रध्वजानें केला तोही पराक्रमी होता. त्याने आपल्या बाणाच्या वर्षावाने अर्जुनाचा पराभव केला. मग कृष्णाने दुसरी युक्ती केली. त्या दोघांनी ब्राह्मण वेष धारण केला व मयूरध्वजाच्या यज्ञ मंडपात दान मागण्यासाठी आले राजाने त्यांचा आदर करून काय दान देऊ? हि पृच्छा केली तेव्हा ब्राह्मण रुपी कृष्णाने सांगितले की आमचा मुलगा जंगलात एका सिंहाने पकडला असून त्याला सोडविण्यास आपला अर्धा देह द्यावा. अशी इच्छा केली. राजाने कृष्णाचे चिंतन केले तेव्हा त्याला ब्राह्मणाचे खरे स्वरूप कळाले. साक्षात भगवान आपल्याकडे दान मागत आहेत हे जाणून राजाने पत्नी शुद्धमती व पुत्र ताम्रध्वज ह्याच्या हातून देह कापून दिला .श्रीकृष्ण राजावर प्रसन्न झाले. राजाचा त्याग पाहून अर्जुन हि खजील झाला. देवाने राजास वर देऊ केला तेव्हा मयूरध्वज म्हणाला की देवा आपल्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती आहेच. पण द्यायचे असेल तर आपल्या ह्या जन्मातील वैशिष्ट्य असलेली रासक्रीडा मला दाखवावी. श्रीकृष्णाने मयूरध्वज राजास ती दिव्यचक्षूंनी दाखविली. राजा धन्य झाला व भगवान श्रीकृष्णास विनंती केली की आपली हि कृपा अश्विनी पौर्णिमेस उत्सव म्हणून साजरी करण्याची परवानगी द्यावी, तेव्हा पासून रासक्रीडा उत्सव साजरा होतो. एवढेच नाही तर श्री उद्धव महाराजांनी आपले निर्वाणानंतर चे स्थान ह्या जागे जवळ असावे अशी इच्छा केली . म्हणून समाधी हि रासस्तंभा समोर आहे.
उत्सवाचे स्वरूप - अश्विन शुद्ध पौर्णिमेला गोरजमुहूर्तावर श्री.उद्धवमहाराज समाधी मंदिराच्या प्रांगणातील एका खांबावर चोवीस आरे असणाऱ्या चक्रावर केळीच्या पानांचे आच्छादन करून त्याचे आरोहण केले जाते त्यानंतर ते झेंडूच्या फुलांनी सुशोभित केले जाते. श्री.उद्धवमहाराजांचे वंशज असणाऱ्या पंडित घराण्यातील एका उपनयनसंस्कार झालेल्या बालकाला कृष्ण बनवतात तोच त्यादिवसाचा साक्षात भगवान असतो त्याची आणि इतर गोपींची पंडितांच्या घरी आरती केली जाते. त्यानंतर त्यांना उत्सवस्थळी चक्राखाली आसनावर बसवले जाते. रासक्रीडा उत्सवाची सुरुवात ही रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते. यासाठी २८ फुट व्यासाचे भव्य चक्र दोरीच्या सहाय्याने विणून तयार केले जाते. यात १४ आऱ्या असलेल्या ७ फुट व्यासाचे चक्राला २८ बाम्बू बांधून ते २८फुट व्यासाचे भले मोठे चक्र कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे विनले जातेेचक्राची सजावट केळीची पाने व झेंडूच्या फुलांनी केली जाते. त्यानंतर सूर्यास्त व् चंद्रोदय यांच्या संपात काळी हजारो हातानी १४ फूटी रासस्तंभावर चढविले जाते.
रासक्रीडेतील अनेक वेगवेगळी कामे पूर्वापार अनेक समाजांना वाटून दिलेली असून सर्व समाजघटकांना विविध जबाबदार्या सोपवत सामाजिक एकतेचा संदेशही या उत्सवातून देण्याचा प्रयत्न पूर्वापार होत आला आहे. आजही हे सर्व समाज आपापली परंपरा व जबाबदारी सांभाळून आहेत. रासमंडलासाठी लागणारी केळीची पाने व झेंडूची फुले आणण्याचे काम भिल्ल व कोकणी समाजाकडे, रासमंडल विणणे व देव सांभाळण्याची जबाबदारी शिंपी समाजाकडे, रासाच्या चाकाची व रासमंडळाच्या दांड्या सांभाळण्याचे काम मराठा समाजाकडे, दिवाबत्तीची सोय करण्याचे नियोजन तेली समाजाकडे आणि भजन परंपरा व पूजा साहित्याची जबाबदारी ब्राह्मण व वाणी समाजाकडे आहे. गावातील इतर सगळी मंडळी रासाच्या चाकाच्या सजावटीत व भजन गायनात सहभागी होतात. मुल्हेर परिसरातील ४२ खेड्यांमधून प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. त्यांचा सहभाग या उत्सवात असतो. गुजरातच्या डांग भागातूनही काही आदिवासी या उत्सवासाठी मुल्हेर गाठतात.
सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्या मध्यकाळी म्हणजेच संपतकाळी हे चक्र चंद्र सूर्याच्या साक्षीने, श्री उद्धव महाराज की जयच्या जयघोषात १४ फूट उंचीच्या रासस्तंभावर चढवतात. चक्र म्हणजे मंडल होय. वृंदावनात अशाच मंडलाखाली भगवान श्रीकृष्ण गोपिकांसमवेत वृंदावनात रासक्रीडा खेळत. या मंडलाचे प्रतिक म्हणजेच हे रासचक्र आहे तर रासक्रीडेला गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार इ.स. पूर्व ३००० साली महाभारत कालीन राजा। मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले. तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते. रासक्रीडा उत्सवाची धुरा सध्या मुल्हेरच्या श्री उद्धव महाराज समाधी संस्थानकडे आहे. चारशे वर्षांपूर्वी उद्धव महाराजांनी मुल्हेरला समाधी घेतली. त्यांचे गुरू श्री काशीनाथ महाराज मुल्हेरलाच राहत. त्यांच्याही आधी मुल्हेरमध्ये रासक्रीडा उत्सव सुरू होताच.
मात्र, इ. स. १६४०च्या सुमारास काशीनाथ महाराजांनी रासक्रीडा उत्सवाची पुनर्रचना केल्याचे संदर्भ श्री उद्धवमहाराज संस्थानचे ११ वे मठाधिपती डॉ. रघुराज महाराज यांच्या अभ्यासाने सापडले आहेत. यावरून तेव्हापासून आजतागायत हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरू आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्याचा सहवास आणि उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात हा रासोत्सव आजही उत्तर भारतीय पद्धतीनेच साजरा केला जातो. श्री उद्धव महाराजांच्या समाधीसमोर संपातकाली रास स्तंभावर चक्र चढल्या नंतर पूजा, आरती होते. रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला श्रीकृष्णाचे रूप दिले जाते. नवसाने झालेल्या मुला, मुलींना राधागोपिका बनवून राधा कृष्ण जय कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी वा भजनाच्या जयघोषाने देवघरापासून समाधी मंदिराकडे नेतात, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होतो. सकाळी सात वाजेपर्यंत रासाच्या चक्राखाली व्रज भाषेतील १०५ भजने म्हटली जातात. या भाजनांची रचना विस्कळीत झाली. ती पुन्हा सुस्थापित करण्याचे काम श्री काशीनाथ महाराजांनी केले. या भजनांची गायकी पंजाबी आहे. तर पखवाज उत्तर भारतीय आहे. सुमारे अर्धा किलो वजनाची दक्षिणी झांज अत्यंत वेगाने या भजनांमध्ये वाजवली जाते.
या भजनांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही भजने संत कबीर, नरसिंह स्वामी यांनी रचलेली असून यात श्रीकृष्णाशी असलेली गोपिकांची एकरूपता, विरहाचि व्याकुळता आणि समर्पण याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. केदार, सारंग, जयजयवंती, अडाना, सोरट, भूप, प्रभात, तोडी, कल्याण, मालगौडा, सामेरी, कानडा, परज, मालू, बिलावर, मालकॉस, रामकली, भैरवी, नायकी आदी रागदारीत गायली जातात. रासक्रीडेची भजने गाण्यामध्ये तरुण वर्गाचा उत्साह लक्षणीय असतो, हेही एक या उत्सवाचे वैशिष्ठ्य. भजन सोहळ्याची सांगता भैरवीने होते. हा परमोच्च क्षण असतो. यावेळी उपस्थित भाविकांचे अश्रूंनी डोळे भरून येतात. सकाळी ८.३० वा. रासस्तंभावरून रासचक्र हळूवारपणे खाली उतरविले जाते. त्यानंतर रासचक्र महोत्सवाची सांगता होते. यादिवशी मुल्हेरमध्ये मोठी यात्रा भरते. या उत्सवाला महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक कोजागिरीच्या रात्री उपस्थित असतात. त्यामुळे मुल्हेरला यात्रेचे स्वरूप येते.
या उत्सवात नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठीही गर्दी असते. त्यात अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलणारे अधिक असतात. नवस हा श्रद्धेचा भाग असला तरी हा रासक्रीडा उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक सोहळा आहे यात शंका नाही.
Friday, 18 October 2024
मुल्हेरचा रासोत्सव
Saturday, 5 October 2024
श्री देवी सप्तश्रुंग स्तोत्र
श्रीगणेशाय नमः || श्री सरस्वत्ये नमः || श्री गुरुभ्यो नमः || श्री दुर्गादेव्ये नमः ||
ॐ नमो श्री सप्तशृंगी निवासिनी | नमो सह्याद्रीशिखर रूपिनी |
नमो त्रिगुणरूप विश्वमोहिनी | जगजननी तुज नमो ||१||
नमो महिषासुरमर्दिनी | नमो सुरवरबंधमोचनी |
नमो भक्त मनोल्हासिनी दैत्यकुलदाहिनी तुजनमो ||२||
नमो मुळमाया भगवती | तुझीया नामे भक्त गर्जती |
सगुणरूप नटली पर्वती | पहाता तटस्थ सूरनर ||३||
कष्टे लंघुनी गिरीवर | जवळ करिता तुझे द्वार |
शिन भाग उतरे पार |नवल अदभूत हेची पै ||४||
सुंदर ध्यान मृत्युलोकी | भक्तलिन सदविवेकी |
साष्टांग नमोनी नयन झाकी | हृदय मंदिरी रूप तुझे ||५||
सर्व सुरांचे तेज एकवटले | अष्टादश भूजारूप नटले |
दानव अंगी भय सुटले | उर्वीवरी प्रगटता ||६||
सर्व देवांची एकशक्ती | प्रेमभावे करावी भक्ती |
ओळंगती चारी मुक्ती |निश्चय चित्ती असावा ||७||
औट पिठे भारता माझारी | अर्धपिठ सप्तश्रुंगगिरी |
दुर्गा हीच आष्टादशकरी | पावली निर्वाण भक्तासी ||८||
विप्रकुळांची कुलस्वामिनी | रेणुकामाता पुर निवासिनी |
क्षत्रियकुल वरदायिनी | तुळजापूर तुकाई ||९||
तृतीय वर्ण वैश्याची आई | करविर निवासिनी रमाबाई |१०||
ध्यान धावते पर्वत कंदरी | क्रोधावली असुरावरी |
नानापरी आयुधेकारी | रणांगणी उभी जैसी ||११||
कधी सौम्यरूप दिसे | कधी नयना उग्रता भासे |
भक्तजना लाविले पिसे | संचारोनी नाचवी थै थै ||१२||
सन्मुख पार्वती मार्कंडेय मुनी | वाडे सप्तसतीचा मधुर ध्वनी |
परिसे जगदंबा लक्ष लावोनी | हस्त कर्णासी लाविला ||१३||
घोडंब निवासीनि धृवबाला | स्तवनार्थी उभी पूर्वेला |
पाठीशी परशुरामबाला | निसर्ग रचना सुंदर ||१४||
गणेशतीर्थी लंबोदर | यमुनातांबुल तीर्थ मनोहर |
शिवालय तीर्थी सिद्धेश्वर | स्नाने पतिता उद्धरी ||१५||
पिंडश्राद्ध पितृतर्पण | करिता पूर्वजा उद्धरण |
मनिद्विपी स्वानंदे करून | समिपता मुक्ती भोगिती ||१६||
नवदुर्गा पर्वत शिखरी | शस्त्रे सज्ज घेवुनिया करी |
गुप्तउभ्यारण सुंदरी | ध्वजरक्षणी सावध ||१७||
सप्तमातृका विक्राळरूप | करी पाजाळुनी पोत दीप |
स्वेच्छे खेळती समीप | रक्षणी सप्तश्रुंगाचे ||१८||
वेताळादि चंडीका भैरव | शाखिनी डाकिनी बिरुदेव |
सांभाळी ती स्वयमेव | अंबिका राजदरबार ||१९||
अदभूत चमत्कार अनेक | वर्णिता वाटेल कौतुक |
सर्वस्वी नटली रूप एक | भगवती अंबिका समर्थ ||२०||
राम असता बळ ब्रम्हचारी | तीर्थे फिरलासे उर्वीवरी |
तव सप्तश्रुंगासी रावणारी | दर्शनास्तव पातले ||२१||
रघुनाथ वनवासी असता | पंचवटी ये निवास करिता |
सांगे घेउनी जनकदुहिता | मातेच्या दर्शनी येतसे ||२२||
अद्यापि सिंदूर चर्चुनी | जगदंबे सन्मुख बैसोनी |
भक्तजना प्रथम दर्शनी | सगुणरूप नटला असे ||२३||
ऐसी माय माझी अनादी | सदभक्ता उतरावी भवाद्धी |
योगिया ब्रम्हानंदपदी | स्वानंदे बैसवी अक्षय ||२४||
सप्तश्रुंगरूपे सप्तशती | शुद्ध वैखरी उच्चारिती |
तयासीच उत्तमगती | तवकृपे लाभतसे ||२५||
ऐसी जगन्माता श्रीमंतीण | भक्ता का करिसी हैराण |
अन्न उदाक्स्तव दिनदिन | हिंडवीसी दारोदारी ||२६||
भक्ता कसोटी लाविसी | खरे खोटे निवडिसी |
सदभक्ता अपंगीसी | अंती दाविसी ब्रम्हरूप ||२७||
तुझे गाता गुणगान | राधासुत झाला लीन |
जळी स्थळी तुझे ध्यान | अहोरात्र ध्यातसे ||२८||
कधी दाविसी चितस्वरूप | भक्ती करिता जपतप |
अंतरीचा ध्यान दिप | अखंड जळतो तवकृपे ||२९||
आता नको हो अंत पाहू | करपल्लवे किती तुज पाहू |
यातना कुठवरी साहू | विश्वमोहिनी दयाळे ||३०||
जीवसृष्टीची जीवन कळा | चिदानंदरुपी चितकळा |
त्रिभुवन सुंदरी वेल्हाळ | भोळा खुळा भाव माझा ||३१|
माया ब्रंम्हात मानिती भेद | निवडीता तटस्थ झाले वेद |
ज्ञानवंत पी घालिती वाद | खेद बहु वाटतसे ||३२||
अंबे तूच रामकृष्ण हरी | राधा रुक्मिणी जनककुमारी |
माया ब्रंम्हाचा खेळ दशअवतारी | आभेदत्व नसेची ||३३||
देहासवे फिरे छाया | तैसी व्यापली श्रीहरीची माया |
ब्रम्ह स्वरूपी ओळख द्याया | जगदंबिका समर्थ ||३४||
पित्याची ओळखी माताच सांगे | बाप म्हणविता वर पांगे |
दूषण येईल निजांगे | समाधान मायकरी ||३५||
सगुणसृष्टी सगुणदेव | भावे मानिले स्वयमेव ।
भेदाभेद पहाती जीव | सोहं शिवा विसरले ||३६||
माजेल वादाचा पाल्हाळ | दुर्गा भगवती गुण वेल्हाळ |
आमंगळासी करिले मंगळ | कृपामृत दृष्टीने ||३७||
तुझे रूप ध्यानी मनी | शिरी मुकुट पंचफणी |
केस मोकळे सोडोनी | मान झुकविली उत्तरे ||३८||
कुंकुम लाविले स्वस्तीक | हरिंद्रा गुलाल बुक्का टिक |
वक्र भुवया सुरेख | धनुष्या कृती शोभती ||३९||
शंकरे चंद्रमा धरिला जटेत तोची | तुझिया मुकुटात |
दैत्यावरील क्रोध बहुत | शितल होण्या धरीला असे ||४०||
किंचित मुरडीले नाशिक | नथनी सर्जाची सुरेख |
गालावरी लावली टीक | दृष्ट सगुनीला होईल ||४१||
कर्णफुले शोभती छान | तांबुल विडामुखी धरून |
अलंकार गळा भरून | नाभिपर्यंत लोळतसे ||४२||
पुतळ्याची हौस भारी | ताईत पेट्या डोरले शिनगरी |
कंठा बोरमाळ गळसरी | महाराणी शोभतसे ||४३||
रंगारंगाच्या पैठण्या फार | नारळी जरतारी बुट्टेदार |
छातीवरी उभा पदर | गुर्जरनि माय माझी ||४४||
पायघोळ दिसे छान | शिंदेशाही तोडर घालोन |
सच्य चरण उचलोन | वाम पुढे टाकिला ||४५||
कमंडलुरुद्राक्ष माला | वामसव्य दोन्ही कराला |
सव्य हास्ती परशु धरीला | वाम लाविला मुकुटासी ||४६||
आणिक हस्त चतुर्दश | शस्त्रे धरिले बहुवश |
दृष्टदानव दंडनास | वर्णिता विस्तार वाढेल ||४७||
आश्विन शुद्ध कोजागिरी | श्रुंगार पुजा षोडशोपचारी |
महापूजा रात्रभरी | नामगजरी कल्लोळ ||४८||
कोजागिरीचे चंद्रामृत | रम्य वनश्री डोलत |
वैकुंठ कैलास भासत | भाविक भक्ता स्वानंद ||४९||
वनस्पती सिद्ध सोज्वळ | धरूजाता होतसे ज्वाळ |
संधीनी संजीवानी कोमल मृतजीवा उठविती ||५०||
गळसरीची प्रदक्षिणा | सोपी आते बहुजना |
आखतिर्थी प्रदक्षिणा | आष्टतिर्थ दर्शन ||५१||
सूर्यतीर्थ कालिका तिर्थ | गंगा लक्ष्मी सरस्वती तिर्थ |
तांबुल यमुना शितला तिर्थ | स्नाने पापे नासती ||५२||
तिसरी महा प्रदक्षिणा | सुरथराजा वैश्यस्थाना |
वणी मार्कंडेया सहजाना | गणती तिन योजने ||५३||
कृतयुगी ब्रम्हा सांगे नारदा | सिद्धीदायक भक्त वरदा |
कालिका लक्ष्मी शारदा | जगदंबीका हिच पै ||५४||
ममकमंडलु पासून निघाली | गिरीजा तीच गीरणा नाम पावली |
महानदित मुख्य जहाली | पर्वता सन्नीध वहातसे ||५५||
ऐसा या अर्धपीठाचा महिमा | नित्य जपावे बत्तीस नामा |
दुर्गभीमा दुर्गाभामा | दुर्गमात्मस्वरूपिणी ||५६||
दुर्गा दुर्गा र्तीशमनी | दुर्गमा दुर्गपद्वी निवारीनी |
दुर्गमच्छेदिनी | दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी | दुर्गभ्या ||५७||
दुर्गतोध्वारिनी दुर्गनिहंत्री | दुर्गमापहा दुर्गमासुर सहंत्री |
कलीयुगी नाममंत्री | उद्धरतिल मानव ||५८||
दुर्गमज्ञानदा दुर्गमार्ग स्वरुपिनी | दुर्गभा दुर्गमायुधधारिणी |
दुर्गमालोका दुर्गमार्थ स्वरुपिनी | दुर्गदैत्य लोक दवानला ||५९||
दुर्गमार्गप्रदा दुर्गमाश्रीता | दुर्गमविद्या दुर्गमता |
दुर्गमांगी आंबामाता | दुर्गमज्ञान संस्थाना ||६०||
दुर्गभ्या दुर्गमेश्वरी दुर्गभात्रिभुवना माझारी |
नाम पठणे संकटे निवारी | दुर्गदारिणी भगवती ||६१||
नामस्मरणी ठेवुन विश्वास | त्रिकाल जपावे बत्तीस नामास |
निर्विघ्न करील भक्तास | सप्तश्रुंगी निवासिनी ||६२||
भक्तिसाधन नामची श्रेष्ठ | नचसाधती जपतपाचे कष्ट |
नाम महिमा वरिष्ठ | कलीयुगा माझारी ||६३||
तनमन धनेची शरण | धरावे आंबेची चरण |
त्रिविध ताप दारूण | निवारील निश्चये ||६४||
निष्काम करिता भक्ती | आंगीबाने चैतन्य शक्ती |
चौ पुरुषार्थ चारीमुक्ती | वोळंगती सर्वस्वे ||६५||
अमृत मोहिनी निवासी | महालयाच्या पंचक्रोसि |
एक योजने दक्षिणेसी | जन्मभूमी कारेगाव ||६६||
प्रतिष्ठान निवासी एकनाथ | मासिक वारी पिता करीत |
नाथ कृपेने जन्म होत | देहनाम निवृत्ती ||६७||
माता माझी राधाबाई | मुखी नाम आंबाबाई |
बालपणी मंत्र देई | तोची लोलो लागला ||६८||
सप्तश्रुंग दुर्गामाई | तुझी लीला तुची वदवी |
भरून उरली सर्वाठाई | मी तव अज्ञान बालक ||६९||
श्रोतया विनवी भक्तकवी | चुकी भुली पदरात घ्यावी |
बहुश्रुत अनुभवी | नमन माझे साष्टांग ||७०||
इतिश्री पद्म पुराणांतरगत | वर्णिली सह्याद्री खंडात |
मार्कंडेय सप्तशतीत | सविस्तर कथियेले ||७१||
तया आधारे वर्णन केले | भक्ती भावे श्रुंगारीले |
श्रीजगदंबे चरणी वाहिले | भक्ता मुखी वदवावे ||७२||
|| श्रीजगदंबार्पणमस्तु ||
Tuesday, 27 August 2024
ळ' अक्षराचा घडलेला किस्सा...
ळ' अक्षराचा घडलेला किस्सा...
घन निळा लडिवाळा
गोपाळ काला व दही हंडी उत्सव
दहीहंडी हा सण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला हा दहीहंडीचा सण साजरा केला जातो. देशभरात दरवर्षी दहीहंडी सण मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रासह गुजरात, गोव्यात या सणाचा थाटमाट मोठा असतो.गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने गोकुळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील आठवणींना उजाळा देणारा सण आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, खोडकर बालकृष्णाला दही. दूध आणि लोणी (माखन) खूप आवडायचे. त्या काळी गोकुळात दूध, दही, लोणी साठवून ठेवले जात होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारच्या घरांतून दही आणि लोणी चोरण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यावेळी गोकुळातील महिलांनी भगवान कृष्णांच्या मित्र-सवंगड्यांच्या हाती दही-लोणी लागू नये म्हणून दही आणि लोण्याची मडकी छताला टांगायला सुरुवात केली. यावेळी कृष्ण मित्र-सवंगड्यांसह मानवी मनोरा बनवून मडकी फोडायचे आणि दही खाण्याचा आनंद घ्यायचे. असा खोडसाळपणा कृष्ण व त्याचे सवंगडी करीत असले तरीही गोकुळातील रहिवासी आनंदी होते. दहीहंडी उत्सव बालगोपाळांच्या बालपणापासूनच्या या खेळकर गमतीजमतींची आठवण करून देतो.
कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.
Friday, 9 August 2024
नागपंचमी
ॐ भुजंगेशाय विद्महे,
सर्पराजाय धीमहि,
तन्नो नाग:प्रचोदयात्।।
श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी. निसर्ग साखळीत नाग हा महत्त्वाचा प्राणी आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक सांगड घालत घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा केली जाते.
पौराणिक काळापासून हिंदू धर्मात नागाला देवता मानले गेले आहे. भगवान शिवाच्या गळ्यात नाग असतो तर विष्णू शेषशायी म्हणजे शेष नागाच्या वेटोळ्यावर विश्रांती घेतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. नाग/सर्प हा शेतकऱ्याचा मित्र ही मानला जातो कारण तो अनेक उपद्रवी प्राण्यांपासून शेताचे/पिकांचे रक्षण करतो. साधना मार्गात कुंडलिनीला ही सर्पाची उपमा दिली आहे त्यामुळे नाग हा कुंडलिनी शक्तीचेही द्योतक मानला जातो. भगवान श्रीकृष्णा ने आजच्याच दिवशी यामुनेतील कालिया नागाला स्वतःच्या वशीभूत केले होते. अश्या अनेक कारणांमुळे आजच्या दिवशी सर्प पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते. सर्प सहसा विनाकारण कोणालाही दंश करत नाही, शेतकरी वर्ग सापाचे आभार मानण्यासाठी व सर्पदंश न व्हावा या हेतूने आजच्या दिवशी भगवान शिव व विष्णू ला प्रिय असलेल्या नागाचे मनोभावे पूजन करतात. महिलांनी त्याला भाऊ समजून पूजल्यास भावा बहिणींचे आयुष्य वाढते. नागाचे मनोभावे पूजन केल्यास हाती घेतलेल्या सर्व कार्यास गती प्राप्त होते व कार्य पूर्णत्वास जाते अशी मान्यता आहे. प्राचीन काळी नागपंचमीच्या दिवशी कुस्त्या आणि नृत्य -नाट्य होत.
काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तर काही ठिकाणी पाटावर चंदनाने/ तांदळाचे ९ नाग काढून तर काही ठिकाणी जीवतीच्या कागदावर असलेल्या कालिया नागाची पूजा केली जाते. नागाची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहतात. तसेच नाग प्रतिमेला फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी वाहतात. नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया, पिंगल या सर्पयोनीतील नागदेवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे . तसेच या दिवशी हे नागस्तोत्रदेखील म्हटले जाते.
अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।।
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, उकडलेले पदार्थ करावेत, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये, भूमी उकरू नये असा दंडक आहे. पूर्वी नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आणि मुली संध्याकाळी गावाबाहेर नागाच्या वारुळावर अथवा देवळात जात असत. दूध लाह्या वाहून नागांची पूजा केल्यानंतर झिम्मा फुगड्या इत्यादी खेळ आणि झाडांना झोपाळे बांधून त्यांवर झोके घेणं, फेर धरून गाणी म्हणणं हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. ही गाणी गद्यप्राय होती त्यांत बाळाई, भारजा, जैता, बहुला गाय इत्यादींच्या कथा गुंफलेल्या असत. क्वचित त्यात सासर- माहेरचा जाच किंवा कौतुकही शब्दबद्ध झालेले असायचे.
नागपंचमीच्या सणाला संपूर्ण भारतात आगळे महत्त्व आहे. महाराष्ट्र, गुजरात, काठियावाड इत्यादी भागांमध्ये नाग ही कुलसंरक्षक देवता मानली जाते. महाराष्ट्रात घरोघरी मातीचे नाग करून पूजा केली जाते. गुजरातेत नागमूर्तीपुढे तुपाचा दिवा लावतात आणि मूर्तीवर जलाभिषेक करतात. वऱ्हाडात मुंग्यांच्या वारुळाजवळ नागमूर्ती ठेवून तिची पूजा करतात. महाराष्ट्रात बत्तीस शिराळ्याला नागपूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते. वसईतील शेषवंशी समाजात आणि पालघर जिल्ह्यातील वनवासी क्षेत्रात पूर्वापार नागपूजा मनोभावे केली जाते.
उत्तरप्रदेशात मथुरा, वाराणसी, अहिच्छत्र या ठिकाणी नागपूजेची मोठी केंद्र आहेत. उत्तरप्रदेशात नागपंचमीच्या दिवशी घरातील पुरुष दुधाची भांडी घेऊन गावाबाहेर अथवा जंगलात जातात आणि नागांच्या वारुळात ती दुधपात्रे रितीकरून येतात. काशीत या दिवशी सकाळी नागलो भाई नागलो, छोटे गुरु का, बडे गुरु का, नागलो भाई नागलो असे ओरडत शाळकरी मुलांच्या मिरवणुकाच निघतात. संध्याकाळी नागकुंवा नामक जलाशयावर असलेल्या नागमूर्तीचे पूजन होते. जमलेले लोक नागकुव्याचे पाणी नागतीर्थ म्हणून प्राशन करतात. व्याकरणकार पतंजली हा शेषावतार होता. मरणोत्तर त्याने या विहिरीत वास्तव्य केले असे सांगितले जाते.
आज काश्मीरमधली परिस्थिती बिकट असली तरी या भागात पारंपरिकरित्या सर्पपूजा अस्तित्त्वात असल्याचे पुरावे मिळतात. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सर्पाकृती कोरलेल्या आढळतात.बंगाल आणि छोटा नागपूर या भागात या दिवशी सर्पराज्ञी मनसादेवीची पूजा करतात. तिची पूजा केली नाही, तर कुटुंबातील व्यक्ती सर्पदंशाने मरते अशी समजूत आहे. बिहारात हिनवर्ण स्त्रिया स्वतःला नागपत्नी समजून नागाची गीते गातात. ओडिसातले लोक अनंतदेव या नावाने नागपूजा करतात. आसाम मध्ये उथेलन नावाचा एक प्रचंड सर्प असल्याचे मानले जाते. तो नरबळी दिल्याशिवाय तृप्त होत नाही अशी तिथल्या आदिवासींची धारणा आहे. त्रिवांकुर, छत्तीसगड, विलासपूर याठिकाणी नागांची देवळेच आहेत.
दक्षिण भारतात अनेक समाजांमध्ये विवाहित स्त्रिया लग्नसमारंभात सर्पाची पूजा करतात. कर्नाटकात नागांच्या नैवेद्याला गूळ-पापडीचे लाडू करतात, त्यांना तंबीट म्हणतात. केरळमध्ये नायर आणि नंपूतिरी यांच्या घराभोवतीच्या परिसरात वायव्येच्या कोपऱ्यात सर्पकावू नावाचे एक ठिकाण असते. तिथे नागप्रतिमा ठेवून तिच्या भोवती झाडेझुडुपे वाढवतात. वर्षातून एकदा त्या नागदेवतेची मोठी पूजा करतात.
भारतात काही ठिकाणी नागांचे अवतार मानलेल्या वीर पुरुषांचीही पूजा केली जाते. पंजाबमधील गुगा, होशंगाबादमधील राजवा आणि सोरळ मध्य परदेशातील करूवा आणि राजस्थानमधील तेजाजी हे ते वीरपुरुष होत. राजस्थानात पीपा, तेजा इत्यादी पौराणिक नागराजाची पूजा प्रचलित आहे. पंजाबमध्ये सफीदोन या नावाचे एक ठिकाण आहे. ते पंजाबातल्या सर्पपूजेचे केंद्र आहे. जनमेजयाने जे सर्पसत्र केले ते याच ठिकाणी अशी मान्यता आहे.
#नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
Tuesday, 16 July 2024
असा आहे विठोबा (विठ्ठल)
विठोबा : महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारकऱ्यांचे-ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशांनाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहेह्या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात पण ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते, असे दिसते. ‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे, असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे. श्रीज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या ‘दिगंबर’ आणि ‘तमालनील’ अशा विठाबोचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबांची स्तुती केली आहे.
विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ (दूर रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असे म्हटले आहे. ह्या व्युत्पत्यनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते ‘विष्णु’ ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले. शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णुचे ‘विट्टु’ असे रूप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रूपालाच प्रेमाने ‘ल’ हा प्रत्यय लावला, की ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह् णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्विकारणारा, तो विठ्ठल’ अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील ‘विठ्ठल’ ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्विक अर्थ प्राप्त करून देण्यात आलेला आ हे. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’ ‘म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल’, अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे. इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’असा असल्याते प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.
विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठावीसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असे घेता येईल.
विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात (विठ्ठल कानडे बोलू जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ।।). ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेलेआहेत. ‘कर्नाटकु’ ह्या शब्दाचा कर्नाटक ह्या प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकु’ म्हणजे ‘करनाटकु’ वा ‘लीलालाधव दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत, ह्या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
विठोबाचे पंढरपुरातील प्रकटन: पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला ह्याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलीक ह्या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढपुरी आला. ‘आईवडिलांची सेवा करतो आहे ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांब’असे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ता मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलीक ओळखला जातो. पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे.
पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा सांगण्यात आल्या आहेत: (१) डिंडिरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा ह्या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो. (२) कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपुर हे एक वाडीवजा गाव आहे, तिथे गोपाकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर बारीची सांगता होते. दिंडीरवनात लखूबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तीरूप आहे. कृष्णावर रूसून दिंडीरवनात आलेली रूक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. (३) पद्मा नावाच्या एका सुंदर तरूण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तो तिच्या समोर प्रकट झाला. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती ह्या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. ह्या कथांपैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रूक्मिणीची कथा पाद्म पांडुरंगमहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कांद आणि पद्म अशा दोन्ही पांडुरंगमहात्म्यात आलेली आहे. ही पांडुरंगमाहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्त्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत.
विठोबाची स्थापना व पूजन पंढरपूर येथे कधी सुरू झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि होयसळ राजा विष्णुवर्धन किंवाबिट्टिदेव किंवा बिट्टिग (बारावे शतक) ह्याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे. स्वतःच्या नावापासून तयार झालेले ‘विठ्ठल’ हे नाव त्याने आपल्या उपास्य देवतेला दिले असावे, असेही ग. ह. खरे ह्यांना वाटते.
विठोबाची मूर्ती: पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास ‘काठी’ असे म्हणतात. कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा ‘दिगंबर’ म्हटले आहे. तथापि-काहींच्या म्हणण्यानुसार-विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच ‘वीट’ म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, त्या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. खऱ्यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.
उपर्युक्त वर्णन हे पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात आज दिसत असलेल्या विठोबाच्या मूर्तीचे आणि ग.ह. खरे यांनी केलेले आहे. तथापि पंढरपूरचे मंदिर श्रीज्ञानदेवांच्याही पूर्वीचे असून तेथे जी मूळ वा आद्य मूर्ती होती, ती ही नसावी, असे मत व्यक्त केले जाते. १६५९ साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीसारखे जेव्हा येत, तेव्हा सुरक्षित ठेण्यासाठी म्हणून विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलविण्यात येई, असे दिसते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेविली होती आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात. विजयनगरचा राजा कृष्णराय वा ⇨कृष्णदेवराय (कार. १५०९-१५२९) हयास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांचा विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेला खुद्द एकनाथांनी भानुदासांच्या दिलेल्या माहितीत आधार सापडत नाही परंतु पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठोबाच्या मूर्तीचे ‘विजयविठ्ठल’ असे नाव आहे. ही मूर्ती विजयानगर साम्राज्याच्या काळातील दक्षिणी विठ्ठलमूर्तीसारखीच दिसते परंतु ती आकाराने लहान वाटते. भानुदासांच्या आख्यायिकेचा पक्का निर्णय करण्यासारखी साधने उपलब्ध नसली, तरी पंढरपूरच्या मंदिरातील विठोबाची मूर्ती वेळोवेळी हालविली जात होती व ह्या हालवाहालवीतच मूळ मूर्ती केव्हा तरी बदलली गेली असेल किंवा काय, असा प्रश्न निर्माण होतो.
ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी ह्या आद्य विठ्ठलमूर्तीची विश्वासार्ह वर्णने कोठे मिळत असल्यास पाहिली पाहिजेत आणि तशी ती मिळतात, असे ह्या विषयाचा अलीकडच्या काळात विशेष आणि सखोल अभ्यास केलेले संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे : विठोबाचे पंढरपूरचे माहात्म्य सांगणारे तीन संस्कृत ग्रंथ (पांडुरंगमाहात्म्ये) आज उपलब्ध आहेत. त्यांतील स्कांद पांडुरंगमहात्म्य आणि पाद्म पांडुरंगमहात्म्य अनुक्रमे स्कंद व पद्म पुराणांतर्गत असल्याचा दावा करणारी आहेत. ह्या दोन पांडुरंगमाहात्म्यांचा निर्देश वर आलेलाच आहे. (तिसरे पांडुरंगमाहात्म्य हे विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणारे असून त्याची एकुलती एक उपलब्ध प्रत डॉ. ढेरे ह्यांच्या संग्रही आहे). ह्या सर्व पांडुरंगमाहात्म्यांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे सर्वां त प्राचीन-म्हणजे निवृत्ती-ज्ञानदेवांच्याही पूर्वीचे आणि अगदी काटेकोरपणे सांगावयाचे झाल्यास रामदेवराय यादवाचा कारणाधिप हेमाद्री (तेरावे शतक, उत्तरार्ध) ह्याच्याही पूर्वीचे-आहे. ह्या स्कांद पांडुरंगमाहात्म्यास पंढरपूर आणि श्रीविठ्ठलाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पाद्म पांडुरंगमाहात्म्याची रचना सोळाव्या शतकात आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणाऱ्या उपर्युक्त पांडुरंगमाहात्म्याचीही रचना त्याच सुमारास झाली असावी.
उपर्युक्त स्कांद पांडुरंगमाहात्म्यात पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील मूर्तीची जी अनन्यसाधारण लक्षणे सांगितली आहेत, त्यांतले एक म्हणजे त्या विठ्ठमूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरे आहेत. श्रीविठ्ठलाचाच मंत्र तेथे कोरलेला आहे. तेथे विठोबाला ‘महामंत्रयुतः’ हे विशेषण लावलेले आहे. त्याचप्रमाणे ‘देवाच्या हृदयावर मंत्राक्षरे पाहावयास मिळतात’ अशा आशयाचे स्पष्ट विधानही तेथे आहे. (मंत्राक्षराणि ….दृश्यन्ते तस्य वक्षसि). पाद्म पांडुरंगमाहात्म्यातही ‘श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला षडक्षराम्’। असा षडक्षर मंत्राचा निर्देश आहे. विठ्ठलसहस्त्रनामस्तोत्रात विठोबाला ‘षडक्षरमय’ म्हटले आहे. विठ्ठलाष्टोत्तरशतनामस्त्रोत्रात ‘मंत्राक्षरावलीहृत्स्थः ’ असे त्याचे वर्णन केलेले आहे. श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणजेच प्रसिद्ध आख्यान कवी ⇨श्रीधर (१६५८-१७२९) ह्यांनी पंढरीमाहात्म्य ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या एका मराठी पांडुरंगमहात्म्यात (एकूण अध्याय दहा) विठ्ठलाच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा कितीतरी वेळा निर्देश केलेला आढळतो. श्रीधर हे पंढरपूरजवळच्याच नाझरे गावचे. पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातील होती. ती मूर्ती प्रत्यक्ष पाहून त्यांनी ह्या षडक्षर मंत्राचा निर्देश केला असणे शक्य वाटते. संत सावता माळी ह्यांनी विठ्ठलमूर्तीचे वर्णन करताना आपल्या एका अभंगात ‘विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्ध’।। असे शब्द वापरले आहेत. अशी मंत्रसिद्ध मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठलमंदिरात नाही. ती माहादाजी निंबाळकर ह्यांनी माढे येथे बांधलेल्या विठ्ठलमंदिरात आहे. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती माढे येथे नेऊन ठेवली होती व ते संकट टळल्यावर ती पुन्हा पंढरपूरला आणण्यात आली. त्या संकटाच्या स्मृतिप्रीत्यर्थ माढे येथे जे विठ्ठलमंदिर बांधण्यात आले असे राजवाडे म्हणतात, तेच हे मंदिर. ह्या मंदिरात पंढरपूर येथील आद्य मूर्तीचीतंतोतंत प्रतिकृती माढेकरांनी स्थापन केली असली पाहिजे, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीच्या नित्य सहवसात असलेले काशीनाथ उपाध्याय उर्फ बाबा पाध्ये ह्यांनी रचिलेल्या विठ्ठलध्यानमानसपूजा ह्या स्तोत्रात त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे जे तपशीलवार वर्णन केलेले आहे, त्यात मूर्तीच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबा पाध्ये हे १८०५ मध्ये निधन पावले हे पाहता, पंढरपूरची आद्य विठ्ठलमूर्ती पंढरपूर येथे १८०५ पर्यंत तरी होती, असे ढेरे ह्यांना वाटते.
माढे येथील ही मूर्ती पूर्ण दिगंबर आहे. तिच्या मस्तकावर कंगोरा असलेली, गवळ्याच्या टोपीसारखी टोपी आहे. कानांत शंखाकार कुंडले आहेत. ती मूर्तीच्या खांद्यांवर टेकलेली आहेत. मूर्तीने धारण केलेल्या दोन माळांपैकी एक गळ्याशी आणि दुसरी हृदयावर लोंबणारी आहे. ह्या माळेत कौस्तुभमणी आहे. ह्या दोन्ही माळांनी साधलेल्या त्रिकोणात तो मंत्र आहे. मंत्राच्या अखेरीस ‘श्रीवत्स’ असा शब्द आहे. कमरेला श्रुद्रघंटिका असलेला पट्टा आहे. डाव्या हातात शंख असून उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकलेला आहे. ह्या हाताच्या बोटात कमलकळी आहे. दोन्ही हात कमरेवर आहेत. दंडांत भुजबंध व मनगटांवर कडी आहेत. ह्या मूर्तीच्या भाळावर तिसरा नेत्र आहे, हे खास वैशिष्ट्य. मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोऱ्या कपाळावरून मागे, दोन्ही बाजूंना गेल्या आहेत. डाव्या बाजूची दोरी मात्र खाली आलेली दिसत नाही. पंढरपूरप्रमाणेच माढे येथील मंदिरातही विठ्ठल हा एकटा आहे. त्याच्या समवेत रखुमाई नाही.
भाळावर तिसरा नेत्र आणि दिगंबरत्व अशी मूळ मूर्तीची अन्य दोन अनन्यसाधारण लक्षणे स्कांद पांडुरंगमाहात्म्यात सांगितलेली असून ती माढे येथील मूर्तीत स्पष्टपणे दिसून येतात. स्कांद पांडुरंग माहात्म्यातील वर्णन हे पुंडलिकासाठी पंढरपुरात आलेल्या श्रीकृष्णाच्या रूपाचे वर्णन करण्यासाठी आलेले आहे व ते माढे येथील मूर्ती दृष्टीसमोर ठेवून केल्यासारखे वाटावे, इतके साम्य त्या वर्णनात आणि माढे येथील विठ्ठलमूर्तीत आहे, असे, डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.
पांडुरंगमाहात्म्यांनी असे सांगितले आहे, की पंढरपुरात विठोबाची तीन रूपे आहेत : एक, प्रत्यक्ष मंदिरातले दुसरे, संपूर्ण पंढरपुराला व्यापून राहिलेले आणि तिसरे, चंद्रभागेच्या प्रवाहाच्या रूपाने अस्तित्वात असलेले. कवी श्रीधरांनी दहा अध्यायांचे पंढरीमाहात्म्य किंवा पांडुरंगमाहात्म्य जसे रचले आहे, तसेच बत्तीस अध्यायांचे दुसरे एक पांडुरंगमाहात्म्य (हा छोट्या पांडुरंगनाहात्म्याचाच विस्तार) लिहिले आहे. त्यात विठोबाच्या उपर्युक्त तीन रूपांखेरीज त्याच्या तीन मूर्तीचाही निर्देश आहे: एक, मुख्य स्थानावरील मूर्ती दुसरी, लक्ष्मीपुढची (म्हणजेच लखूबाईपुढची) आणि तिसरी, पुंडलिकासमोरची. लखुबाई आणि पुंडलिक ह्यांच्या समोर आज विठ्ठलमूर्ती दिसत नाही. मुख्य मूर्तीबद्दल श्रीधरांनी लिहिले आहे :‘मुख्य जे पांडुरंगस्थान । तेथे न करावे आरोहण।’ ‘आरोहण’ ह्या शब्दातून उंच ठिकाणावर चढून जाण्याची कल्पना सूचित होते. तेथे आरोहण केल्यास दारूण परिणाम होतील, असाही धाक श्रीधरकांच्या ओवीतून दाखविलेला आहे. त्यामुळे अगदी आरंभी ही मूर्ती नुसतीच एखाद्या उंचवट्यावर, मंदिर नसलेल्या अवस्थेत होती किंवा काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.
ग. ह. खरे ह्यांच्या मते पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्ती प्राचीन किंवा मध्ययुगीनही म्हणता येणार नाही, परंतु आधुनिक म्हणजे शेसवाशे वर्षातील ती आहे असेही म्हणवत नाही.
विठोबाच्या अन्य काही मूर्ती: अहोबलम् (आंध्र प्रदेश) येथे असलेली विठ्ठलमूर्ती कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभी आहे. हिच्या हातांत आणि कमलनाल आहेत. मस्तकावर उंच, टोपीवजा नक्षीदार मुकुट आहे. ही मूर्ती पंढरपूर येथे असलेल्या विठ्ठलमूर्तीपेक्षा खूपच जुनी असल्याचे ग. ह. खरे ह्यांचे मत आहे.
मुंबईतील जोगेश्वरी गुहेत आढळणारी एक भग्न मूर्ती विठ्ठलाची असावी, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे. ह्या मूर्तीचे मस्तक, हात आणि गुडघ्यापासूनचा खालचा भाग नाहीसा झाला आहे, परंतु गळ्यात मोत्यांचा कंठा आणि कमरेस मेखला दिसते. मूर्तीचे धोतर गुडघ्यापर्यंत आलेले आहे. डाव्या मांडीवर धोतराच्या सुरकुत्या दिसतात, तसेच मेखलेचा लोंबता पदरही दिसतो. पोकळीत बोटे घातलेला शंखही आहे. मेखलेचे एक टोक उजव्या मांडीवर आहे. गळ्यातल्या कंठ्याच्या फिती पाठीवर दिसतात. छातीच्या उजव्या भागावर लांब व कुरळ्या केसांची एक बट दिसते. ही मूर्ती आठव्या शतकाच्या उत्तरार्धातली असावी, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे.
मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियममध्ये घारापुरीच्या लेण्यांतून आणलेली एक उभी मूर्तीही विठ्ठलाची असण्याची शक्यता वाटते. ही मूर्तीही भग्नावस्थेत आहे. हिच्या कमरेच्या वरचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. कमरेस वस्त्र, वर मेखला, डाव्या मांडीवर टेकलेला व पोकळीत डाव्या हाताची बोटे असलेला शंख हे सर्व स्पष्ट दिसते पण ह्या मूर्तीच्या उजव्या बाजूस एक उभी स्त्री व डाव्या बाजूस उभा, बुटका आणि लठ्ठ असा गण आहे. ही मूर्ती आठव्या शतकाच्या दुसऱ्या पावक्यातील असावी, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे.
कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्ळी येथे, तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्न केशवाच्या मंदिरात, वसरूल (जि. मंड्या) येथील मल्लिकार्जुनमंदिरात आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे विठ्ठलमूर्ती आहेत. बेल्लारी जिल्ह्यातील हंपी येथील विरूपाक्षमंदिरातही विठ्ठलमूर्ती आहे.
तमिळनाडूत श्रीरंगम् (जि. तिरुचिरापल्ली) येथील रंगनाथमंदिरात, तंजावर येथील विष्णुमंदिरात विठ्ठलमूर्ती असून ती श्रीदेवीभूदेवीसह आहे. हैदराबाद येथे एका खाजगी संग्रहात विठ्ठलाची एक सुबक मूर्ती.
अहमदनगर जिल्ह्यात आणि नेवाशाजवळ टाकळीभान म्हणून असलेल्या एका गावी एका मंदिरात चतुर्भुज विठ्ठल आढळतो. हे मंदिर यादवकालीन आहे, असे मत सुरेश जोशी ह्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. टाकळीभान येथील विठ्ठलमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीला मिशा कोरलेल्या आहेत, चांदीचे डोळे बसविले आहेत. मस्तकावर शाळुंकेसह शिवलिंग स्पष्टपणे कोरलेले आहे. येथे विठ्ठलाला चार हात आहेत. ह्या मूर्तीची शैली लोकशिल्पाची आहे. आज उपलब्ध असलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती पाहिल्या, तर त्या कधी दोन हात, तर कधी चार हात असलेल्या आहेत. काही विष्णूच्या रूपात आहेत, तर काही गोपाळकृष्णाच्या रूपात आहेत. मूर्तीच्या हाती कधी शंख-चक्र, तर कधी शंख-पद्म आहे. कधी शंख-वरदमुद्रा, तर कधी शंख अभयमुद्रा आहे. चौकोनी पादपीठावर वा विटेवर उभ्या असलेल्या मूर्ती आहेत पण कमलफुलात पाय घोट्यांच्या वरपर्यंत झाकलेली मूर्तीही आढळते. कमरेवर हात असणे हे मात्र सर्व मूर्तीना समान असे लक्षण आहे. कोणत्याही मूर्तिलक्षणग्रंथाचा विठ्ठल हा विषय झालेला नाही, मात्र दक्षिणेतील अनेक प्राचीन विठ्ठलमूर्ती ह्या स्कांद पांडुरंगमाहारम्यात वर्णन केलेल्या विठ्ठलमूर्तीशी बऱ्याच संवादी आहेत, असे डॉ. ढेरे ह्यांनी नमूद केले आहे.
विठ्ठलाची विकसनप्रक्रिया:
विठ्ठल हे एक वैष्णव दैवत मानले जाते. विठ्ठल हे उपास्य दैवत असलेला वारकरी संप्रदाय हा भागवत धर्मातच अंतर्भूत होतो, किंबहुना त्याला भागवत धर्म असेही म्हटले जाते. विठ्ठलाच्या भोवती वैदिकतेचे वलयही आहे.वारकरी संप्रदायाचे एक थोर प्रचारक कीर्तनकार शं. वा. ऊर्फ सोनोपंत दांडेकर म्हणतातः ‘हा पंथ पूर्ण वैदिक आहे किंबहुना सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी ही एक शाखा आहे, असे म्हटले तरी चालेल.’ या पंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. की याचे तत्त्वज्ञान वैदिक आहे.’ ‘‘या पंथास ‘भागवत धर्म’ ही म्हणतात कारण याचे उपास्य दैवत हे श्रीकृष्णाचे बालस्वरूप समजले जाते.’’ असे असले, तरी विठोबाचा निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आढळत नाही. विष्णुच्या सहस्त्रनामांतही विठ्ठलाचे नाव नाही. विष्णूचे जे चोवीस अवतार पुराणांनी सांगितले आहेत, त्यांतही विठोबा नाहीच. संत त्याचा निर्देश ‘चोविसावेगळा’ आणि ‘सहस्त्रांआगळा’ असा अनेकदा करतात, तेव्हा ते हीच वस्तुस्थिती सांगत असतात. तरीही अकराव्या-बाराव्या शतकापासून विठोबाला फार मोठी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. ही प्रतिष्ठा हा एक विकसनप्रक्रियेचा परिपाक असून विठोबाचे मूळ रूप कोणत्या तरी लोकदेवाचे असले पाहिजे, असे अनेक अभ्यासकांना दीर्घकाळ वाटत आले. त्या दिशेने काही संशोधनही झाले. ‘कटिवर कर’ हे विठ्ठल मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या मूर्ती महाराष्ट्रात-कर्नाटकांतील अनेक गावांत आढळतात. शिळांवर कोरलेल्या ह्या मूर्ती पूज्य वीरांच्या स्मृत्यार्थ घडविलेल्या असतात. त्यांना ⇨वीरगळ म्हणतात प्राप्त झालेला बीर कुअर नावाचा एक आहिर (आभीर) बिहारात होऊन गेला. आहिर त्याला कृष्ण समजू लागले. कर कटी ठेवलेल्या त्याच्या अनेक मूर्ती आहेत. इथल्या गवळी-धनगरांपैकी कुणीतरी असाच मृत्यू येऊन पूजनीय ठरला असावा आणि नंतर कृष्णरूप (विठ्ठलरूप) झाली असावा असे डॉ. जी. ए. दलरी, डॉ. म्यूंथर सोनथायमर, डॉ. शं.गो. तुळपुळे डॉ. माणिकराव धनपलावर ह्यांसारख्या विठ्ठलाभ्यासकांचे म्हणणे आहे. डॉ. दलरी ह्यांनी आपल्या मताची मांडणी करीत असतात बिहारातील बिहारमधील बीर कुअरांचे उदाहरण दिलेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटकांत आपल्या गाईगुरांचे रक्षण करताना मृत्यू पावलेल्या वीरांच्या स्मारकशिला (किंवा वीरगळ) बऱ्याच असून अशा शिळेला ‘बिट्टिग’ असे म्हणतात, आणि ह्या शब्दापासून ‘विठ्ठल’ हे नाव बनले असे त्यांचे प्रतिसादन आहे. स्मृतिशिलांच्या रूपाने आढळणारे हे वीरदेव विठोबाप्रमाणेच कमरेवर हात ठेवलेल्या रूपात आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकांच धनगरांचे म्हणून जे देव आहेत, त्यांत विठोबाचा समावेश आहे, हेही डॉ. दलरी सांगतात. महानुभाव संप्रदायाच्या लीळाचरित्रात एके ठिकाणी असे सांगितले आहे, की विठ्ठल हा गाई चोरणारा होता आणि गाईचे रक्षण करणाऱ्यांकडून तो मारला गेला. डॉ. दलरी ह्यांचे म्हणणे असे, की द्वेषबुद्धीने मूळची कथा विकृत करून येथे विठ्ठलाला गो-चोर ठरविलेले दिसते. तो खरोखरी गोरक्षकच असला पाहिजे. ह्या कथेत विठ्ठलाला ‘वीर’ म्हटले आहे तसेच तो गोरक्षकांकडून मारला गेल्यानंतर त्याच्या पुत्रांनी त्याच्या स्मरणार्थ एक ‘भडखंब्रा’ (स्तंभ) उभा केला व त्या स्तंभाच्या माथ्यावर लिंग स्थापना केली, असेही म्हटले आहे. पुढे त्या स्मारकास देवत्व प्राप्त झाले व विठ्ठल लोकाचे मनोरथ पुरवू लागला हेही ही कथा सांगते.
पंढरपूर येथे महाद्वारासमोर एका वीराची स्मारकशीला डॉ. सोनथायमर ह्यांना दिसून आली व त्यांनी डॉ. तुळपुळे ह्यांच्या ती नजरेस आणल्यानंतर डॉ. तुळपुळे ह्यांनी त्या वीरगळात विठ्ठलाचे मूळरूप असते पाहिजे, असे मत मांडले व डॉ. दलरी ह्यांच्या मताला पुष्टी दिली. आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्यात पलनाडू म्हणून एक ठिकाण असून तेथे बरेच वीरगळ आहेत व त्यांनाही वैष्णव प्रतिष्ठा मिळालेली आहे, असे माणिकराव धनपलवार ह्यांनी दाखून डॉ. दलरी ह्यांच्याशी सहमती दर्शवली आहे.
तथापि वीरगळ हे विठ्ठलाचे मूलरूप असावे, हे मत डॉ. ढेरे ह्यांना मान्य नाही. वर दिलेली लीळाचरित्रातील कथा प्रक्षिप्त आहे, हे स्पष्ट दिसते. शिवाय विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे, हे महानुभाव पंथास मान्य नाही त्याचप्रमाणे ह्या पंथाच्या दृष्टीने विष्णू पंथास मान्य नाही त्याचप्रमाणे ह्या पंथाच्या दृष्टीने विष्णू आणि त्याचे कृष्णवादी अवतार हे कनिष्ठ देवतांपैकी होत. विठ्ठलाबद्दलचा अनुदार भावही त्यांच्या साहित्यात काही ठिकाणी प्रकट दिसतो. तोच भावही त्यांच्या साहित्यात काही ठिकाणी प्रकट झालेला दिसतो. तोच भाव त्यांच्या साहित्यात काही ठिकाणी प्रकट झालेला दिसतो. तोच भाव विठ्ठलाला गो-चार ठरविणाऱ्या ह्या कथेत ठळकपणे व्यक्त झालेला आहे. ह्याच कथेचा काहीसा सौम्य असा एक पाठही मिळतो. पण अशा एखाद्या कथेचा आधार घेऊन विठ्ठलाचे मूलरूप शोधण्याचा प्रयत्न करणे योग्य होणार नाही, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. आंध्र प्रदेशातील पलनाडूत ज्या वीरगळांना वैष्णव प्रतिष्ठा मिळाली आहे त्यांपैकी कोणालाही ‘विठ्ठल’ हे नाव मिळालेले नाही, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. पंढरपूर येथील महाद्वारासमोरील वीरगळ हेच विठ्ठलाचे मूलरूप असते, तर विठ्ठलाच्या जवळच ते असल्याने विठ्ठलाच्या पूजाअर्चेत त्यालाही काही प्रतीकात्मक स्थान प्राप्त झाले असते पण तसे झालेले दिसत नाही.
डॉ. ढेरे ह्यांच्या मते विठोबा हा मूलतः गोपजनांचा देव आहे. दक्षिणेत संचार करणाऱ्या अथवा अर्धस्थिर अशा स्थितीत जगणाऱ्या गवळी-धनगर गोल्ल-कुरुब ह्यांसारख्या गाई-गुरे-शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्या जमातींचा देव आहे. गोल्ल-कुरुब हे आंध्र-कर्नाटकांतले आणि गवळी-धनगर हे मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रातले होत. त्यांचा निर्देश आंध्र-कर्नाटकांत ‘यादव’ म्हणूनही केला जातो. पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा ज्यांनी वाढविला, ती अनेक राजकुले यादवच आहेत (उदा., देवगिरीचे तीन ‘यादव’ राजे-कृष्ण, महादेव आणि रामचंद्र स्वतःला अभिमानाने यादव म्हणवून घेणारा, होयसळ वंशातला, वीर सोमेश्वर हा राजा इ.) हे डॉ. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. तमिळ भाषेत मेंढराला ‘याडु’ म्हणतात. ह्या शब्दापासून ‘यादव’ शब्द बनला ‘यादव’ हे ‘याडव’ चे संस्कृतीकरण असावे. सेऊण यादवांचा आदिपुरुष तर गाईंचे रक्षण करणारा शूर वीर होता, हेही डॉ. ढेरे दाखवून देतात. धुळे, औरंगाबाद, नगर येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेले गोपाळ ह्या जमातीचे लोक पंढरपूरजवळील गोपाळपुऱ्यात राहत असत, असे एका पारंपरिक कथेत म्हटले आहे. ह्या गोपाळपुऱ्यास पंढरपूरच्या वारीत मोठे महत्त्व आहे आणि रुसलेल्या रक्मिणीची समजूत काढण्यासाठी कृष्ण प्रथम गोपाळपुऱ्यासच गोपवेषाने आला. अशीही कथा आहे.
डॉ. ढेरे ह्यांच्या मते, विठ्ठल-बीरप्पा ह्या धनगर-गवळ्यांसारख्या गोपजनांच्या जोडदेवांपैकी एक असलेला विठ्ठल हा पंढरपुरच्या विठ्ठलाचे आदिरूप होय. धनगरी विठ्ठल हा नेहमी बीरप्पासमावेत असतो एकट्या बीरप्पाची स्वतंत्र ठाणी आढळतात पण एकट्या विठ्ठलाची तशी आढळत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यांतील हातकणंगले तालुक्यात असलेले पट्टणकोडोली, सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर आणि सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे विठ्ठल-बीरप्पाची ठाणी आहेत पट्टणकोडोली येथे दर वर्षी भोबी पौर्णिमेनंतर (आश्विन पौर्णिमेनंतर) मृग नक्षत्रावर तीन दिवस विराट यात्रा भरत असते. पट्टणकोडली येथे वारी-दिंड्याही येतात.
एक संशोधक वा. दा. मुंडले ह्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दोन वार्षिक इतिवृत्तांमधून (१९१४, १९१५) प्रसिद्ध केलेल्या धनगरी गीतांपैकी दोन गीते विठ्ठलाच्या विकासप्रक्रियेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाची आहेत. विठ्ठल-बीरप्पा हे पट्टणकोडली (जुने नाव इंगळकोडोली) येथे कसे आले ह्याची कथा ह्यांपैकी एका गीतात मिळते. इंगळकोडीली इथले मूळ लिंगायत रहिवासी आणिनंतर तेथे वस्ती करावयास आलेले धनगर ह्यांच्यात संघर्ष आणि समन्वय झाला, हे कथा सांगते. ह्या कथागीतात इटल-ब्रमल (विठ्ठल आणि बीरोबा) ही नावे एकत्र आहेत. दुसऱ्या कथागीतात इटल-ब्रमल देवांनी आश्विनी पौर्णिमेला माळावर यात्रा भरवण्याचा विचार कसा केला, त्या यात्रेला यात्रिकांना घेऊन येणारा फरांडे नावाचा कोणी भक्त आणि भंडारा घेऊन येणारा माळिंगराय ह्यांची सर्व व्यवस्था करण्याबद्दलचा निरोप त्यांनी विठ्ठलाच्या बायकोला-पदूबाईला-कसा पाठवला, पदूबाईने ते करण्यास नकार देतात विठ्ठलाने तिला भयंकर शाप कसा दिला, हे सांगितले आहे. विठ्ठलाच्या शापामुळे पदूबाई वेडी झाली. लोकांना धोंडे मारू लागली. पोरे तिच्यावर शेण फेकू लागली. अशा अवस्थेतच तिचे लुगडे कारीला अडकले, चोळी बोरीला अडकली. तिचे आईवडील दुःख करीत तिला सोडवायला आले पण पाच फणा असलेला एक भुजंग तिच्या शरीरावर डोलत होता. त्यामुळे कोणालाच तिला मदत करणे शक्य झाले नाही. पुढे पदूबाईची झालेली दशा तिच्या लेकीला समजली. ती अत्यंत दुःखी झाली, तेव्हा देवाने (इटल देवाने) तिची समजूत काढली. तिला आपल्या उजव्या अंगाला बसण्याचा आणि ‘सात रोज’ जत्रेत आरवण्या-मिरवण्याचा मान दिला.
दुर्गा भागवत ह्यांनी लोकसाहित्याची रूपरेखा (१९५६) व पैस (१९७०) ह्या आपल्या ग्रंथात पदूबाईची हीच कहाणी थोड्या वेगळ्या तपशिलांनी दिलेली आहे. ह्या कथेत विठोबा हा मल्हारीदेवाचा मांडलिक राजा आणि माळशिरसला राहणारा दाखविला आहे. खानदेशचा भक्त त्याची राणी पद्मावती (म्हणजे पदूबाई) म्हणून आहे. खानदेशचा भक्तशिरोमणी माळीगया (म्हाळिंगराय) बरीचशी माणसे घेऊन विठोबाच्या दर्शनाला येत होता. विठोबाने पद्मावती राणीला निरोप धाडला, की ह्या माणसांची व्यवस्था ठेवा. पद्मावती घरातली कामे करून थकली असतानाच हा निरोप आल्यामुळे चिडली आणि तिने ह्या पाहुण्यांची व्यवस्था करण्यास नकार दिला. विठोबाला हे कळल्यावर त्याला फार दुःख झाले. त्याने बायकोला शाप दिला,की तुझे माझे नाते तुटले. उद्या सकाळी नदीवर पाणी भरायला गेलीस, की तुझी सोन्याची घागर बुडेल, तू वेडी होऊन सैरावैरा भटकत राहशील, तुला कोणाचाही आश्रय मिळणार नाही, तू रानात एकटी मरशील, तुझ्या हाडालाही कुणी मायेने शिवणार नाही. हा साप खरा ठरून पदूबाई रानात मरून पडली. ही वार्ता कळताच पदूबाईचे आईवडील धावत आले पण विठोबा नाग होऊन वाटेत आडवा आला. त्याने तिच्या आईबापांना पुढे येऊ दिले नाही. तिचे केस तोडून एका चिंचेच्या झाडाला टांगले. घारीगिधाडांकडून त्याने तिचे प्रेत खाववले. मेघांनी त्याच्या आज्ञेने मुसळधार पाऊस पाडला आणि पदूबाईच्या अस्थी समुद्रात वाहून गेल्या. पण ह्या गोष्टीचा भक्तराज माळीरायाला (म्हाळिंगरायाला) अत्यंत खेद झाला. त्याने समुद्रकाठी तप सुरु केले. बारा वर्षांनी (बारा दिवसांनी असाही निर्देश मिळतो) समुद्राने पदूबाईच्या अस्थी माळीरायाला परत केल्या. त्याने त्या पंढरपूरच्या पद्मतीर्थ तळ्यात टाकल्या. त्या तळ्यात त्यानंतर एक कमळ उमलून आले. विठोबालाही पदूबाईच्या मृत्यूचे आता दुःख होते. तोही राज्य सोडून भटकत होता. भटकत भटकत तो चंद्रभागेच्या तीरी आला. पद्मतीर्थात उमललेल्या सुंदर कमळाचा त्याला मोह पडला व त्याने ते तोडले त्याच क्षणी त्यातून पदूबाई जिवंत होऊन उभी राहिली. पण आता ती रुक्मिणी झाली. होती. पदूबाई म्हणजेच रुक्मिणी, अशी धनगरांची श्रद्धा आहे. विठोबाचा पदूबाईवरचा राग आता गेला होता पण तिच्यासह एकत्र राहायचे नाही, हा त्याचा निर्धार मात्र पक्का होता. त्यामुळे तो पंढरपुरात वेगळा राहिला पदूबाई म्हणजे रुक्मिणीही वेगळी राहिली.
पंढरपुरात विठोबा आणि रखुमाई वेगवेगळ्या देवळांत आहेत एकत्र नाहीत, हा निर्देश वर आलेलाच आहे. रुक्मिणीचा रूसवा काढण्यासाठी कृष्ण पंढरपुरात आला, ही पंढरपुरातील विठ्ठल-प्रकटनाची कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आल्याचाही उल्लेख आला आहे. ही रुक्मिणी म्हणजेच पंढरपुरातल्या दिंडीरवनात जिचे मंदिरे आहे, ती लखूबाई होय, असेही समजतात. पद्मावतीचे वा पदूबाईचेही मंदिर पंढरपुरात आहे. पदूबाई आणि लखूबाई ह्या दोन्ही देवता तेथे तांदळ्यां च्या रूपांत पूजिल्या जात आहेत. त्या लोकदेवता आहेत. लखूबाई हे लक्ष्मीचे ग्रामीण मराठी रूप आहे. मेंढ्या आणि गुरे ह्यांच्या रूपाने येणाऱ्या श्रीमंतीची ती देवता आहे. ही देवी मेंढवाड्यात राहते अशी भावना असल्यामुळे तिथे वहाणा घालून जात नाहीत, असे आपले निरीक्षण डॉ. सोयथायमर ह्यांनी नोंदविलेले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड येथे दसऱ्याच्यासुमारास होणाऱ्या धनगरांच्या हुईकाचा (भविष्यकथनाचा) डॉ. प्रभाकर मांडे ह्यांनी एक विस्तृत वृत्तांत लिहिला असून त्यात त्यांनी हुईकापूर्वीच्या म्हटल्या जाणाऱ्या काही धनगरी ओव्याही दिल्या आहेत. त्यांत विठोबाचा उल्लेख असून ‘भक्त कुंडलिका’साठी (म्हणजेच पुंडलिकासाठी) विठोबा पंढरपुरी अठ्ठावीस युगे उभा असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर देवाच्या धनगर-भक्तांचे जे उल्लेख आले आहेत त्यांत ‘राजोबा म्हाळोबा भक्त गेले होऊन’ असे म्हटले आहे. त्यांपैकी म्हाळोबा म्हणजेच म्हाळिंगराय वा महालिंगराय असल्याचे चटकन सुचित होते. म्हाळिंगराय पदूबाईच्या कथेत आलेला आहेच.
विठ्ठल हा गोपजनांचा देव आहे, असे मत विठ्ठलाच्या अभ्यासक्षेत्रात प्रथम दुर्गा भागवत ह्यांनी मांडले, डॉ, जी. ए. दलरी आणि ग्यंथर सोनथायमर ह्यांनी त्या दिशेने काम केले. डॉ. ढेरे ह्यांनी ह्याच दिशेने विपुल आणि सखोल संशोधन करून श्रीविठ्ठल:एक महासमन्वय (१९८४) हा आपला ग्रंथ लिहिला.
विठोबाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण:विठोबा हा मूळ एक लोकदेव असला, तरी अन्य अनेक लोकदैवतांप्रमाणे त्याची कीर्ती मर्यादित न राहता ती सतत वाढत गेली. इतकी, की समाजातल्या शास्त्री-पंडितांना त्याला शास्त्रप्रतिष्ठा देणे भाग पडले आणि त्या दृष्टीने विठ्ठलाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण घडवून आणण्यात आले. ही प्रक्रिया संतांच्या उदयापूर्वी सुरू झाली आणि आजही ती चालू आहे, असे डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांच्या मते, पंढरपुरची स्थळपुराणे प्रसिद्ध असलेल्या तीन संस्कृत पांडुरंगमाहात्म्यांची रचना हा ह्या प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग होय. ही माहात्म्ये रचताना अनेक लोककथांना पुराणकथांचे रूप देण्यात आले.
श्रीज्ञानदेवांच्या अनुभवामृताचे आणि चांगदेवपासष्टीचे संस्कृतात रूपांतर करण्यात आले. विठोबाला वैदिक वलय प्राप्त करून देण्यासाठी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ‘द्वे विरूपे चरतः . . .’ अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या पंचाण्णवाव्या सूक्ताचा अर्थ विठ्ठलपर लावण्याचाही प्रयत्न पंढरपूर येथील एक धर्मपंडित काशीनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये ह्यांच्या विठ्ठलऋङ्मंत्रसारमाष्य ह्या ग्रंथात करण्यात आलेला आहे. विठ्ठलशास्त्री धारूरकर ह्यांनी आपल्या पंढरीतत्त्वविवेक ह्या मराठी ग्रंथात ऋग्वेदाच्या उपर्युक्त पंचाण्णावाव्या सूक्तातील पाच ऋचांचा विठ्ठलपर अर्थ दिला आहे. आपला ग्रंथ लिहिताना त्यांनी विठ्ठल ऋङ्मंत्रसारभाष्याचा आधार घेतला आहे. ‘द्वे विरुपे . . .’ ह्या ऋचेचा आशय मराठी अनुवादात असाः ‘भिन्न रूपांच्या दोघी (रात्री आणि उषा) आपापल्या कामाविषयी तप्तर होऊन भ्रमण करीत असतात. (त्या) एकमेकी एकमेकींच्या वाळांना स्तनात करवितात. एकीच्या जवळ पीतवर्णाचा (बालक) तेजस्वी होतो, दुसरीच्या जवळ निर्मळ कांतीचा (बालक) महातेजस्वी दिसू लागतो.
पंढरीतत्त्वसतविषेकात ह्या ऋचेच्या पदांच्या विठ्ठलपर अर्थ लावून दिलेला प्राकृतार्थ असा आहे: ‘सुस्वरूप अशा दोन भगवंताच्या मूर्ती आपल्या भक्तांस मोक्ष देण्याकरिता, पुंडरिकाचे आश्रमाचे ठायी संचार करितात आणि परस्परसंमुख होऊन आपला वत्स (जो पुंडरीक) त्यास सादर पाहतात. आता दोन मूर्तीपैकी हरी ही भक्तजनांच्या भावबंधनाचा नाश करणारी अशी तीर्थरूपाने आहे.(ह्या अभिप्रायास अनुसरून तुकाराम एका अभंगात म्हणतात : ‘ तुका म्हणे चंद्रभागा । स्वरूप तुझे पांडुरंग ’।।) व दुसरी शुक्रः (पांडुरंग) रूपाने राहिलेली आहे, जीस सर्व लोक पाहतात. ’
श्रीगोपाळाचार्य ह्या नावाच्या एका वैष्णव शास्त्र्यांनी श्रीमद्विठ्ठलभूषण ही सात पानांची पोथीस लिहिली आहे. तीत निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील विठ्ठलविषयक संदर्भ संग्रहीत आहेत. ‘द्वे विरूपे…’ हे ऋग्वेदातील सूक्त ह्या पोथीरही विठ्ठलपर लावून दाखविलेले आहे. ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् लाति गृहणाति विठ्ठलः ’म्हणजे‘जो अज्ञ जनांचा ज्ञानाने स्वीकार करतो, तो विठ्ठल ’-अशी विठ्ठल ह्या नामाची निरूक्ती ह्या पोथीत दिलेली आहे. भगवद् गीतेप्रमाणेच अठरा अध्याय, अठरा योग, तीन कांडे आणि सातशे श्लोक असलेली एक विठ्ठलगीताही रचण्यात आली आहे. ती संस्कृतात असून तीवर ओवीबद्ध मराठी विवरणही दिलेले आहे. तिचा कर्ता अज्ञात आहे पण ‘श्रीसिद्धानुसार’ असा त्याने स्वतःचा निर्देश दोन ठिकाणी केलेला दिसतो. गीता हा कृष्णार्जुनसंवाद आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलगीता हा विठ्ठल आणि तुल्येंद्र (तुकाराम ह्या नावाचे करण्यात आलेले संस्कृत रूप) ह्यांच्यातील संवाद आहे. विठ्ठलगीतेच्या पहिल्या अध्यायात विठ्ठल ह्या नावाच्या काही व्युत्पत्त्या दिलेल्या आहेत. त्यांत ‘विदा ज्ञानेन….’ही आहेच. मात्र येथे ती ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् भक्तिहीनान् लाति गृहणातीति विठ्ठलः ’अशी दिलेली आहे. श्रीविठ्ठलप्रतिष्ठा हे नाव दिलेल्या एका हस्तलिखितात श्रीविठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी समंत्रक विधिविधान सांगितले आहे. विठ्ठलपंचरत्न ह्या नावाने पाच संस्कृत स्तोत्रांचा समुच्चय ओळखला जातो. विठ्ठल हा विष्णू असल्याची स्पष्ट जाणीव श्रीविठ्ठप्रतिष्ठा आणि विठ्ठलपंचरत्नांपैकी विठ्ठलकवच ह्या,तसेच विठ्ठलसहस्रनाम ह्या स्तोत्रांत दिसते. आद्य शंकराचार्यांच्या नावावर पांडुरंगाष्टक हे स्तोत्र मोडते पण ते त्यांचे नाही, ह्याबाबत विद्वांनांत ऐकमत्य आहे. हे स्तोत्र कोणा उत्तरकालीन शंकराचार्यांनी रचले असणे शक्य आहे. श्रीपांडुरंगमंत्रजप ह्या हस्तलिखितात विठ्ठलास ‘यज्ञरूप’ आणि ‘यज्ञभोक्ता’ अशी विशेषणे लावलेली आहेत. श्रीविठ्ठलाच्या प्रसादासाठी महादेव यादवाचा मांडलिक असलेला कोणी केशव ह्याचा पुत्र भानू ह्याने पंढरपुरात आप्तोर्याम महायज्ञ केला, असे पंढरपुरातीलच एका कोरीव लेखावरून दिसून येते. पंढरपुरात श्रीविठ्ठलाच्या प्रीत्यार्थ आणखीही यज्ञ झाले आहेत. विठ्ठलाचे वैष्णवीकरण झाल्यामुळे विष्णुयागही झाले आहेत.
परमविष्णुभक्त पुंडलिक ह्याच्यासाठी वैकुंठाचा देव विष्णू हा पंढरपुरी आला, असे मानले जाते. पंढरपुरात पुंडलिकाचे मंदिरही आहे तथापि पंढरपुरातील पुंडलिकमंदिर वार्षिक उत्सवही होतो. पुंडलिककथा इतिहासात सापडत नाही ती पुराणांत सापडते. पुंडलीक हा मुळात पुंडरीकेश्वर होता. संक्षेपाने त्याला पुंडरिक म्हटले जात होते आणि जाते. स्कंदपुराण, पद्मपुराण, नृसिंहपुराण अशा पुराणांतून विष्णुभक्त पुंडरिकाच्या कथा आलेल्या आहेत, परंतु पुराणांमधील पुंडरीक हा पंढरपूरचा पुंडरिक नाही. पुराणांताल पुंडरीक-कथांच्या प्रभावाच्या आधारे, विठ्ठलाच्या वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत, पंढरपूर येथील पुंडलिकाची वा पुंडरिकाची कथा उभी करण्यात आली, असेडॉ. रा. चि. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. डिंडीरव वनातील (दिंडीरवनातील) डिंडीरवनामक दैत्याचे पारिपत्य करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुनाचे (शिवाचे) रूप घेतले, अशी कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे. पंढरपुरात मल्लिकार्जुनाचे पुरातन मंदिर आहेच. येथे मल्लिकार्जुनाचे शिवरूप आहे, असे सांगितले गेले. पंढरपूरच्या पूर्वेस नदीकाठी दिंडीरवनात लखूबाईचे मंदिर आहे. तिलाच कृष्णावर रूसून पंढरपुरी आलेली रूक्मिणी मानले जाते. पद्मावती तीर्थाची कथाही वर दिलेली आहे. विठ्ठलाचे वैष्णवीकरण करण्याच्या प्रक्रियेचाच हा भाग होय.
विठ्ठलाचे वैष्णवीकरण होण्यापूर्वी पंढरपूरचा विठ्ठल काही काळ शिवरूप झाला होता, असे डॉ. माणिकराव धनपलवार ह्यांचे मत आहे. पंढरपूर हे मुळात पुंडलिकपूर असून तिरूवारूर आणि चिदंबरम् ह्या दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्रांचे पर्यायी नाव ‘पंडरीकपूर’असेच आहे, हे अन्य काही प्रमाणांसह ह्या संदर्भात निदर्शनास आणतात. तथापि पंढरपूर हे पुंडरीकेश्वरामुळे पुंडरीकपूर झाले, पंढरीचा तोच मूळ अधिष्ठाता देव होता. वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत तो विठ्ठलाच्या परिवारात समाविष्ट झाला परंतु पंढरपूरचा विठ्ठल हा मात्र शिव बनलेला नव्हता, असे डॉ. ढेरे ह्यांचे मत आहे. डॉ. ढेरे असेही दाखवून देतात, की विठोबाच्या उन्नयप्रक्रियेत प्रथम विठोबाचे शैवीकरण होते आणि नंतर वैष्णवीकरण होते, असा सार्वत्रिक नियम नाही.
विठोबा आणि वेंकटेश : पंढरपूरचा विठोबा आणि तिरूमलाई (आंध्र प्रदेश) येथील वेंकटेश ह्या दोन देवांमधील साम्य लक्षणीय आहे. विठोबाप्रमाणेच वेंकटेश हा हाती शस्त्र नसलेला आणि मौनी आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात त्याच्या भक्तांना वर देत आहे. विठोबाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत. विठोबाच्या संस्कृत पांडुरंगमाहात्म्यांप्रमाणेच वेंकटेशाशी संबंधित अशा तिरूमलाईचीही संस्कृत माहात्म्ये आहेत. रूसलेल्या रूक्मिणीची समजूत काढण्यासाठी विठोबा पंढरपूरला आला. त्याचप्रमाणे वेंकटेशही रूसलेल्या लक्ष्मीसाठी तिरूमलई येथे आला. तेथे त्याने पद्मतीर्थ खोदले व त्यातून पद्मावती (जी वेंकटेशाही पत्नी आहे) प्रगट झाली, अशी कथा सांगितली जाते. विठोबा आणि वेंकटेश ह्या दोन्ही देवांना कांबळे अत्यंत प्रिय आहे आणि दोन्ही देवांच्या पावित्र्यसंमारंभात चिंचेच्या झाडांना फार महत्त्व आहे. वेंकटेश हा वेंकटाचलावर एका चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारूळातून प्रकट झाला, अशी कथा सांगितली जाते. पंढरपूर येथील दिंडीरवन हे चिंचेच्या झाडांचे वन होते. वेंकटेश आणि विठोबा ह्यांच्यातील साम्य लक्षात घेता, हे दोन्ही देव एकाच लोकदेवाची (विठ्ठल-वीरप्पाची) दोन वेगवेगळी, पण एकमेकांशी लक्षणीय साम्यही राखून असलेली उन्नत रूपे असली पाहिजेत असे डॉ. ढेरे ह्यांच्यासारख्या अभ्यासकांना वाटते. विठ्ठल-वीरप्पा ह्या जोडदेवाचाही चिंचेच्या झाडाशी संबंध आहे. विठ्ठल-वीरप्पा हा जोडदेव पहिल्यांदा पट्टणकोडोलीला आला, तेव्हा तो चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला, अशी धनगरांची श्रद्धा आहे. एका धनगरी कथेनुसार विठ्ठलाची पत्नी विठ्ठलावर रूसून वनात गेली आणि चिंचेच्या बुंध्यापाशी येऊन गतप्राण झाली. वेंकटेशाची उपासना आज श्रीनिवास किंवा विष्णू म्हणून केली जाते परंतु साडेसातशे वर्षांपूर्वी वेंकटेश हा वीरभद्र म्हणून पूजला जात होता, असा ⇨वीरशैष पंथांच्या अनुयायांचा दावा आहे आणि वीरप्पाचेच वीरभद्रात रूपांतर झाले असा ग्यूथर सोनथायमर ह्यांचा निष्कर्ष आहे. आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्रात वीरशैव पंथीयांमध्ये वीरभद्र उपासना केली जाते. वीरशैव पंथांचा प्रभाव वाढला, तेव्हा दक्षिण भारतातील गोपजन हे वीरशैव बनले व त्यांच्या प्रिय दैवताचे-वीरप्पाचे-वीरभद्रीकरण त्यांच्या मूळच्यादेवाला त्यांनी नव्याने स्वीकारलेल्या श्रद्धाविश्वात प्रतिष्ठित करण्यासाठी वीरशैवांनी घडवून आणले. असे डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.
मराठी संतांनी अनेकदा विठोबाला बुद्ध वा बौद्ध म्हणून संबोधिले आहे. उदा., संत जनाबाईने तिच्या एका अभंगात असे म्हटले आहे, की कृष्णावतारी कंसवध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे. विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे, असे एकनाथांनी आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हटले आहे. विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे. अशी संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठोबाचे (रूक्मिणीसह वा तिच्यावाचून) चित्र दाखविलेले दिसते आणि त्या चित्रावर ‘बुद्ध’ असेही छापलेले आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशवमंदिरात कोरलेल्या दशावतांरांत बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे जाणवते. संतांनी विठ्ठलाला बुद्ध मानले याचे कारण बुद्धाची करुणा आणि त्या करणेचे त्यांना वाटत असलेले महत्त्व, हे आहे, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. बुद्धीचीच करूणाधारा विठ्ठलभक्तीच्या रूपाने संतांनी महाराष्ट्रात वाहती ठेवली.
विठोबा हे जैनांचे दैवत आहे, असा जैनांचा दावा अठराव्या शतकापर्यंत तरा होता, असे दिसते. मराठी संतांनी मात्र विठ्ठलाला अनेकदा बुद्ध म्हणून संबोधिले असले, तरी जिन म्हणून कधीही संबोधिलेले नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले ह्यांनी त्यांच्या भरतखंडाच्या अर्वाचीन कोशात एका जैन पंडिताने जैन तीर्थंकर नेमिनाथाच्या स्थापन केलेल्या मूर्तीचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक एका जैन ग्रंथातून उदधृत केले आहेत (हा ग्रंथ कोणता ह्याचा निर्देश त्यांनी केलेला नाही) व ते वर्णन पंढरपूर येथील विठोबाच्या मूर्तीशी जुळते असे त्यांनी म्हटले आहे. कृष्ण आणि नेमिनाथ ह्यांचा संबंध जैन परंपरेत जवळचा मानला गेला आहे. दोघेही यदुवंशीय असून चुलतभाऊ होते. असे ही परंपरा सांगते, त्यामुळे ज्याला कृष्णाचे बालरूप मानले जाते, त्या विठोबात जैनांनी नेमिनाथांना पाहिले असणे शक्य आहे.
डॉ. ढेरे ह्यांनी विठ्ठलाचे वर्णन ‘एक महासमन्वय’ असे केले आहे कारण शैव, वैष्णव, बौद्ध, जैव इ. धर्मधारांचा सुमधुर संगम विठ्ठलामध्ये आढळतो.
संदर्भ : 1. Deleury, G. A. The Cult of Vithoba, Pune, 1960.
2. Purohit, Vinayak, The Pastoralist Class Society in Indian History and Historiography, Bombay, 1980.
3. Settar, S. Sontheimer, Gunther D. Ed. Memorial Stones in India, Dharwad-Heidelberg, 1982.
4. Shashi, S. S. The Shepherds of India, Delhi, 1978.
5. Sontheimer, Gunther D. Biroba, Mhaskoba and Khandoba (Summary in English, PP 235-253), Heidelberg, 1976.
6. ‘The Dhangars : A Nomadic Pastoral Communnity in a Developing Agricultural Environnent’ in Pastoralists and Nomads in South Asia, Ed. Leshnik, L. S. Sontheimer, Gunther D. Heidelberg, 1975.
७. अभंगराव, केरो रामचंद्र, संपा. श्रीपुंडलीकस्तव (भाग पहिला), पंढरपूर, १९११.
८. कारंडे, य. ल. सुंबरान मांडील, सांगली, १९६७.
९. खरे, ग. ह. महाराष्ट्राची चार दैवते, पुणे, १९५८.
१०. खरे ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, आवृ. ३ री, पुणे, १९६३.
११, चेंदवणकर, सदानंद, पंढरपूरचा विठोबा, मुंबई, १९६५.
१२. चोपडे, तात्या केशव, पंढरपूरचा विठोबा, म्हसवड, १९३०.
१३. जोशी, ग. वा. भालेराव, प. शा. श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन, पुणे, १९८४.
१४. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.
१५. धनपलवार, माणिक, संपा. कान्हो त्रिमलदासकृत पुंडलीकचरित्र, हैदराबाद, १९७२.
१६. बेंद्रे, द. रा.विठ्ठलसंप्रदाय, दिल्ली, १९६५.
१७. बेंद्रे, द, रा. संत-महंताचा पूर्णशंभु विठ्ठल, पुणे, १९८०.
१८. भागवत, दुर्गा, पैस, मुंबई, १९७०.
१९. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रूपरेखा, आवृ. २ री, पुणे, १९७७.
२०. मतकर, ग. शं. धनगर समाज दर्शन, इंदूर, १९८३.
- (मराठी विश्वकोश)
कहाणी पंढरीची
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या व्युत्पत्तीचा पुराभिलेखीय आढावा
उदंड ऐकिला । उदंड गायिला ।
उदंड देखिला । क्षेत्रमहिमा ।
पंढरीसारखे । नाही क्षेत्र कोठे ।।
या बहिणाबाईंच्या अभंगाच्या कडव्यातूनच पंढरपुरीचे महत्त्व विशद होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरक्षेत्रीचा राजा म्हणजेच ‘पांडुरंग’. याच पांडुरंगाचा महिमा वर्णावा तितका कमीच. गेली २८ युगं पांडुरंग हा एकाच स्थळी उभा असल्याचे वर्णन संत परंपरा करते. पंढरपूरच्या या राणाला त्याच्या भक्तांनी अनेक बिरुद दिली. विठोबा, विठू माऊली, पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई इत्यादी. या प्रत्येक नावांचा अर्थ आणि त्यामागे दडलेला इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आहे. पांडुरंग आणि पंढरपूर या दोन नावांमध्येही असाच ऐतिहासिक ऋणानुबंध आहे. पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानतात. या क्षेत्राचा प्राचीन उल्लेख इसवी सन ५१६ च्या ताम्रपटात 'पांडरंगपल्ली' या नावाने आलेला आहे.
पांडुरंगपूरचा पांडुरंग :
पंढरपूर हे पंडरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंडरीपूर, फागनीपूर, पौंडरीक्षेत्रे, पंडरंगे, पांडरंगपल्ली अशा विविध नावांनी ओळखले जात होते. संतजन या क्षेत्राचा उल्लेख भूवैकुंठ किंवा दक्षिण काशी म्हणून करतात. ‘पंडरंगे’ हा कानडी शब्द आहे. त्याचे पंडरिका, पंडरी किंवा पंढरी असे रूप झाले असले पाहिजे असे अभ्यासक मानतात. ‘पंढरी’ या शब्दाला ‘पूर’ हा नगरवाचक प्रत्यय लागून पंढरीपूर आणि नंतर पंढरपूर हा शब्द तयार झाला. ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण होय. ‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र/गौर रंग’ असा होतो. गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे, असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते परंतु त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे. राजपुरोहित आणि डॉ. रा. गो. भांडारकर यांनी अनुक्रमे पंडरीकपूर व पांडुरंगपूर या शब्दांपासून पंढरपूर शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचे म्हटले आहे. पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य सांगणारा पंढरी माहात्म नामक एक संस्कृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्कंद पुराणाचा भाग आल्याचे मानले जाते. यात वर्णन केल्याप्रमाणे पौंडरीक नावाचे क्षेत्र आणि तीर्थ आहे. त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ देव पांडुरंग मूर्तिरूपात आहे. हे क्षेत्र अर्ध योजन लांब आहे. त्याची रुंदी ‘तदर्ध’ म्हणजे एक कोस आहे.
पुराभिलेखीय पुरावा :
पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानतात. या क्षेत्राचा प्राचीन उल्लेख इसवी सन ५१६ च्या ताम्रपटात ‘पांडरंगपल्ली’ या नावाने आलेला आहे. हा ताम्रपट राष्ट्रकूट घराण्यातील ‘अविधेय’ राजाने कोरवून घेतलेला आहे. त्यात जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणाला शंभुमहादेवाच्या डोंगराच्या पूर्वेस असलेल्या पाच गावांचे दान दिल्याचा उल्लेख आढळतो. पांडरंगपल्ली ताम्रपटात असे नमूद केले आहे की हे स्थळ अनेवती नदीच्या काठावर वसलेले आहे, अनेवती नदी ही पंढरपूर येथील एक लहान नदी आहे, जी गोपाळपूरजवळ भीमा नदीला मिळते. या ठिकाणी विष्णुपद नावाने ओळखले जाणारे वैष्णव देवस्थान आहे. या प्राचीन मंदिरात विष्णू मूर्ती नाही. मूर्तीच्या जागी फक्त दगडावर कोरलेले विष्णूचे पदचिन्ह होते. ही परंपरा इसवी सनाच्या प्रारंभिक शतकातील आहे, या कालखंडात हिंदू धर्मात मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती (ठोसर, २००४). ही वस्तुस्थिती समजून घेतल्यास पंढरपूरजवळील गोपाळपूर हे संपूर्ण दख्खनमधील सर्वात जुने वैष्णव आसन मानावे लागते. यावरून असे दिसून येते की, प्राचीन काळापासून पंढरपूर हे महाराष्ट्रातील वैष्णवांचे केंद्र होते. या दृष्टीने पंढरपूरचे त्याचे फागनिपूर हे नाव वेधक आहे. फागिनी हे बिहारमधील गयाचे प्राचीन नाव आहे. गया हे फागिनी किंवा फाल्गुनी नदीवर वसलेले होते. आजही गया हे उत्तरेकडील वैष्णवांचे प्रमुख केंद्र मानले जाते. पंढरपूर येथील विष्णुपद बहुधा बिहारमधील गया येथील विष्णुपद मंदिराच्या अनुकरणाने या ठिकाणी स्थापित केले गेले असावे. हे बहुधा हिंदू धर्माचे आद्य प्रमुख केंद्र मानले गेले होते, त्याचा उल्लेख पांडरंगपल्ली ताम्रपटात `सनातन धर्म’ म्हणून केला आहे. योगायोगाने हा सनातन धर्माचा सर्वात जुना उल्लेख आहे, जे सध्याच्या हिंदू धर्माचे सर्वात जुने नाव आहे. कला इतिहासकारांनी विठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या लक्षणावरून या क्षेत्राचा संभाव्य कालखंड इसवी सन चौथे शतक म्हणून नमूद केला आहे (ठोसर, २००४).
११ व्या शतकानंतर, या ठिकाणाचे नाव अनेक कन्नड आणि संस्कृत-मराठी शिलालेखांमध्ये आढळते. कन्नड शिलालेखांमध्ये या क्षेत्राला पंडरिग्गे असे संबोधले गेले आहे तर संस्कृत आणि मराठी शिलालेखांमध्ये पंढरीपुरा, फगिनीपुरा आणि पंढरपुरा अशी विविधता नामाभिधानात आढळते. यावरून असे दिसून येते की इसवी सन ५ व्या ते १० व्या शतकादरम्यान या क्षेत्राला केवळ शिक्षण व विद्येचे माहेरघर स्थान म्हणून महत्त्व होते. हळूहळू कालांतराने हे स्थळ परिवर्तित होऊन पवित्र विष्णूचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले (ठोसर, २००४). डेक्कन कॉलेज, पुणे यांनी पंढरपूर येथे केलेल्या उत्खननात या ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन कालखंडाचे पुरावे सापडले आहे (माटे आणि ढवळीकर, १९६७). शके ११११ (इसवी सन ११८९) मधील शिलालेखात जो कोणी मंदिराला पीडा देईल, त्याला विठ्ठलाची आण घातली आहे. यातूनच ११ व्या शतकात विठ्ठल मंदिर अस्तित्त्वात असल्याचा पुरावा सापडतो. गावाचा आणि देवाचा उल्लेख असलेला यानंतरचा शिलालेख शके ११५९ (इसवी सन १२३६) मधला असून हा लेख मंदिरात सोळखांबी मंडपात आहे. हा शिलालेख संस्कृत-कानडी अशा मिश्र भाषेत आहे. या लेखात वीर सोमेश्वर (होयसळ वंश) याने विठ्ठलाच्या अंग भोगासाठी आसंदिनाडामधील हिरिय गरंज गाव दान केल्याचे नमूद केले आहे आणि देवाला श्री विठ्ठल असे म्हटले आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे पांडरंगपल्लीचा उल्लेख ‘राष्ट्रकूट अविधेयच्या ताम्रपटात आहे, या राजाने इसवी सन ५ व्या शतकात दक्षिण महाराष्ट्रावर राज्य केले. तसेच या स्थळाचा उल्लेख पांडरंगवल्ली म्हणून पुलकेशी पहिला याच्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या ताम्रपट आहे. याशिवाय विठ्ठल मंदिराबाहेर संत चोखामेळा यांच्या समाधी जवळ एक शिलालेख आहे. त्याचा काळ शके १२३३ (इसवी सन १३११) असा आहे. या लेखाची भाषा मराठी आहे. त्यात पंढरपूरला पंढरिपुर व विठ्ठलाला विठ्ठल किंवा विठल असे उभय पद्धतीने संबोधले आहे (ठोसर, २००४).
पौराणिक आणि मध्ययुगीन संदर्भ:
या क्षेत्राचा उल्लेख पद्मपुराणात देखील आढळतो. पैठण येथे जानश्रुती नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने ब्रह्मवादी रैक्वाचा शोध घेण्यासाठी आपल्या सारथ्याला पाठवले होते. तो अनेक क्षेत्रे धुंडाळीत पंढरपूरला आला. त्याने इथल्या द्विभुज विठ्ठलाला भेट दिली. हेमाद्रीच्या चातुर्वर्गचिंतामणीच्या तीर्थखंडात पंढरपूरचा उल्लेख आहे. तिथे पंढरपुराला पौंडरीक व विठ्ठलाला पांडुरंग असे म्हटले आहे. याच सुमारास चौंडरस नावाचा दक्षिण भारतीय कवी होऊन गेला. त्याने अभिनव दशकुमार चरिते या ग्रंथात पंढरपूर आणि तिथले विठ्ठलाचे मंदिर, त्यातील गरुड, गणपती, क्षेत्रपाल इत्यादींचे वर्णन केलेले आहे. महाराष्ट्रनिर्मित संत साहित्यात पंढरपूरचा महिमा अनेक पद्धतीने वर्णिला आहे. आतापर्यंतच्या शिलालेखीय व वाङ्मयीन पुराव्यांच्या आधारे असे दिसते, की पंढरपूरची प्राचीनता इसवी सन ६ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मागे जाते.
संदर्भ/References
मराठी संदर्भ -
खरे ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, पुणे, १९६३.
जोशी, महादेव,(संपा) भारतीय संस्कृतिकोश, खंड ५, पुणे, १९६८ (२०१६)
भागवत, दुर्गा. लोकसाहित्याची रूपरेखा, पुणे, १९७७.
ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.
इंग्रजी संदर्भ: -
Mate, M. S., and M. K. Dhavalikar. “PANDHARPUR EXCAVATION : 1968-A REPORT.” Bulletin of the Deccan College Research Institute, vol. 29, no. 1/4, 1968, pp. 76–117.
Thosar H.S., Historical Geography of Maharashtra and Goa, Epigraphical Society of India, Mysore, 2004.
- डॉ. शमिका सरवणकर
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...
-
गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक Shreepad ShreeVallabh Temple, Galne ro...
-
आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस ! सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जगातील काव्यात्मक अभिव्यक्त...
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...






























