Tuesday, 16 July 2024

असा आहे विठोबा (विठ्ठल)

 




विठोबा : महाराष्ट्रातील, तसेच आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म वा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत. विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ अशा अन्य नावांनीही ते प्रसिद्ध आहे. ह्या नोंदीत विठोबाचा निर्देश त्याच्या अन्य नावांनीही केला आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे-वारकऱ्यांचे-ते प्रमुख तीर्थस्थान होय. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येतात. शुद्ध माघी व शुद्ध चैत्री ह्या एकादशांनाही पंढरपूरला आवर्जून येणारे वारकरी आणि अन्य भाविक आहेत. पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहेह्या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात पण ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते, असे दिसते. ‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे, असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे. श्रीज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. केरळीय कृष्णभक्त कवी लीलाशुक (बारावे-तेरावे शतक) ह्याने आपल्या श्रीकृष्णकर्णामृतम् ह्या संस्कृत काव्यात भीमरथीकाठच्या ‘दिगंबर’ आणि ‘तमालनील’ अशा विठाबोचे वर्णन केले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या तीर्थप्रबंधनामक काव्यात विठोबांची स्तुती केली आहे.

विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी व्युत्पत्ती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ (दूर रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून व्युत्पादावा, असे म्हटले आहे. ह्या व्युत्पत्यनुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते ‘विष्णु’ ह्या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ‘विट्टि’ असे होते आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले. शब्दमणिदर्पणाच्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णुचे ‘विट्टु’ असे रूप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रूपालाच प्रेमाने ‘ल’ हा प्रत्यय लावला, की ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. विदा (ज्ञानेन), ठीन् (अज्ञजनान्), लाति (गृह्‌ णाति) म्हणजे ‘अज्ञ जनांना ज्ञानाने स्विकारणारा, तो विठ्ठल’ अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. ह्या व्युत्पत्तीतील ‘विठ्ठल’ ह्या नावातील प्रत्येक अक्षराला तात्विक अर्थ प्राप्त करून देण्यात आलेला आ हे. ‘विदि (ज्ञाने) स्थलः (स्थिरः)’ ‘म्हणजे जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे, तो विठ्ठल’, अशी एक व्युत्पत्ती वि. कृ. श्रोत्रिय ह्यांनी दिली आहे. इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे. श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’असा असल्याते प्रतिपादन केले आहे. ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते.

विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठावीसाव्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असे घेता येईल.

विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे. नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात (विठ्ठल कानडे बोलू जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ।।). ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेलेआहेत. ‘कर्नाटकु’ ह्या शब्दाचा कर्नाटक ह्या प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकु’ म्हणजे ‘करनाटकु’ वा ‘लीलालाधव दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे. त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत, ह्या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

 विठोबाचे पंढरपुरातील प्रकटन: पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला ह्याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलीक ह्या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढपुरी आला. ‘आईवडिलांची सेवा करतो आहे ती पूर्ण होईपर्यंत ह्या विटेवर थांब’असे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ता मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलीक ओळखला जातो. पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे.

पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखी तीन कथा सांगण्यात आल्या आहेत: (१) डिंडिरव वनातल्या डिंडीरव ह्याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णुने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा ह्या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो. (२) कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही, म्हणून रूक्मिणी रूसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रूक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपुर हे एक वाडीवजा गाव आहे, तिथे गोपाकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाचा काला दिला जातो. त्यानंतर बारीची सांगता होते. दिंडीरवनात लखूबाई नावाच्या देवतेचे मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्तीरूप आहे. कृष्णावर रूसून दिंडीरवनात आलेली रूक्मिणी म्हणजेच ही लखूबाई असे समजले जाते. (३) पद्मा नावाच्या एका सुंदर तरूण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तो तिच्या समोर प्रकट झाला. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती ह्या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. ह्या कथांपैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रूक्मिणीची कथा पाद्म पांडुरंगमहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कांद आणि पद्म अशा दोन्ही पांडुरंगमहात्म्यात आलेली आहे. ही पांडुरंगमाहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्त्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत.

विठोबाची स्थापना व पूजन पंढरपूर येथे कधी सुरू झाले, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि होयसळ राजा विष्णुवर्धन किंवाबिट्टिदेव किंवा बिट्टिग (बारावे शतक) ह्याने पंढरपूरचे देऊळ बांधले असावे, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे. स्वतःच्या नावापासून तयार झालेले ‘विठ्ठल’ हे नाव त्याने आपल्या उपास्य देवतेला दिले असावे, असेही ग. ह. खरे ह्यांना वाटते.

विठोबाची मूर्ती: पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा खाली येईल, अशा प्रकारे कमरेवर ठेवला आहे. कमरेस तिहेरी मेखला आहे. दोन पायांना जोडणारा असा एक दगडी भाग पायांमध्ये आहे. त्यास ‘काठी’ असे म्हणतात. कमरेवर वस्त्र असल्याच्या खुणा दिसत नाहीत असे मूर्तीकडे पाहता वाटते. संतांनीही विठोबाला अनेकदा ‘दिगंबर’ म्हटले आहे. तथापि-काहींच्या म्हणण्यानुसार-विठोबाच्या कमरेस वस्त्र आहे, असे मानल्यास काठीस विठ्ठलाच्या वस्त्राचा सोगा म्हणता येईल व हा सोगा मूर्तीच्या पावलांपर्यंत आलेला आहे, असेही म्हणता येईल. ही पावले एका चौकोनावर असून त्यालाच ‘वीट’ म्हणतात. ह्या विटेखाली उलटे कमळ आहे. शिंक्याची दोरी व काठी अशा ज्या वस्तू दाखविल्या जातात, त्या खरोखरीच तशा आहेत, असे ग.ह. खऱ्यांसारख्या इतिहासज्ञाला वाटत नाही.

उपर्युक्त वर्णन हे पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात आज दिसत असलेल्या विठोबाच्या मूर्तीचे आणि ग.ह. खरे यांनी केलेले आहे. तथापि पंढरपूरचे मंदिर श्रीज्ञानदेवांच्याही पूर्वीचे असून तेथे जी मूळ वा आद्य मूर्ती होती, ती ही नसावी, असे मत व्यक्त केले जाते. १६५९ साली झालेल्या अफजलखानाच्या स्वारीसारखे जेव्हा येत, तेव्हा सुरक्षित ठेण्यासाठी म्हणून विठोबाची मूर्ती मंदिरातून चिंचोली, गुळसरे, देगाव ह्यांसारख्या पंढरपूरच्या गावांत हलविण्यात येई, असे दिसते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी मूर्ती पंढरपूरजवळच असलेल्या माढे गावात नेऊन ठेविली होती आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती तेथून पुन्हा पंढरपूरात आणली, असे इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ह्या संकटाचे स्मरण म्हणून माढे येथे विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ आणि मूर्ती स्थापण्यात आली, असेही राजवाडे सांगतात. विजयनगरचा राजा कृष्णराय वा ⇨कृष्णदेवराय (कार. १५०९-१५२९) हयास ठिकठिकाणच्या देवमूर्ती आणून त्यांचा विजयनगरात स्थापना करण्याचा हव्यास होता. पंढरपूची विठ्ठलमूर्तीही त्याने विजयनगरास नेली होती आणि एकनाथांचे पणजे संत भानुदास ह्यांनी ती पुन्हा पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे. ह्या आख्यायिकेला खुद्द एकनाथांनी भानुदासांच्या दिलेल्या माहितीत आधार सापडत नाही परंतु पैठण येथील एकनाथांच्या वाड्यातील विठोबाच्या मूर्तीचे ‘विजयविठ्ठल’ असे नाव आहे. ही मूर्ती विजयानगर साम्राज्याच्या काळातील दक्षिणी विठ्ठलमूर्तीसारखीच दिसते परंतु ती आकाराने लहान वाटते. भानुदासांच्या आख्यायिकेचा पक्का निर्णय करण्यासारखी साधने उपलब्ध नसली, तरी पंढरपूरच्या मंदिरातील विठोबाची मूर्ती वेळोवेळी हालविली जात होती व ह्या हालवाहालवीतच मूळ मूर्ती केव्हा तरी बदलली गेली असेल किंवा काय, असा प्रश्न निर्माण होतो.  

ह्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी ह्या आद्य विठ्ठलमूर्तीची विश्वासार्ह वर्णने कोठे मिळत असल्यास पाहिली पाहिजेत आणि तशी ती मिळतात, असे ह्या विषयाचा अलीकडच्या काळात विशेष आणि सखोल अभ्यास केलेले संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांचे म्हणणे थोडक्यात असे : विठोबाचे पंढरपूरचे माहात्म्य सांगणारे तीन संस्कृत ग्रंथ (पांडुरंगमाहात्म्ये) आज उपलब्ध आहेत. त्यांतील स्कांद पांडुरंगमहात्म्य आणि पाद्म पांडुरंगमहात्म्य अनुक्रमे स्कंद व पद्म पुराणांतर्गत असल्याचा दावा करणारी आहेत. ह्या दोन पांडुरंगमाहात्म्यांचा निर्देश वर आलेलाच आहे. (तिसरे पांडुरंगमाहात्म्य हे विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणारे असून त्याची एकुलती एक उपलब्ध प्रत डॉ. ढेरे ह्यांच्या संग्रही आहे). ह्या सर्व पांडुरंगमाहात्म्यांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे सर्वां  त प्राचीन-म्हणजे निवृत्ती-ज्ञानदेवांच्याही पूर्वीचे आणि अगदी काटेकोरपणे सांगावयाचे झाल्यास रामदेवराय यादवाचा कारणाधिप हेमाद्री (तेरावे शतक, उत्तरार्ध) ह्याच्याही पूर्वीचे-आहे. ह्या स्कांद पांडुरंगमाहात्म्यास पंढरपूर आणि श्रीविठ्ठलाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पाद्म पांडुरंगमाहात्म्याची रचना सोळाव्या शतकात आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा करणाऱ्या उपर्युक्त पांडुरंगमाहात्म्याचीही रचना त्याच सुमारास झाली असावी.

उपर्युक्त स्कांद पांडुरंगमाहात्म्यात पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील मूर्तीची जी अनन्यसाधारण लक्षणे सांगितली आहेत, त्यांतले एक म्हणजे त्या विठ्ठमूर्तीच्या हृदयावर मंत्राक्षरे आहेत. श्रीविठ्ठलाचाच मंत्र तेथे कोरलेला आहे. तेथे विठोबाला ‘महामंत्रयुतः’ हे विशेषण लावलेले आहे. त्याचप्रमाणे ‘देवाच्या हृदयावर मंत्राक्षरे पाहावयास मिळतात’ अशा आशयाचे स्पष्ट विधानही तेथे आहे. (मंत्राक्षराणि ….दृश्यन्ते तस्य वक्षसि). पाद्म पांडुरंगमाहात्म्यातही ‘श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला षडक्षराम्’। असा षडक्षर मंत्राचा निर्देश आहे. विठ्ठलसहस्त्रनामस्तोत्रात विठोबाला ‘षडक्षरमय’ म्हटले आहे. विठ्ठलाष्टोत्तरशतनामस्त्रोत्रात ‘मंत्राक्षरावलीहृत्स्थः ’ असे त्याचे वर्णन केलेले आहे. श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणजेच प्रसिद्ध आख्यान कवी ⇨श्रीधर (१६५८-१७२९) ह्यांनी पंढरीमाहात्म्य ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या एका मराठी पांडुरंगमहात्म्यात (एकूण अध्याय दहा) विठ्ठलाच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा कितीतरी वेळा निर्देश केलेला आढळतो. श्रीधर हे पंढरपूरजवळच्याच नाझरे गावचे. पंढरपूरच्या मंदिरातील मूर्ती त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातील होती. ती मूर्ती प्रत्यक्ष पाहून त्यांनी ह्या षडक्षर मंत्राचा निर्देश केला असणे शक्य वाटते. संत सावता माळी ह्यांनी विठ्ठलमूर्तीचे वर्णन करताना आपल्या एका अभंगात ‘विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्ध’।। असे शब्द वापरले आहेत. अशी मंत्रसिद्ध मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठलमंदिरात नाही. ती माहादाजी निंबाळकर ह्यांनी माढे येथे बांधलेल्या विठ्ठलमंदिरात आहे. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती माढे येथे नेऊन ठेवली होती व ते संकट टळल्यावर ती पुन्हा पंढरपूरला आणण्यात आली. त्या संकटाच्या स्मृतिप्रीत्यर्थ माढे येथे जे विठ्ठलमंदिर बांधण्यात आले असे राजवाडे म्हणतात, तेच हे मंदिर. ह्या मंदिरात पंढरपूर येथील आद्य मूर्तीचीतंतोतंत प्रतिकृती माढेकरांनी स्थापन केली असली पाहिजे, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीच्या नित्य सहवसात असलेले काशीनाथ उपाध्याय उर्फ बाबा पाध्ये ह्यांनी रचिलेल्या विठ्ठलध्यानमानसपूजा ह्या स्तोत्रात त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे जे तपशीलवार वर्णन केलेले आहे, त्यात मूर्तीच्या हृदयावरील षडक्षर मंत्राचा स्पष्ट उल्लेख आहे. बाबा पाध्ये हे १८०५ मध्ये निधन पावले हे पाहता, पंढरपूरची आद्य विठ्ठलमूर्ती पंढरपूर येथे १८०५ पर्यंत तरी होती, असे ढेरे ह्यांना वाटते.

माढे येथील ही मूर्ती पूर्ण दिगंबर आहे. तिच्या मस्तकावर कंगोरा असलेली, गवळ्याच्या टोपीसारखी टोपी आहे. कानांत शंखाकार कुंडले आहेत. ती मूर्तीच्या खांद्यांवर टेकलेली आहेत. मूर्तीने धारण केलेल्या दोन माळांपैकी एक गळ्याशी आणि दुसरी हृदयावर लोंबणारी आहे. ह्या माळेत कौस्तुभमणी आहे. ह्या दोन्ही माळांनी साधलेल्या त्रिकोणात तो मंत्र आहे. मंत्राच्या अखेरीस ‘श्रीवत्स’ असा शब्द आहे. कमरेला श्रुद्रघंटिका असलेला पट्टा आहे. डाव्या हातात शंख असून उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकलेला आहे. ह्या हाताच्या बोटात कमलकळी आहे. दोन्ही हात कमरेवर आहेत. दंडांत भुजबंध व मनगटांवर कडी आहेत. ह्या मूर्तीच्या भाळावर तिसरा नेत्र आहे, हे खास वैशिष्ट्य. मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोऱ्या कपाळावरून मागे, दोन्ही बाजूंना गेल्या आहेत. डाव्या बाजूची दोरी मात्र खाली आलेली दिसत नाही. पंढरपूरप्रमाणेच माढे येथील मंदिरातही विठ्ठल हा एकटा आहे. त्याच्या समवेत रखुमाई नाही.

भाळावर तिसरा नेत्र आणि दिगंबरत्व अशी मूळ मूर्तीची अन्य दोन अनन्यसाधारण लक्षणे स्कांद पांडुरंगमाहात्म्यात सांगितलेली असून ती माढे येथील मूर्तीत स्पष्टपणे दिसून येतात. स्कांद पांडुरंग माहात्म्यातील वर्णन हे पुंडलिकासाठी पंढरपुरात आलेल्या श्रीकृष्णाच्या रूपाचे वर्णन करण्यासाठी आलेले आहे व ते माढे येथील मूर्ती दृष्टीसमोर ठेवून केल्यासारखे वाटावे, इतके साम्य त्या वर्णनात आणि माढे येथील विठ्ठलमूर्तीत आहे, असे, डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.

पांडुरंगमाहात्म्यांनी असे सांगितले आहे, की पंढरपुरात विठोबाची तीन रूपे आहेत : एक, प्रत्यक्ष मंदिरातले दुसरे, संपूर्ण पंढरपुराला व्यापून राहिलेले आणि तिसरे, चंद्रभागेच्या प्रवाहाच्या रूपाने अस्तित्वात असलेले. कवी श्रीधरांनी दहा अध्यायांचे पंढरीमाहात्म्य किंवा पांडुरंगमाहात्म्य जसे रचले आहे, तसेच बत्तीस अध्यायांचे दुसरे एक पांडुरंगमाहात्म्य (हा छोट्या पांडुरंगनाहात्म्याचाच विस्तार) लिहिले आहे. त्यात विठोबाच्या उपर्युक्त तीन रूपांखेरीज त्याच्या तीन मूर्तीचाही निर्देश आहे: एक, मुख्य स्थानावरील मूर्ती दुसरी, लक्ष्मीपुढची (म्हणजेच लखूबाईपुढची) आणि तिसरी, पुंडलिकासमोरची. लखुबाई आणि पुंडलिक ह्यांच्या समोर आज विठ्ठलमूर्ती दिसत नाही. मुख्य मूर्तीबद्दल श्रीधरांनी लिहिले आहे :‘मुख्य जे पांडुरंगस्थान । तेथे न करावे आरोहण।’ ‘आरोहण’ ह्या शब्दातून उंच ठिकाणावर चढून जाण्याची कल्पना सूचित होते. तेथे आरोहण केल्यास दारूण परिणाम होतील, असाही धाक श्रीधरकांच्या ओवीतून दाखविलेला आहे. त्यामुळे अगदी आरंभी ही मूर्ती नुसतीच एखाद्या उंचवट्यावर, मंदिर नसलेल्या अवस्थेत होती किंवा काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.

ग. ह. खरे ह्यांच्या मते पंढरपूर येथील विठ्ठलाची मूर्ती प्राचीन किंवा मध्ययुगीनही म्हणता येणार नाही, परंतु आधुनिक म्हणजे शेसवाशे वर्षातील ती आहे असेही म्हणवत नाही.

 विठोबाच्या अन्य काही मूर्ती: अहोबलम् (आंध्र प्रदेश) येथे असलेली विठ्ठलमूर्ती कमळ काढलेल्या एका बैठकीवर कमरेवर हात ठेवून उभी आहे. हिच्या हातांत आणि कमलनाल आहेत. मस्तकावर उंच, टोपीवजा नक्षीदार मुकुट आहे. ही मूर्ती पंढरपूर येथे असलेल्या विठ्ठलमूर्तीपेक्षा खूपच जुनी असल्याचे ग. ह. खरे ह्यांचे मत आहे.

मुंबईतील जोगेश्वरी गुहेत आढळणारी एक भग्न मूर्ती विठ्ठलाची असावी, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे. ह्या मूर्तीचे मस्तक, हात आणि गुडघ्यापासूनचा खालचा भाग नाहीसा झाला आहे, परंतु गळ्यात मोत्यांचा कंठा आणि कमरेस मेखला दिसते. मूर्तीचे धोतर गुडघ्यापर्यंत आलेले आहे. डाव्या मांडीवर धोतराच्या सुरकुत्या दिसतात, तसेच मेखलेचा लोंबता पदरही दिसतो. पोकळीत बोटे घातलेला शंखही आहे. मेखलेचे एक टोक उजव्या मांडीवर आहे. गळ्यातल्या कंठ्याच्या फिती पाठीवर दिसतात. छातीच्या उजव्या भागावर लांब व कुरळ्या केसांची एक बट दिसते. ही मूर्ती आठव्या शतकाच्या उत्तरार्धातली असावी, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे.

मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियममध्ये घारापुरीच्या लेण्यांतून आणलेली एक उभी मूर्तीही विठ्ठलाची असण्याची शक्यता वाटते. ही मूर्तीही भग्नावस्थेत आहे. हिच्या कमरेच्या वरचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. कमरेस वस्त्र, वर मेखला, डाव्या मांडीवर टेकलेला व पोकळीत डाव्या हाताची बोटे असलेला शंख हे सर्व स्पष्ट दिसते पण ह्या मूर्तीच्या उजव्या बाजूस एक उभी स्त्री व डाव्या बाजूस उभा, बुटका आणि लठ्ठ असा गण आहे. ही मूर्ती आठव्या शतकाच्या दुसऱ्या पावक्यातील असावी, असा ग. ह. खरे ह्यांचा तर्क आहे.

कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्‌ळी येथे, तसेच हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्न केशवाच्या मंदिरात, वसरूल (जि. मंड्या) येथील मल्लिकार्जुनमंदिरात आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे विठ्ठलमूर्ती आहेत. बेल्लारी जिल्ह्यातील हंपी येथील विरूपाक्षमंदिरातही विठ्ठलमूर्ती आहे.

तमिळनाडूत श्रीरंगम् (जि. तिरुचिरापल्ली) येथील रंगनाथमंदिरात, तंजावर येथील विष्णुमंदिरात विठ्ठलमूर्ती असून ती श्रीदेवीभूदेवीसह आहे. हैदराबाद येथे एका खाजगी संग्रहात विठ्ठलाची एक सुबक मूर्ती.

अहमदनगर जिल्ह्यात आणि नेवाशाजवळ टाकळीभान म्हणून असलेल्या एका गावी एका मंदिरात चतुर्भुज विठ्ठल आढळतो. हे मंदिर यादवकालीन आहे, असे मत सुरेश जोशी ह्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. टाकळीभान येथील विठ्ठलमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीला मिशा कोरलेल्या आहेत, चांदीचे डोळे बसविले आहेत. मस्तकावर शाळुंकेसह शिवलिंग स्पष्टपणे कोरलेले आहे. येथे विठ्ठलाला चार हात आहेत. ह्या मूर्तीची शैली लोकशिल्पाची आहे. आज उपलब्ध असलेल्या विठ्ठलाच्या मूर्ती पाहिल्या, तर त्या कधी दोन हात, तर कधी चार हात असलेल्या आहेत. काही विष्णूच्या रूपात आहेत, तर काही गोपाळकृष्णाच्या रूपात आहेत. मूर्तीच्या हाती कधी शंख-चक्र, तर कधी शंख-पद्म आहे. कधी शंख-वरदमुद्रा, तर कधी शंख अभयमुद्रा आहे. चौकोनी पादपीठावर वा विटेवर उभ्या असलेल्या मूर्ती आहेत पण कमलफुलात पाय घोट्यांच्या वरपर्यंत झाकलेली मूर्तीही आढळते. कमरेवर हात असणे हे मात्र सर्व मूर्तीना समान असे लक्षण आहे. कोणत्याही मूर्तिलक्षणग्रंथाचा विठ्ठल हा विषय झालेला नाही, मात्र दक्षिणेतील अनेक प्राचीन विठ्ठलमूर्ती ह्या स्कांद पांडुरंगमाहारम्यात वर्णन केलेल्या विठ्ठलमूर्तीशी बऱ्याच संवादी आहेत, असे डॉ. ढेरे ह्यांनी नमूद केले आहे.

विठ्ठलाची विकसनप्रक्रिया:
विठ्ठल हे एक वैष्णव दैवत मानले जाते. विठ्ठल हे उपास्य दैवत असलेला वारकरी संप्रदाय हा भागवत धर्मातच अंतर्भूत होतो, किंबहुना त्याला भागवत धर्म असेही म्हटले जाते. विठ्ठलाच्या भोवती वैदिकतेचे वलयही आहे.वारकरी संप्रदायाचे एक थोर प्रचारक कीर्तनकार शं. वा. ऊर्फ सोनोपंत दांडेकर म्हणतातः ‘हा पंथ पूर्ण वैदिक आहे किंबहुना सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी ही एक शाखा आहे, असे म्हटले तरी चालेल.’ या पंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याकरिता ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. की याचे तत्त्वज्ञान वैदिक आहे.’ ‘‘या पंथास ‘भागवत धर्म’ ही म्हणतात कारण याचे उपास्य दैवत हे श्रीकृष्णाचे बालस्वरूप समजले जाते.’’ असे असले, तरी विठोबाचा निर्देश श्रुतिस्मृतिपुराणांत आढळत नाही. विष्णुच्या सहस्त्रनामांतही विठ्ठलाचे नाव नाही. विष्णूचे जे चोवीस अवतार पुराणांनी सांगितले आहेत, त्यांतही विठोबा नाहीच. संत त्याचा निर्देश ‘चोविसावेगळा’ आणि ‘सहस्त्रांआगळा’ असा अनेकदा करतात, तेव्हा ते हीच वस्तुस्थिती सांगत असतात. तरीही अकराव्या-बाराव्या शतकापासून विठोबाला फार मोठी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. ही प्रतिष्ठा हा एक विकसनप्रक्रियेचा परिपाक असून विठोबाचे मूळ रूप कोणत्या तरी लोकदेवाचे असले पाहिजे, असे अनेक अभ्यासकांना दीर्घकाळ वाटत आले. त्या दिशेने काही संशोधनही झाले. ‘कटिवर कर’ हे विठ्ठल मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या मूर्ती महाराष्ट्रात-कर्नाटकांतील अनेक गावांत आढळतात. शिळांवर कोरलेल्या ह्या मूर्ती पूज्य वीरांच्या स्मृत्यार्थ घडविलेल्या असतात. त्यांना ⇨वीरगळ म्हणतात प्राप्त झालेला बीर कुअर नावाचा एक आहिर (आभीर) बिहारात होऊन गेला. आहिर त्याला कृष्ण समजू लागले. कर कटी ठेवलेल्या त्याच्या अनेक मूर्ती आहेत. इथल्या गवळी-धनगरांपैकी कुणीतरी असाच मृत्यू येऊन पूजनीय ठरला असावा आणि नंतर कृष्णरूप (विठ्ठलरूप) झाली असावा असे डॉ. जी. ए. दलरी, डॉ. म्यूंथर सोनथायमर, डॉ. शं.गो. तुळपुळे डॉ. माणिकराव धनपलावर ह्यांसारख्या विठ्ठलाभ्यासकांचे म्हणणे आहे. डॉ. दलरी ह्यांनी आपल्या मताची मांडणी करीत असतात बिहारातील बिहारमधील बीर कुअरांचे उदाहरण दिलेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटकांत आपल्या गाईगुरांचे रक्षण करताना मृत्यू पावलेल्या वीरांच्या स्मारकशिला (किंवा वीरगळ) बऱ्याच असून अशा शिळेला ‘बिट्टिग’ असे म्हणतात, आणि ह्या शब्दापासून ‘विठ्ठल’ हे नाव बनले असे त्यांचे प्रतिसादन आहे. स्मृतिशिलांच्या रूपाने आढळणारे हे वीरदेव विठोबाप्रमाणेच कमरेवर हात ठेवलेल्या रूपात आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकांच धनगरांचे म्हणून जे देव आहेत, त्यांत विठोबाचा समावेश आहे, हेही डॉ. दलरी सांगतात. महानुभाव संप्रदायाच्या लीळाचरित्रात एके ठिकाणी असे सांगितले आहे, की विठ्ठल हा गाई चोरणारा होता आणि गाईचे रक्षण करणाऱ्यांकडून तो मारला गेला. डॉ. दलरी ह्यांचे म्हणणे असे, की द्वेषबुद्धीने मूळची कथा विकृत करून येथे विठ्ठलाला गो-चोर ठरविलेले दिसते. तो खरोखरी गोरक्षकच असला पाहिजे. ह्या कथेत विठ्ठलाला ‘वीर’ म्हटले आहे तसेच तो गोरक्षकांकडून मारला गेल्यानंतर त्याच्या पुत्रांनी त्याच्या स्मरणार्थ एक ‘भडखंब्रा’ (स्तंभ) उभा केला व त्या स्तंभाच्या माथ्यावर लिंग स्थापना केली, असेही म्हटले आहे. पुढे त्या स्मारकास देवत्व प्राप्त झाले व विठ्ठल लोकाचे मनोरथ पुरवू लागला हेही ही कथा सांगते.

पंढरपूर येथे महाद्वारासमोर एका वीराची स्मारकशीला डॉ. सोनथायमर ह्यांना दिसून आली व त्यांनी डॉ. तुळपुळे ह्यांच्या ती नजरेस आणल्यानंतर डॉ. तुळपुळे ह्यांनी त्या वीरगळात विठ्ठलाचे मूळरूप असते पाहिजे, असे मत मांडले व डॉ. दलरी ह्यांच्या मताला पुष्टी दिली. आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्यात पलनाडू म्हणून एक ठिकाण असून तेथे बरेच वीरगळ आहेत व त्यांनाही वैष्णव प्रतिष्ठा मिळालेली आहे, असे माणिकराव धनपलवार ह्यांनी दाखून डॉ. दलरी ह्यांच्याशी सहमती दर्शवली आहे.

 तथापि वीरगळ हे विठ्ठलाचे मूलरूप असावे, हे मत डॉ. ढेरे ह्यांना मान्य नाही. वर दिलेली लीळाचरित्रातील कथा प्रक्षिप्त आहे, हे स्पष्ट दिसते. शिवाय विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे, हे महानुभाव पंथास मान्य नाही त्याचप्रमाणे ह्या पंथाच्या दृष्टीने विष्णू पंथास मान्य नाही त्याचप्रमाणे ह्या पंथाच्या दृष्टीने विष्णू आणि त्याचे कृष्णवादी अवतार हे कनिष्ठ देवतांपैकी होत. विठ्ठलाबद्दलचा अनुदार भावही त्यांच्या साहित्यात काही ठिकाणी प्रकट दिसतो. तोच भावही त्यांच्या साहित्यात काही ठिकाणी प्रकट झालेला दिसतो. तोच भाव त्यांच्या साहित्यात काही ठिकाणी प्रकट झालेला दिसतो. तोच भाव विठ्ठलाला गो-चार ठरविणाऱ्या ह्या कथेत ठळकपणे व्यक्त झालेला आहे. ह्याच कथेचा काहीसा सौम्य असा एक पाठही मिळतो. पण अशा एखाद्या कथेचा आधार घेऊन विठ्ठलाचे मूलरूप शोधण्याचा प्रयत्न करणे योग्य होणार नाही, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. आंध्र प्रदेशातील पलनाडूत ज्या वीरगळांना वैष्णव प्रतिष्ठा मिळाली आहे त्यांपैकी कोणालाही ‘विठ्ठल’ हे नाव मिळालेले नाही, असेही त्यांनी दाखवून दिले आहे. पंढरपूर येथील महाद्वारासमोरील वीरगळ हेच विठ्ठलाचे मूलरूप असते, तर विठ्ठलाच्या जवळच ते असल्याने विठ्ठलाच्या पूजाअर्चेत त्यालाही काही प्रतीकात्मक स्थान प्राप्त झाले असते पण तसे झालेले दिसत नाही.

डॉ. ढेरे ह्यांच्या मते विठोबा हा मूलतः गोपजनांचा देव आहे. दक्षिणेत संचार करणाऱ्या अथवा अर्धस्थिर अशा स्थितीत जगणाऱ्या गवळी-धनगर गोल्ल-कुरुब ह्यांसारख्या गाई-गुरे-शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्या जमातींचा देव आहे. गोल्ल-कुरुब हे आंध्र-कर्नाटकांतले आणि गवळी-धनगर हे मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रातले होत. त्यांचा निर्देश आंध्र-कर्नाटकांत ‘यादव’ म्हणूनही केला जातो. पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा ज्यांनी वाढविला, ती अनेक राजकुले यादवच आहेत (उदा., देवगिरीचे तीन ‘यादव’ राजे-कृष्ण, महादेव आणि रामचंद्र स्वतःला अभिमानाने यादव म्हणवून घेणारा, होयसळ वंशातला, वीर सोमेश्वर हा राजा इ.) हे डॉ. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. तमिळ भाषेत मेंढराला ‘याडु’ म्हणतात. ह्या शब्दापासून ‘यादव’ शब्द बनला ‘यादव’ हे ‘याडव’ चे संस्कृतीकरण असावे. सेऊण यादवांचा आदिपुरुष तर गाईंचे रक्षण करणारा शूर वीर होता, हेही डॉ. ढेरे दाखवून देतात. धुळे, औरंगाबाद, नगर येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेले गोपाळ ह्या जमातीचे लोक पंढरपूरजवळील गोपाळपुऱ्यात राहत असत, असे एका पारंपरिक कथेत म्हटले आहे. ह्या गोपाळपुऱ्यास पंढरपूरच्या वारीत मोठे महत्त्व आहे आणि रुसलेल्या रक्मिणीची समजूत काढण्यासाठी कृष्ण प्रथम गोपाळपुऱ्यासच गोपवेषाने आला. अशीही कथा आहे.

डॉ. ढेरे ह्यांच्या मते, विठ्ठल-बीरप्पा ह्या धनगर-गवळ्यांसारख्या गोपजनांच्या जोडदेवांपैकी एक असलेला विठ्ठल हा पंढरपुरच्या विठ्ठलाचे आदिरूप होय. धनगरी विठ्ठल हा नेहमी बीरप्पासमावेत असतो एकट्या बीरप्पाची स्वतंत्र ठाणी आढळतात पण एकट्या विठ्ठलाची तशी आढळत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यांतील हातकणंगले तालुक्यात असलेले पट्टणकोडोली, सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर आणि सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे विठ्ठल-बीरप्पाची ठाणी आहेत पट्टणकोडोली येथे दर वर्षी भोबी पौर्णिमेनंतर (आश्विन पौर्णिमेनंतर) मृग नक्षत्रावर तीन दिवस विराट यात्रा भरत असते. पट्टणकोडली येथे वारी-दिंड्याही येतात.

एक संशोधक वा. दा. मुंडले ह्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दोन वार्षिक इतिवृत्तांमधून (१९१४, १९१५) प्रसिद्ध केलेल्या धनगरी गीतांपैकी दोन गीते विठ्ठलाच्या विकासप्रक्रियेच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाची आहेत. विठ्ठल-बीरप्पा हे पट्टणकोडली (जुने नाव इंगळकोडोली) येथे कसे आले ह्याची कथा ह्यांपैकी एका गीतात मिळते. इंगळकोडीली इथले मूळ लिंगायत रहिवासी आणिनंतर तेथे वस्ती करावयास आलेले धनगर ह्यांच्यात संघर्ष आणि समन्वय झाला, हे कथा सांगते. ह्या कथागीतात इटल-ब्रमल (विठ्ठल आणि बीरोबा) ही नावे एकत्र आहेत. दुसऱ्या कथागीतात इटल-ब्रमल देवांनी आश्विनी पौर्णिमेला माळावर यात्रा भरवण्याचा विचार कसा केला, त्या यात्रेला यात्रिकांना घेऊन येणारा फरांडे नावाचा कोणी भक्त आणि भंडारा घेऊन येणारा माळिंगराय ह्यांची सर्व व्यवस्था करण्याबद्दलचा निरोप त्यांनी विठ्ठलाच्या बायकोला-पदूबाईला-कसा पाठवला, पदूबाईने ते करण्यास नकार देतात विठ्ठलाने तिला भयंकर शाप कसा दिला, हे सांगितले आहे. विठ्ठलाच्या शापामुळे पदूबाई वेडी झाली. लोकांना धोंडे मारू लागली. पोरे तिच्यावर शेण फेकू लागली. अशा अवस्थेतच तिचे लुगडे कारीला अडकले, चोळी बोरीला अडकली. तिचे आईवडील दुःख करीत तिला सोडवायला आले पण पाच फणा असलेला एक भुजंग तिच्या शरीरावर डोलत होता. त्यामुळे कोणालाच तिला मदत करणे शक्य झाले नाही. पुढे पदूबाईची झालेली दशा तिच्या लेकीला समजली. ती अत्यंत दुःखी झाली, तेव्हा देवाने (इटल देवाने) तिची समजूत काढली. तिला आपल्या उजव्या अंगाला बसण्याचा आणि ‘सात रोज’ जत्रेत आरवण्या-मिरवण्याचा मान दिला.

दुर्गा भागवत ह्यांनी लोकसाहित्याची रूपरेखा (१९५६) व पैस (१९७०) ह्या आपल्या ग्रंथात पदूबाईची हीच कहाणी थोड्या वेगळ्या तपशिलांनी दिलेली आहे. ह्या कथेत विठोबा हा मल्हारीदेवाचा मांडलिक राजा आणि माळशिरसला राहणारा दाखविला आहे. खानदेशचा भक्त त्याची राणी पद्मावती (म्हणजे पदूबाई) म्हणून आहे. खानदेशचा भक्तशिरोमणी माळीगया (म्हाळिंगराय) बरीचशी माणसे घेऊन विठोबाच्या दर्शनाला येत होता. विठोबाने पद्मावती राणीला निरोप धाडला, की ह्या माणसांची व्यवस्था ठेवा. पद्मावती घरातली कामे करून थकली असतानाच हा निरोप आल्यामुळे चिडली आणि तिने ह्या पाहुण्यांची व्यवस्था करण्यास नकार दिला. विठोबाला हे कळल्यावर त्याला फार दुःख झाले. त्याने बायकोला शाप दिला,की तुझे माझे नाते तुटले. उद्या सकाळी नदीवर पाणी भरायला गेलीस, की तुझी सोन्याची घागर बुडेल, तू वेडी होऊन सैरावैरा भटकत राहशील, तुला कोणाचाही आश्रय मिळणार नाही, तू रानात एकटी मरशील, तुझ्या हाडालाही कुणी मायेने शिवणार नाही. हा साप खरा ठरून पदूबाई रानात मरून पडली. ही वार्ता कळताच पदूबाईचे आईवडील धावत आले पण विठोबा नाग होऊन वाटेत आडवा आला. त्याने तिच्या आईबापांना पुढे येऊ दिले नाही. तिचे केस तोडून एका चिंचेच्या झाडाला टांगले. घारीगिधाडांकडून त्याने तिचे प्रेत खाववले. मेघांनी त्याच्या आज्ञेने मुसळधार पाऊस पाडला आणि पदूबाईच्या अस्थी समुद्रात वाहून गेल्या. पण ह्या गोष्टीचा भक्तराज माळीरायाला (म्हाळिंगरायाला) अत्यंत खेद झाला. त्याने समुद्रकाठी तप सुरु केले. बारा वर्षांनी (बारा दिवसांनी असाही निर्देश मिळतो) समुद्राने पदूबाईच्या अस्थी माळीरायाला परत केल्या. त्याने त्या पंढरपूरच्या पद्मतीर्थ तळ्यात टाकल्या. त्या तळ्यात त्यानंतर एक कमळ उमलून आले. विठोबालाही पदूबाईच्या मृत्यूचे आता दुःख होते. तोही राज्य सोडून भटकत होता. भटकत भटकत तो चंद्रभागेच्या तीरी आला. पद्मतीर्थात उमललेल्या सुंदर कमळाचा त्याला मोह पडला व त्याने ते तोडले त्याच क्षणी त्यातून पदूबाई जिवंत होऊन उभी राहिली. पण आता ती रुक्मिणी झाली. होती. पदूबाई म्हणजेच रुक्मिणी, अशी धनगरांची श्रद्धा आहे. विठोबाचा पदूबाईवरचा राग आता गेला होता पण तिच्यासह एकत्र राहायचे नाही, हा त्याचा निर्धार मात्र पक्का होता. त्यामुळे तो पंढरपुरात वेगळा राहिला पदूबाई म्हणजे रुक्मिणीही वेगळी राहिली.

 पंढरपुरात विठोबा आणि रखुमाई वेगवेगळ्या देवळांत आहेत एकत्र नाहीत, हा निर्देश वर आलेलाच आहे. रुक्मिणीचा रूसवा काढण्यासाठी कृष्ण पंढरपुरात आला, ही पंढरपुरातील विठ्ठल-प्रकटनाची कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आल्याचाही उल्लेख आला आहे. ही रुक्मिणी म्हणजेच पंढरपुरातल्या दिंडीरवनात जिचे मंदिरे आहे, ती लखूबाई होय, असेही समजतात. पद्मावतीचे वा पदूबाईचेही मंदिर पंढरपुरात आहे. पदूबाई आणि लखूबाई ह्या दोन्ही देवता तेथे तांदळ्यां च्या रूपांत पूजिल्या जात आहेत. त्या लोकदेवता आहेत. लखूबाई हे लक्ष्मीचे ग्रामीण मराठी रूप आहे. मेंढ्या आणि गुरे ह्यांच्या रूपाने येणाऱ्या श्रीमंतीची ती देवता आहे. ही देवी मेंढवाड्यात राहते अशी भावना असल्यामुळे तिथे वहाणा घालून जात नाहीत, असे आपले निरीक्षण डॉ. सोयथायमर ह्यांनी नोंदविलेले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड येथे दसऱ्याच्यासुमारास होणाऱ्या धनगरांच्या हुईकाचा (भविष्यकथनाचा) डॉ. प्रभाकर मांडे ह्यांनी एक विस्तृत वृत्तांत लिहिला असून त्यात त्यांनी हुईकापूर्वीच्या म्हटल्या जाणाऱ्या काही धनगरी ओव्याही दिल्या आहेत. त्यांत विठोबाचा उल्लेख असून ‘भक्त कुंडलिका’साठी (म्हणजेच पुंडलिकासाठी) विठोबा पंढरपुरी अठ्ठावीस युगे उभा असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर देवाच्या धनगर-भक्तांचे जे उल्लेख आले आहेत त्यांत ‘राजोबा म्हाळोबा भक्त गेले होऊन’ असे म्हटले आहे. त्यांपैकी म्हाळोबा म्हणजेच म्हाळिंगराय वा महालिंगराय असल्याचे चटकन सुचित होते. म्हाळिंगराय पदूबाईच्या कथेत आलेला आहेच.

विठ्ठल हा गोपजनांचा देव आहे, असे मत विठ्ठलाच्या अभ्यासक्षेत्रात प्रथम दुर्गा भागवत ह्यांनी मांडले, डॉ, जी. ए. दलरी आणि ग्यंथर सोनथायमर ह्यांनी त्या दिशेने काम केले. डॉ. ढेरे ह्यांनी ह्याच दिशेने विपुल आणि सखोल संशोधन करून श्रीविठ्ठल:एक महासमन्वय (१९८४) हा आपला ग्रंथ लिहिला.

विठोबाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण:विठोबा हा मूळ एक लोकदेव असला, तरी अन्य अनेक लोकदैवतांप्रमाणे त्याची कीर्ती मर्यादित न राहता ती सतत वाढत गेली. इतकी, की समाजातल्या शास्त्री-पंडितांना त्याला शास्त्रप्रतिष्ठा देणे भाग पडले आणि त्या दृष्टीने विठ्ठलाचे वैदिकीकरण आणि वैष्णवीकरण घडवून आणण्यात आले. ही प्रक्रिया संतांच्या उदयापूर्वी सुरू झाली आणि आजही ती चालू आहे, असे डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे. त्यांच्या मते, पंढरपुरची स्थळपुराणे प्रसिद्ध असलेल्या तीन संस्कृत पांडुरंगमाहात्म्यांची रचना हा ह्या प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग होय. ही माहात्म्ये रचताना अनेक लोककथांना पुराणकथांचे रूप देण्यात आले.

श्रीज्ञानदेवांच्या अनुभवामृताचे आणि चांगदेवपासष्टीचे संस्कृतात रूपांतर करण्यात आले. विठोबाला वैदिक वलय प्राप्त करून देण्यासाठी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ‘द्वे विरूपे चरतः . . .’ अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या पंचाण्णवाव्या सूक्ताचा अर्थ विठ्ठलपर लावण्याचाही प्रयत्न पंढरपूर येथील एक धर्मपंडित काशीनाथ उपाध्याय ऊर्फ बाबा पाध्ये ह्यांच्या विठ्ठलऋङ्मंत्रसारमाष्य ह्या ग्रंथात करण्यात आलेला आहे. विठ्ठलशास्त्री धारूरकर ह्यांनी आपल्या पंढरीतत्त्वविवेक ह्या मराठी ग्रंथात ऋग्वेदाच्या उपर्युक्त पंचाण्णावाव्या सूक्तातील पाच ऋचांचा विठ्ठलपर अर्थ दिला आहे. आपला ग्रंथ लिहिताना त्यांनी विठ्ठल ऋङ्मंत्रसारभाष्याचा आधार घेतला आहे. ‘द्वे विरुपे . . .’ ह्या ऋचेचा आशय मराठी अनुवादात असाः ‘भिन्न रूपांच्या दोघी (रात्री आणि उषा) आपापल्या कामाविषयी तप्तर होऊन भ्रमण करीत असतात. (त्या) एकमेकी एकमेकींच्या वाळांना स्तनात करवितात. एकीच्या जवळ पीतवर्णाचा (बालक) तेजस्वी होतो, दुसरीच्या जवळ निर्मळ कांतीचा (बालक) महातेजस्वी दिसू लागतो.

पंढरीतत्त्वसतविषेकात ह्या ऋचेच्या पदांच्या विठ्ठलपर अर्थ लावून दिलेला प्राकृतार्थ असा आहे: ‘सुस्वरूप अशा दोन भगवंताच्या मूर्ती आपल्या भक्तांस मोक्ष देण्याकरिता, पुंडरिकाचे आश्रमाचे ठायी संचार करितात आणि परस्परसंमुख होऊन आपला वत्स (जो पुंडरीक) त्यास सादर पाहतात. आता दोन मूर्तीपैकी हरी ही भक्तजनांच्या भावबंधनाचा नाश करणारी अशी तीर्थरूपाने आहे.(ह्या अभिप्रायास अनुसरून तुकाराम एका अभंगात म्हणतात : ‘ तुका म्हणे चंद्रभागा । स्वरूप तुझे पांडुरंग ’।।) व दुसरी शुक्रः (पांडुरंग) रूपाने राहिलेली आहे, जीस सर्व लोक पाहतात. ’

श्रीगोपाळाचार्य ह्या नावाच्या एका वैष्णव शास्त्र्यांनी श्रीमद्विठ्ठलभूषण ही सात पानांची पोथीस लिहिली आहे. तीत निरनिराळ्या संस्कृत ग्रंथातील विठ्ठलविषयक संदर्भ संग्रहीत आहेत. ‘द्वे विरूपे…’ हे ऋग्वेदातील सूक्त ह्या पोथीरही विठ्ठलपर लावून दाखविलेले आहे. ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् लाति गृहणाति विठ्ठलः ’म्हणजे‘जो अज्ञ जनांचा ज्ञानाने स्वीकार करतो, तो विठ्ठल ’-अशी विठ्ठल ह्या नामाची निरूक्ती ह्या पोथीत दिलेली आहे. भगवद्‌ गीतेप्रमाणेच अठरा अध्याय, अठरा योग, तीन कांडे आणि सातशे श्लोक असलेली एक विठ्ठलगीताही रचण्यात आली आहे. ती संस्कृतात असून तीवर ओवीबद्ध मराठी विवरणही दिलेले आहे. तिचा कर्ता अज्ञात आहे पण ‘श्रीसिद्धानुसार’ असा त्याने स्वतःचा निर्देश दोन ठिकाणी केलेला दिसतो. गीता हा कृष्णार्जुनसंवाद आहे. त्याचप्रमाणे विठ्ठलगीता हा विठ्ठल आणि तुल्येंद्र (तुकाराम ह्या नावाचे करण्यात आलेले संस्कृत रूप) ह्यांच्यातील संवाद आहे. विठ्ठलगीतेच्या पहिल्या अध्यायात विठ्ठल ह्या नावाच्या काही व्युत्पत्त्या दिलेल्या आहेत. त्यांत ‘विदा ज्ञानेन….’ही आहेच. मात्र येथे ती ‘विदा ज्ञानेन ठान् शून्यान् भक्तिहीनान् लाति गृहणातीति विठ्ठलः ’अशी दिलेली आहे. श्रीविठ्ठलप्रतिष्ठा हे नाव दिलेल्या एका हस्तलिखितात श्रीविठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी समंत्रक विधिविधान सांगितले आहे. विठ्ठलपंचरत्न ह्या नावाने पाच संस्कृत स्तोत्रांचा समुच्चय ओळखला जातो. विठ्ठल हा विष्णू असल्याची स्पष्ट जाणीव श्रीविठ्ठप्रतिष्ठा आणि विठ्ठलपंचरत्नांपैकी विठ्ठलकवच ह्या,तसेच विठ्ठलसहस्रनाम ह्या स्तोत्रांत दिसते. आद्य शंकराचार्यांच्या नावावर पांडुरंगाष्टक हे स्तोत्र मोडते पण ते त्यांचे नाही, ह्याबाबत विद्वांनांत ऐकमत्य आहे. हे स्तोत्र कोणा उत्तरकालीन शंकराचार्यांनी रचले असणे शक्य आहे. श्रीपांडुरंगमंत्रजप ह्या हस्तलिखितात विठ्ठलास ‘यज्ञरूप’ आणि ‘यज्ञभोक्ता’ अशी विशेषणे लावलेली आहेत. श्रीविठ्ठलाच्या प्रसादासाठी महादेव यादवाचा मांडलिक असलेला कोणी केशव ह्याचा पुत्र भानू ह्याने पंढरपुरात आप्तोर्याम महायज्ञ केला, असे पंढरपुरातीलच एका कोरीव लेखावरून दिसून येते. पंढरपुरात श्रीविठ्ठलाच्या प्रीत्यार्थ आणखीही यज्ञ झाले आहेत. विठ्ठलाचे वैष्णवीकरण झाल्यामुळे विष्णुयागही झाले आहेत.

परमविष्णुभक्त पुंडलिक ह्याच्यासाठी वैकुंठाचा देव विष्णू हा पंढरपुरी आला, असे मानले जाते. पंढरपुरात पुंडलिकाचे मंदिरही आहे तथापि पंढरपुरातील पुंडलिकमंदिर वार्षिक उत्सवही होतो. पुंडलिककथा इतिहासात सापडत नाही ती पुराणांत सापडते. पुंडलीक हा मुळात पुंडरीकेश्वर होता. संक्षेपाने त्याला पुंडरिक म्हटले जात होते आणि जाते. स्कंदपुराण, पद्मपुराण, नृसिंहपुराण अशा पुराणांतून विष्णुभक्त पुंडरिकाच्या कथा आलेल्या आहेत, परंतु पुराणांमधील पुंडरीक हा पंढरपूरचा पुंडरिक नाही. पुराणांताल पुंडरीक-कथांच्या प्रभावाच्या आधारे, विठ्ठलाच्या वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत, पंढरपूर येथील पुंडलिकाची वा पुंडरिकाची कथा उभी करण्यात आली, असेडॉ. रा. चि. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. डिंडीरव वनातील (दिंडीरवनातील) डिंडीरवनामक दैत्याचे पारिपत्य करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुनाचे (शिवाचे) रूप घेतले, अशी कथा पाद्म पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे. पंढरपुरात मल्लिकार्जुनाचे पुरातन मंदिर आहेच. येथे मल्लिकार्जुनाचे शिवरूप आहे, असे सांगितले गेले. पंढरपूरच्या पूर्वेस नदीकाठी दिंडीरवनात लखूबाईचे मंदिर आहे. तिलाच कृष्णावर रूसून पंढरपुरी आलेली रूक्मिणी मानले जाते. पद्मावती तीर्थाची कथाही वर दिलेली आहे. विठ्ठलाचे वैष्णवीकरण करण्याच्या प्रक्रियेचाच हा भाग होय.

विठ्ठलाचे वैष्णवीकरण होण्यापूर्वी पंढरपूरचा विठ्ठल काही काळ शिवरूप झाला होता, असे डॉ. माणिकराव धनपलवार ह्यांचे मत आहे. पंढरपूर हे मुळात पुंडलिकपूर असून तिरूवारूर आणि चिदंबरम् ह्या दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्रांचे पर्यायी नाव ‘पंडरीकपूर’असेच आहे, हे अन्य काही प्रमाणांसह ह्या संदर्भात निदर्शनास आणतात. तथापि पंढरपूर हे पुंडरीकेश्वरामुळे पुंडरीकपूर झाले, पंढरीचा तोच मूळ अधिष्ठाता देव होता. वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत तो विठ्ठलाच्या परिवारात समाविष्ट झाला परंतु पंढरपूरचा विठ्ठल हा मात्र शिव बनलेला नव्हता, असे डॉ. ढेरे ह्यांचे मत आहे. डॉ. ढेरे असेही दाखवून देतात, की विठोबाच्या उन्नयप्रक्रियेत प्रथम विठोबाचे शैवीकरण होते आणि नंतर वैष्णवीकरण होते, असा सार्वत्रिक नियम नाही.

 विठोबा आणि वेंकटेश : पंढरपूरचा विठोबा आणि तिरूमलाई (आंध्र प्रदेश) येथील वेंकटेश ह्या दोन देवांमधील साम्य लक्षणीय आहे. विठोबाप्रमाणेच वेंकटेश हा हाती शस्त्र नसलेला आणि मौनी आहे. त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात त्याच्या भक्तांना वर देत आहे. विठोबाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत. विठोबाच्या संस्कृत पांडुरंगमाहात्म्यांप्रमाणेच वेंकटेशाशी संबंधित अशा तिरूमलाईचीही संस्कृत माहात्म्ये आहेत. रूसलेल्या रूक्मिणीची समजूत काढण्यासाठी विठोबा पंढरपूरला आला. त्याचप्रमाणे वेंकटेशही रूसलेल्या लक्ष्मीसाठी तिरूमलई येथे आला. तेथे त्याने पद्मतीर्थ खोदले व त्यातून पद्मावती (जी वेंकटेशाही पत्नी आहे) प्रगट झाली, अशी कथा सांगितली जाते. विठोबा आणि वेंकटेश ह्या दोन्ही देवांना कांबळे अत्यंत प्रिय आहे आणि दोन्ही देवांच्या पावित्र्यसंमारंभात चिंचेच्या झाडांना फार महत्त्व आहे. वेंकटेश हा वेंकटाचलावर एका चिंचेच्या झाडाखाली असलेल्या वारूळातून प्रकट झाला, अशी कथा सांगितली जाते. पंढरपूर येथील दिंडीरवन हे चिंचेच्या झाडांचे वन होते. वेंकटेश आणि विठोबा ह्यांच्यातील साम्य लक्षात घेता, हे दोन्ही देव एकाच लोकदेवाची (विठ्ठल-वीरप्पाची) दोन वेगवेगळी, पण एकमेकांशी लक्षणीय साम्यही राखून असलेली उन्नत रूपे असली पाहिजेत असे डॉ. ढेरे ह्यांच्यासारख्या अभ्यासकांना वाटते. विठ्ठल-वीरप्पा ह्या जोडदेवाचाही चिंचेच्या झाडाशी संबंध आहे. विठ्ठल-वीरप्पा हा जोडदेव पहिल्यांदा पट्टणकोडोलीला आला, तेव्हा तो चिंचेच्या झाडाखाली येऊन थांबला, अशी धनगरांची श्रद्धा आहे. एका धनगरी कथेनुसार विठ्ठलाची पत्नी विठ्ठलावर रूसून वनात गेली आणि चिंचेच्या बुंध्यापाशी येऊन गतप्राण झाली. वेंकटेशाची उपासना आज श्रीनिवास किंवा विष्णू म्हणून केली जाते परंतु साडेसातशे वर्षांपूर्वी वेंकटेश हा वीरभद्र म्हणून पूजला जात होता, असा ⇨वीरशैष पंथांच्या अनुयायांचा दावा आहे आणि वीरप्पाचेच वीरभद्रात रूपांतर झाले असा ग्यूथर सोनथायमर ह्यांचा निष्कर्ष आहे. आंध्र-कर्नाटक-महाराष्ट्रात वीरशैव पंथीयांमध्ये वीरभद्र उपासना केली जाते. वीरशैव पंथांचा प्रभाव वाढला, तेव्हा दक्षिण भारतातील गोपजन हे वीरशैव बनले व त्यांच्या प्रिय दैवताचे-वीरप्पाचे-वीरभद्रीकरण त्यांच्या मूळच्यादेवाला त्यांनी नव्याने स्वीकारलेल्या श्रद्धाविश्वात प्रतिष्ठित करण्यासाठी वीरशैवांनी घडवून आणले. असे डॉ. ढेरे ह्यांचे प्रतिपादन आहे.

मराठी संतांनी अनेकदा विठोबाला बुद्ध वा बौद्ध म्हणून संबोधिले आहे. उदा., संत जनाबाईने तिच्या एका अभंगात असे म्हटले आहे, की कृष्णावतारी कंसवध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे. विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे, असे एकनाथांनी आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हटले आहे. विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे. अशी संतांची श्रद्धा दिसते. काही चित्रशिल्पांमधूनही ही श्रद्धा व्यक्त झालेली आहे. काही जुन्या पंचांगांच्या मुखपृष्ठावर छापलेल्या दशावतारांच्या चित्रांत नवव्या अवताराच्या ठिकाणी विठोबाचे (रूक्मिणीसह वा तिच्यावाचून) चित्र दाखविलेले दिसते आणि त्या चित्रावर ‘बुद्ध’ असेही छापलेले आढळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशवमंदिरात कोरलेल्या दशावतांरांत बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे जाणवते. संतांनी विठ्ठलाला बुद्ध मानले याचे कारण बुद्धाची करुणा आणि त्या करणेचे त्यांना वाटत असलेले महत्त्व, हे आहे, असे डॉ. ढेरे ह्यांना वाटते. बुद्धीचीच करूणाधारा विठ्ठलभक्तीच्या रूपाने संतांनी महाराष्ट्रात वाहती ठेवली.

विठोबा हे जैनांचे दैवत आहे, असा जैनांचा दावा अठराव्या शतकापर्यंत तरा होता, असे दिसते. मराठी संतांनी मात्र विठ्ठलाला अनेकदा बुद्ध म्हणून संबोधिले असले, तरी जिन म्हणून कधीही संबोधिलेले नाही. रघुनाथ भास्कर गोडबोले ह्यांनी त्यांच्या भरतखंडाच्या अर्वाचीन कोशात एका जैन पंडिताने जैन तीर्थंकर नेमिनाथाच्या स्थापन केलेल्या मूर्तीचे वर्णन करणारे संस्कृत श्लोक एका जैन ग्रंथातून उदधृत केले आहेत (हा ग्रंथ कोणता ह्याचा निर्देश त्यांनी केलेला नाही) व ते वर्णन पंढरपूर येथील विठोबाच्या मूर्तीशी जुळते असे त्यांनी म्हटले आहे. कृष्ण आणि नेमिनाथ ह्यांचा संबंध जैन परंपरेत जवळचा मानला गेला आहे. दोघेही यदुवंशीय असून चुलतभाऊ होते. असे ही परंपरा सांगते, त्यामुळे ज्याला कृष्णाचे बालरूप मानले जाते, त्या विठोबात जैनांनी नेमिनाथांना पाहिले असणे शक्य आहे.

डॉ. ढेरे ह्यांनी विठ्ठलाचे वर्णन ‘एक महासमन्वय’ असे केले आहे कारण शैव, वैष्णव, बौद्ध, जैव इ. धर्मधारांचा सुमधुर संगम विठ्ठलामध्ये आढळतो.

संदर्भ : 1. Deleury, G. A. The Cult of Vithoba, Pune, 1960.
            2. Purohit, Vinayak, The Pastoralist Class Society in Indian History and Historiography, Bombay, 1980.
            3. Settar, S. Sontheimer, Gunther D. Ed. Memorial Stones in India, Dharwad-Heidelberg, 1982.
           4. Shashi, S. S. The Shepherds of India, Delhi, 1978.
           5. Sontheimer, Gunther D. Biroba, Mhaskoba and Khandoba (Summary in English, PP 235-253), Heidelberg, 1976.
           6. ‘The Dhangars : A Nomadic Pastoral Communnity in a Developing Agricultural Environnent’ in Pastoralists and Nomads in South Asia, Ed. Leshnik, L. S. Sontheimer,   Gunther D. Heidelberg, 1975.

          ७. अभंगराव, केरो रामचंद्र, संपा. श्रीपुंडलीकस्तव (भाग पहिला), पंढरपूर, १९११.
           ८. कारंडे, य. ल. सुंबरान मांडील, सांगली, १९६७.
           ९. खरे, ग. ह. महाराष्ट्राची चार दैवते, पुणे, १९५८.
          १०. खरे ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, आवृ. ३ री, पुणे, १९६३.
          ११, चेंदवणकर, सदानंद, पंढरपूरचा विठोबा, मुंबई, १९६५.
          १२. चोपडे, तात्या केशव, पंढरपूरचा विठोबा, म्हसवड, १९३०.
          १३. जोशी, ग. वा. भालेराव, प. शा. श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन, पुणे, १९८४.
           १४. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.
          १५. धनपलवार, माणिक, संपा. कान्हो त्रिमलदासकृत पुंडलीकचरित्र, हैदराबाद, १९७२.
          १६. बेंद्रे, द. रा.विठ्ठलसंप्रदाय, दिल्ली, १९६५.
          १७. बेंद्रे, द, रा. संत-महंताचा पूर्णशंभु विठ्ठल, पुणे, १९८०.
          १८. भागवत, दुर्गा, पैस, मुंबई, १९७०.
          १९. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रूपरेखा, आवृ. २ री, पुणे, १९७७.
         २०. मतकर, ग. शं. धनगर समाज दर्शन, इंदूर, १९८३.

- (मराठी विश्वकोश)

 



 

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....