Tuesday, 27 August 2024

गोपाळ काला व दही हंडी उत्सव

 दहीहंडी हा सण दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.  श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला हा दहीहंडीचा सण साजरा केला जातो.  देशभरात दरवर्षी दहीहंडी सण मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरा केला जातो. विशेषत: महाराष्ट्रासह गुजरात, गोव्यात या सणाचा थाटमाट मोठा असतो.गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने गोकुळात  गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातील आठवणींना उजाळा देणारा सण आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, खोडकर बालकृष्णाला दही. दूध आणि लोणी (माखन) खूप आवडायचे. त्या काळी गोकुळात दूध, दही, लोणी साठवून ठेवले जात होते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह शेजारच्या घरांतून दही आणि लोणी चोरण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यावेळी गोकुळातील महिलांनी भगवान कृष्णांच्या मित्र-सवंगड्यांच्या हाती दही-लोणी लागू नये म्हणून दही आणि लोण्याची मडकी छताला टांगायला सुरुवात केली. यावेळी कृष्ण मित्र-सवंगड्यांसह मानवी मनोरा बनवून मडकी फोडायचे आणि दही खाण्याचा आनंद घ्यायचे. असा खोडसाळपणा कृष्ण व त्याचे सवंगडी करीत असले तरीही गोकुळातील रहिवासी आनंदी होते. दहीहंडी उत्सव बालगोपाळांच्या बालपणापासूनच्या या खेळकर गमतीजमतींची आठवण करून देतो.

कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.







 

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....