Thursday, 28 April 2022

श्रीस्वामी समर्थ महाराजांची काही मूळ छायाचित्रे

 आज अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. लौकिकार्थाने आज देहत्याग केला असला तरी “हम गया नही, जिंदा है” अशा आश्वासक वचनांनी अनेकांच्या बुडत्या नौकांना सुखरुपपणे भवसागर पार करुन देणाऱ्या स्वामी महाराजांचे आज पुण्यस्मरण करुया.


|| श्री स्वामी समर्थ ||  


                                                    

















Tuesday, 19 April 2022

''काळाचाही काळ तुझा हनुमान... वाटे लाव त्याला, खूप लोटलासे काळ" रामायणातील एक अपरिचित कथा



रामायणाची एक कथा आहे. अगदी शेवटाकडची. रामाचं अवतार कार्य संपलेलं असतं म्हणून काळ त्यांना घ्यायला आलेला असतो. पण तो आयोध्येच्या बाहेरच थांबून राहतो. वेळ जात राहतो, पण काळ काही आयोध्येमध्ये प्रवेश करीत नाही. ब्रम्हदेवांना प्रश्न पडतो की काळ असं का करतोय. ते त्याला विचारतात. काळ म्हणतो, "हनुमान राखी राम, जाऊ कसा आत, जीवाचे गा भय, जीवाहून थोर!" ब्रम्हदेव काय समजायचे ते समजतात आणि रामाकडे जातात. ते रामाला सांगतात ''काळाचाही काळ तुझा हनुमान... वाटे लाव त्याला, खूप लोटलासे काळ"

प्रभू श्रीराम विचारांती, हनुमानाला जवळ बोलवतात. नकळतच त्यांचे डोळे भरून येतात. युगायुगाच्या या सोबत्याला सोडून जाणं त्यांच्यासाठी अवघड असणार असतं. हनुमानाला त्याच्या धन्याची ही अवस्था का झाली ते कळू शकत नाही. तो प्रश्न विचारायला तोंड उघडणार एवढ्या रामाच्या हातातली एक अंगठी जमिनीवर पडते आणि हळुहळू घरंगळत जमिनीतील एका फटीमध्ये नाहीशी होते. हनुमानाच्या हे लक्षात येत नाही. राम त्याला सांगतो, तेवढी अंगठी घेऊन ये हनुमंता! हनुमान निरखून बघतो, भेग चांगलीच खोल असते. तो सूक्ष्म रूप धारण करतो आणि त्या भेगेमध्ये प्रवेशतो. तो खोल खोल जात राहतो.
अगदी धरणीच्या अंतापर्यंत आता हा प्रवास होणार, असं वाटत असतानाच, हनुमान नागलोकांत येऊन पोहोचतो. तिथलं गूढ वातावरण अधिकच गूढ वाटू लागतं. भलाथोरला नागराज हनुमानासमोर येतो. तो हनुमानाला म्हणतो, त्या पलिकडच्या खोलीमध्ये पडली आहे अंगठी. दोघेही त्या खोलीकडे चालू लागतात. दाराखालच्या फटीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडू पाहत असतो. हनुमान खोलीचं दार ढकलतो. दाराखालून बाहेर पडणारा पिवळा प्रकाश आता दोघांच्याही अंगावर पडू लागतो. हनुमान समोर बघतो तर एकसारख्या असंख्य अंगठ्यांची एक रास समोर पडलेली असते. नागराज हनुमानाला म्हणतो, शोध तुझी अंगठी!
हनुमान पुढे होऊन एक एक अंगठी उचलू लागतो. प्रत्येक अंगठीमध्ये त्याला त्याचा राम जाणवत असतो! प्रत्येकीला रामाचा स्पर्श झालेला असतो. तो बुचकळ्यात पडतो आणि पाताळाच्या स्वाम्याकडे बघतो. तो हसत असतो. तो हनुमानाला सांगतो, "प्रवेशला काळ, संपला अवतार, रघुरामाचा!" हनुमान पळतच दारकडे जाऊ लागतो. नागराज त्याला थांबवतो "उशिर जाहला, त्याने गाठ्ली गा वेळ! कसा रे फसशी, युगांचा हा खेळ! मारुतीराया युगांयुगे हे असंच चाललं आहे. दरवेळेस आंगठी पडते आणि दरवेळेस तू फसतोस!"
हनुमानाचे डोळे पाणवतात. त्याच्या डोळ्यासमोर असतो तो त्याच्या प्रभूचा चेहरा. त्या चेहर्याला नमस्कार करून हनुमान म्हणतो "नाही फसणार पुढच्या वेळी, नाही सोडणार राम"
*श्रीराम, जय राम, जय जय राम*

Monday, 18 April 2022

अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? व तिचे महत्व काय?

 आज अंगारकी चतुर्थी.   



 

नेहमी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाणारी ही तिथी मंगळवारी आल्यानंतर  "अंगारकी " म्हणून का संबोधिली जाते हे आज जाणून घेऊयात. 


सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी  उपवास धरतात. आपापल्या घरी  संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून त्याला २१मोदकांचा नैवेद्य दाखवून कुटुंबासमवेत आरती म्हणून, मगच हा उपवास सोडला जातो.


परंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी  येते तेंव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही आपल्या ब्रम्हांडातल्या नवग्रहातील मंगळ  ह्या ग्रहाशी निगडीत असल्याने ती कथाही तितकीच रंजक आहे. 


कृतयुगात अवंती नगरीत  वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनीच तर त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. 


ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. 


त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो  दिवस होता मंगळवारी  आलेल्या संकष्टी चतुर्थीचा.


" स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात होण्याचे," वरदान त्यानं त्याच्यावर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा  कडे मागितला.


यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी  केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि त्यामुळेच तर तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इप्सित मनोकामना पूर्ण होण्यास आणि हरतऱ्हेने  ते ऋणमुक्त होण्यास त्यांना तुझीच मदत होईल."


"अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम,   अंगारकासारखा लाल आहेस  म्हणून अंगारक,   व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून  मंगळ,  ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या  आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील". 


त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला  अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी  केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. 


 आजची मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही ह्या २०२२ साल शेवटचीच अंगारकी चतुर्थी  आहे. 


Friday, 15 April 2022

हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला?



हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात

हनुमंताला महादेवांचा 11वा रूद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभु श्री रामाचे उत्कट भक्त आहेत. 

हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे.  हनुमानाचे वडिल वानरराज केसरी हे होते. लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. जन्मानंतर लगेचच भूक लागल्यामुळे उगवणाऱ्या सुर्याला नारंगी रंगाचे फळ समजून त्याला खाण्याकरता हनुमानाने सुर्याकडे उड्डाण केले. त्यामुळे इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले.

इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मूर्च्छित  झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्च्छिततेतून बाहेर आणले, त्यांनंतर पवन देव शांत झाले व वातावरण सुरळीत केले. तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या. 

हनुमानाला मारूती, बजरंगबली, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते. हनुमंताला मारूती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते.

हनुमानाच्या जन्मस्थळाबद्दल मात्र अनेक वादविवाद आहेत.  त्यांचे जन्मस्थान असलेला अंजनेरी पर्वत नेमका कुठे आहे याबद्दल विविध ठिकाणी  दावे केले जातात. हनुमान जयंतीच्या निमित्ताने  हनुमानाच्या विविध  जन्म स्थळांबद्दल  ठिकाणाहून इथेच हनुमानाचा जन्म झाला असे दावे केले जातात. या सर्व ठिकाणी तशी स्थळेही दाखविली जातात. तर आता जाणून घेऊयात, हनुमानाचा जन्म कुठे झाला व हि विविध स्थाने कोणती आहेत. 

महाराष्ट्रात जर हा प्रश्न विचाराल तर बहुतेक करून त्र्यंबकेश्वरजवळ जो अंजनेरी पर्वत आहे, ते स्थान लोकं सांगतील पण उरलेली स्थानंही भारतातली लोकं ठामपणे सांगतात. 

ही सर्व स्थानं, तिथेच जन्म झाला म्हणत जन्माची आणि एकंदर गोष्ट, त्या सर्वही स्थानी मंदीर आणि एखाद्या देवाच्या जन्म स्थानी जे वातावरण असतं, ते सगळं सगळं या सर्वच ठिकाणी आहे. 

आता ही अशी परिस्थिती का निर्माण व्हावी हे माहीत नाही पण सांगितली जाणारी हनुमानाची जन्म स्थानं ही अशी... 

१) अंजनेय पर्वत, हंपी, कर्नाटक. ऋष्यमुक पर्वताच्या जवळच ही जागा आहे आणि तिथे हनुमान जन्माचं स्थानही दाखवतात.. 

Anjeyadri hill, near Hampi

२)  त्र्यंबकेश्वर, नाशिकजवळ जो अंजनेरी पर्वत आहे तिथेही अगदी दुर्गम स्थानी छोट्या गुहेतही हे स्थान दाखवले जाते.

Anjaneri, Nashik, Maharashtra.

३) अंजनाद्री शिखर, सप्तगिरी, तिरुमला आंध्रप्रदेश.  तिरुमलाच्या तिरुपती बालाजी देवस्थान असलेल्या सात टेकड्या शेषाद्री, निलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि वेंकटाद्री म्हणून ओळखल्या जातात. या डोंगररांगेतील अंजनाद्री या टेकडीवरच हनुमानाचा जन्म झाला असे मानतात. तिथे हनुमान जन्माचं स्थानही दाखवतात. हे ठिकाण हनुमान जन्म स्थळ म्हणून विकसित करण्यास तिरूपती देवस्थानम बोर्डाने सुरुवातही केली आहे. 

Anjandri Hill, Tirumala, Andhra pradesh

४) कर्नाटच्या शिवमोगा जिल्ह्यातील गोकर्ण येथेच हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जातो. गोकर्ण ही हनुमानाची जन्मभूमी तर हंपीजवळचं अंजेयानाद्री कर्मभूमी असे मानणारेही अनेक भाविक आहेत. 

Gokarn, District Shivamoga, Karnataka

5) झारखंड राज्याच्या गुमलापासून जवळ, अंजन नावाचं एक गाव आहे, तिथेही हनुमान जन्मस्थळी आहे. 

Anjan gram in Jharkhand

6) राजस्थानातल्या चुरु जिल्ह्यात सुजनगडजवळ लक्षका नावाच्या डोंगराच्या निकट अंजन धाम हे ही हनुमानाचं जन्मस्थान म्हटलं जातं.

Anjan dham, Churu, Rajasthan.

7) हरयाणा मध्ये कैथल या शहरालगत असणा-या  पर्वतावरील गुंफेत हनुमानाचा जन्म झाला असेही मानतात.

Kaithal, Haryana.

8) गुजरात मध्ये डांग जिल्ह्यात नवसारीजवळ जंगलातील एका गुहेत हनुमानाचे जन्म स्थान दाखवले जाते.

Dang, Gujrat.

हनुमान हा एकच अवतारी देव असा असेल की त्याची ही अशी एवढी जन्माची ठिकाणं सांगितली जातात. प्रत्येक ठिकाणी इथेच हा रुद्रावतार अवतरला म्हणत भक्त प्रत्येक ठिकाणी मनोभावे भक्तीत लीन होतात.. 

ही सर्व ठिकाणे वेगवेगळी असली तरी सर्व भक्तांची भक्ती मात्र हनुमंतरायाच्या चरणी दृढ आहे.

हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते.. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात, तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते.

चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते.

हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते.

वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला. चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हटले जाते.





Monday, 21 March 2022

शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?

पुण्यवंत, सामर्थ्यवंत! नीतिवंत, जाणता राजा!

महाराष्ट्र सरकारने 2001 मध्ये फाल्गुन वद्य तृतीया, 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकरली आहे. सरकार कडून या दिवशी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याची सरकारी सुट्टी देखील दिली जाते. या व्यतिरिक्त संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख होती. त्यानुसार अनेक शिवभक्त शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतात. त्यानुसार वेगवेगळ्या दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखवली जाते.


शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?


गेले अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची याबाबत वाद-प्रतिवाद केले जात आहेत. तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं मनसे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या भाषणात म्हटलंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावरही अनेक मत-मतांतरे आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या तारखेबाबत वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात. या अशा विचारप्रवाहांमुळे शिवाजी महाराजांची सध्याची जन्मतारीख कशाप्रकारे ठरवण्यात आली याचा विचार करण्याचा प्रयत्न येथे करू.


सध्याच्या १९ फेब्रुवारी १६३० या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके १५५१ शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके १५४९ मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता ६ एप्रिल १६२७. (त्यामुळे जेथे शके १५४९ येते तेथे इसवी सन १६२७ आणि शके १५५१ येते तेथे इसवी सन १६३० साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे.)


लोकमान्य टिळकांचे योगदान :

छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे आणि वि. का. राजवाडे यांचे नाव आधी घेतले जाते.  टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करुन काही मते मांडली होती. १४ एप्रिल १९०० च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी याचा सविस्तर ऊहापोह केला होता. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली होती. बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हते.

डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे लिखित 'Birth Date of Shivaji' पुस्तक

डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी 'Birth Date of Shivaji' नावाने लिहिलेल्या पुस्तकात हे नमूद केले आहे. आपटे आणि परांजपे यांचे पुस्तक 'द महाराष्ट्रा पब्लिशिंग हाऊस लिमिटेडटने १९२७ साली प्रकाशित केले आहे.


टिळकांनी काही मुद्द्यांचा विचार तेथे केला होता.  ते लिहितात,

१) कवी भूषण यांनी 'शिवभूषण' या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख दिलेली नाही.

२) सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी लिहिली गेली. त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही. केवळ एके ठिकाणी वयाचा उल्लेख येतो ते म्हणजे जिजाबाई शहाजी महाराजांना भेटायला बंगळुरूला गेल्या तेव्हा शिवाजी महाराज १२ वर्षांचे होते.

३) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती ६ एप्रिल १६२७ येते. मात्र गणिती आकडेमोड करुन पाहिल्यास गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो. चिटणीस बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १३० वर्षांनी लिहिण्यात आली आहे.

४) रायरी बखर प्रा. फॉरेस्ट यांनी लिहिली होती. त्यामध्ये एके ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माचे शक १५४८ आणि एके ठिकाणी १५४९ लिहिले आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू शके १६०२ म्हणजे १६८० साली झाला असे लिहिले आहे. मात्र या बखरीत केवळ वर्षांचा उल्लेख आहे. जन्मतारखेचा नाही.

५) धार येथील 'काव्येतिहास संग्रहा'मध्ये तिथी वैशाख शुद्ध पंचमी, शके १५४९ आणि सोमवार हा जन्मवार दिला आहे. मात्र यामध्ये नक्षत्र चुकीचे देण्यात आले आहे.

६) बडोदा येथे छापून प्रकाशित झालेल्या 'शिवदिग्विजय' ग्रंथामध्ये शके १५४९, प्रभव संवत्सर, वैशाखद्वीतिया, गुरुवार, रोहिणी नक्षत्र अशी माहिती दिली आहे. व जन्मवार गुरुवार दिला आहे. चिटणीस बखरीप्रमाणे यातही गोंधळ दिसतो.

७) बडोदा येथे प्रकाशित झालेल्या 'श्रीशिवप्रताप' ग्रंथात शके १५४९चे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आले आहे. मात्र रक्ताक्षी हे नाव हे शके १५४६ चे होते. शके १५४९चे नव्हे.

८) संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही शिवाजी महाराजांची जन्मतारिख दिलेली नाही.

९) असंच एक वेगळं टिपण 'काव्येतिहास संग्रह' या नियतकालिकाने छापलेल्या 'मराठी साम्राज्याची छोटी बखर' या लेखात दिसून येतं. यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके १५४९, क्षय, वैशाख शुद्ध पंचमी, सोमवार असा उल्लेख आहे. इथे संवत्सर वर्षाचं नाव चुकले आहे. येथे प्रभव संवत्सर असायला हवे होते.

१०) भारतवर्ष या नियतकालिकाने 'एक्याण्णव कलमी बखर' प्रकाशित केली. त्यात शिवाजी महाराजांची जन्मतिथी १५ व्या परिच्छेदात दिली आहे. ती शके १५५९, क्षय, वैशाख, शुद्ध पंचमी अशी दिली आहे. येथे १५४९ ऐवजी १५५९ शक पडले आहे.

११) भारतवर्षाने 'पंत प्रतिनिधींची बखर'ही प्रसिद्ध केली आहे. त्यात १५४९, वैशाख पौर्णिमा, सोमवार असा उल्लेख आहे. ही एक वेगळीच तिथी देण्यात आली आहे.


जेधे शकावलीमुळे बदलली अभ्यासाची दिशा :

सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म शके १५४९ (१६२७) मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असे गृहित धरण्यात आले. मात्र १९१६ साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेधे शकावली.

या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी फाल्गुन वद्य तृतिया १५५१ ( शुक्रवार १९ फेब्रुवारी १६३० ) असल्याचे घोषित केले.

जेधे शकावली काय आहे?

आता जन्मतारखेबाबत इतकी माहिती देणारी जेधे शकावली आहे तरी काय हे जाणून घ्यायला हवे. हा एक २३ पानांचा दस्तऐवज आहे. यातील पानांच्या दोन्ही बाजूंना मजकूर लिहिलेला आहे. जेधे शकावलीमध्ये शके १५४९ ते शके १६१९ म्हणजेच इसवी सन १६१८ ते १६९७ या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या घटनांच्या तारखा लिहून ठेवल्या आहेत.

भोर संस्थानातील एका गावाचे देशमुख दयाजीराव सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांनी ही शकावली टिळकांकडे सोपवली होती. जेधे शकावलीचा अभ्यास अनेक इतिहास अभ्यासकांनी केला आणि त्यातील बहुतांश नोंदी सुयोग्य असल्याचा निर्वाळा दिला.

या शकावली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांपर्यंतच्या नोंदी आहेत आणि त्याच्या लेखकास अस्सल कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध होत असावीत असे दिसते.

जेधे शकावली


वानगीदाखल काही उदाहरणे डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी दिली आहेत. ते लिहितात,

1) जेधे शकावलीमध्ये औरंगजेबाची जन्मतिथी कार्तिक प्रतिपदा शके १५४० दिली आहे. जदुनाथ सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे योग्य आहे.

2) नौशेरखानाबरोबर झालेली लढाई शके १५७९ मध्ये ज्येष्ठ महिन्यात झाली. ही नोंदही बरोबर आहे.

3) शिवाजी महाराजांनी श्रीरंगपूर ताब्यात घेतल्याची तिथीही योग्य आहे.

4) सुरत लुटीची तारीख आणि इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेली नोंद जुळते.

5) जयसिंहाशी केलेल्या तहाची तारीखही अगदी बरोबर जुळली आहे.


१६२७ की १६३० ? 

आता इतके सर्व झाल्यावर शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की १६२७ ची की १६३० ची मान्य करावी हा प्रश्न उरतोच. आपटे आणि परांजपे यांनी १६२७ म्हणजे १५४९ शक नसावे हे सांगण्यासाठी काही काही नोंदी दिल्या आहेत.

1) कवी परमानंद- 'शिवभारत' लिहिणाऱ्या कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील १६६२ पर्यंतच्या घडामोडी दिल्या आहेत. त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ अशी तिथी दिली आहे. जेधे शकावलीशी ही नोंद जुळते.

2) राज्याभिषेक शकावली- शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळेस तयार करण्यात आली होती. त्यातही फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ ही तारीख आहे. ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात सापडली आहे.

3) फोर्ब्स दस्तऐवज- गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए. के फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके १५५१ अशी नोंद आहे.

4) जेधे शकावली-या शकावलीत स्पष्टपणे १५५१ या वर्षाचा उल्लेख आहे.

5) दास-पंचायतन शकावली- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म शके १५५१ मध्ये झाला अशी नोंद आहे.

6) ओर्नेसच्या नोंदी- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म १६२९ साली झाला अशी नोंद आहे.

7) स्प्रेंजेल- या १७९१ साली प्रसिद्ध झालेल्या जर्मन पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म १६२९ साली झाला असे लिहिण्यात आले आहे.

8) तंजावरचा शिलालेख- तंजावरमध्ये १८०३ साली कोरलेल्या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म शके १५५१ साली झाल्याची नोंद आहे. मात्र त्यात संवत्सराचे नाव चुकले आहे.


जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका :

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलींबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पं. रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगडा झाला. या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली आहे.



जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका



त्यात मारवाडी भाषेत नोंद केली आहे - ||संवत १६८६ फागूण वदि ३ शुक्रे उ. घटी ३०|९ राजा शिवाजी जन्मः || संवत १६८६ फाल्गुन वद्य ३ म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ (सन १६३०).

(संवत कालगणना आपण सध्या वापरत असलेल्या इसवी सनाच्या आधी 56 वर्षे सुरु होते त्यामुळे प्रत्येक वर्षातून 56 वर्षे वजा केली इसवी सन समजून घेता येते.)


१९६६ साली राज्य सरकारने स्थापन केलेली समिती :

शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती १९६६  साली स्थापन केली. या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता.

समितीच्या पहिल्या बैठकीला आ. ग. पवार काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत महामोपाध्याय द. वा. पोतदार, ग. ह. खरे, वा. सी बेंद्रे. ब. मो. पुरंदरे. मोरेश्वर दीक्षित यांचे फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) या तारखेवर एकमत झाले. मात्र न. र. फाटक यांनी मात्र वैशाख शुद्ध द्वीतिया शके १५४९ (६ एप्रिल १९२७) ही तारीख योग्य वाटते असे मत दिले.

सर्व सदस्यांनी त्यानंतर आपापली निवेदनेही समितीसमोर सादर केली. न. र. फाटक यांच्या तारखेचे खंडन करणारी निवेदनेही सादर करण्यात आली.


महाराष्ट्र सरकारने 1966 साली स्थापन केलेल्या समितीच्या अहवालाचे मुखपृष्ठ

दुसऱ्या बैठकीसाठी आ. ग. पवार उपस्थित राहिले. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा निर्णायक पुरावा नसल्यामुळे जुनी तारीख कायम ठेवावी असं मत त्यांनी मांडलं. या बैठकीत एकमत न झाल्यामुळे जन्मतारखेबाबतचा निर्णय शासनाकडेच सोपवण्यात आला.

शेवटी "ठाम पुरावा उपलब्ध होईपर्यंत किंवा इतिहासतज्ज्ञांत एकवाक्यता येईपर्यंत समारंभाच्या सोईसाठी जुनीच तिथी म्हणजे वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (इसवी सन १६२७) ही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे." असा निर्णय शासनाने समिती सदस्यांना कळवला.


गजानन भास्कर मेहेंदळे यांचे लेखन :

गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेल्या 'श्री राजाशिवछत्रपती' या ग्रंथाच्या सोळाव्या परिशिष्टामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे.

त्यात त्यांनी एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, पंतप्रतिनिधींची बखर, सातारच्या छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी, शिवदिग्विजय बखर, नागपूरकर भोसल्यांची बखर, शेडगावकर बखर, प्रभानवल्ली शकावली, धडफळे यादी, न्या. पंडितराव यांची बखर, शिवाजीप्रताप बखर, जेधे शकावली, राज्याभिषेक शकावली, फोर्ब्स शकावली, शिवभारत, तंजावर शिलालेख, घोडेगावकर शकावली, चित्रे शकावली, कोस्मी द ग्वार्दचा उल्लेख, रॉबर्ट आर्मचा उल्लेख, स्प्रेंजेलमधील उल्लेख या सर्वांचा विचार केला आहे. मेहेंदळे यांनी ऐतिहासिक साधनांमध्ये चुका का होतात याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे.


प्रमोद नवलकर यांना विनंती

मेहेंदळे यांनी १९९६  साली झालेल्या पुढील घडामोडींचा उल्लेख या परिशिष्टाच्या शेवटी केला आहे. १९९६ साली तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांची भारत इतिहास संशोधन मंडळाचे वि. द. सरलष्कर, भारतीय इतिहास संकलन समितीचे महाराष्ट्र कार्यवाह चिं. ना. परचुरे आणि इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी भेट घेतली. फाल्गुन वद्य ३, १५५१  ही तिथी स्विकारण्यासाठी सरकारने नवी समिती स्थापन करण्याची विनंती त्यांनी नवलकर यांच्याकडे केली.

त्यावर एकदा समिती स्थापन झाली आहे. आता फाल्गुन वद्य 3 या या दिवशी सरकारने जन्मतिथीचा उत्सव साजरा करायचे ठरवले आहे. याबाबत ज्यांना आपले म्हणणे सरकारकडे सादर करायचे आहे त्यांनी एका महिन्यात सादर करावे. त्याबाबत सरकारी निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होईल आणि सरकार निर्णय घेईल असे प्रमोद नवलकर यांनी सांगितले.

त्यावर दहा अभ्यासकांनी आपली मते कळवली आणि त्या सर्वांनी फाल्गुन वद्य तृतिया १५५१ ला अनुकूल मत दिले होते. ही सर्व माहिती मेहेंदळे यांनी 'श्री राजा शिवछत्रपती' ग्रंथात पान क्र ६४७,६४८,६४९ वर दिली आहे.


१९ फेब्रुवारी ही तारिख कशी ठरली?

सध्याचा १९ फेब्रुवारी १६३० या तारखेचा निर्णय कसा झाला याबाबत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. या तारखेच्या निर्णयासाठी त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात प्रयत्न केले होते.

त्या म्हणाल्या, "याबाबत जुन्या समितीचा अहवाल, इतर पुरावे मांडून मी शासकीय ठराव मांडला. त्याला विधिमंडळाने मंजुरी दिली आणि १९ फेब्रुवारी १६३० तारखेला मान्यता मिळाली. त्यानंतर नव्या सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तेव्हा मी या निर्णयाच्या अंमलबाजवणीसाठी पुन्हा प्रयत्न केले. विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकारच्या कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आणि हा निर्णय लागू झाला."

इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना समकालीन पुरावे पाहाता १६३० मधील तारीख सुयोग्य असल्याचे दिसते म्हणून या तारखेचा आम्ही पाठपुरावा करतो असे सांगितले.


'नवे पुरावे मिळू शकतात'

तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, "जन्मतिथिबाबत नवा ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत थोडा धीर धरुन आधीची तारिख कायम ठेवता आली असती. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत नवा अस्सल पुरावा मिळणार नाहीच असे नाही."

१०० वर्षांहून अधिक काळ संशोधन करुनही आजही शिवाजी महाराजांची जयंती नक्की कधी साजरी करावी याबद्दल दुमत दिसून येतेच. आज काही ठिकाणी शिवजयंती जुन्या तारखेनुसार, शासकीय उत्सव नव्या तारखेस आणि काही ठिकाणी तिथीनुसार जयंती साजरी होते.

(लेखक : ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी)

Wednesday, 16 March 2022

होळी होलिकोत्सव

आज होळी. 

संपूर्ण भारतात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतात या सणाला ‘ होरी - दोलायात्रा ‘ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘ कामदहन ‘ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘ होळी किंवा शिमगा ‘ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘ शिग्मा किंवा शिग्मो ‘ असे म्हणतात. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘ सुगिम्हअ ‘ म्हणजे ‘ सुग्रीष्मक ‘ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘ शिग्मा ‘ हा शब्द रूढ झाला . त्यानंतर त्याचे ‘ शिमगा ‘ असे रूप रूढ झाले आहे.


होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे, पौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आणि या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव सर्वत्र साजरा होऊ लागला. अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.

महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.


होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे रंगाचा खेळ धुळवड साजरा करण्यामागे राधाकृष्णाची कथा सांगितली जाते. अशी मान्यता आहे की, जेव्हा कृष्णाला राक्षसीने विषारी दूध पाजलं तेव्हा त्याचा रंग निळा पडला होता. मोठं झाल्यावर कृष्णाने आपल्या रंगाला पाहिलं तेव्हा त्याला शंका आली की आपल्या अश्या दिसण्यामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलणार नाही तेव्हा ही शंका त्याने यशोदामाते जवळ व्यक्त केली. त्यावेळी यशोदामातेने सांगितले की असं कर तूला आवडणारा रंग घे आणि राधेला लावून ये यानंतर कृष्णाने मातेचं हे बोलणं ऐकून राधेला खरंच रंग लावला आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली आणि रंगाचा हा उत्सव साजरा होऊ लागला असं म्हटलं जातं.


होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ.  वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. “ होळी जळाली, थंडी पळाली “ असे म्हटले जाते. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी ! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आता लोक सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात.


होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो केमिकल , हानीकारक रंगांचा नाही . तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.







Monday, 28 February 2022

महाशिवरात्री व्रत कथा

यावर्षीची महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे यंदा भाविकांनी महादेवाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. मंदिरात जाऊन पूजाविधी आणि नामस्मरण करता येणार आहे.

                                

भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे.  या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात.

प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.

महाशिवरात्री कथा :

समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होते ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून, कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतू मंथनातून हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.

यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे ही म्हटले जाते. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.


या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते

एकदा ब्रह्मा आणि विष्णू दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतता निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेले. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर हि गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरवात आणि शेवट नसणाऱ्या अग्निलिंगाच्या रुपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचा प्रयत्न निष्फल ठरला त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघे ही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या अग्निलिंगसमोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ऊॅं असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, अग्निलिंगच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्पटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर अग्निलिंगच्या रुपात प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.


महाशिवरात्री ची पुराणकथा –

ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन ‘कालकूट’ नावाचे हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते.

उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि ईच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी . . .

महाशिवरात्रि व्रत कथा :

प्राचीन काळी एका जंगलात गुरुद्रुह नावाचा एक शिकारी राहत होता जो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, शोध घेऊनही त्याला शिकार सापडली नाही, त्याची मुले, पत्नी आणि आई-वडील उपाशी राहतील, सूर्यास्ताच्या वेळी त्याला काळजी वाटू लागली. तो एका जलाशयाजवळ गेला आणि एका झाडावर पाणी प्यायला घेऊन चढला, कारण त्याला आशा होती की इथे कोणीतरी प्राणी आपली तहान भागवायला येईल.ते झाड ‘बेल’चं होतं. आणि त्याच झाडाखाली शिवलिंग होते व ते बेलाच्या पानांनी झाकून गेले होते. त्यामुळे दिसत नव्हते. 


रात्रीचे पहिले प्रहर संपण्यापूर्वी तेथे एक हरिणी पाणी प्यायला आली. तिला पाहताच शिका-याने तिच्यावर बाण सोडला, असे करताना त्याच्या हाताने बेलाची काही पाने आणि पाण्याचे काही थेंब उडाले व  खाली असलेल्या शिवलिंगावर पडले आणि अनवधानाने शिका-याच्या हातून पहिल्या प्रहराची पूजा झाली. पानांचा सळसळाट ऐकून हरणाने घाबरून वर पाहिले आणि शिका-याला थरथरत्या स्वरात म्हटले  ‘मला मारू नकोस. .’ शिकारी म्हणाला की तो आणि त्याचे कुटुंब भुकेले आहे म्हणून तो तिला सोडू शकत नाही. हरिणीने वचन दिले की ती आपल्या मुलांना तिच्या मालकाच्या स्वाधीन करून परत येईल. मग तो त्याची शिकार करतो. शिका-याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तिने पुन्हा शिकारीला असे सांगून पटवून दिले की ती देखील सत्य बोलत आहे. त्यामुळे क्रूर असलेल्या शिका-याला दया आली आणि ‘लवकर परत ये’ असे म्हणत हरिणीला त्याने जाऊ दिले.


थोड्या वेळाने दुसरे हरीण पाणी प्यायला तेथे आले, शिकारी सावध झाला, त्याने बाण सोडण्यास सुरुवात केली आणि असे करत असताना पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्या हाताच्या हालचालीने थोडे पाणी आणि काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली. शिका-याकडून दुसर्‍या प्रहराचीही पूजा  झाली. हे हरणही घाबरले, शिका-याकडे जीवाची भीक मागितली. पुन्हा एकदा शिका-याने दया येऊन त्याला जाऊ दिले. 


काही वेळाने तिसरी हरिणी आलि व पुन्हा एकदा आधीच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन तिलाहि

शिका-याने जाऊ दिले. मात्र बराच वेळ गेला तरी एकही हरिण परत न आल्यामुळे तो चिंतेत पडला व त्याला आपल्या कुटूंबाचि चिंता सतावू लागली. 


काही वेळाने त्याला एक नर मृग येताना दिसला. शिका-याने नेम धरताच त्या मृगाने शिका-याची विनवणी केली व त्याला सांगितले की, यापूर्वी ज्या तीन हरिणी गेल्या आहेत, त्या त्याच्याच पत्नी आहेत व तू मला त्यांचाकडे जाऊ दिले तर मी वचन देतो की त्यांना व माझ्या मुलांना भेटून परत येतो मग तू सावकाश माझा बळी घे. शेवटी शिका-याला दया आली व त्याने त्यालाही जाऊ दिले.


रात्रीचा शेवटचा प्रहर सुरू झाल्यानंतर काही काळाने शिका-याने पाहिले की तो नरमृग व त्याच्या तीनही हरिणी आपल्या मुलांसह एकत्र त्याच्याकडे येत आहेत. त्यांना पाहताच त्याने आपल्या धनुष्यावर बाण ठेवला आणि पूर्वीप्रमाणेच आपल्या चौथ्या प्रहराची शिवाची पूजाही पूर्ण झाली. आता त्या शिका-याची शिवाच्या कृपेने सर्व पापे भस्मसात झाली, म्हणून तो विचार करू लागला – ‘धन्य आहेत हे प्राणी जे अज्ञानी असूनही आपल्या देहाचे दान करू इच्छितात, पण मी मात्र या पापकृत्याने माझे व माझ्या कुटूंबाचे पोट भरत आहे.' त्याने आपले धनुष्य बाणा फेकून दिले हरणांना सांगितले की ते सर्व धन्य आहेत आणि त्यांना परत जाऊ दिले. 


हे सर्व पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवले आणि त्यांना सुख-समृद्धीचे वरदान कृपा आशिर्वाद दिला. सर्वांचा उध्दार केला. 

हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व शिकाऱ्याला व्याध नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . 


महाशिवरात्री कशी साजरी केली जाते?

महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या काळात भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकर यांचा नामजप करतात. 

महाशिवरात्री पूजाविधी :

महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाली ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसऱ्या प्रहरात ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे.


शिवरात्रीचा अर्थ काय?

शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र.या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते.

शिवरात्रीच्या पूजेत काय अर्पण केले जाते?

शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध इत्यादींचा अभिषेक केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुले, चंदन, बेलची पाने, आणि धतुरा अर्पण केला जातो.

महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.






सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...