रामायणाची एक कथा आहे. अगदी शेवटाकडची. रामाचं अवतार कार्य संपलेलं असतं म्हणून काळ त्यांना घ्यायला आलेला असतो. पण तो आयोध्येच्या बाहेरच थांबून राहतो. वेळ जात राहतो, पण काळ काही आयोध्येमध्ये प्रवेश करीत नाही. ब्रम्हदेवांना प्रश्न पडतो की काळ असं का करतोय. ते त्याला विचारतात. काळ म्हणतो, "हनुमान राखी राम, जाऊ कसा आत, जीवाचे गा भय, जीवाहून थोर!" ब्रम्हदेव काय समजायचे ते समजतात आणि रामाकडे जातात. ते रामाला सांगतात ''काळाचाही काळ तुझा हनुमान... वाटे लाव त्याला, खूप लोटलासे काळ"
प्रभू श्रीराम विचारांती, हनुमानाला जवळ बोलवतात. नकळतच त्यांचे डोळे भरून येतात. युगायुगाच्या या सोबत्याला सोडून जाणं त्यांच्यासाठी अवघड असणार असतं. हनुमानाला त्याच्या धन्याची ही अवस्था का झाली ते कळू शकत नाही. तो प्रश्न विचारायला तोंड उघडणार एवढ्या रामाच्या हातातली एक अंगठी जमिनीवर पडते आणि हळुहळू घरंगळत जमिनीतील एका फटीमध्ये नाहीशी होते. हनुमानाच्या हे लक्षात येत नाही. राम त्याला सांगतो, तेवढी अंगठी घेऊन ये हनुमंता! हनुमान निरखून बघतो, भेग चांगलीच खोल असते. तो सूक्ष्म रूप धारण करतो आणि त्या भेगेमध्ये प्रवेशतो. तो खोल खोल जात राहतो.
अगदी धरणीच्या अंतापर्यंत आता हा प्रवास होणार, असं वाटत असतानाच, हनुमान नागलोकांत येऊन पोहोचतो. तिथलं गूढ वातावरण अधिकच गूढ वाटू लागतं. भलाथोरला नागराज हनुमानासमोर येतो. तो हनुमानाला म्हणतो, त्या पलिकडच्या खोलीमध्ये पडली आहे अंगठी. दोघेही त्या खोलीकडे चालू लागतात. दाराखालच्या फटीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडू पाहत असतो. हनुमान खोलीचं दार ढकलतो. दाराखालून बाहेर पडणारा पिवळा प्रकाश आता दोघांच्याही अंगावर पडू लागतो. हनुमान समोर बघतो तर एकसारख्या असंख्य अंगठ्यांची एक रास समोर पडलेली असते. नागराज हनुमानाला म्हणतो, शोध तुझी अंगठी!
हनुमान पुढे होऊन एक एक अंगठी उचलू लागतो. प्रत्येक अंगठीमध्ये त्याला त्याचा राम जाणवत असतो! प्रत्येकीला रामाचा स्पर्श झालेला असतो. तो बुचकळ्यात पडतो आणि पाताळाच्या स्वाम्याकडे बघतो. तो हसत असतो. तो हनुमानाला सांगतो, "प्रवेशला काळ, संपला अवतार, रघुरामाचा!" हनुमान पळतच दारकडे जाऊ लागतो. नागराज त्याला थांबवतो "उशिर जाहला, त्याने गाठ्ली गा वेळ! कसा रे फसशी, युगांचा हा खेळ! मारुतीराया युगांयुगे हे असंच चाललं आहे. दरवेळेस आंगठी पडते आणि दरवेळेस तू फसतोस!"
हनुमानाचे डोळे पाणवतात. त्याच्या डोळ्यासमोर असतो तो त्याच्या प्रभूचा चेहरा. त्या चेहर्याला नमस्कार करून हनुमान म्हणतो "नाही फसणार पुढच्या वेळी, नाही सोडणार राम"
*श्रीराम, जय राम, जय जय राम*
Jai Jai Shree Ram
ReplyDelete