Wednesday, 16 March 2022

होळी होलिकोत्सव

आज होळी. 

संपूर्ण भारतात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतात या सणाला ‘ होरी - दोलायात्रा ‘ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘ कामदहन ‘ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘ होळी किंवा शिमगा ‘ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘ शिग्मा किंवा शिग्मो ‘ असे म्हणतात. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘ सुगिम्हअ ‘ म्हणजे ‘ सुग्रीष्मक ‘ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘ शिग्मा ‘ हा शब्द रूढ झाला . त्यानंतर त्याचे ‘ शिमगा ‘ असे रूप रूढ झाले आहे.


होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे, पौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आणि या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव सर्वत्र साजरा होऊ लागला. अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.

महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.


होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे रंगाचा खेळ धुळवड साजरा करण्यामागे राधाकृष्णाची कथा सांगितली जाते. अशी मान्यता आहे की, जेव्हा कृष्णाला राक्षसीने विषारी दूध पाजलं तेव्हा त्याचा रंग निळा पडला होता. मोठं झाल्यावर कृष्णाने आपल्या रंगाला पाहिलं तेव्हा त्याला शंका आली की आपल्या अश्या दिसण्यामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलणार नाही तेव्हा ही शंका त्याने यशोदामाते जवळ व्यक्त केली. त्यावेळी यशोदामातेने सांगितले की असं कर तूला आवडणारा रंग घे आणि राधेला लावून ये यानंतर कृष्णाने मातेचं हे बोलणं ऐकून राधेला खरंच रंग लावला आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली आणि रंगाचा हा उत्सव साजरा होऊ लागला असं म्हटलं जातं.


होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ.  वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. “ होळी जळाली, थंडी पळाली “ असे म्हटले जाते. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी ! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आता लोक सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात.


होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो केमिकल , हानीकारक रंगांचा नाही . तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.







No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....