Monday, 18 April 2022

अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? व तिचे महत्व काय?

 आज अंगारकी चतुर्थी.   



 

नेहमी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाणारी ही तिथी मंगळवारी आल्यानंतर  "अंगारकी " म्हणून का संबोधिली जाते हे आज जाणून घेऊयात. 


सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी  उपवास धरतात. आपापल्या घरी  संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून त्याला २१मोदकांचा नैवेद्य दाखवून कुटुंबासमवेत आरती म्हणून, मगच हा उपवास सोडला जातो.


परंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी  येते तेंव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही आपल्या ब्रम्हांडातल्या नवग्रहातील मंगळ  ह्या ग्रहाशी निगडीत असल्याने ती कथाही तितकीच रंजक आहे. 


कृतयुगात अवंती नगरीत  वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनीच तर त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. 


ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. 


त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो  दिवस होता मंगळवारी  आलेल्या संकष्टी चतुर्थीचा.


" स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात होण्याचे," वरदान त्यानं त्याच्यावर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा  कडे मागितला.


यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, "ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी  केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि त्यामुळेच तर तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इप्सित मनोकामना पूर्ण होण्यास आणि हरतऱ्हेने  ते ऋणमुक्त होण्यास त्यांना तुझीच मदत होईल."


"अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम,   अंगारकासारखा लाल आहेस  म्हणून अंगारक,   व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून  मंगळ,  ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या  आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील". 


त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला  अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी  केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. 


 आजची मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही ह्या २०२२ साल शेवटचीच अंगारकी चतुर्थी  आहे. 


No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....