Monday, 21 March 2022

शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?

पुण्यवंत, सामर्थ्यवंत! नीतिवंत, जाणता राजा!

महाराष्ट्र सरकारने 2001 मध्ये फाल्गुन वद्य तृतीया, 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकरली आहे. सरकार कडून या दिवशी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याची सरकारी सुट्टी देखील दिली जाते. या व्यतिरिक्त संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख होती. त्यानुसार अनेक शिवभक्त शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतात. त्यानुसार वेगवेगळ्या दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखवली जाते.


शिवजयंती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?


गेले अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची याबाबत वाद-प्रतिवाद केले जात आहेत. तिथीनुसार शिवजयंती साजरी करा असं मनसे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या भाषणात म्हटलंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेस झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने यावरही अनेक मत-मतांतरे आहेत. त्यामुळेच प्रत्येक वर्षी शिवजयंतीच्या तारखेबाबत वेगवेगळे विचारप्रवाह दिसून येतात. या अशा विचारप्रवाहांमुळे शिवाजी महाराजांची सध्याची जन्मतारीख कशाप्रकारे ठरवण्यात आली याचा विचार करण्याचा प्रयत्न येथे करू.


सध्याच्या १९ फेब्रुवारी १६३० या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके १५५१ शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके १५४९ मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता ६ एप्रिल १६२७. (त्यामुळे जेथे शके १५४९ येते तेथे इसवी सन १६२७ आणि शके १५५१ येते तेथे इसवी सन १६३० साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे.)


लोकमान्य टिळकांचे योगदान :

छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणाऱ्यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे आणि वि. का. राजवाडे यांचे नाव आधी घेतले जाते.  टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करुन काही मते मांडली होती. १४ एप्रिल १९०० च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी याचा सविस्तर ऊहापोह केला होता. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली होती. बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हते.

डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे लिखित 'Birth Date of Shivaji' पुस्तक

डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी 'Birth Date of Shivaji' नावाने लिहिलेल्या पुस्तकात हे नमूद केले आहे. आपटे आणि परांजपे यांचे पुस्तक 'द महाराष्ट्रा पब्लिशिंग हाऊस लिमिटेडटने १९२७ साली प्रकाशित केले आहे.


टिळकांनी काही मुद्द्यांचा विचार तेथे केला होता.  ते लिहितात,

१) कवी भूषण यांनी 'शिवभूषण' या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख दिलेली नाही.

२) सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी लिहिली गेली. त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही. केवळ एके ठिकाणी वयाचा उल्लेख येतो ते म्हणजे जिजाबाई शहाजी महाराजांना भेटायला बंगळुरूला गेल्या तेव्हा शिवाजी महाराज १२ वर्षांचे होते.

३) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती ६ एप्रिल १६२७ येते. मात्र गणिती आकडेमोड करुन पाहिल्यास गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो. चिटणीस बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १३० वर्षांनी लिहिण्यात आली आहे.

४) रायरी बखर प्रा. फॉरेस्ट यांनी लिहिली होती. त्यामध्ये एके ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माचे शक १५४८ आणि एके ठिकाणी १५४९ लिहिले आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू शके १६०२ म्हणजे १६८० साली झाला असे लिहिले आहे. मात्र या बखरीत केवळ वर्षांचा उल्लेख आहे. जन्मतारखेचा नाही.

५) धार येथील 'काव्येतिहास संग्रहा'मध्ये तिथी वैशाख शुद्ध पंचमी, शके १५४९ आणि सोमवार हा जन्मवार दिला आहे. मात्र यामध्ये नक्षत्र चुकीचे देण्यात आले आहे.

६) बडोदा येथे छापून प्रकाशित झालेल्या 'शिवदिग्विजय' ग्रंथामध्ये शके १५४९, प्रभव संवत्सर, वैशाखद्वीतिया, गुरुवार, रोहिणी नक्षत्र अशी माहिती दिली आहे. व जन्मवार गुरुवार दिला आहे. चिटणीस बखरीप्रमाणे यातही गोंधळ दिसतो.

७) बडोदा येथे प्रकाशित झालेल्या 'श्रीशिवप्रताप' ग्रंथात शके १५४९चे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आले आहे. मात्र रक्ताक्षी हे नाव हे शके १५४६ चे होते. शके १५४९चे नव्हे.

८) संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही शिवाजी महाराजांची जन्मतारिख दिलेली नाही.

९) असंच एक वेगळं टिपण 'काव्येतिहास संग्रह' या नियतकालिकाने छापलेल्या 'मराठी साम्राज्याची छोटी बखर' या लेखात दिसून येतं. यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके १५४९, क्षय, वैशाख शुद्ध पंचमी, सोमवार असा उल्लेख आहे. इथे संवत्सर वर्षाचं नाव चुकले आहे. येथे प्रभव संवत्सर असायला हवे होते.

१०) भारतवर्ष या नियतकालिकाने 'एक्याण्णव कलमी बखर' प्रकाशित केली. त्यात शिवाजी महाराजांची जन्मतिथी १५ व्या परिच्छेदात दिली आहे. ती शके १५५९, क्षय, वैशाख, शुद्ध पंचमी अशी दिली आहे. येथे १५४९ ऐवजी १५५९ शक पडले आहे.

११) भारतवर्षाने 'पंत प्रतिनिधींची बखर'ही प्रसिद्ध केली आहे. त्यात १५४९, वैशाख पौर्णिमा, सोमवार असा उल्लेख आहे. ही एक वेगळीच तिथी देण्यात आली आहे.


जेधे शकावलीमुळे बदलली अभ्यासाची दिशा :

सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म शके १५४९ (१६२७) मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असे गृहित धरण्यात आले. मात्र १९१६ साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेधे शकावली.

या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी फाल्गुन वद्य तृतिया १५५१ ( शुक्रवार १९ फेब्रुवारी १६३० ) असल्याचे घोषित केले.

जेधे शकावली काय आहे?

आता जन्मतारखेबाबत इतकी माहिती देणारी जेधे शकावली आहे तरी काय हे जाणून घ्यायला हवे. हा एक २३ पानांचा दस्तऐवज आहे. यातील पानांच्या दोन्ही बाजूंना मजकूर लिहिलेला आहे. जेधे शकावलीमध्ये शके १५४९ ते शके १६१९ म्हणजेच इसवी सन १६१८ ते १६९७ या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या घटनांच्या तारखा लिहून ठेवल्या आहेत.

भोर संस्थानातील एका गावाचे देशमुख दयाजीराव सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांनी ही शकावली टिळकांकडे सोपवली होती. जेधे शकावलीचा अभ्यास अनेक इतिहास अभ्यासकांनी केला आणि त्यातील बहुतांश नोंदी सुयोग्य असल्याचा निर्वाळा दिला.

या शकावली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांपर्यंतच्या नोंदी आहेत आणि त्याच्या लेखकास अस्सल कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध होत असावीत असे दिसते.

जेधे शकावली


वानगीदाखल काही उदाहरणे डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी दिली आहेत. ते लिहितात,

1) जेधे शकावलीमध्ये औरंगजेबाची जन्मतिथी कार्तिक प्रतिपदा शके १५४० दिली आहे. जदुनाथ सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे योग्य आहे.

2) नौशेरखानाबरोबर झालेली लढाई शके १५७९ मध्ये ज्येष्ठ महिन्यात झाली. ही नोंदही बरोबर आहे.

3) शिवाजी महाराजांनी श्रीरंगपूर ताब्यात घेतल्याची तिथीही योग्य आहे.

4) सुरत लुटीची तारीख आणि इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेली नोंद जुळते.

5) जयसिंहाशी केलेल्या तहाची तारीखही अगदी बरोबर जुळली आहे.


१६२७ की १६३० ? 

आता इतके सर्व झाल्यावर शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की १६२७ ची की १६३० ची मान्य करावी हा प्रश्न उरतोच. आपटे आणि परांजपे यांनी १६२७ म्हणजे १५४९ शक नसावे हे सांगण्यासाठी काही काही नोंदी दिल्या आहेत.

1) कवी परमानंद- 'शिवभारत' लिहिणाऱ्या कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील १६६२ पर्यंतच्या घडामोडी दिल्या आहेत. त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ अशी तिथी दिली आहे. जेधे शकावलीशी ही नोंद जुळते.

2) राज्याभिषेक शकावली- शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळेस तयार करण्यात आली होती. त्यातही फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ ही तारीख आहे. ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात सापडली आहे.

3) फोर्ब्स दस्तऐवज- गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए. के फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके १५५१ अशी नोंद आहे.

4) जेधे शकावली-या शकावलीत स्पष्टपणे १५५१ या वर्षाचा उल्लेख आहे.

5) दास-पंचायतन शकावली- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म शके १५५१ मध्ये झाला अशी नोंद आहे.

6) ओर्नेसच्या नोंदी- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म १६२९ साली झाला अशी नोंद आहे.

7) स्प्रेंजेल- या १७९१ साली प्रसिद्ध झालेल्या जर्मन पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म १६२९ साली झाला असे लिहिण्यात आले आहे.

8) तंजावरचा शिलालेख- तंजावरमध्ये १८०३ साली कोरलेल्या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म शके १५५१ साली झाल्याची नोंद आहे. मात्र त्यात संवत्सराचे नाव चुकले आहे.


जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका :

शिवाजी महाराजांचा जन्म १६३० साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलींबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पं. रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगडा झाला. या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली आहे.



जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका



त्यात मारवाडी भाषेत नोंद केली आहे - ||संवत १६८६ फागूण वदि ३ शुक्रे उ. घटी ३०|९ राजा शिवाजी जन्मः || संवत १६८६ फाल्गुन वद्य ३ म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ (सन १६३०).

(संवत कालगणना आपण सध्या वापरत असलेल्या इसवी सनाच्या आधी 56 वर्षे सुरु होते त्यामुळे प्रत्येक वर्षातून 56 वर्षे वजा केली इसवी सन समजून घेता येते.)


१९६६ साली राज्य सरकारने स्थापन केलेली समिती :

शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती १९६६  साली स्थापन केली. या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता.

समितीच्या पहिल्या बैठकीला आ. ग. पवार काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत महामोपाध्याय द. वा. पोतदार, ग. ह. खरे, वा. सी बेंद्रे. ब. मो. पुरंदरे. मोरेश्वर दीक्षित यांचे फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३०) या तारखेवर एकमत झाले. मात्र न. र. फाटक यांनी मात्र वैशाख शुद्ध द्वीतिया शके १५४९ (६ एप्रिल १९२७) ही तारीख योग्य वाटते असे मत दिले.

सर्व सदस्यांनी त्यानंतर आपापली निवेदनेही समितीसमोर सादर केली. न. र. फाटक यांच्या तारखेचे खंडन करणारी निवेदनेही सादर करण्यात आली.


महाराष्ट्र सरकारने 1966 साली स्थापन केलेल्या समितीच्या अहवालाचे मुखपृष्ठ

दुसऱ्या बैठकीसाठी आ. ग. पवार उपस्थित राहिले. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा निर्णायक पुरावा नसल्यामुळे जुनी तारीख कायम ठेवावी असं मत त्यांनी मांडलं. या बैठकीत एकमत न झाल्यामुळे जन्मतारखेबाबतचा निर्णय शासनाकडेच सोपवण्यात आला.

शेवटी "ठाम पुरावा उपलब्ध होईपर्यंत किंवा इतिहासतज्ज्ञांत एकवाक्यता येईपर्यंत समारंभाच्या सोईसाठी जुनीच तिथी म्हणजे वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (इसवी सन १६२७) ही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे." असा निर्णय शासनाने समिती सदस्यांना कळवला.


गजानन भास्कर मेहेंदळे यांचे लेखन :

गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेल्या 'श्री राजाशिवछत्रपती' या ग्रंथाच्या सोळाव्या परिशिष्टामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे.

त्यात त्यांनी एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, पंतप्रतिनिधींची बखर, सातारच्या छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी, शिवदिग्विजय बखर, नागपूरकर भोसल्यांची बखर, शेडगावकर बखर, प्रभानवल्ली शकावली, धडफळे यादी, न्या. पंडितराव यांची बखर, शिवाजीप्रताप बखर, जेधे शकावली, राज्याभिषेक शकावली, फोर्ब्स शकावली, शिवभारत, तंजावर शिलालेख, घोडेगावकर शकावली, चित्रे शकावली, कोस्मी द ग्वार्दचा उल्लेख, रॉबर्ट आर्मचा उल्लेख, स्प्रेंजेलमधील उल्लेख या सर्वांचा विचार केला आहे. मेहेंदळे यांनी ऐतिहासिक साधनांमध्ये चुका का होतात याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे.


प्रमोद नवलकर यांना विनंती

मेहेंदळे यांनी १९९६  साली झालेल्या पुढील घडामोडींचा उल्लेख या परिशिष्टाच्या शेवटी केला आहे. १९९६ साली तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांची भारत इतिहास संशोधन मंडळाचे वि. द. सरलष्कर, भारतीय इतिहास संकलन समितीचे महाराष्ट्र कार्यवाह चिं. ना. परचुरे आणि इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी भेट घेतली. फाल्गुन वद्य ३, १५५१  ही तिथी स्विकारण्यासाठी सरकारने नवी समिती स्थापन करण्याची विनंती त्यांनी नवलकर यांच्याकडे केली.

त्यावर एकदा समिती स्थापन झाली आहे. आता फाल्गुन वद्य 3 या या दिवशी सरकारने जन्मतिथीचा उत्सव साजरा करायचे ठरवले आहे. याबाबत ज्यांना आपले म्हणणे सरकारकडे सादर करायचे आहे त्यांनी एका महिन्यात सादर करावे. त्याबाबत सरकारी निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होईल आणि सरकार निर्णय घेईल असे प्रमोद नवलकर यांनी सांगितले.

त्यावर दहा अभ्यासकांनी आपली मते कळवली आणि त्या सर्वांनी फाल्गुन वद्य तृतिया १५५१ ला अनुकूल मत दिले होते. ही सर्व माहिती मेहेंदळे यांनी 'श्री राजा शिवछत्रपती' ग्रंथात पान क्र ६४७,६४८,६४९ वर दिली आहे.


१९ फेब्रुवारी ही तारिख कशी ठरली?

सध्याचा १९ फेब्रुवारी १६३० या तारखेचा निर्णय कसा झाला याबाबत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. या तारखेच्या निर्णयासाठी त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात प्रयत्न केले होते.

त्या म्हणाल्या, "याबाबत जुन्या समितीचा अहवाल, इतर पुरावे मांडून मी शासकीय ठराव मांडला. त्याला विधिमंडळाने मंजुरी दिली आणि १९ फेब्रुवारी १६३० तारखेला मान्यता मिळाली. त्यानंतर नव्या सरकारमध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तेव्हा मी या निर्णयाच्या अंमलबाजवणीसाठी पुन्हा प्रयत्न केले. विलासराव देशमुख यांच्या आघाडी सरकारच्या कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली आणि हा निर्णय लागू झाला."

इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना समकालीन पुरावे पाहाता १६३० मधील तारीख सुयोग्य असल्याचे दिसते म्हणून या तारखेचा आम्ही पाठपुरावा करतो असे सांगितले.


'नवे पुरावे मिळू शकतात'

तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, "जन्मतिथिबाबत नवा ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत थोडा धीर धरुन आधीची तारिख कायम ठेवता आली असती. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत नवा अस्सल पुरावा मिळणार नाहीच असे नाही."

१०० वर्षांहून अधिक काळ संशोधन करुनही आजही शिवाजी महाराजांची जयंती नक्की कधी साजरी करावी याबद्दल दुमत दिसून येतेच. आज काही ठिकाणी शिवजयंती जुन्या तारखेनुसार, शासकीय उत्सव नव्या तारखेस आणि काही ठिकाणी तिथीनुसार जयंती साजरी होते.

(लेखक : ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी)

Wednesday, 16 March 2022

होळी होलिकोत्सव

आज होळी. 

संपूर्ण भारतात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतात या सणाला ‘ होरी - दोलायात्रा ‘ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘ कामदहन ‘ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘ होळी किंवा शिमगा ‘ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘ शिग्मा किंवा शिग्मो ‘ असे म्हणतात. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘ सुगिम्हअ ‘ म्हणजे ‘ सुग्रीष्मक ‘ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘ शिग्मा ‘ हा शब्द रूढ झाला . त्यानंतर त्याचे ‘ शिमगा ‘ असे रूप रूढ झाले आहे.


होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे, पौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आणि या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव सर्वत्र साजरा होऊ लागला. अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.

महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.


होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे रंगाचा खेळ धुळवड साजरा करण्यामागे राधाकृष्णाची कथा सांगितली जाते. अशी मान्यता आहे की, जेव्हा कृष्णाला राक्षसीने विषारी दूध पाजलं तेव्हा त्याचा रंग निळा पडला होता. मोठं झाल्यावर कृष्णाने आपल्या रंगाला पाहिलं तेव्हा त्याला शंका आली की आपल्या अश्या दिसण्यामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलणार नाही तेव्हा ही शंका त्याने यशोदामाते जवळ व्यक्त केली. त्यावेळी यशोदामातेने सांगितले की असं कर तूला आवडणारा रंग घे आणि राधेला लावून ये यानंतर कृष्णाने मातेचं हे बोलणं ऐकून राधेला खरंच रंग लावला आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली आणि रंगाचा हा उत्सव साजरा होऊ लागला असं म्हटलं जातं.


होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ.  वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. “ होळी जळाली, थंडी पळाली “ असे म्हटले जाते. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी ! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आता लोक सांस्कृतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही याकडे पाहतात.


होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो केमिकल , हानीकारक रंगांचा नाही . तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.







Monday, 28 February 2022

महाशिवरात्री व्रत कथा

यावर्षीची महाशिवरात्री अनेकार्थाने विशेष आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे यंदा भाविकांनी महादेवाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. मंदिरात जाऊन पूजाविधी आणि नामस्मरण करता येणार आहे.

                                

भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे.  या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात.

प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.

महाशिवरात्री कथा :

समुद्र मंथना वेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झाले होते. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होते ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून, कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतू मंथनातून हे अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले.

यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास नीळकंठ असे ही म्हटले जाते. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या पोर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात.


या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते

एकदा ब्रह्मा आणि विष्णू दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतता निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेले. भांडण कसे मिटवायचे या चिंतेत सगळे देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर हि गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरवात आणि शेवट नसणाऱ्या अग्निलिंगाच्या रुपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांचा प्रयत्न निष्फल ठरला त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघे ही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या अग्निलिंगसमोर हात जोडले. हात जोडताच त्यातून ऊॅं असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, अग्निलिंगच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्पटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर अग्निलिंगच्या रुपात प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.


महाशिवरात्री ची पुराणकथा –

ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन ‘कालकूट’ नावाचे हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते. अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते.

उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि ईच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी . . .

महाशिवरात्रि व्रत कथा :

प्राचीन काळी एका जंगलात गुरुद्रुह नावाचा एक शिकारी राहत होता जो वन्य प्राण्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता, शोध घेऊनही त्याला शिकार सापडली नाही, त्याची मुले, पत्नी आणि आई-वडील उपाशी राहतील, सूर्यास्ताच्या वेळी त्याला काळजी वाटू लागली. तो एका जलाशयाजवळ गेला आणि एका झाडावर पाणी प्यायला घेऊन चढला, कारण त्याला आशा होती की इथे कोणीतरी प्राणी आपली तहान भागवायला येईल.ते झाड ‘बेल’चं होतं. आणि त्याच झाडाखाली शिवलिंग होते व ते बेलाच्या पानांनी झाकून गेले होते. त्यामुळे दिसत नव्हते. 


रात्रीचे पहिले प्रहर संपण्यापूर्वी तेथे एक हरिणी पाणी प्यायला आली. तिला पाहताच शिका-याने तिच्यावर बाण सोडला, असे करताना त्याच्या हाताने बेलाची काही पाने आणि पाण्याचे काही थेंब उडाले व  खाली असलेल्या शिवलिंगावर पडले आणि अनवधानाने शिका-याच्या हातून पहिल्या प्रहराची पूजा झाली. पानांचा सळसळाट ऐकून हरणाने घाबरून वर पाहिले आणि शिका-याला थरथरत्या स्वरात म्हटले  ‘मला मारू नकोस. .’ शिकारी म्हणाला की तो आणि त्याचे कुटुंब भुकेले आहे म्हणून तो तिला सोडू शकत नाही. हरिणीने वचन दिले की ती आपल्या मुलांना तिच्या मालकाच्या स्वाधीन करून परत येईल. मग तो त्याची शिकार करतो. शिका-याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तिने पुन्हा शिकारीला असे सांगून पटवून दिले की ती देखील सत्य बोलत आहे. त्यामुळे क्रूर असलेल्या शिका-याला दया आली आणि ‘लवकर परत ये’ असे म्हणत हरिणीला त्याने जाऊ दिले.


थोड्या वेळाने दुसरे हरीण पाणी प्यायला तेथे आले, शिकारी सावध झाला, त्याने बाण सोडण्यास सुरुवात केली आणि असे करत असताना पुन्हा पूर्वीप्रमाणेच त्याच्या हाताच्या हालचालीने थोडे पाणी आणि काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली. शिका-याकडून दुसर्‍या प्रहराचीही पूजा  झाली. हे हरणही घाबरले, शिका-याकडे जीवाची भीक मागितली. पुन्हा एकदा शिका-याने दया येऊन त्याला जाऊ दिले. 


काही वेळाने तिसरी हरिणी आलि व पुन्हा एकदा आधीच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन तिलाहि

शिका-याने जाऊ दिले. मात्र बराच वेळ गेला तरी एकही हरिण परत न आल्यामुळे तो चिंतेत पडला व त्याला आपल्या कुटूंबाचि चिंता सतावू लागली. 


काही वेळाने त्याला एक नर मृग येताना दिसला. शिका-याने नेम धरताच त्या मृगाने शिका-याची विनवणी केली व त्याला सांगितले की, यापूर्वी ज्या तीन हरिणी गेल्या आहेत, त्या त्याच्याच पत्नी आहेत व तू मला त्यांचाकडे जाऊ दिले तर मी वचन देतो की त्यांना व माझ्या मुलांना भेटून परत येतो मग तू सावकाश माझा बळी घे. शेवटी शिका-याला दया आली व त्याने त्यालाही जाऊ दिले.


रात्रीचा शेवटचा प्रहर सुरू झाल्यानंतर काही काळाने शिका-याने पाहिले की तो नरमृग व त्याच्या तीनही हरिणी आपल्या मुलांसह एकत्र त्याच्याकडे येत आहेत. त्यांना पाहताच त्याने आपल्या धनुष्यावर बाण ठेवला आणि पूर्वीप्रमाणेच आपल्या चौथ्या प्रहराची शिवाची पूजाही पूर्ण झाली. आता त्या शिका-याची शिवाच्या कृपेने सर्व पापे भस्मसात झाली, म्हणून तो विचार करू लागला – ‘धन्य आहेत हे प्राणी जे अज्ञानी असूनही आपल्या देहाचे दान करू इच्छितात, पण मी मात्र या पापकृत्याने माझे व माझ्या कुटूंबाचे पोट भरत आहे.' त्याने आपले धनुष्य बाणा फेकून दिले हरणांना सांगितले की ते सर्व धन्य आहेत आणि त्यांना परत जाऊ दिले. 


हे सर्व पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवले आणि त्यांना सुख-समृद्धीचे वरदान कृपा आशिर्वाद दिला. सर्वांचा उध्दार केला. 

हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व शिकाऱ्याला व्याध नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . 


महाशिवरात्री कशी साजरी केली जाते?

महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या काळात भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकर यांचा नामजप करतात. 

महाशिवरात्री पूजाविधी :

महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात ‘श्रीशिवाय नमः’ असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात ‘श्रीशंकराय नमः’ असे म्हणावे. निशीथकाली ‘श्रीसांबसदाशिवाय नमः’ असे जपावे. तिसऱ्या प्रहरात ‘श्रीमहेश्वराय नमः’ आणि चौथ्या प्रहरात ‘श्रीरुद्राय नमः’ असा नामोच्चार करून समर्पण करावे.


शिवरात्रीचा अर्थ काय?

शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र.या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते.

शिवरात्रीच्या पूजेत काय अर्पण केले जाते?

शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध इत्यादींचा अभिषेक केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुले, चंदन, बेलची पाने, आणि धतुरा अर्पण केला जातो.

महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.






नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेले कदाचित सर्वात जुने शिव मंदिर

 आयेश्वर (ऐश्वर्येश्वर) मंदिर, सिन्नर :



सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर तसं बऱ्याच लोकांना परिचित आहे. पण त्याच्यापासून काहीश्या अंतरावरील सरस्वती नदीच्या किनारी असलेले आयेश्वराचं ( ऐश्वर्येश्वर ) प्राचीन मंदिर फारसं कोणाला माहीत नाही आणि या मंदिराबद्दल फारशी माहिती देखील सहसा उपलब्ध होत नाही. ऐश्वर्येश्वर मंदिर हे नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अलिकडे आहे. 


द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर अतिशय सुंदर  आहे. आजही ह्या मंदिरावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. दुर्दैवाने मंदिराची पडझड दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे. मंदिर सुदैवाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक च्या यादीत असल्यामुळे मंदिरा भोवतालचा परिसर अतिक्रमणापासून सुरक्षित आहे व त्याला रीतसर कंपाऊंड देखील केलेले आहे. मंदिरात माहितीचा कुठलाही फलक अथवा शिलालेख उपलब्ध नाही. चालुक्य (कल्याणी) ज्याला द्राविडी शैली असं म्हणतात त्या शैलीतील सर्वात उत्तरेकडील मंदिर म्हणजे ऐश्वरेश्वर मंदिर असे मानले जाते. जाणकारांच्या मते हे मंदिर कालदृष्ट्या गोंदेश्वर मंदिरापेक्षाही आधीचे असावे. यादव राजे मांडलिक असताना देवगिरी ही यादवांची राजधानी नसताना या कालखंडात बांधले गेलेल एक दुर्लक्षीत मंदिर सरस्वती नदीच्या किनारी असलेलं ऐश्वर्येश्वर मंदिर. यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव याने हे ऐश्वर्येश्वर शिवमंदिर बांधले असावे असे मानले जाते.


ऐश्वर्येश्वर मंदिर दिसायला अगदी लहानसे द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं, मूळचे शिखर अस्तित्वात नाही त्यामुळे शैली नीट ओळखता येत नाही. कमानीवर नृत्य करणारा शिव, त्याच्या कमानीवर असलेले लक्ष्मीचे शिल्प आणि गर्भगृहाच्या द्वारावरील ललाटावर कोरलेल्या सप्तमातृकांच्या मूर्ती, अंतराळाच्या छतावर असलेले अष्टदिक्पाल या आणि अशा बऱ्याच सुंदर मूर्ती आपल्याला या मंदिरावर पाहायला मिळतात. समोरच्या भिंतीतील स्तंभांवर ब्रह्मा व विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत प्राकारातील स्तंभ चौकोनी षटकोनी अष्टकोनी असून त्यावर विष्णूचे अवतार आणि नृत्यांगना यांच्या सुंदर मूर्ती आहेत त्याच्या वास्तुशैली वरून तज्ञांच्या मते ते दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावे.


मंदिराचा चौथरा विस्तीर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.   नक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी याची रचना आहे. गाभारा साधा असून कोपऱ्यात अर्धे खांब आहेत.  गाभार्‍यात शिवलिंग आणि त्यासमोरील मंडपात नंदी विराजमान दिसतो. नंदीच्या गळ्यात माळ व पाठीवर झूल आहे पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ उत्कृष्ट नक्षीकामाचे नमुने आहेत ते स्तंभ सरळ आहे इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ निमुळते झालेले नाहीत. मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षीकामाबरोबरच उत्तम मूर्तिकामसुद्धा या खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिरांप्रमाणे वर चौकटीजवळ निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर पाहून मन मोहून जातं. गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही भग्न शिल्प आपल्याला दिसतात पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे ती नीट ओळखता येत नाहीत. 


या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर दगडात कोरलेले अप्रतिम मकर तोरण हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या मंदिराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरलेलं मकर तोरण. मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम कलाकुसर असलेले तोरण लक्ष वेधून घेते. ह्या अर्ध वर्तुळाकार तोरणाची सुरुवात दरवाज्याच्या खांबांपासून होते. दोन्ही खांबांवर दोन मकर असून मध्ये गंधर्व कीचक यांचे तोरण आहे. नैसर्गिक झीज सोडली तर हे तोरण फारच अप्रतिम आहे. असे हे खरोखरंच ऐश्वर्य असलेलं प्राचीन ऐश्वर्येश्वर मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्यांनी पाहावे असेच आहे.


ऐश्वर्येश्वर मंदिर (आधीच्या पोस्ट्स) 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/12/blog-post_60.html

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/11/blog-post_29.html

  

गोंदेश्वर मंदिर 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/01/blog-post_17.html

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/11/blog-post_9.html













































Thursday, 24 February 2022

महादेवाचे असे एक मंदिर जे फक्त महाशिवरात्रीलाच उघडले जाते



सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंदिराचे कुलूप फक्त बारा तासांसाठी उघडले जातात.


भारतात महादेवाची अनेक मंदिरे आहेत. यातील काही मंदिरे वर्षाचे बाराही महिने खुली असतात तर काही फक्त काही महिन्यांसाठी खुली केली जातात. परंतु, मध्यप्रदेशात महादेवाचे असे एक मंदिर आहे जे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच उघडले जाते. मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एक खूप जुने महादेवाचे मंदिर आहे. प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर रायसेनच्या प्राचीन किल्ला संकुलातील एका उंच टेकडीवर वसलेले आहे. येथील भगवान सोमेश्वर महादेवाचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते.


या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे दार फक्त महाशिवरात्रीच्या वेळीच उघडले जातात. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत प्रशासकीय अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंदिराचे कुलूप फक्त बारा तासांसाठी उघडले जातात. म्हणजेच या दिवशीही सूर्योदयाच्या वेळी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर ते सूर्यास्तानंतर बंद केले जातात.


असे असताना देखील अनेक भक्त वर्षभर या मंदिराला भेट देतात, परंतु यादरम्यान मंदिराच्या दाराला कुलूप लावलेले असते. यावेळी भक्त बाहेरूनच महादेवाची पूजा करतात आणि नवस मागून मंदिराच्या लोखंडी दरवाजाला कापड बांधतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्त हे कापड उघडण्यासाठीही येतात.


या मंदिरात बांधलेल्या शिवलिंगाबद्दलची एक अद्भूत गोष्ट म्हणजे या शिवलिंगावर सूर्याची किरणे पडली की ते सोन्यासारखे चमकते. श्रावण महिन्यात भाविकांना जलाभिषेकासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था केली जाते. यावेळी लोखंडी जाळी लावून शिवलिंगाचे दुरूनच दर्शन घेतले जाते आणि पाईपद्वारे शिवलिंगाला जल अर्पण केले जाते.


व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://youtu.be/xEc7swLog8Q

https://youtu.be/xEc7swLog8Q











Saturday, 19 February 2022

द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

माघ महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीच्या ३२ रूपांपैकी ६व्या स्वरूपाची म्हणजेच ‘द्विज’ स्वरुपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला चार डोके आणि चार हात आहेत. या रूपात चार दिशेला चार मुख असून शुभ्र वर्ण आहे. चारी हातांमध्ये कमंडलू, रुद्राक्ष, छडी व ग्रंथ धारण केलेलं आहेत. ब्रह्मदेवाप्रमाणेच दोनदा जन्म झाल्यामुळे या गणेशाच्या रूपास द्विज गणेश असे नाव पडले. याचे चार हात म्हणजे चार वेदांचे प्रतीक मानले जाते.

या स्वरूपात श्री गणेशाचे ज्ञान व संपत्ती हे प्रमुख गुण आहेत. हे दोन्ही प्राप्त करण्यासाठी श्री गणेशाच्या या रूपाची आराधना केली जाते. त्यांची उपासना आणि उपवास केल्यास सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. यासह, चांगले आरोग्य आणि आनंदी व समृद्धी प्राप्त होते.

द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!!




Friday, 18 February 2022

बाल शिवबाचा पाळणा

पाळणा हा मराठी भाषेचा एक वैशिष्ट्यपूर्ण गीतप्रकार आहे.  शेकडो वर्षांपासून मराठी माता भगिनींनी हि लोककला जोपासली व वृद्धिंगत केली आहे. राम, कृष्ण इ. विविध देवदेवतांचे पाळणे सर्वांनाच परिचित आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा ही प्रसिद्ध आहे. 


महाराष्ट्रात जसा बाळाचा पाळणा किंवा अंगाई गीत असते तसेच गुजरात मध्ये हालरडू म्हटले जाते.  प्रसिध्द गुजराथी कवी झवेरचंद मेघाणी यांनी शिवरायांचा पाळणा म्हणजे शिवजीनू हालरडू हे गीत लिहिले आहे. यांचा जन्म १७ आँगस्ट १८९७ चोटीला गुजरात चा.  थोडक्यात हा शिवाजी महाराजांचा गुजराथी भाषेतील पाळणा म्हणता येईल. 


आज शिवजयंतीनिमित्त पाहुयात हा गुजराथी पाळणा...  


आभमां ऊगेल चांदलो ने,

जिजाबाईने आव्या बाळरे

बाळुडाने माता हींचोळे,

धणनना डुंगरा बोले,

शिवाजी ने निंदरू ना आवे,

माता जिजाबाई झुलावे......

अर्थ :- आभाळात चंद्र उगवला आहे नी जिजाऊ साहेबांनी एका सुंदर राजकूमाराला जन्म दिला. या बाळाला आऊसाहेब पाळ्यात झोके देत आहे, पण बाळ शिवबाला झोप काही येत नाही कारण बाहेर गुलामगीरीच्या अंधारात बुडालेल्या डोंगरांचा घणघणाट होत आहे.


पेटमां पोढीने सांभळेली बाळे,

राम-लक्षमणनी वात

माताजीने मुख जे दीथी,

ऊडी एनी उंघ ते दीथी.....

अर्थ :- पोटामध्ये असतना मातेच्या मुखातून राम-लक्ष्मणाच्या शौर्य कथा ऐकल्या होत्या आणि त्या दिवसापासूनच या बाळ शिवबाची झोप ऊडाली होती.


पोढजो रे, मारां बाळ !

पोढीलेजो पेट भरीने आज

काले काळा युध खेलासे

सुवाताणू ख्याल न रहेशे......

अर्थ :- बाळा झोपून घे रे आज पोट भरून जोझोप . कारण उद्या घनघोर युद्ध खेळायला जाशील तेंव्हा तू तूझी झोप विसरून जाशील.  झोपायचे लक्षातही राहणार नाही.


धावजो रे मारा पेट,

धावी लेजो खुब ध्रुपीने आज,

रेहेशे नही रणघेलुजा !

खावा मिठी धाननी वेळा......

अर्थ : बाळा आज तू पोट भरून खाऊन घे, उद्या तू मोठा होशील तेव्हा तू युध्द खेळायला गेल्यावर जेवायची उसंतही नसेल तसेच जेवणात गोड धोड ही नसेल.


पेर ओढी लजो पातळा रे !

पीला, लाल, पीरोजी चीर,

काया तारी लोही मा नहशे,

दखन तेडी धालनू थासे......

अर्थ :- आज लाल पिवळ्या रंगाचे, जरीची सुंदर कापडे घाल, उद्या तुझे शरिर शत्रूच्या रक्ताने माखेल आणि अंगावर वस्त्र म्हणून ढाल लावावी लागेल.


घूघरा, घावणी पोपट-लाकडी 

फेरवी लेजो आज,

ते दी तारे हाथ रहेवानी

राती बंबोळ भवानी....

अर्थ :-  घुघरा, धावणी, लाकडी पोपट याने आज मनसोक्त खेळून घे, नंतर बाळा तुला भवानी तलवार हातात घ्यावी लागेल.


लाल कंकु केरा चांदला ने

ताणजो केसरा आड्या,

ते दी तो सिंदोरीया थापा,

छाती माथे झीलवा बापा.....

अर्थ :-  आज मी  लाल कुंकवाची चंद्रकोर तुझ्या कपाळावर लावत आहे पण नंतर तू मोठा झाल्यावर तुझ्या विजयासाठी याच कुंकुवाच्या रंगाने रंगलेले माझ्या हाताचे ठसे तुझ्या छातीवर उमटवीन.


आज माता चोडे चुमीयु रे बाळा

झीलजो बेवड गाल

तेडी तारा मोढाडां माथे

धूवाधार तोप मंडाशे....

अर्थ :- बाळा आज आई तुझ्या  गालाचे मुके घेत आहे पण नंतर तुझ्या चेह-या भोवती तोफा फुटतील आणि तोफ गोळे शत्रू वर पडतील.


आज माताजीने गोदमा रे तुंने

हूफ आवे आंठ पाहोर,

ते दी काळी मेघली राते,

वायु ताढा मोतना वाशे...

अर्थ :-  आज आईच्या कुशीत तुला खुप बरे वाटेल चांगली झोप ही लागेल पण उद्या युद्धाची काळी रात्र असेल व वारे देखील मृत्यूचे वाहतील यातूनच अखंड सावध राहून तूला मार्ग काढावा लागेल.


आज माताजीने खोळले रे 

तारां झोले जय,

ते दी तारे शिर ओशीका 

मेलाशे तीर-बंदूका...

अर्थ :- आज आईच्या मांडीवर डोके ठेवून शांत निजला आहेस पण उद्या रणात ही आईची कूस तूला मिळणार नाही तर तिथे तुझ्या भोवती बाण आणि बंदुका असतील.


सुई लेजे, मारा केसरी रे ! तारी

हिंदवाण्यू जोवे वाट,

जागी व्हेलो आव बालुडा !

माने हाथ भेट बांधवा...

अर्थ :- बाळा आज तुझी झोप पुर्ण करून घे कारण उभा हिदुस्थान तुझी वाट बघतो आहे. उद्या लवकर उठून तुला तुझ्या आईचे हिंदवी स्वराज्या चे स्वप्न आहे ते पुर्ण करायचे आहे.


जागी व्हेलो आवजो वीरा !

टीलु माँ ना लोहीनु लेवा !

अर्थ :-  माझ्या रक्ताचे कूंकु तुझ्या कपाळाला लावायचे आहे म्हणून लवकर उठून ये....


(सौजन्य : इंटरनेट वरून कॉपी पेस्ट )


बाल शिवबाचा मराठी पाळणा 


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा…


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…


गाली तील लावून बाळा काजळ घाला

डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी

घुंगर वाळा राजस रूपड,

डोही टोपड पाहून सुख गोपाळा

लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा

कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा…


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

जो जो रे बाळा..

जो जो रे..

जो जो रे बाळा..

जो जो रे.. जाग रे..

बाळा जाग रे..


ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे

शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे

गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे

बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे

खडे आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा…


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…


गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा

उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा

राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा

लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा

कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा…


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

जो जो रे बाळा..

जो जो रे.. जो जो रे बाळा..

जो जो रे.. जाग रे..

बाळा जाग रे..

ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे

शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे

गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे

बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे

आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा…


झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा

झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा




अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...