Monday, 28 February 2022

नाशिक जिल्ह्यातील अस्तित्वात असलेले कदाचित सर्वात जुने शिव मंदिर

 आयेश्वर (ऐश्वर्येश्वर) मंदिर, सिन्नर :



सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर तसं बऱ्याच लोकांना परिचित आहे. पण त्याच्यापासून काहीश्या अंतरावरील सरस्वती नदीच्या किनारी असलेले आयेश्वराचं ( ऐश्वर्येश्वर ) प्राचीन मंदिर फारसं कोणाला माहीत नाही आणि या मंदिराबद्दल फारशी माहिती देखील सहसा उपलब्ध होत नाही. ऐश्वर्येश्वर मंदिर हे नाशिक-शिर्डी मार्गावर सिन्नर बस डेपोच्या अलिकडे आहे. 


द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर अतिशय सुंदर  आहे. आजही ह्या मंदिरावरील शिल्प आपले लक्ष वेधून घेतात. दुर्दैवाने मंदिराची पडझड दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे. मंदिर सुदैवाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक च्या यादीत असल्यामुळे मंदिरा भोवतालचा परिसर अतिक्रमणापासून सुरक्षित आहे व त्याला रीतसर कंपाऊंड देखील केलेले आहे. मंदिरात माहितीचा कुठलाही फलक अथवा शिलालेख उपलब्ध नाही. चालुक्य (कल्याणी) ज्याला द्राविडी शैली असं म्हणतात त्या शैलीतील सर्वात उत्तरेकडील मंदिर म्हणजे ऐश्वरेश्वर मंदिर असे मानले जाते. जाणकारांच्या मते हे मंदिर कालदृष्ट्या गोंदेश्वर मंदिरापेक्षाही आधीचे असावे. यादव राजे मांडलिक असताना देवगिरी ही यादवांची राजधानी नसताना या कालखंडात बांधले गेलेल एक दुर्लक्षीत मंदिर सरस्वती नदीच्या किनारी असलेलं ऐश्वर्येश्वर मंदिर. यालाच आयेश्वर मंदिर असेही म्हणतात. यादव आईरमदेव याने हे ऐश्वर्येश्वर शिवमंदिर बांधले असावे असे मानले जाते.


ऐश्वर्येश्वर मंदिर दिसायला अगदी लहानसे द्रविड आणि वेस्सर अशा मिश्र शैलीचं, मूळचे शिखर अस्तित्वात नाही त्यामुळे शैली नीट ओळखता येत नाही. कमानीवर नृत्य करणारा शिव, त्याच्या कमानीवर असलेले लक्ष्मीचे शिल्प आणि गर्भगृहाच्या द्वारावरील ललाटावर कोरलेल्या सप्तमातृकांच्या मूर्ती, अंतराळाच्या छतावर असलेले अष्टदिक्पाल या आणि अशा बऱ्याच सुंदर मूर्ती आपल्याला या मंदिरावर पाहायला मिळतात. समोरच्या भिंतीतील स्तंभांवर ब्रह्मा व विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत प्राकारातील स्तंभ चौकोनी षटकोनी अष्टकोनी असून त्यावर विष्णूचे अवतार आणि नृत्यांगना यांच्या सुंदर मूर्ती आहेत त्याच्या वास्तुशैली वरून तज्ञांच्या मते ते दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावे.


मंदिराचा चौथरा विस्तीर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.   नक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी याची रचना आहे. गाभारा साधा असून कोपऱ्यात अर्धे खांब आहेत.  गाभार्‍यात शिवलिंग आणि त्यासमोरील मंडपात नंदी विराजमान दिसतो. नंदीच्या गळ्यात माळ व पाठीवर झूल आहे पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. मंदिराच्या सभामंडपाचे स्तंभ उत्कृष्ट नक्षीकामाचे नमुने आहेत ते स्तंभ सरळ आहे इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ निमुळते झालेले नाहीत. मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षीकामाबरोबरच उत्तम मूर्तिकामसुद्धा या खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिरांप्रमाणे वर चौकटीजवळ निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर पाहून मन मोहून जातं. गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही भग्न शिल्प आपल्याला दिसतात पण दगडांच्या झालेल्या झिजेमुळे ती नीट ओळखता येत नाहीत. 


या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर दगडात कोरलेले अप्रतिम मकर तोरण हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या मंदिराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरलेलं मकर तोरण. मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम कलाकुसर असलेले तोरण लक्ष वेधून घेते. ह्या अर्ध वर्तुळाकार तोरणाची सुरुवात दरवाज्याच्या खांबांपासून होते. दोन्ही खांबांवर दोन मकर असून मध्ये गंधर्व कीचक यांचे तोरण आहे. नैसर्गिक झीज सोडली तर हे तोरण फारच अप्रतिम आहे. असे हे खरोखरंच ऐश्वर्य असलेलं प्राचीन ऐश्वर्येश्वर मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्यांनी पाहावे असेच आहे.


ऐश्वर्येश्वर मंदिर (आधीच्या पोस्ट्स) 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/12/blog-post_60.html

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/11/blog-post_29.html

  

गोंदेश्वर मंदिर 

https://nashikpratibimb2.blogspot.com/2021/01/blog-post_17.html

https://nashikpratibimb2.blogspot.com/2020/11/blog-post_9.html













































No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....