Wednesday, 25 October 2023

वल्कले परीधान केलेले प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई

 विजयादशमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरात प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मणाच्या मूर्तींना विशेष वस्त्र परिधान करण्यात येते. ह्या वस्त्राना वल्कले म्हणतात.  प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सितामाई जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा त्यानी वल्कले  परिधान केली होती. वृक्षांच्या सालींपासून हे वस्त्र बनवतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे देव रथात आरूढ होऊन सिमोल्लंघन करण्यासाठी चालले आहे असा देखावा मांडण्यात येतो व देवांना पारंपारिक आभूषणे  देखील चढवण्यात येतात. 








Thursday, 19 October 2023

स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक



 स्वातंत्र्यलक्ष्मी, अभिनव भारत मंदिर, नाशिक 



ब्रिटिशांच्या दास्यातून भारतमातेची मुक्तता या अनिवार ध्यासातूनच सावरकरांना ’स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हा महन्मंगल मंत्र स्फुरला. या मंत्राच्या सिध्दीसाठी त्यांनी ’अभिनव भारत’ या क्रांति-संघटनेची संस्थापना केली. सावरकर लंडनला गेले, तेही त्यासाठीच. हि कथा आहे सावरकरांनी स्थापन केलेल्या स्वातंत्र्यलक्ष्मीची व अभिनव भारत संस्थेची. 


१८९८ मध्ये भगूर व आजूबाजूच्या गावांमध्ये प्लेगचा उद्रेक झाल्याने बाबाराव व तात्याराव सावरकर हे दोघे सावरकर बंधू नाशिकच्या तीळभांडेश्वर गल्ली येथील वर्तकांच्या वाड्यात वास्तव्यास आले. सुरुवातीला वर्तकांच्या वाड्यात राहणारे सावरकर कुटुंबीय नंतर तो वाडा सोडून दातारांच्या घरात वास्तव्य करू लागले. ही सर्व मंडळी राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम या राष्ट्रीय भावनेने भारावलेली होती. ‘आपला भारत देश या जुलमी व अत्याचारी ब्रिटिश राजवटीत अडकला आहे. भारतीय जनता भरडली जात आहे. आपण आपल्या परीने जमेल तशी सशस्त्र क्रांती करून इंग्रजांच्या विरोधात लढले पाहिजे,‘ असे या सर्वांचे ठाम मत होते. यातूनच नोव्हेंबर १८९९ मध्ये या सर्व मित्रांनी म्हणजेच सावरकर बंधू, दातार बंधू, वर्तक, चिपळूणकर, म्हसकर, पागे या सर्वांनी मिळून ‘राष्ट्रभक्त समूह‘ ही गुप्त संघटना स्थापन केली. याची प्रकट शाखा म्हणून दि. १ जानेवारी १९०० ला ‘मित्रमेळा’ या संस्थेची स्थापना केली. ‘मित्रमेळा’च्या बैठकांमध्ये तत्कालीन इंग्रज करत असलेले जुलूम-जबरदस्ती व अन्याय कृतींबाबत चर्चा केली जात असे. 


‘स्वातंत्र्य हेच साध्य आणि सशस्त्र क्रांती हेच साधन’ हे ‘मित्रमेळ्या’चे ब्रीदवाक्य होते. ‘मित्रमेळ्या‘त जातीभेद नव्हता, शिवजयंती व गणेशोत्सव हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने ‘मित्रमेळा‘ समूहातर्फे नाशिकमध्ये साजरे केले जात. विनायक सावरकर हा तरुण मुलगा तेथीलच जवळील पिंपळाच्या पारावर उभा राहून देशाची सध्याची परिस्थिती आपल्या भाषणातून सांगत असे. ‘देश स्वतंत्र व्हावा, यासाठी सर्वांनी आपापसातील वैयक्तिक हेवेदावे विसरून राष्ट्रभक्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून इंग्रजांविरोधात लढले पाहिजे,‘ असे हा तरुण विनायक सर्व नाशिककरांना सांगत असे. विनायकाची भाषणे ऐकण्यासाठी दुरून लोक नाशिकला येत असत. पिंपळपार परिसरामध्ये जमत असत. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, टिळक महाराज की जय’ अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर दुमदूमून जात असे. 


 ‘मित्रमेळा‘च्या सदस्यांची संख्या व शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. याचवेळी वयाच्या १८व्या वर्षी एप्रिल महिन्यात १९०१ मध्ये तात्यारावांचं लग्न जव्हारच्या रामचंद्र त्र्यंबक अर्थात भाऊराव चिपळूणकरांची मुलगी यमुनाशी झालं. लग्नानंतर मॅट्रिकच्या परीक्षेसाठी वीर सावरकर पुण्यात दाखल झाले. मॅट्रिकची परीक्षा देऊन १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथेही समविचारी तरुणांना संघटित केले. १९०४ मध्ये सावरकरांनी नाशिकमध्ये देशस्वातंत्र्याची शपथ घेतलेल्या ‘मित्रमेळ्या‘च्या २०० सदस्यांचा मेळावा भरवला. या मेळाव्यातच गुप्त क्रांतिकारक संघटनेचे नामकरण ‘अभिनव भारत’ असे करण्यात आले. इटलीचा जोसेफ मॅझिनी यांच्या ‘यंग इटली’ या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. हळूहळू ‘अभिनव भारत‘च्या शाखांचे जाळे भारतभरच नव्हे, तर देशभर पसरले.


१९०४ मध्ये वीर सावरकर ‘एलएलबी’च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ऑक्टोबर १९०५ मध्ये त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केली आणि अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे, तर अवघ्या देशाने या कृतीचे कौतुक व समर्थन केले. यानंतर भारताला स्वातंत्र्य हवे आहे, हे आपल्यावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांना कळावं, सार्‍या जगाला कळावं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावं ही वीर सावरकर यांची इच्छा होती. लंडनमध्ये येणार्‍या इतर देशांच्या क्रांतिकारकांना त्यांना भेटायचं होतं, शस्त्रे जमवायची होती, बॉम्ब तयार करायची कृती मिळवायची होती व पुढेही शस्त्रे व हे बॉम्ब बनवायची कला भारतातील आपल्या सहकार्‍यांपर्यंत पोहोचवायची होती आणि म्हणूनच ते लंडनला गेले. 


दि. २१ डिसेंबर, १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग बघण्यासाठी नाशिकचा क्रूर जिल्हाधिकारी जॅक्सन आला होता. अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांनी जॅक्सनचा वध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व नियोजित कट करून अनंत कान्हेरे या १७ वर्षीय युवकाने जॅक्सनचा गोळ्या घालून वध केला. यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अभिनव भारत’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. नाशिकच्या अनेक तरुणांना या काळात अटक करण्यात आली व अत्यंत जुलूम-जबरदस्ती करून त्यांना कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आले होते. अनंत कान्हेरेला दिलेले पिस्तुल हे लंडन येथून सावरकरांनीच पाठवले आहे, असा आरोप इंग्रजांनी केला व सावरकरांना अटक झाली.


तत्पूर्वी ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना’ ही कविता केवळ छापली म्हणून बाबाराव सावरकरांना ‘अभिनव भारत‘ मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली येथून नाशिकच्या सेंट्रल जेलपर्यंत अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हातापायात बेड्या, तोंडाला काळे फासून बाबाराव सावरकर यांची धींड काढण्यात आली होती. नाशिकमध्ये ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला म्हणून अनेक तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या सर्वांचा बदला म्हणून अनंत कान्हेरेने जॅक्सनचा वध केला होता. यानंतर सावरकरांना अटक झाली. पुढे अंदमान येथे काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ११ वर्षे अंदमानात शिक्षा भोगल्यानंतर पुढे सावरकर बंधूंची सुटका झाली व त्यांना १३ वर्षे रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. पुढे दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.


दि. १० ते १२ मे, १९५२ मध्ये ‘अभिनव भारत’ संघटनेचा सांगता समारंभ पुण्याच्या एसपी कॉलेज येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दि. १० मे, १९५३ या दिवशी वीर सावरकरांनी नाशिकला ‘अभिनव भारत मंदिरा‘ची स्थापना केली. या दरम्यान नाशिकच्या सावरकरप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जंगी मिरवणूक काढली. वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, गुलालाच्या उधळणीत ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो’ या घोषणांनी अवघे नाशिक दुमदूमून गेले. मिरवणूक ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत आली.


सावरकर व सर्व नाशिककर जनतेने येथे प्रवेश केला. नगरपालिकेच्यावतीने आयोजित समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यावर नाशिकच्या ‘अभिनव भारत मंदिर‘ या वास्तूत सावरकरांनी स्वातंत्र्यलक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना केली होती. या देवीच्या चारही हातांमध्ये शस्त्रे आहेत. देवीच्या या स्वरूपाचं पूजन, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक भारतीयाने करावं, असे सावरकर यावेळेस म्हणाले होते. त्याचप्रमाणे याच वास्तूमध्ये १८५७च्या समरात ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं अशा क्रांतिकारकांच्या आत्म्यांना शांती मिळावी व त्यांचे स्मरण कायम नवीन पिढीला व्हावे, या हेतूने सावरकरांनी एका तुळशी वृंदावनाची स्थापना केली. सावरकरांनी दि. ११ मे, १९५३ ला आपल्या जन्मगाव भगूर येथे आपल्या अष्टभुजा देवीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मघराचे दर्शन घेतलं आणि तिथे भव्य व विराट अशी सभा झाली. यानंतर मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे येणे नाशिक व भगूर येथे कधी झाले नाही.


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदीर, नाशिक येथील स्वातंत्र्यलक्ष्मीची मुर्ती १९५६ छायचित्राखालिल अक्षर बहुदा स्वत: स्वातंत्र्यवीरांचे आहे. (हे मूळ फोटोच्या मागे लिहिले आहे)पोस्ट साभार- चंद्रशेखर साने








Saturday, 14 October 2023

नाशिकची ग्रामदेवता कालिका माता

 नाशिक शहराची ग्रामदेवता असलेले कालिका मातेचे मंदिर 


नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता. 


मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. 


येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.


स्वातंत्र्यपूर्वकालिन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या चळवळीपासून श्री कालिका मंदिर येथे नवरात्र यात्रा भरू लागली व गावातील सर्व मंडळी, भाविक व स्वातंत्रसैनिक एकत्र जमू लागले. स्वातंत्रच्या कल्पनेबरोबर धार्मिक कार्यक्रम मधुन सीमोल्लंघन करण्याकरीता या देवस्थानापर्यंत येऊ लागले. त्यावेळेपासून दरवर्षी यात्रेचे दिवसेंदिवस जास्त स्वरुप येऊ लागले व हजारोंच्या संख्येने लोक यात्रेस व दर्शनास येऊ लागले.


पूर्वी कालिकेच्या मंदिराचा आतला भाग अतिशय लहान होता. बाहेरचा सभा मंडपही पत्र्याचा व लहान असल्यामुळे यात्रेच्यावेळी भाविकांना दर्शन घेताना अत्यंत अडचण होई. त्यामुळे मंदिराच्या विस्ताराची मागणी पुढे आली. जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे.  मंदिराच्या आवारातील उद्यानात  कालिका मातेचे परमभक्त असलेले रामकृष्ण परमहंस व त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. 


मनाला शांतता मिळवून देणारे मंदिर कसे सुंदर, प्रशस्त, निवांत व स्वच्छ असावे याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे नाशिकचे श्रीकालिका मंदिर.

सध्याचे कालिका मंदिर 


महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती यांच्या देखण्या मूर्ती 



अठराव्या शतकातील कालिका मंदिराचे कल्पनाचित्र 







Wednesday, 6 September 2023

मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर

 आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जाणून घेऊया दुर्मिळ  व एकमेवाद्वितीय अशी मूर्ती असलेले मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर  




दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावाचे मुख्य दैवत आहे श्रीकृष्ण. या गावातील श्रीकृष्णाच्या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे.  ते म्हणजे येथे असलेली गोपालकृष्ण स्वरूपातील अष्टबाहू मूर्ती. या मूर्तीची प्रतिष्ठापना नेमकी कधी झाली अज्ञात आहे. मात्र पुरातनकाळापासून ही वैशिट्यपूर्ण मूर्ती असलेल्या या मंदिरात येथील ग्रामस्थ गोपाळकृष्णाची मनोभावे आराधना करीत आहेत.  


मराठाकालीन शैलीतील दुमजली काष्ठ सभामंडप असलेले हे मंदिर पाहताक्षणीच प्रेमात पडावे असे आहे. या मंदिराची तीन मजली इमारत काष्ठवास्तुशैलीचा उत्तम नमुना असून पाच खण रूंद व सात खण लांब असे हे मंदिर आहे. या सभामंडपातील गाभाऱ्यात ही देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे. गाभाऱ्यावर ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत. 


गाभाऱ्यातली शाळीग्राम पाषाणातील अष्टबाहू गोपालकृष्ण मूर्ती  अतिशय देखणी व मंत्रमुग्ध करणारी आहे.  कृष्णाने एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला आहे, दोन हातात मंत्रमुग्ध करणारी मुरली, इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, मोशृंग इत्यादी आयुधे आहेत. कमरेस लंगोट त्यावर घागऱ्यास दागीनापट्टा आहे. कृष्णाच्या अंगाभोवती असणाऱ्या कालियाचा विळखा अन् तो कृष्णाच्या कानाला दंश करतो आहे. चरणकमलाजवळ दोन गोपी असून, त्यापैकी एक मृदुंग वाजवीत आहे. तर दुसरी सनई वादन करीत आहे. शेजारी दोन सवत्स धेनु आणि गरूड उभे आहेत. 



या मूर्तीविषयी एक आख्यायिका इथे प्रचलित आहे. प्राचीन काळी केव्हातरी एक मूर्तीकार कन्याकुमारीहून उज्जैनला जाण्यासाठी एका रात्री मोहाडीत थांबला होता. सोबत त्याने तयार केलेली ही अष्टबाहू गोपाळकृष्णाची मूर्ती होती. पुढे जाण्यासाठी सकाळी जेव्हा तो तयार झाला तेव्हा जमिनीवर ठेवलेली अष्टबाहू गोपालकृष्णाची मूर्ती त्या मूर्तीकारास उचलता येईना. मूर्तीकारांनी कुऱ्हाडीचा प्रहार करून मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही हलली नाही. तेव्हा मूर्तीकार ही मूर्ती गावातच सोडून गेले. आजही कुऱ्हाडीचा प्रहार मूर्तीच्या मागील बाजूस पहायला मिळतो,  

हे अष्टबाहू कृष्णाचे रूप भारतात इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. त्यामुळे मोहाडीतील ही या दुर्मिळ कृष्णमूर्तीचे वैभव हे मोहाडीचे वैशिष्ट्य आहे. साधारण पंचाहत्तर वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. गावात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उतसाहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो.  पाहण्यासारखा असतो. या जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने अनेक वर्षांपासून होत असलेली मोहाडीची श्रीकृष्ण व्याख्यानमालाही रसिकांसाठी एक आकर्षण असते. 

Monday, 4 September 2023

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माहात्म्य

 ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माहात्म्य 

श्रावण महिना लागला की, असंख्य शिवभक्तांना ओढ लागते ती ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेची.  त्यातही श्रावणातील तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची लाखो भाविक आतुरतेने वाट पाहतात. या प्रदक्षिणेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविक या खडतर प्रदक्षिणेत सहभागी होतात. एवढेच नव्हे तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविक गर्दी करतात. वास्तविक पाहता, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी चालते, असे ज्येष्ठ मंडळी सांगतात. मात्र कालांतराने श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार हा प्रदक्षिणेचा पर्वकाळ मानला गेला. त्यामुळे प्रदक्षिणा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारीच करावी, हा नवा पायंडा वर्षानुवर्षे रूढ झाला आहे. सध्याच्या काळात  “फेरी” हा शब्द प्रचलित झाला आहे मात्र धर्मशास्त्रानुसार ही प्रदक्षिणाच, कारण यात संपूर्ण ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातली जाते. अनादिकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत असून पुण्यप्राप्तीसाठी व पापक्षालनासाठी प्रदक्षिणा करावी असे म्हणतात. 


पौराणिक आख्यायिकेनुसार, ब्रम्हगिरी पर्वत हा शिवस्वरूप असून ब्रम्हगिरी पर्वत स्वयंभु पंचमुखी शिवलिंग आहे. आधी हा पर्वत शिवगिरी ह्या नावाने ओळखला जायचा. ब्रम्हदेवाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने ब्रम्हदेवास वरदान दिले की तुमचे नाव धारण करूनच मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन तेव्हापासुन ह्या पर्वताचे नाव ब्रम्हगिरी पर्वत असे पडले. ह्या पर्वताला एकुण पाच शिखरे असून त्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते.


नवक्रोशात्मकं लिंगं त्र्यंबकस्य प्रतिष्ठितम । 

या श्लोकानुसार नऊ कोस लांबी असलेला ब्रह्मगिरी पर्वत हाच त्र्यंबकेश्वराचे शिवलिंग आहे. व याठिकाणी साक्षात शिवशंकरासोबत ब्रह्मदेव व हरिहर पर्वत रूपाने भगवान विष्णू ही विराजमान असल्यामुळे अशा प्रकारे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते व हजारो वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळते अशी जनमानसात धारणा आहे.


आणखी एका पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला ज्यामुळे अनेक जिवजंतु, पशु-पक्षी, अकारण मरण पावले आणि चारही दिशेला त्राही त्राही झाली. पाण्याचा भयंकर दुष्काळ पडला तेव्हा गौतमऋषी व त्यांच्या सौभाग्यवती अहिल्यामातेने भगवान वरुणदेवाची पुजा अर्चना केली व त्यांना प्रसन्न करून घेतले.

त्यांनी गौतमऋषींना एक उपाय सुचविला, मुनिवर तुम्ही एक खड्डा तयार करा आणि मग मी तो खड्डा अक्षय शितल पाण्याने तुडुंब भरून देईन. नंतर या खड्ड्याचे पाणी कधीही संपणार नाही. गौतम ऋषींनी तसेच केले आणि बघता बघता तो खड्डा अक्षय शितल पाण्याने भरून गेला. या खड्ड्याचे तलावात रूपांतर झाले. या गौतम तलावाजवळ आजूबाजूचे साधुसंत येऊ लागले व नंतर तेथेच निवास करून राहु लागले. हळूहळू गौतम तलावाजवळ वस्ती होत गेली. 


एके दिवशी गौतम तलावाजवळ पाणी भरण्यावरून माता अहिल्याचे दुसऱ्या ऋषी पत्नीबरोबर भांडण झाले. ही गोष्ट अन्य ऋषीपत्नींनी वाढवून आपल्या ऋषीपतींना सांगितली. तेव्हा ऋषीपतींनी आपापल्या सौभाग्यवतींना आश्वासन केले की, आम्ही सगळे मिळून गौतम ऋषींना त्र्यंबकेश्वर स्थान सोडून जाण्यास भाग पाडतो मग तुम्हा लोकांना पाणी भरायला कोणताही त्रास होणार नाही. सर्व ऋषीमुनींनी श्री गणेशांची आराधना करून त्यांना विनंती केली की गौतम ऋषींवर कोणत्याही पापांचा दोष लावा. त्यामुळे गौतम ऋषी कलंकित होऊन त्र्यंबकेश्वर क्षेत्र सोडून लांब जातील. तेव्हा गणेश तथास्तु म्हणाले. 


नंतर गौरीपुत्र गणेशाने गायीचे रूप धारण केले व गौतम ऋषींच्या शेतावर चरायला गेले. गौतम ऋषींनी गायीला चरताना बघितले व तिला हुसकवण्यासाठी दर्भाच्या काडीने मारले. दर्भाच्या काडीचा स्पर्श होताच गाय मरण पावली तेव्हा सर्व ऋषी तेथे आले आणि त्यांनी गौतम ऋषींवर गोहत्या पापांचा दोष लावला. असाह्य गौतम ऋषीमुनींनी अन्य ऋषींना या महापाप दोषांचे निवारण विचारले. तेव्हा सगळे ऋषीगण म्हणाले, तुमच्याकडे फक्त दोनच उपाय आहेत एकतर तुम्ही ब्रम्हगिरी पर्वत सोडून जाणे नाहीतर तीन वेळा पृथ्वीची आणि १०१ वेळा शिवस्वरूप ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा करून नाथांचे नाथ भोलेनाथाला प्रसन्न करून त्यांच्या जटेतील गंगामातेला ब्रम्हगिरीत आणून त्या पवित्र जलधारेने स्नान करा आणि त्या पाण्याने शिवस्वरूप १०१ शिवलिंगावर अभिषेक करा. तेव्हा तुम्ही या गोहत्येच्या महापापातून दोषमुक्त होवू शकाल.  गौतम ऋषींनी समस्त ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीची ३ वेळा प्रदक्षिणा व ब्रम्हगिरी पर्वताची १०१ वेळा प्रदक्षिणा करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेतले. तत्पश्चात भगवान आदिनाथ भोलेनाथ प्रगट झाले आणि म्हणाले, मुनीवर गौतम आपण निष्पाप आहात. तुमचा छळ केला आहे. मी तुमच्या गोहत्या महापाप दोषमुक्ती करिता आपल्याला गंगा अवश्य प्रदान करील.  त्यानुसार ब्रह्मगिरी पर्वतावर महादेवाच्या जटेमधून गंगास्वरूप गोदावरी प्रकट झाली. 


श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना आपल्या ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताई या भावंडांसमवेत याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि पुढे त्यांनी ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून भागवत धर्माची स्थापना केली. 


ही प्रदक्षिणा कधी करावी, या विषयावर देखील अनेक तर्क सांगितले जातात. परंतु, धर्मशास्त्रानुसार श्रावणातल्या सोमवारी व त्यातल्या त्यात तिसऱ्या सोमवारी ही प्रदक्षिणा करावी अशीच परंपरा इथे प्रचलीत आहे. अनेक जण श्रावणाच्‍या तिस-या सोमवारची प्रदक्षिणा रविवारी संध्‍याकाळपासूनच सुरू करतात. त्यामुळे प्रदक्षिणेचा शीण जाणवत नाही असे अनेकांचे मत आहे. 


प्रदक्षिणेचे मार्गानुसार तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अंतराने छोटी असलेली परंतु सध्या सर्वात जास्त प्रचलित असलेली ब्रम्हगिरी प्रदक्षिणा.  या प्रदक्षिणा मार्गाचे अंतर साधारणपणे २२ ते २५ किमी पर्यंत आहे. दुसरा मार्ग म्हणजे हरिहर पर्वतासहित प्रदक्षिणा. या मार्गाने प्रदक्षिणेचे अंतर साधारणपणे ३७ ते ३८ किमी पर्यंत आहे तर सर्वात मोठी प्रदक्षिणा म्हणजे अंजनेरी, हरिहर व ब्रह्मगिरी पर्वतांसह प्रदक्षिणा. हा मार्ग साधारणपणे  ५८ ते ६० किमी अंतराचा आहे. जास्तीत जास्त भाविक पहिल्या प्रकारची छोट्या अंतराचीच प्रदक्षिणा करतात. 


ब्रम्हगिरी प्रदक्षिणा सुरुवात करताना प्रथम कुशावर्ता तीर्थावर जाऊन स्नान करायचे असते. पहाटे उठून कुशावर्त तीर्थावर स्नान करून भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा आरंभ करावी. प्रयागतीर्थ, पहिणे बारी, भिलमाळ, कोजुर्ण धाडोशी गांवावरुन तेथे उजव्या हाताने वळण घेऊन गौतमाचा धस (गौतमाचे मंदिर) तळेगांव धरणाजवळून नमस्कार करून पुढे सापगांव शिवार, गणपती बारी, पुन्हा त्र्यंबकेश्‍वर असा छोट्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे. या प्रदक्षिणेदरम्यान ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत, पंचलिंंग डोंगर, गौतम धस, लग्नस्तंभ डोंगर, दुर्गा भांडार, मेटघेर किल्ला अशा डोंगरांनाही प्रदक्षिणा होते.  प्रदक्षिणेदरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिव स्वरूप ब्र्म्हगिरीस पूर्वाभिमुख होत साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. या प्रदक्षिणा मार्गात प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, भागिरथी तीर्थ, अंकुर तीर्थ, नाग तीर्थ, राम तीर्थ, बहुतीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ इ. अनेक तीर्थांचे दर्शन होते. पूर्वी या मार्गात एकूण १०८ तीर्थ होते ते म्हणतात. मात्र अनेक तीर्थ आता काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. 


पुर्वी शेतातून मिळेल तो रस्ता काढीत भाविक ही प्रदक्षिणा पुर्ण करत असत. मात्र आता हा संपूर्ण मार्ग सिमेंटच्या रस्त्याने बांधून काढण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना हि प्रदक्षिणा आता पूर्वीपेक्षा सुखकर झाली असली तरी जंगल आणि भातशेतीतून, चिखलातून पायवाटेद्वारे होणाऱ्या प्रदक्षिणेचे मजा येत नाही. चिखल माती तुडवत चालण्याची मजा कमी झाली आहे.


श्रावणात केल्‍या जाणा-या या प्रदक्षिणेच्या मागे जसे एक पौराणिक व धार्मिक महत्व आहे, तसेच निसर्गाशी जवळीक साधून निसर्गसौंदर्याचा असीम व अनोखा आनंदही या प्रदक्षिणेने मिळतो. ऐन पावसाळ्यात हि प्रदक्षिणा असल्याने पावसाची रिमझिम सतत चालूच असते. बहुतांश वेळेला दुतर्फा असलेले डोंगर अर्धेअधिक धुक्यांनी झाकलेलेच असतात. सभोवार सततच्या पावसामुळे खळाळणारे ओहोळ, झरे आणि डोंगरमाथ्यावरून झेपावणारे असंख्य धबधबे भाविकांना स्वर्गसुखाचीच अनुभूती देतात.   








Sunday, 16 July 2023

जगात सर्वांना मोहिनी घालणारा नासिक(नसक Nassak Diamond) हिरा नेमका कसा आहे?

Eye of Shiva म्हणजे महादेवाचा डोळा म्हणवला जाणारा हा हिरा त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुवर्णमुखवटा व प्राचीन रत्नजडित मुकुटात जडलेला होता असे मानतात. १८१८ साली त्रंबकेश्वर येथुन ब्रिटिशांनी त्रंबकराजचा खजिना लुटला. यात आपल्या नाशिकचा वारसा असलेला नासक हिरा ही लुटला गेला. त्यानंतर या हिऱ्याचा जगप्रवास सुरू झाला व त्याच्या सोंदर्याने सर्व जगाला वेडं करून सोडले.  


असा हा आपला नासिकचा हिरा नेमका कसा होता, त्याची रोमांचक कहाणी काय आहे हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये...  



https://youtu.be/sa_tgZZjkhU

https://youtu.be/sa_tgZZjkhU

https://youtu.be/sa_tgZZjkhU


Monday, 19 June 2023

त्र्यंबकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे स्मृतीस्थळ

 श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दिशेच्या दर्शनबारीच्या समोर निर्माण करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे स्मृतीस्थळ. 

 

सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारीसाठी जाताना ३१ डिसेंबर १६६३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्र्यंबकराजाला अभिषेक करून दर्शन घेतले होते व हा परिसर मुघलांच्या ताब्यातून सोडवण्याचा संकल्प केला होता, तर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी मुघल बादशहा औरंगजेब याने विध्वंस केलेल्या जुन्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून सध्याच्या मंदिराची उभारणी केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज व पेशवे यांचे एकत्रित असलेले हे कदाचित पहिलेच व एकमेव स्मारक असावे. 

हा सर्व इतिहास श्री त्र्यंबकेश्वर  ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मंदिरात जाण्यापूर्वीच या स्मृतिस्थळाचे दर्शन घेताना ज्ञात होत आहे. 



सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...