आज श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जाणून घेऊया दुर्मिळ व एकमेवाद्वितीय अशी मूर्ती असलेले मोहाडीचे अष्टबाहू गोपालकृष्ण मंदिर
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावाचे मुख्य दैवत आहे श्रीकृष्ण. या गावातील श्रीकृष्णाच्या मंदिराचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे येथे असलेली गोपालकृष्ण स्वरूपातील अष्टबाहू मूर्ती. या मूर्तीची प्रतिष्ठापना नेमकी कधी झाली अज्ञात आहे. मात्र पुरातनकाळापासून ही वैशिट्यपूर्ण मूर्ती असलेल्या या मंदिरात येथील ग्रामस्थ गोपाळकृष्णाची मनोभावे आराधना करीत आहेत.
मराठाकालीन शैलीतील दुमजली काष्ठ सभामंडप असलेले हे मंदिर पाहताक्षणीच प्रेमात पडावे असे आहे. या मंदिराची तीन मजली इमारत काष्ठवास्तुशैलीचा उत्तम नमुना असून पाच खण रूंद व सात खण लांब असे हे मंदिर आहे. या सभामंडपातील गाभाऱ्यात ही देखणी मूर्ती स्थापित केलेली आहे. गाभाऱ्यावर ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज व संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या आहेत.
गाभाऱ्यातली शाळीग्राम पाषाणातील अष्टबाहू गोपालकृष्ण मूर्ती अतिशय देखणी व मंत्रमुग्ध करणारी आहे. कृष्णाने एका हाताच्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला आहे, दोन हातात मंत्रमुग्ध करणारी मुरली, इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, मोशृंग इत्यादी आयुधे आहेत. कमरेस लंगोट त्यावर घागऱ्यास दागीनापट्टा आहे. कृष्णाच्या अंगाभोवती असणाऱ्या कालियाचा विळखा अन् तो कृष्णाच्या कानाला दंश करतो आहे. चरणकमलाजवळ दोन गोपी असून, त्यापैकी एक मृदुंग वाजवीत आहे. तर दुसरी सनई वादन करीत आहे. शेजारी दोन सवत्स धेनु आणि गरूड उभे आहेत.
या मूर्तीविषयी एक आख्यायिका इथे प्रचलित आहे. प्राचीन काळी केव्हातरी एक मूर्तीकार कन्याकुमारीहून उज्जैनला जाण्यासाठी एका रात्री मोहाडीत थांबला होता. सोबत त्याने तयार केलेली ही अष्टबाहू गोपाळकृष्णाची मूर्ती होती. पुढे जाण्यासाठी सकाळी जेव्हा तो तयार झाला तेव्हा जमिनीवर ठेवलेली अष्टबाहू गोपालकृष्णाची मूर्ती त्या मूर्तीकारास उचलता येईना. मूर्तीकारांनी कुऱ्हाडीचा प्रहार करून मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती काही हलली नाही. तेव्हा मूर्तीकार ही मूर्ती गावातच सोडून गेले. आजही कुऱ्हाडीचा प्रहार मूर्तीच्या मागील बाजूस पहायला मिळतो,
हे अष्टबाहू कृष्णाचे रूप भारतात इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. त्यामुळे मोहाडीतील ही या दुर्मिळ कृष्णमूर्तीचे वैभव हे मोहाडीचे वैशिष्ट्य आहे. साधारण पंचाहत्तर वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. गावात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उतसाहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. पाहण्यासारखा असतो. या जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने अनेक वर्षांपासून होत असलेली मोहाडीची श्रीकृष्ण व्याख्यानमालाही रसिकांसाठी एक आकर्षण असते.
No comments:
Post a Comment