Monday, 15 March 2021

जागतिक ग्राहक हक्क दिन

 आज जागतिक ग्राहक हक्क दिन...

ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे. 

१९६२ साली या दिवसाची सुरुवात झाली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या एका भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षिततेचा, माहितीचा, निवडीचा आणि प्रतिनिधित्व असे चार हक्क प्रदान केले. काळानुरूप ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा आणि पाठपुरावा करून मूलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखी चार ग्राहक हक्कांना जगभरात मान्यता मिळाली. अशाप्रकारे हे आठ ग्राहक हक्क १५ मार्च रोजी जगभर मान्य झाले आहेत. 

जागतिक स्तरांवर त्याचा पाठपुरावाही केला. त्याला यूनेस्कोकडून मान्यता मिळवली. त्या तेव्हापासून दरवर्षी १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा आणि पाळला जातो.

वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करून घ्यावी. वस्तूची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. 

वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी आहे.

1 फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.

2 वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.

3 वस्तू खरेदी करताना बिल मागावे.

4 सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.

5 डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.

6 वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.

7 पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.

8 ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.

9 वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.

१15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. या निमित्ताने

ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jaagograhakjago. gov.in ही वेबसाइट सादर केली आहे. या वेबसाइटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते.

त्याशिवाय ग्राहकांचे अधिकार, तक्रार, सर्व माहिती मिळू शकेल. या वेबसाइटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणं सोपे आहे. ग्राहक टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करू शकतात. त्याच बरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाइट द्वारे ट्रेक करू शकतात.

ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, वस्तूची गुणवत्ता, प्रमाण आणि दर्जा जाणून घेण्याचा अधिकार आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत आहे.

म्हणूनच ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि तक्रार निवारण प्रणालीची जाणीव होण्यासाठी व जागरूकता येण्यासाठी दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो. चला, सुजाण व जिज्ञासू ग्राहक बनू या.






Sunday, 14 March 2021

सुरेश भट

मराठी भाषेत #गझल हा काव्यप्रकार रुजविणारे लोकप्रिय कवी, गीतकार गझलसम्राट 'सुरेश श्रीधर भट' यांचा आज स्मृतिदिन.


अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. श्रीधर-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीच वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती.
अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्यांदा परीक्षेला बसून तिसर्या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती.
पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय!
१९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.
शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती. मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्या मुलाला डॉ. श्रीधर यांनी बाजाची पेटी आणून दिली. पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.
पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने व्यायाम करू लागला.मवेळ बराच लागला पण दंडबैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला. नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.
अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता. तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी. सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे. या व्यायामाचा फायदा पुढे जेव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेव्हा मांडी घालून तासन् तास बसण्यासाठी झाला. सुरेशने केवळ शारीरिकच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले.
कधीतरी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला. तो वाचून प्रभावित होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं. ‘मालवून टाक दीप’ ते पार ‘केंव्हातरी पहाटे’पर्यंत मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच कवीवर्य सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन आणि म्हणून हे सगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण.
रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी, काफिला, झंझावात, रसवंतीचा मुजरा, सप्तरंग, निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना मानाचा सप्रेम मुजरा! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :
कंठी स्वरेश होता, शब्दी सुरेश होता
उलटवून हरती बाजी, तो जगला नरेश होता
गाजलेल्या मराठी गझल ♻
✒
तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
(सुरेश भट)
✒
मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
(सुरेश भट)
✒
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली
अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
(सुरेश भट)
✒
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
(सुरेश भट)
✒
केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली !
उरले उरात काही , आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे , उचलून रात गेली !
स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
(सुरेश भट)
✒
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
(सुरेश भट)
✒
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
(सुरेश भट)
✒
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले !
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
(सुरेश भट)
#साभार (व्हॉटस अप फाॅरवर्ड)



Saturday, 13 March 2021

दिवाणी व फौजदारी न्यायालय नाशिकरोडची नविन इमारत

आज दिनांक १४ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता दिवाणी व फौजदारी #न्यायालय क. स्तर, नाशिक रोड, जि.#नाशिक न्यायालयाचे नविन इमारतीचे #उद्घाटन दिनांक १४ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता मा. #न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभुदेसाई, न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते आभासी ऑनलाईन (Virtual Inauguration) पद्धतीने संपन्न झाले.

या न्यायालयाची ही अतिशय देखणी व प्रशस्त #इमारत आता न्यायदानासाठी सज्ज झाली आहे. या देखण्या न्यायालयाचे दर्शन घडविणारा हा व्हिडीओ.

(व्हिडीओ सौजन्य - नाशिकरोड बार असोसिएशन)



Thursday, 11 March 2021

जेजुरीच्या मंदिरातील गुप्त शिवलिंग

 श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे बुधवारी मध्यरात्री उघडण्यात आले. वर्षातून फक्त एकदाच म्हणजे केवळ महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. 

खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे.त्रिलोकातील शिवलिंग दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभार्‍यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते. 

मुख्य मंदिराच्या गाभ-यातील शिवलिंगाला भूलोकीचे शिवलिंग म्हणतात, (जेजुरी मुख्य मंदिराच्या तळघरात असलेल्या शिवलिंगाला पाताळातील शिवलिंग म्हणतात तर मुख्य मंदिराच्या कळसामध्ये असलेल्या शिवलिंगाला स्वर्गलोकीचे शिवलिंग म्हणतात.

प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मोजके पुजारी व मानकरी यांच्या हस्ते तिन्ही शिवलिंगावर अभिषेक-पूजा करण्यात आली. शिवलिंगाचे दर्शन घेताना गर्दी होऊ नये म्हणुन यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री तिन्ही शिवलिंगाचे पूजन होऊन दोन कळसातील व भुगर्भातील शिवलिंग मंदिर बंद करण्यात येणार आहे.शनिवारपासून (दि.१३) भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. 















शेवटचा आदर्श महाराजा - महाराजा सयाजीराव गायकवाड

‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ महाराजा सयाजीराव गायकवाड - 

१८६३: बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९)

२८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. 

संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे .  गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.

सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).

सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे.

Wednesday, 10 March 2021

महाशिवरात्र महापर्व

#महाशिवरात्र

माघ महिन्यातील कृ चतुर्दशीला 'महाशिवरात्र' असते. तसतर प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशीला शिवरात्र असतेच पण माघ कृष्ण चतुर्दशीला 'महाशिवरात्र' असे म्हणतात. या दिवशी सर्वजण भगवान शंकराची आराधना, प्रार्थना आणि पुजा करतात. उपवास करतात. कधीही कोणतेही उपास न पाळणारे लोकं सुध्दा आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादश्यांना तसेच महाशिवरात्रीला उपवास हमखास करत असतात.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विशेष यात्रा भरत असतात, तसेच भारतभर जवळपास सर्वच गावागावांत शिवमंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होऊन 'ॐ नमं शिवाय' चा गजर करतात.

पुराणांमध्ये अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराणांमध्ये या महाशिवरात्रीचे महत्व वर्णन केलेले आहे.  'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली ती याच तिथीला मध्यरात्री म्हणुनच या दिवशी भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण करून तांडव नृत्य केले, अशी एक आख्यायिका आहे. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.
      
‘शिवलिलामृत’ मध्ये एक रंजक कथा आहे ती अशी : असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा त्याचा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा, पण, दिवस गेला-संध्याकाळ झाली, तिन्ही सांजा होऊ लागली, सूर्य अस्ताला गेला, तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही अन्‌ शिकार मिळाली नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या! तू शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार.
         
खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे पण सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.” हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली.
       
आता रात्र कशी काढायची या विचारात तो झाडावरच बसुन राहीला. तोच दूरवरच्या मंदिरातून त्याला घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय ऐकु येऊ लागले. नकळत नाममंत्राची त्या पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी बेलाच्या वृक्षाखाली असलेल्या  शिवपिंडीवर पडत होती. त्याच्या नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.
      
तोच ते हरिण आले आणि म्हणाले, “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय.! मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “नाही, मला मारा, ते माझे पती आहेत. त्यांच्या आधी मला मारा. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली "त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे."
        
एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन् पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये.? मी त्यांची शिकार करून पापाचा धनी का होऊ.? पारध्यानं सर्वांनाच जीवनदान दिले.
       यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांना आशिर्वाद देऊन उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन्‌ पारध्याला व्याध नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तोही दिवस होता महाशिवरात्रीचाच.

#आपले_सण_आपले_उत्सव
#ॐनमःशिवाय


श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग 


श्री कपालेश्वर महादेव 

श्री शिवछत्रपतींचे" पहिले मंदिर

शिवराम मंदिर, म्हसरुळ, नाशिक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत "श्री शिवछत्रपतींचे" उत्तर महाराष्ट्रातील किंबहुना आधुनिक काळातील संपूर्ण देशातील पहिले मंदिर नाशिक मध्ये २००१ मध्ये उभारण्यात आले आहे. मात्र बारा वर्षा पुर्वी उभारण्यात आलेले हे मंदिर अजूनही  बरेचसे दुर्लक्षित आहे. बहुतांश नाशिक करांना ह्या मंदिरा विषयी माहिती देखील नाही. 

या मंदिराची उभारणी करणारे डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर महाराज यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या  सेवेत पुरोहित म्हणून कार्यरत होते. याची आठवण म्हणून पूर्णवाद चे प्रसारक डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर महाराज यांनी पूर्ण देश भरात छत्रपती शिवाजी महाराजांची एक हजार मंदीरे स्थापण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार या संकल्पाची मुहूर्तमेढ नाशिक मधुन झाली आणि छत्रपतींचे पहिले मंदिर उभारण्याचा मान नाशिकला मिळाला. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडी घालून बसलेल्या अवस्थेमध्ये जवळपास ३५० किलो वजनाच्या पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माध्यमातुन या मंदिरात रोज पुजा पाठ केला जातो. 

मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिक नगरीत शिव्छत्रपतींचेही मंदिर आहे, ही अवघ्या नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. 

मंदिराचा पत्ता :- रिलायंस पेट्रोल पंप, सौभाग्य मंगल कार्यालया जवळ, महाराजा हॉटेल मागे, दिंडोरी रोड, नाशिक.


Shivram Temple, Mhasrul, Nashik

The first temple of Shri Shiv Chhatrapati, the adorable deity of Maharashtra, has been erected in Nashik. But the temple, which was built twelve years ago, is still neglected. Most Nashik taxes do not even know about this temple. 

Dr. Ramchandra Parnarkar Maharaj, the broadcaster of Purnaism, had resolved to set up a thousand temples of Shivaji Maharaj across the country. It was completed in Nashik and Nashik received the honor of erecting the first temple of Chhatrapati. This temple has an idol of Shiv Chhatrapati in sitting posture, made up of five metals i.e. panch dhatu', weighing approx. 350 kg. Pooja is practiced daily in this temple through the citizens. 

This is very much proud moment for Nashikeites, having a temple of Shiv Chhatrapati.

Address of the Temple: - Reliance Petrol Pump, Near Saughagya Mars Office, Behind Maharaja Hotel, Dindori Road, Nashik.







सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...